नेहा बोरा आणि अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाच्या पद्धतीत आहे 'हा' फरक

फोटो स्रोत, @AISA
पोलिसांनी कितीही कठोर कडक निर्बंध लादले असले, तरी 29 वर्षांच्या नेहा बोरा दिल्लीच्या रस्त्यांवर उतरून आंदोलन करताना दिसतात.
नेहा बोरा या ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (आयसा) राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आयसा ही कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची (मार्क्सवादी-लेनिनवादी) विद्यार्थी संघटना आहे.
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक संस्थापक अभिजीत दिपके यांनी 10 ऑक्टोबरपासून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन करण्याची घोषणा केली होती.
दिपके त्यांचे 2 सहकारी सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यासोबत मुंबईहून दिल्लीला येत होते. मात्र, दिल्ली विमानतळावर विमानातून उतरण्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेण्यात आलं.
दुसरीकडे, शनिवारी (10 ऑक्टोबर) पोलिसांनी आंदोलकांना जिथे आंदोलन होणार होतं, त्या जंतरमंतरवर जाण्यापासून रोखलं. त्यानंतर नेहा बोरा यांनी आंदोलकांना जंतर मंतरपासून जवळपास 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या दिल्ली हाट इथं पुन्हा एकत्र येण्याचं आवाहन केलं.
या नवीन आंदोलनस्थळाकडे जाण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलं, "आज दिल्ली हाट हेच जंतरमंतर बनेल."
त्यानंतर त्या घोषणा देत पुढे निघाल्या आणि इतर लोकही त्यांच्यासोबत सहभागी झाले.
पोलिसांनी त्यांना आणि इतर अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. मात्र, आपण ताब्यात असलो तरी आंदोलन सुरू ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं.

फोटो स्रोत, X/NEHA BORA
ऑनलाइन पोस्ट केलेल्या एका व्हीडिओमध्ये त्यांनी म्हटलं, "मला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी ज्यांना जिथे अडवलं आहे, तिथेच आंदोलन सुरू करावं."
शनिवारी नंतर त्यांची सुटका करण्यात आली.
पोलिसांना कसं चकवलं?
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलनं सुरू आहेत.
मतदार यादीतून 13 कोटींपेक्षा जास्त लोकांची नावं वगळण्यात आली आहेत, असा आंदोलकांचा आरोप आहे. ही संख्या जपानच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे.
पोलीस कोठडीतून बाहेर आल्यानंतर नेहा बोरा यांनी रविवारी (11 ऑक्टोबर) पुन्हा एकदा दिल्ली पोलिसांना चकवा देण्यात यश मिळवलं.

फोटो स्रोत, Prabhat Kumar/BBC
आपल्यासारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीच्या मदतीने दिल्ली पोलिसांना चकवा दिल्याचा दावा नेहा यांनी केला.
कनॉट प्लेस परिसरातल्या गर्दीतून नेहा पळताना दिसल्या. दुसरीकडे आरके आश्रम परिसरात त्यांच्यासारखी दिसणारी एक व्यक्ती पोलिसांशी हुज्जत घालताना दिसली.
नेहा मोर्चात सहभागी झाल्या, धावू लागल्या. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. पोलिसांना चकवून त्या पुन्हा धावायला लागल्या. अखेर पोलिसांनी त्यांना पकडलं.
यावेळी त्यांनी घोषणा दिल्या. त्यानंतर त्यांना ढकलत पोलीस बसमध्ये बसवण्यात आलं. बसमधूनच त्यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली.
पोलिसांच्या ताब्यात असताना पोस्ट केला व्हीडिओ
दुसरीकडे, रविवारी सकाळी पोलिसांच्या ताब्यातून सुटका झाल्यानंतर सीजेपीच्या नेत्यांनी हे आंदोलन आता देशभरात पसरवण्यात येईल, असं सांगितलं.
सीजेपीचे सहसंयोजक आशुतोष रांका यांनी म्हटलं, "लढाईला आता कुठे सुरुवात झाली आहे."
सीजेपीचे नेते दररोज नव्या घोषणा करत असले तरी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात त्यांना नेहा बोरा यांच्याप्रमाणे यश मिळालेलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही नेहा बोरा यांनी आणखी एक व्हीडिओ पोस्ट केला.
या व्हीडिओत त्यांनी सांगितलं, "या बसमध्ये 4 'सेल' आहेत आणि श्वास घेण्याइतकीही जागा नाही. आंदोलकांना ताब्यात घेऊन जाणाऱ्या बसचं रूपांतर तुरुंगात केलं जातंय का?"
केंद्रीय निमलष्करी दलं आणि पोलिसांवर 'आपल्याच नागरिकांविरोधात युद्ध पुकारल्याचा' आरोप त्यांनी केला.
"केवळ ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी इतका हिंसाचार का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मुख्य निवडणूक आयुक्तपदावरून ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, ही मागणीही त्यांनी पुन्हा केली.
दरम्यान, निवडणूक आयोगाने आपल्यावर होत असलेले पक्षपाताचे आरोप सातत्याने फेटाळले आहेत.
सोशल मीडियावर कौतुक
रविवारी (11 ऑक्टोबर) बोरा यांचा पळतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एका युझरने त्यावर कमेंट करताना म्हटलं, "त्या काही दिवस दिसल्या नाहीत, तर पोलीसही 'आज नेहा कुठे आहे?' असा विचार करत असतील."
फेसबुकवर एकाने लिहिलं, "ही मुलगी कोणत्या मातीची बनलीये कळत नाही. प्रत्येक वेळी तिला रोखण्याचा प्रयत्न केला जातो आणि प्रत्येक वेळी ती पुन्हा मैदानात उतरते!"
आणखी एका यूझरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटलं, "अटक व्हायचं, बाहेर यायचं, ठिकाण बदलायचं, रात्रभर भूमिगत राहायचं आणि सकाळी पुन्हा त्याच ताकदीने समोर यायचं. किती ऊर्जा आहे!"
नेहा आपल्या राजकारणातील प्रवेशाचं श्रेय रंगभूमीला देतात. 2019 आणि 2020 मध्ये नागरिकत्व कायद्याविरोधात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनांमुळे आपण राजकारणाकडे अधिक आकर्षित झाल्याचं त्या सांगतात.
रणनीतीमधला फरक
अभिजीत दिपके यांनी 21 जुलैला आंदोलकांची माफी मागितली होती. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी म्हटलं होतं, "मी माझ्या सर्व समर्थकांची माफी मागतो, विशेषतः त्या मुलींची, ज्यांना पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी निर्दयपणे मारहाण केली. आपण यापेक्षा चांगलं करू शकलो असतो. दिल्ली पोलिसांच्या अमानुष कारवाईपासून तुम्हाला वाचवण्यासाठी मी अजून योग्य काम करू शकलो असतो."
मात्र, आपण नेमकं आणखी काय करू शकलो असतो, हे दिपके यांनी स्पष्ट केलं नव्हतं. त्यावेळीही अनेकांनी प्रश्न उपस्थित केला होता की, आंदोलकांना पोलिसांच्या लाठ्यांचा मार बसत असताना अभिजीत दिपके गर्दीत कुठेही दिसले नाहीत.
सीजेपीचं वरिष्ठ नेतृत्व रस्त्यावर उतरून एकत्रितपणे आंदोलन करताना क्वचितच दिसलं आहे.

फोटो स्रोत, Reuters
7 ऑक्टोबरला नेहा बोरा यांनी कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके आणि सौरव दास यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेत त्यांनी 10 ऑक्टोबरला जंतरमंतरवर आंदोलन करण्याची घोषणा केली होती.
त्यावेळी सोशल मीडियावर काही जणांनी नेहा बोरा या अभिजीत दिपके यांच्यापेक्षा अधिक परिपक्व असल्याचं म्हटलं होतं. दिपके यांनीही लोकांच्या या कमेंटला दुजोरा दिला होता.
मात्र, नेहा यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं, "तुलना नाही, तर एकता असायला हवी."
10 ऑक्टोबरच्या आंदोलनानंतर नेहा बोरा यांनी 'फ्लॅश प्रोटेस्ट' म्हणजेच अचानक आणि कमी वेळेत आयोजित केल्या जाणाऱ्या आंदोलनांची रणनीती अवलंबल्याचं दिसलं.
दुसरीकडे, अभिजीत दिपके आणि त्यांचे सहकारी आपली रणनीती जाहीरपणे सांगत राहिले.
त्यामुळे नेहा बोरा यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना बरीच धावपळ करावी लागली. मात्र, सीजेपीच्या नेत्यांना पोलिसांनी सहजपणे ताब्यात घेतल्याचं दिसून आलं.
सीजेपीच्या आंदोलनाची पुढची दिशा काय?
सीजेपीनं आपली रणनीती कायम जाहीरपणे मांडली.
11 ऑक्टोबरला कॉक्रोच जनता पार्टीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आवाहन केलं, "दिल्लीमध्ये सध्या उपस्थित असलेल्या सर्व कॉक्रोचने तिथेच थांबावं. पुढचं आवाहन लवकरच केलं जाईल! दिल्लीबाहेर असलेल्या कॉक्रोचसाठी रेल्वेगाड्या पुन्हा सुरू होत आहेत."
कॉक्रोच जनता पार्टी शांततापूर्ण आंदोलनाचं आवाहन करत आहे. हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत अहिंसक राहील, असं पक्षाचं म्हणणं आहे.
आपण संसद मार्ग पोलीस ठाण्यात जाणार असून जंतरमंतरवर शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी तारीख ठरवण्याची मागणी करणार असल्याचं सीजेपीनं म्हटलं.
दिल्ली पोलीस 24 तासांच्या आत त्यांना आंदोलनाची तारीख सांगू शकतात. नाही तर सीजेपी स्वतःहून आंदोलनाची हाक देईल. मात्र, हा निर्णय घेण्यापूर्वी सीजेपीने आयसा किंवा नेहा बोरा यांच्याशी संपर्क साधला होता की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना लिहिलं, "सीजेपीने सर्वोच्च न्यायालयापर्यंत काढल्या जाणाऱ्या राहुल गांधी यांच्या मोर्चात सहभागी व्हायला हवं. दिशाभूल करणारं राजकारण करणं थांबवा आणि नेहा बोरा यांच्याप्रमाणे संघर्ष करा."
10 ऑक्टोबरला सीजेपीचे नेते दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात घेतले जात असताना राहुल गांधी चेन्नईमध्ये होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



























