You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कामसूत्र आणि खजुराहोच्या भूमीत 'सेक्स'बद्दल तिटकारा का आहे?
- Author, ॲना गॅब्रिएला रोजास
- Role, बीबीसी मुंडो
- वाचन वेळ: 6 मिनिटे
भारतात एक विरोधाभास दिसून येतो.
इथे एका बाजूला, प्रेमात पडलेली जोडपी आहेत. ती सार्वजनिक ठिकाणी एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात, एकमेकांचा हात हातात धरतात. अगदी एकमेकांना गुलाबाची फुलंदेखील दिली जातात.
मात्र दुसऱ्या बाजूला, अतिरेकी कट्ट्ररतावाद्यांचे 'रखवालदार' आहेत. त्यांना याप्रकारचं वर्तन म्हणजे नैतिकतेचं गंभीर उल्लंघन, अध:पतन वाटतं.
ते अशा जोडप्यांना लज्जित करण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतात.
कामसूत्रची जन्मभूमी आणि अप्रतिम कामशिल्पांचं घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशामध्ये अशाप्रकारच्या स्वयंघोषित रक्षकांची चर्चा भारताबाहेरील व्यक्तीला भारताबद्दलच्या कल्पनेशी विसंगत आणि विचित्र वाटते.
प्रख्यात इतिहासकार मधू खन्ना यांनी बीबीसीला सांगितलं, "भारतीय दृष्टीकोनातून पाहता विश्वाची निर्मिती एका शक्तिशाली वैश्विक शक्तीनं केलेली आहे. लैंगिक समाधान किंवा आनंदाचा आविष्कार हा याच पवित्र पायाचा एक भाग आहे."
'लैंगिक उत्तेजना ही काही लज्जास्पद गोष्ट नाही'
"इंद्रियांचं सुख अनुभवणं ही एक जोपासनेची आणि विकासाची गोष्ट आहे. हे अनुभवणं चांगलं मानवी जीवन जगण्यातील एक महत्त्वाचा उद्देश आहे, मौल्यवान भाग आहे," असं मधू खन्ना यांचं मत आहे.
"लैंगिक उत्तेजना ही काही लज्जास्पद गोष्ट नाही. भारतीयांच्या दृष्टीनं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. फक्त लैंगिक संबंधांच्याच बाबतीत नव्हे, संपूर्ण जीवनातही," असंही त्या नमूद करतात.
त्यासंदर्भात, ज्याप्रकारे भारतात लैंगिक सुख किंवा समाधानाची अभिव्यक्ती केली जाते, तसं करणं इतर कोणत्याही संस्कृतीसाठी अकल्पनीय गोष्ट ठरेल.
कामसूत्र हा लैंगिक संबंधांच्या अभिव्यक्तीवरील जगातील एक मूलभूत, महत्त्वाचा आणि तितकाच प्रभावशाली ग्रंथ आहे.
तो तिसऱ्या शतकात संकलित केलेला असून त्यात मांडण्यात आलेल्या संकल्पना तर त्याहूनही जुन्या, अधिक प्राचीन काळातील आहेत.
कामसूत्राचे अनुवादक म्हणतात, "संस्कृतमध्ये 'काम'चा अर्थ फक्त लैंगिक संबंध असा होता नाही. तर त्याचा अर्थ सुख आणि इच्छा किंवा कामना असा होतो."
हा ग्रंथ मानवी अस्तित्व, जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये सुखाचा किंवा आनंदाचा शोध घेण्यावर भर देतो.
"ही प्राप्ती किंवा उद्दिष्टं मानवी आयुष्याच्या 3 तत्त्वांपैकी एक आहे. इतर दोन तत्त्वं म्हणजे चांगलं किंवा सदाचारी असणं आणि नैतिक आयुष्य (धर्म) यांची प्राप्ती आणि समृद्धी व संपत्तीची (अर्थ) प्राप्ती," असं ते म्हणतात.
म्हणजे काम, धर्म आणि अर्थ प्राप्ती.
आजच्या काळातही प्रासंगिक कामसूत्र
"कामसूत्राच्या 7 अध्याय किंवा प्रकरणांपैकी, फक्त दुसरा अध्यायच लैंगिक संबंधांवर आहे. तो अतिशय स्पष्टपणे, सविस्तर आहे. त्यात लैंगिक संबंधाच्या वेळेस अवलंबता येतील अशा विविध आसनांची अतिशय तपशीलवार चर्चा करण्यात आली आहे," असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.
संध्या मूलचंदानी, 'द कामसूत्र फॉर वीमेन' या पुस्तकाच्या लेखिका आहेत.
त्या म्हणतात की, या ग्रंथातील काही आसनं बऱ्याचशा विचित्र वाटत असल्या, तरीदेखील या प्राचीन ग्रंथातील अनेक तत्त्वं आजदेखील तितकीच प्रासंगिक आहेत. ती आजदेखील तितकीच लागू होतात.
"अनेक अर्थांनी, ते एक आधुनिक पुस्तक आहे. उदाहरणार्थ, त्यात महिलांच्या इच्छांना आणि लैंगिक संबंधांची सूत्र स्वत:च्या हातात घेण्याच्या महिलांच्या क्षमतेला मान्यता दिली आहे, त्याचं महत्त्व मान्य केलं आहे," असं संध्या म्हणतात.
"कामसूत्र हे एक प्रकारचं मासिकच आहे. ते तरुणांना 'डेट'वर जाताना जे माहीत असायला हवं अशी सर्व आवश्यक माहिती पुरवतं. त्यांनी कसं वागावं हे तो ग्रंथ सांगतो.
स्नान करणं, स्वच्छ कपडे परिधान करणं, नखं कापणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जोडीदाराचं म्हणणं कसं ऐकून घ्यावं आणि स्वार्थी न राहण्याबाबत हा ग्रंथ मार्गदर्शन करतो," असं त्या म्हणाल्या.
संध्या मूलचंदानी नमूद करतात, "हा ग्रंथ फक्त अशाच एका अत्यंत प्रगल्भ आणि सहिष्णू संस्कृतीमध्ये जन्माला येऊ शकतो, जी संस्कृती आयुष्याच्या सर्व पैलूंचा, त्यातील सौंदर्य आणि वैभवाचा भरभरून पूर्ण आनंद घेते, त्याचा उत्सव साजरा करते."
कामुक मंदिरं
लैंगिकता किंवा लैंगिक संबंधांविषयीच्या मोकळेपणाचं, खुलेपणाचं भारताच्या इतिहासातील आणखी एक उदाहरण म्हणजे खजुराहोची मंदिरं. खजुराहोमधील लाल वाळूच्या खडकात कोरलेली अप्रतिम, सुंदर शिल्पं पर्यटकांना आकर्षित करतात.
यातील काही शिल्पं अप्सरांना सूचक मुद्रांमध्ये दाखवतात. उदाहरणार्थ, शृंगार करताना किंवा पायातील काटा काढताना. तर इतरा काही शिल्पांमध्ये जोडपी आणि समूहांना कामूक मुद्रांमध्ये दाखवण्यात आलं आहे.
तज्ज्ञ याबद्दल सांगतात की, "ज्याप्रमाणे इतर संस्कृतींमधील शिल्पांमध्ये युद्धाशी संबंधित मुद्रा आढळतात. त्याचप्रमाणे या शिल्पांमध्ये कामूक मुद्रांचं चित्रण करण्यात आलं आहे."
संशोधक किंवा तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, भारतातील जवळपास 300 वर्षांच्या मुस्लीम राजवटीच्या काळात लैंगिकता किंवा लैंगिक इच्छा दडपली गेली किंवा त्याचं दमन झालं, हा एक गैरसमज आहे.
"मुघल राज्यकर्ते लैंगिक बाबींविषयी तितकेसे मोकळे किंवा खुल्या विचारांचे नसले, तरीदेखील त्यांच्या राजवटीनं कलेच्या क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे," असं इतिहासकार खन्ना म्हणतात.
सलीम किडवई मध्ययुगीन इतिहासाचे तज्ज्ञ आहेत.
"इस्लामिक संस्कृतीमध्ये देखील मोकळेपणाचे, खुल्या विचारांचे महान कालखंड होऊन गेले आहेत. अगदी मुघल काळात लिहिण्यात आलेल्या पर्शियन कवितांमध्ये लैंगिकता, शृंगार याचे अंश, उल्लेख दिसतात," असं सलीम किडवई म्हणाले.
ब्रिटिश राजवटीचा परिणाम
लैंगिकता, कामुकता, कामभावना यांचा उत्सव साजरा करणाऱ्या समाजाचं रुपांतर लैंगिक इच्छेला एक निषिद्ध किंवा वाईट गोष्ट मानणाऱ्या समाजात होण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुतींची आहे, असं सलीम किडवई म्हणतात.
"ढोबळमानानं सांगायचं, तर हा सर्व बदल 19 व्या शतकाच्या मध्याच्या दरम्यान झाला. यासाठीचा संदर्भ बिंदू म्हणून 1857 च्या उठावाचा विचार करता येईल. या घटनेनंतर भारत थेट ब्रिटिश राजसत्तेच्या अधिपत्याखाली आला. त्यामुळे भारतावर व्हिक्टोरियन मूल्यं आणि कायदे लादण्यात आले," असं किडवई म्हणाले.
"राणी व्हिक्टोरियाच्या राजवटीतील नियम कठोर आणि नैतिक स्वरुपाचे होते. त्यात कुटुंबं आणि लैंगिक वर्तनावर कडक निर्बंध किंवा बंधनं घालण्यात आलेली होती," असं ते म्हणाले.
"गुलामगिरीमुळे किंवा पारतंत्र्यात राहिल्यामुळे भारतीय समाजातील एका घटकानं आपल्या संस्कृतीचं पुनर्मुल्यांकन किंवा पुनर्परिक्षण करण्यास सुरुवात केली. मग ब्रिटनमध्ये किंवा ब्रिटिश शिक्षणव्यवस्थेत शिकलेल्या लोकांनी ठरवलं की सेक्स किंवा लैंगिक संबंध ठेवणं हे चुकीचं कृत्य आहे," असं इतिहासकार सांगतात.
भारतीयांकडून त्यांच्या संस्कृतीचा पुनर्विचार
"साम्राज्यवादाचा मुक्तपणे विचार करण्याच्या आपल्या क्षमतेवर परिणाम झाला. लोक जसजसे अधिक तर्कसंगत किंवा बुद्धिवादी बनले, तसतसं त्यांनी त्यांच्या परंपरा आणि दंतकथांबाबत प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली," असं मूलचंदानी यांनी नमूद केलं.
परकीय दृष्टीकोनाबरोबरच हिंदू धर्मातीलच काही अधिक पुराणमतवादी विचारप्रवाहांमध्ये लैंगिकता किंवा लैंगिक संबंध एक निषिद्ध किंवा वाईट विषय मानला जातो.
"पारंपारिकदृष्ट्या हिंदू धर्म खुल्या विचारांचा किंवा उदारमतवादी आहे. मात्र राजकारणातील काही घटकांचे लैंगिक संबंध किंवा कामजीवनासह प्रत्येक गोष्टीबाबत स्वत:चे असे विशिष्ट विचार किंवा दृष्टीकोन आहेत," असं किडवई म्हणाले.
लैंगिक संबंध किंवा सेक्स या विषयाबद्दल आनंद व्यक्त करणं किंवा त्याचं महत्त्व मान्य करणं हा भारतीय संस्कृतीचा एक भाग जरी असला, तरीदेखील ती नेहमीच एक खासगी बाब राहिली आहे, असं मूलचंदाची यांनी निदर्शनास आणून दिलं.
"मी कदाचित अत्यंत कामूक प्रवृत्तीचा व्यक्ती असेन, मात्र मी ते समाजासमोर दाखवण्याची किंवा प्रदर्शित करण्याची मला काहीच आवश्यकता नाही. मात्र, लैंगिक सुख आणि आनंद यांची अभिव्यक्ती ही काही लपवून ठेवता येणारी गोष्ट नाही. हा मानवी स्वभाव आहे आणि भारतात तो प्रत्येक क्षणी व्यक्त होत असतो," असं ते म्हणाले.
(या लेखातील मतं लेखिकेची स्वतःची मतं आहेत)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)