व्यायाम करूनही रिझल्ट मिळत नाहीये? मग 'ही' चूक नक्कीच होत असेल!

आठवड्यातून किमान दोन दिवस योगाभ्यास करणे आरोग्यासाठी चांगले असते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आठवड्यातून किमान दोन दिवस योगाभ्यास करणे आरोग्यासाठी चांगले असते.
    • Author, मिशेल रॉबर्ट्स
    • Role, डिजिटल हेल्थ एडिटर
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही जिममध्ये जाताय, झुंबा करताय... पण शरीरावर काहीच फरक पडत नाहीये?

मग, तुमचे कष्ट कमी पडत नसावेत, तर तुमची व्यायामाची वेळ चुकत असू शकते.

आरोग्य संशोधकांचे असे म्हणणे आहे की, व्यायामाचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या नैसर्गिक 'बॉडी क्लॉक'शी सुसंगत अशाच वेळी व्यायाम केला पाहिजे.

ते सांगतात की, जर तुम्ही 'लवकर निजे, लवकर उठे' या पठडीतले असाल, तर सकाळी व्यायाम करणं तुमच्यासाठी उत्तम आहे. पण जर तुम्हाला रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय असेल, तर संध्याकाळचा व्यायाम तुम्हाला जास्त चांगला रिझल्ट देईल.

'ओपन हार्ट' या वैद्यकीय मासिकातील नव्या संशोधनानुसार शरीराच्या या नैसर्गिक चक्राचा आणि व्यायामाचा मेळ बसला, तर हृदयाचे आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होतो.

विशेषतः हृदयाशी संबंधित काही त्रास असणाऱ्यांसाठी तर हे 'बॉडी क्लॉक' पाळणं म्हणजे वरदानच ठरू शकतं.

ज्या लोकांनी या उपक्रमात भाग घेतला त्यांना काही महत्त्वाचे फायदे जाणवले. त्यांची झोप सुधारली, ब्लड प्रेशर कमी झाले आणि ब्लड शुगरची पातळी सुद्धा संतुलित राहिली.

ताळमेळ बसवण्याचे फायदे

या रिसर्चसाठी पाकिस्तानमधील 40 ते 50 वयोगटातील 134 लोकांना एकत्र आणलं होतं. हे लोक रोज जिममध्ये जाणारे नव्हते. कोणाचं वजन जास्त होतं, तर कोणाला हाय बीपीचा त्रास होता. म्हणजेच प्रत्येकाला हृदयविकाराचा थोडा-फार धोका होताच.

त्यांना तज्ज्ञांच्या देखरेखीखाली 'ब्रिस्क वॉकिंग' म्हणजेच वेगाने चालण्याचा व्यायाम करायला सांगितला. हे सेशन रोज ट्रेडमिलवर 40 मिनिटांचे होते.

सलग 3 महिने आठवड्यातून 5 दिवस हा नियम पाळायचा होता.

एका प्रश्नावलीद्वारे या लोकांचे दोन गट केले गेले. 70 लोक सकाळी लवकर उठणारे होते तर 64 लोक रात्री उशिरापर्यंत जागणारे होते.

वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करणे फायदेशीर ठरते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करणे फायदेशीर ठरते.

काही लोकांनी त्यांच्या शरीराच्या नैसर्गिक सवयीनुसार म्हणजेच त्यांच्या बॉडी क्लॉकनुसार व्यायाम केला. जसे की लवकर उठणाऱ्यांनी सकाळी आणि उशिरा जाणाऱ्यांनी संध्याकाळी. तर काही लोकांनी याच्या अगदी उलट वेळ निवडली.

रिझल्ट्समध्ये असं दिसलं की, व्यायाम केल्यामुळे फिटनेस तर दोन्ही गटांचा सुधारला. पण ज्यांनी आपल्या बॉडी क्लॉकशी ताळमेळ राखून व्यायाम केला होता त्यांना दुप्पट फायदे मिळाले. त्यांचा ब्लड प्रेशर, शरीराची ऊर्जा, मेटाबॉलिझम आणि झोपेचा दर्जा यामध्ये कमालीची सुधारणा दिसून आली.

संशोधक सांगतात की, तुमचं हे अंतर्गत 'बॉडी क्लॉक' फक्त झोपण्या-उठण्याच्या वेळाच ठरवत नाही तर तुमचे हार्मोन्स आणि दिवसभराची एनर्जी लेव्हल देखील नियंत्रित करतं.

नेमकी हीच गोष्ट तुम्ही व्यायाम किती जोशात करता आणि तो रोज टिकवून ठेवता की नाही यावर मोठा परिणाम करते. म्हणजेच जेव्हा तुमचं शरीर आणि ऊर्जा यांचा मेळ बसतो तेव्हाच व्यायामाची खरी गाडी रुळावर येते.

सोशल जेटलॅग टाळा, आपल्या शरीराचं ऐका

संशोधकांचं असं म्हणणं आहे की, व्यायामाच्या बाबतीत एकच नियम सर्वांना लागू होत नाही. प्रत्येकाची शरीरयष्टी आणि अंतर्गत घड्याळ वेगळं असतं.

जेव्हा तुमच्या शरीराची नैसर्गिक वेळ आणि तुमच्या कामाचं किंवा व्यायामाचं वेळापत्रक यांची सांगड बसत नाही, तेव्हा त्याला 'सोशल जेटलॅग' म्हणतात. याचा थेट संबंध हृदयविकाराच्या वाढत्या धोक्याशी असतो.

संशोधक असा इशारा देतात की, ज्यांना रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय आहे त्यांना याचा धोका जास्त असतो. त्यामुळे अशा लोकांनी जबरदस्तीने सकाळी लवकर उठून व्यायाम करण्याचा प्रयत्न करू नये. उलट आपल्या सवयीनुसार वेळ निवडलेली कधीही उत्तम.

योगा करणारी महिला

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ज्या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे त्यामध्ये 'ब्रिटिश कार्डिओव्हस्क्युलर सोसायटी'चाही सहभाग आहे.

या संशोधनाशी संबंधित डॉ. राजीव शंकरनारायणन म्हणतात, "निष्कर्षानुसार शरीराच्या नैसर्गिक घड्याळाचा विचार करूनच व्यायामाची वेळ ठरवायला हवी. अर्थात यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अजून थोड्या अभ्यासाची गरज आहे."

दुसरीकडे, केंब्रिज विद्यापीठातील 'बॉडी रिदम' तज्ज्ञ डॉ. नीना झेकॉर्झेक एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात.

त्या म्हणतात, "व्यायामाची वेळ हा एक महत्त्वाचा भाग असू शकतो, पण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की, तुम्ही पुरेसा आणि नियमित व्यायाम करणं."

यूकेची आरोग्य संस्था NHS नुसार, प्रौढ व्यक्तींनी फिट राहण्यासाठी काय करावे?

•आठवड्यातून किमान 2 दिवस अशा हालचाली कराव्यात ज्यामुळे सर्व मुख्य स्नायू (पाय, नितंब, पाठ, पोट, छाती, खांदे आणि हात) मजबूत होतील. यासाठी तुम्ही योग, पिलाटेस किंवा वेट ट्रेनिंग ( वजन उचलणे) करू शकता.

• आठवड्यातून किमान 150 मिनिटे मध्यम तीव्रतेची हालचाल करावी. जसे की वेगाने चालणे किंवा 75 मिनिटे उच्च तीव्रतेची हालचाल करावी जसे की धावणे, ज्यामुळे दम लागेल.

• व्यायाम पूर्ण आठवड्यात समान रीतीने विभागून घ्यावा किंवा दररोज करावा.

• बैठंकाम टाळा म्हणजे एका जागी बसून राहण्याची वेळ जेवढी कमी करता येईल तेवढी कमी करा.

विविध प्रकारच्या व्यायामांचा एकत्रित सराव करणे फायदेशीर ठरते, असं पुराव्यानिशी सिद्ध झालं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)