सीमेवरील 'घुसखोरी'चं प्रकरण : भारत आणि पाकिस्ताननं एकमेकांच्या राजदूतांना बजावले समन्स

भारत आणि पाकिस्तान यांनी केलेल्या दाव्यांमध्ये लक्षणीय तफावत दिसून येते (प्रातिनिधिक प्रतिमा).
फोटो कॅप्शन, भारत आणि पाकिस्तान यांनी केलेल्या दाव्यांमध्ये लक्षणीय तफावत दिसून येते (प्रातिनिधिक प्रतिमा).
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं शनिवारी (3 ऑक्टोबर) पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाच्या प्रभारी राजदूतांना समन्स बजावून बोलावून घेतलं.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे की, 'पाकिस्तानकडून होणाऱ्या बेकायदेशीर सीमापार घुसखोरीला पाठिंबा' दिल्याबद्दल भारतानं तीव्र निषेध नोंदवला आहे.'

2 ऑक्टोबर 2026 रोजी पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर घडलेल्या घटनेसंदर्भात पाकिस्ताननं केलेले आरोप निराधार आणि द्वेषपूर्ण असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं सांगत, ते पूर्णपणे फेटाळून लावले.

खरंतर पाकिस्ताननं असा दावा केला आहे की, 2 ऑक्टोबर 2026 रोजी आंतरराष्ट्रीय सीमेवरील बेदियन सेक्टरमध्ये भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी दोन पाकिस्तानी नागरिकांना ठार केलं आहे.

भारतानं पाकिस्तानला काय म्हटलं?

भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं अधिकृत निवेदनात म्हटलं आहे, "तीन व्यक्ती भारतीय हद्दीत घुसल्याची माहिती पाकिस्तानला देण्यात आली होती. बीएसएफनं त्या व्यक्तींना पाकिस्तानात परत जाण्याचा वारंवार इशारा देऊनही, ते सीमेवरील कुंपणाच्या दिशेनं पुढे जात राहिले. त्यांच्यामुळे सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाल्यानं बीएसएफला त्यांच्यावर कारवाई करणं भाग पडलं."

मंत्रालयानं म्हटलं आहे की, "या घटनेवरून पाकिस्तानमधून कार्यरत असलेल्या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सशस्त्र टोळ्यांकडून वारंवार होणारी घुसखोरी स्पष्टपणे दिसून येते. पाकिस्तान सरकारला या सीमापार घुसखोरीबाबत, अमली पदार्थांच्या तस्करीबाबत तसेच यामध्ये पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दलांच्या सहभागाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यास सांगण्यात आलं आहे."

परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय सीमेचा आदर राखण्यास आणि दोन्ही देशांमधील संबंधित करारांचं काटेकोरपणे पालन करण्यासही सांगण्यात आलं आहे.

"पाकिस्ताननं आपल्या सैन्याला अनधिकृत सीमा ओलांडण्याच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याचे आदेश द्यावेत आणि अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात," असंही त्यात म्हटलं आहे.

पाकिस्ताननं भारतीय राजदूतांना बजावले समन्स

यापूर्वी, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये म्हटलं होतं की, त्यांनी भारतीय कार्यवाहक राजदूतांना समन्स बजावले आहेत.

त्या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, 2 ऑक्टोबर 2026 रोजी आंतरराष्ट्रीय सीमेवरील बेडियन सेक्टरमध्ये भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएएफ) जवानांनी दोन पाकिस्तानी नागरिकांना ठार केलं.

या घटनेबद्दल निषेध नोंदवण्यासाठी पाकिस्तानमधील भारतीय कार्यवाहक राजदूतांना समन्स बजावण्यात आले आहेत.

दरम्यान, भारतात पंजाब पोलिसांनी सांगितलं आहे की, सीमा सुरक्षा दलानं (बीएसएफ) तरनतारनमध्ये दोन पाकिस्तानी घुसखोरांना ठार केलं आहे.

पाकिस्ताननं काय म्हटलं?

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं असा आरोप केला आहे की, बीएसएफच्या जवानांनी कोणत्याही कारणाशिवाय निःशस्त्र नागरिकांवर प्राणघातक बळाचा वापर केला.

"बळाचा असा वापर पूर्णपणे अन्यायकारक आणि अत्यंत प्रमाणाबाहेर होता. त्यामुळे दोन व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांना 'घुसखोर' म्हणून चित्रित करण्याचा कोणताही प्रयत्न पाकिस्तान स्पष्टपणे नाकारतो," असंही पाकिस्तानच्या मंत्रालयानं लिहिलं आहे.

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, "या घटनेमुळे जीवनाच्या हक्कासह मूलभूत मानवी हक्कांचं गंभीर उल्लंघन झालं असून, आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार नागरिकांच्या जीवनाच्या संरक्षणाबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे, यावर जोर देण्यात आला."

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं असा आरोप केला आहे की, बीएसएफच्या जवानांनी कोणत्याही कारणाशिवाय निःशस्त्र नागरिकांवर प्राणघातक बळाचा वापर केला.
फोटो कॅप्शन, पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं असा आरोप केला आहे की, बीएसएफच्या जवानांनी कोणत्याही कारणाशिवाय निःशस्त्र नागरिकांवर प्राणघातक बळाचा वापर केला.

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं एका भारतीय राजदूतामार्फत भारताला या घटनेची तात्काळ, पारदर्शक आणि विश्वासार्ह चौकशी करण्याचं आवाहन केलं आहे.

"जबाबदार आढळलेल्यांविरुद्ध योग्य शिस्तभंगाची आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी, आणि तपासाचे निष्कर्ष व केलेल्या कारवाईची माहिती पाकिस्तान सरकारला अधिकृतपणे देण्यात यावी," असं पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.

त्यानुसार, "भारताला मूलभूत मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर सुनिश्चित करण्याचे, तसेच संबंधित द्विपक्षीय करार आणि स्थापित सीमा प्रक्रियांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले."

अशा परिस्थिती हाताळताना जास्तीतजास्त संयम बाळगावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असं आवाहन पाकिस्ताननं भारताला केलं आहे.

पंजाब पोलिसांनी काय सांगितलं?

पंजाब पोलिसांनी शुक्रवारी सांगितलं होतं की, बीएसएफने भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेजवळील राजोके गावात दोन घुसखोरांना ठार केलं.

भिखीविंडचे डीएसपी अतुल सोनी म्हणाले की, "ही बीओपी (बॉर्डर आऊट पोस्ट) राजोके खालरा पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येते, जिथं ही गोळीबाराची घटना घडली."

आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा आम्हाला आढळलं की, बीएसएफ जवान आणि 25-26 वर्षे वयोगटातील तीन पाकिस्तानी नागरिकांमध्ये गोळीबार झाला होता. त्यापैकी एक जण परत (पाकिस्तानला) जाण्यात यशस्वी झाला, तर बीएसएफच्या पहारेकऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्या पाकिस्तानी नागरिकांनी 'आम्हाला भारतात घुसायचं आहे' असं सांगून जवानांना वारंवार चिथावणी दिली.

पंजाबमधील भिकिविंडचे डीएसपी अतुल सोनी यांनी सीमेवर घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली.
फोटो कॅप्शन, पंजाबमधील भिकिविंडचे डीएसपी अतुल सोनी यांनी सीमेवर घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली.

डीएसपी म्हणाले की, "पहरेकऱ्यानं त्यांना समजावून सांगितलं की ही भारतीय सीमा आहे आणि त्यांना परत जावं लागेल. ते शेतात जाऊन तिथेच झोपले. वारंवार विनंती करूनही त्यांनी जायला नकार दिला. यानंतर, बीएसएफच्या जवानांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि गोळीबारही केला."

गोळीबाराचा आवाज ऐकून ते तिघेही पाकिस्तानच्या दिशेने परत पळू लागले आणि त्यापैकी दोघे गोळी लागल्याने जागीच ठार झाले. बीएसएफचे एक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ठार झालेल्या लोकांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला.

भारत आणि पाकिस्तानच्या दाव्यांमधील फरक

एएनआय या वृत्तसंस्थेनं शुक्रवारी अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, "आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन पाकिस्तानी घुसखोरांना सीमा सुरक्षा दलानं आज गोळ्या घालून ठार केलं. ते दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पंजाबच्या तरनतारन भागात घुसण्याचा प्रयत्न करत होते."

बीबीसी उर्दूच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी सरकारी माध्यमांनी मृत झालेल्या दोन नागरिकांची ओळख अझमत रसूल आणि मोहसिन जट्ट अशी पटवली आहे.

पाकिस्तानी सरकारी माध्यमांनी सुरक्षा यंत्रणेतील सूत्रांचा हवाला देत असाही दावा केला आहे की, भारतीय माध्यमांनी निष्पाप नागरिकांना घुसखोर म्हणून चित्रित करणारी भारतीय सुरक्षा दलांची 'खोटी मोहीम' सुरूच ठेवली आहे.

सुरक्षा सूत्रांचा हवाला देत पाकिस्तानी माध्यमांनी दावा केला की, "वास्तविक पाहता, त्या तिघांपैकी कुणीही सीमेवरील कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न केला नव्हता."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)