अमेरिकेचे हल्ले तीव्र; बुशहर अणुऊर्जा केंद्रावरही निशाणा? इराणचा दावा

अमेरिकेचे हल्ले तीव्र; बुशहर अणुऊर्जा केंद्रावरही निशाणा? इराणचा दावा

फोटो स्रोत, US Central Command

Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्कार आणि दफनविधीच्या अंतिम कार्यक्रमांदरम्यान अमेरिकेने इराणवर हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये अणु केंद्रांपासून ते चीन आणि रशियाला जोडणाऱ्या रेल्वे कॉरिडॉरपर्यंतच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने म्हटलं आहे की, गेल्या दोन रात्रींमध्ये अमेरिकी सैन्यदलांनी इराणमधील 170 लष्करी ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले.

याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कतार, कुवेत आणि जॉर्डनमधील अमेरिकी लष्करी तळांना लक्ष्य केलं.

इराणच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या दोन रात्रींमध्ये झालेल्या अमेरिकी हल्ल्यांमध्ये किमान 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेने इराणवर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले असून, या हल्ल्यांमध्ये बुशहर अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरालाही लक्ष्य करण्यात आल्याचा दावा इराणने केला आहे.

अमेरिकेच्या हल्ल्यात चाबहारच्या पोर्ट कंट्रोल टॉवरचे नुकसान झाले आहे.

फोटो स्रोत, Instagram

फोटो कॅप्शन, अमेरिकेच्या हल्ल्यात चाबहारच्या पोर्ट कंट्रोल टॉवरचे नुकसान झाले आहे.

अमेरिकेनी केलेल्या हल्ल्यात चाबहार येथील पोर्ट कंट्रोल टॉवरचे नुकसान झाल्याचे व्हीडिओ देखील समोर आले आहेत. बीबीसी व्हेरीफायने या व्हीडिओंची पडताळणी केली. त्यात हे व्हीडिओ खरे असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, गुरुवारी अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्कार प्रक्रियेच्या अखेरच्या दिवशी अमेरिकेच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर तेहरान आणि मशहददरम्यानची रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली.

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने गुरुवारी सांगितले की अमेरिकेनी इराणवर केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात त्यांनी आखात देश आणि जॉर्डनमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केले.

ताज्या आकडेवारीनुसार बुधवारी होर्मुजच्या सामुद्रधुनीतून व्यापारी जहाजांची वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी झाली आणि गुरुवारी तर ती पूर्णपणे ठप्प झाली.

8 जुलै रोजी करण्यात आलेल्या हल्ल्याचे फुटेज सेंटकॉमने प्रसिद्ध केले

फोटो स्रोत, US Central Command

फोटो कॅप्शन, 8 जुलै रोजी करण्यात आलेल्या हल्ल्याचे फुटेज सेंटकॉमने प्रसिद्ध केले
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

गुरुवारी सकाळी अमेरिकन सेंट्रल कमांड (सेंटकॉम) ने एक्स वर दिलेल्या निवेदनात म्हटले की अमेरिकेनी 8 जुलैला इराणवर हल्ल्याचा एक आणखी टप्पा पूर्ण केला आहे.

अमेरिकेच्या सेंटकॉमने 8 जुलै रोजी म्हटले होते की होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर आणि निर्दोष खलाशांवर हल्ले करण्याची इराणची क्षमता आणखी कमकुवत करण्याचा या हल्ल्यामागचा उद्देश होता.

निवेदनानुसार या हल्ल्यात अमेरिकेने इराणची हवाई संरक्षण प्रणाली, किनारपट्टीवरील देखरेखीची उपकरणे, क्षेपणास्त्र आणि ड्रोनचे साठे, नौदलाची साधनं तसेच इराणच्या किनारपट्टीवरील लष्करी पुरवठा व्यवस्था अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केलं गेलं.

सेंटकॉमने पुढे म्हटले की इराणची आक्रमक कार्यवाही ही विनाकारण, धोकादायक आणि युद्धबंदीचे उल्लंघन करणारी होती.

अमेरिकन हल्ल्यांच्या घोषणेनंतर इराणच्या सरकारी मीडियाने म्हटले की देशातील दक्षिण किनारी प्रदेशात अनेक ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. या आधी सेंटकॉमने म्हटले होते की सलग दुसऱ्या रात्री इराणच्या लष्करी तळांवर हल्ले करण्यात आले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी म्हटलं होतं की त्यांनी इराणवर नव्याने हल्ले करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी इशारा दिला होता की जर इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना लक्ष्य करेल तर त्याचे त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील.

या हल्ल्याआधी मंगळवारी इराणला अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आलेली तात्पुरती सवलत रद्द करण्यात आली होती. या सवलतीनुसार, इराणला तेल संबंधी निर्बंधांवर काही काळासाठी मोकळीक देण्यात आली होती.

इराणचेही जोरदार प्रत्युत्तर

आयआरजीसीने म्हटले आहे की त्यांनी आखाती देशात असलेल्या अमेरिकन तळांना लक्ष्य केले आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आयआरजीसीने म्हटले आहे की त्यांनी कुवैत, कतार आणि जॉर्डनमधील अमेरिकन तळांना लक्ष्य केले आहे.

आयआरजीसीने आपल्या एका निवेदनात म्हटलं आहे की, कुवेतमधील आरिफजान आणि अली अल सालेम, बहरीनमधील जुफेर आणि शेख ईसा तसेच जॉर्डनमधील अझराक या लष्करी तळांवरील महत्त्वाच्या इमारती आणि सुविधांवर हल्ले करण्यात आले आहेत.

इराणच्या सरकारी वृत्तसंस्था इरनाच्या वृत्तानुसार, एका इराणी अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, अमेरिकेच्या हल्ल्यात बुशहर अणुऊर्जा प्रकल्पाच्या आसपासचा परिसर प्रभावित झाला आहे. यापूर्वी फार्स वृत्तसंस्थेने दक्षिण-पश्चिम इराणमधील बुशहर प्रांतात अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे वृत्त दिले होते.

जॉर्डन सरकारचे प्रवक्ते मोहम्मद अल-मोमानी यांनी गुरुवारी (9 जुलै) दुपारी सांगितले की, इराणने डागलेली काही क्षेपणास्त्रे जॉर्डनच्या हवाई हद्दीत शिरल्यानंतर धोक्याचा इशारा देणारे सायरन वाजवण्यात आले. परंतु, ही सर्व क्षेपणास्त्रे हवेतच रोखण्यात आली.

जॉर्डनच्या लष्करातील एका अधिकाऱ्याने सांगितलं की, देशाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने इराणकडून डागण्यात आलेली 8 क्षेपणास्त्रे हवेतच पाडली. त्यांचे काही अवशेष वेगवेगळ्या ठिकाणी पडले. पण यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाने इराणच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.

इराणमध्ये कुठे-कुठे हल्ले झाले?

इराणसाठी लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या एका पुलावर हल्ला करण्यात आला. हा पूल चीन-तुर्कमेनिस्तान-इराण या रेल्वे मार्गाचा (कॉरिडॉर) महत्त्वाचा भाग आहे.

बीबीसी व्हेरिफायने उत्तरेकडील अक्काला शहरातील रेल्वे पुलावर झालेल्या हल्ल्याची छायाचित्रे खरी असल्याची सत्यता पडताळून पाहिली आहे. कॅस्पियन समुद्रापासून साधारण 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोलेस्तान प्रांतातील अक्ताका खान रेल्वे पुलाचेही या हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे.

आयआरजीसीच्या निवेदनानुसार, अक्ताका खान रेल्वे पूलही हल्ल्याच्या लक्ष्यांपैकी एक होता. या हल्ल्यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

अक्ताका खान रेल्वे पूल हा चीन-तुर्कमेनिस्तान-इराण रेल्वे मार्गावरील एक महत्त्वाचा पूल आहे. तो इराणच्या गोलेस्तान प्रांतातील अक्काला परिसरात आहे.

इतर दोन व्हीडिओंची पडताळणी केल्यानंतर, इराणच्या आग्नेय भागातील चाबहार शहरातील बेहेश्ती बंदराच्या नियंत्रण मनोऱ्याचे (कंट्रोल टॉवर) मोठे नुकसान झाले आहे.

इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी दुपारी इराणमधील एकमेव कार्यरत अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या बुशहर अणुऊर्जा प्रकल्पाला लक्ष्य करण्यात आले.

बुशहर प्रांताच्या एका डेप्युटी गव्हर्नरचे एक निवेदन इराणी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केले जात आहे. ज्यात अमेरिकेने डागलेले क्षेपणास्त्र या अणुऊर्जा प्रकल्पाच्या बाहेरील परिसरात येऊन पडल्याचे म्हटले आहे.

इराणमधील सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील इराण शहर विमानतळावर स्फोट झाल्याचे वृत्त इराणी ब्रॉडकास्टिंग एजन्सीने (आयबीए) स्थानिक नागरिकांच्या हवाल्याने दिले आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण- आयआरजीसी

इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे.

आयआरजीसीशी संबंधित तस्नीम या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन आठवड्यांत इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीची 'सुरक्षा कायम' ठेवली असून आता ती 'टप्प्याटप्प्याने पुन्हा खुली करण्याची' प्रक्रिया सुरू केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, या जलमार्गावरून जहाजांची वाहतूक आता युद्धापूर्व पातळीच्या तुलनेत सुमारे 50 टक्क्यांपर्यंत पुन्हा सुरू झाली आहे.

त्याचबरोबर इराणकडून 'परवानगी' घेणाऱ्या जहाजांची संख्या सातत्याने वाढत आहे.

निवेदनात म्हटलं आहे की, "आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करतो की, या मार्गावर किंवा होर्मुझच्या सामुद्रधुनीवर कोणत्याही परकीय शक्तीचा कोणताही हक्क नाही."

बीबीसी व्हेरिफायच्या माहितीनुसार, 8 जुलै रोजी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून 23 मालवाहू जहाजे आणि तेलवाहू टँकर्सनी प्रवास केला. केप्लरच्या आकडेवारीनुसार, त्यापैकी 12 जहाजांनी इराणच्या उत्तरेकडील मार्गाचा वापर केला.

जॉइंट मेरिटाइम इन्फॉर्मेशन सेंटरच्या आकडेवारीनुसार, 28 फेब्रुवारीला संघर्ष सुरू होण्यापूर्वी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दररोज सरासरी 138 जहाजांची वाहतूक होत होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)