सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षिका सिंथिया फरार यांच्या समाधीचा नगरमध्ये शोध, जाणून घ्या त्यांचं कार्य

फोटो स्रोत, विमल कीर्ती प्रकाशन
- Author, कामिल पारखे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 11 मिनिटे
मिस सिंथिया फरार हे नाव सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या चरित्रांत अनेकदा झळकते. ख्रिस्ती मिशनरी आणि विशेषतः सिंथिया फरार यांच्या मुलींच्या शिक्षणकार्यापासून प्रेरणा घेऊन आपण आपल्या शिक्षणकार्याची सुरुवात केली असे खुद्द जोतिबांनी लिहिले आहे.
जोतिबांचे एक महत्त्वाचे चरित्रकार धनंजय कीर आणि संशोधक हरी नरके यांच्या लिखाणात फरारबाईंचा उल्लेख आढळतो.
जोतिबा फुले यांच्या चालू द्विशताब्दी जयंती वर्षात या महापुरुषाला स्त्रीशिक्षण कार्याची प्रेरणा देणाऱ्या आणि सावित्रीबाई फुले यांना अध्यापनाचे प्रशिक्षण देणाऱ्या सिंथिया फरारबाईंच्या अहिल्यानगर येथील समाधीचा शोध 16 ऑक्टोबर 2026 रोजी लागला आहे.
अहिल्यानगर येथील इतिहासप्रेमी मंडळाचे सदस्य अभिजीत एकनाथ वाघ, भैरवनाथ वाकळे आणि आसिफ खान दुलेखान यांनी गेली 150 वर्षे अज्ञात आणि त्यामुळे दुर्लक्षित असलेली फरारबाईंची ही दगडी समाधी शोधून काढली आहे.
जोतिबा फुले यांनी डॉ. सर विल्यम हंटर शिक्षण आयोगापुढे पुण्यात 19 ऑक्टोबर 1882 रोजी एक निवेदन सादर केले.
या निवेदनाच्या पहिल्याच परिच्छेदात जोतीरावांनी शिक्षणकार्यातील आपले प्रेरणास्थान, आपण काय काम केले आणि 30 वर्षांपूर्वी आपण सुरू केलेली या कामाबाबत सध्या काय परिस्थिती आहे हे नमूद केले. जोतिबांनी स्वतःच मांडलेला हा घटनाक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.

फोटो स्रोत, Camil Parkhe
हे निवेदन मूळ इंग्रजीत असून महात्मा फुले समग्र वाड्मयात त्याचे मराठी भाषांतर देण्यात आले आहे. या निवेदनात जोतिबा लिहितात:
''माझा शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव पुणे आणि पुण्याच्या परिसरातील खेडी यापुरताच प्रामुख्याने आहे. सुमारे 25 वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी या पुण्यात स्त्रियांसाठी एक शाळा स्थापन केली होती. पण जिला स्वकीय म्हणता येईल अशी एकही मुलींची शाळा नव्हती. म्हणून तशी शाळा स्थापन करण्याची प्रेरणा मला झाली आणि मी व माझी पत्नी (सावित्रीबाई) अशा उभयतांनी कित्येक वर्षांपर्यंत त्या शाळेत काम केले.''
मिस सिंथिया फरार यांचे अमेरिकेतून मुंबईत 29 डिसेंबर 1827 रोजी आगमन झाले. अमेरिकन मराठी मिशनच्या त्या पहिल्या अविवाहित महिला मिशनरी. मुंबईत मिशनच्या मुलींच्या शाळेत कार्य केल्यानंतर प्रकृतीच्या कारणामुळे 1837 साली त्या मायदेशी परतल्या. मात्र दोनच वर्षांनी 1839 साली त्या भारतात पुन्हा आल्या त्या कायमच्याच. येथेच देह ठेवण्यासाठी.
फरारबाई भारतात येण्याआधी त्यांच्या अमेरिकेतील पुर्वायुष्याची फारशी माहिती उपलब्ध नाही. मुंबईत आल्यानंतर सुरुवातीच्या त्यांच्या मुंबईतील कार्याविषयी आणि नंतर अहिल्यानगर येथील त्यांच्या आयुष्याच्या अखेरीपर्यंतच्या दीर्घ कालावधीतील सेवेबाबत मात्र अनेक उल्लेख अमेरिकन मराठी मिशनच्या वार्षिक अहवालांमध्ये आणि इतर कागदपत्रांमध्ये आढळतात.
फरारबाईंचे मुंबई, अहिल्यानगरमधील शिक्षणकार्य
यादरम्यान अमेरिकेतून मुंबईत आल्यावर सिंथिया फरार यांनी अमेरिकन मराठी मिशनच्या मुलींच्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले.
मिशनच्या 1829 सालच्या अहवालात या शाळांची संख्या वाढत चालली आहे असे नमूद करून विद्यार्थिनींची संख्या 400 हून अधिक झाली आहे आणि त्यापैकी 122 मुली चांगल्यापैकी वाचू शकतात, सुंदर अक्षरात लिहू शकतात, असे म्हटले आहे.
अमेरिकन मराठी मिशनच्या 1834 सालच्या अहवालात मिशनच्या मुंबईच्या शाळांची माहिती दिली आहे. त्यात तेथील कार्यरत मिशनरींच्या यादीत मुलींच्या शाळांच्या सुपिरिटेंडंट मिस सी. फरार' असा उल्लेख आढळतो.
मुंबईत त्यावेळी मुलांसाठी 5 तर मुलींसाठी 13 शाळा होत्या. या शाळांमध्ये कुठल्याही प्रकारची फी नव्हती. त्याशिवाय इतर ठिकाणी मुलांसाठी आणि मुलींसाठी 12 शाळा होत्या. अहमदनगरमध्ये 1835 साली अमेरिकन मराठी मिशनच्या 9 शाळा होत्या.

फोटो स्रोत, Camil Parkhe
अमेरिकन मराठी मिशनतर्फे पहिल्यांदा सुरू केलेल्या मुलांच्या बोर्डिंग स्कुल्स मिशनरी कुटुंबांत चालवल्या जात असत. याचे कारण बोर्डिंगमधल्या या मुलांमुलींची काळजी घेणे आणि त्यांना शिकवणे अधिक सोयिस्कर होते.
सन 1836 ला मात्र मुलींची पहिलीवहिली बोर्डिंग स्कुल मिस सिंथिया फरार यांनी चॅपलला लागून असलेल्या मिशन हाऊसमध्ये सुरू केली. या बोर्डिंग स्कुलमध्ये 13 मुली होत्या. त्यापैकी 5 जणी गुलामांच्या जहाजातून मुक्त केलेल्या निग्रो होत्या.
अमेरिकन मराठी मिशनच्या मुंबईच्या विविध परिसरांत त्यावेळी मुलींसाठी तब्बल 12 शाळा होत्या आणि या शाळांमध्ये 200 ते 300 विद्यार्थिनी होत्या. मात्र कालांतराने या शाळांची संख्या कमी करून या शाळांचे एकत्रिकरण करण्यात आले. तसेच त्या शाळा चॅपलसमोर असलेल्या भेंडी बझार केंद्रात आणि भायखळा मॅन्शन येथे या शाळा चालू ठेवण्यात आल्या. मिस सिंथिया फरार या शाळांच्या सुपरिंटेंडेन्ट होत्या.

फोटो स्रोत, Camil Parkhe
अमेरिकन मराठी मिशनच्या 1881च्या वर्धापनानिमित्त मिसेस एल. एस. गेट्स आपल्या निबंधात लिहितात:
"सन 1827 ला महिलांसाठी कार्य करण्यासाठी मिस सिंथिया फरार हिंदुस्थानात आल्या. मुंबईत त्यांनी मुलींसाठी अनेक शाळा सुरू केल्या. दयाळू वृत्तीच्या मित्र असलेल्या ब्रिटिशांसह उच्च पदांवरील अनेक भारतीय सद्गृहस्थांनी मुलींच्या या शाळांना पाठबळ पुरवले. याचे कारण म्हणजे या शाळांतील मुलींनी केलेली प्रगती त्यांनी पाहिली होती.
ब्रिटिश लोकांच्या मदतीवर चाललेल्या काही शाळांच्या सुपरिंटेंडंट म्हणून त्यांनी काम पाहिले. आपल्या कामावर त्यांनी अलोट प्रेम केले. भौतिक साधने मिळवण्याची त्यांना संधी असतानाही त्यांनी या भौतिक सुखाकडे पाठ फिरवली आणि पवित्र ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी नम्र वृत्तीने आपले कार्य सुरू ठेवले.
त्यांनी म्हटले, ''मी माझे निरुपयोगी आणि अगदी हलके असलेले श्रम (आपल्या श्रमाबद्दल त्यांची अशी धारणा होती) माझ्या तारणहार प्रभूच्या चरणापाशी प्रत्येक रात्री ठेवत होते, माझ्या या अर्पणाचा त्याने स्वीकार करावा अशी मी प्रार्थना करत असे.''
अशा भावनेने फरार यांनी काम केले. आपल्या कामाबाबत त्या सतत उत्साही असायच्या. त्यांच्या विद्यार्थिनी त्यांची अत्यंत प्रेमाने आणि कृतज्ञतापूर्वक आठवण करत असत.

फोटो स्रोत, Camil Parkhe
अमेरिकन मराठी मिशनचे मिशनरी अहिल्यानगर येथे पोहोचल्यानंतर लगेचच या मिशनरींच्या पत्नींनी तिथल्या स्थानिक मुलींना आपल्याकडे बोलावून शाळा सुरू केल्या. या शाळांमध्ये मुलींना लिहिणे, वाचणे शिकवले जाई आणि बायबलमधील काही प्राथमिक तत्त्वे शिकवली जाई.
मुलींच्या शिक्षणाबाबत समाजात अत्यंत प्रतिकूल मत आणि कडवा विरोध असल्याने या शाळांमध्ये मुलींना बोलावण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागायची.
धर्मप्रसार करताना या कार्याचाच एक भाग म्हणून स्थानिक मुलांसाठी शाळा सुरू करणाऱ्या मिशनरींना अनेक समस्यांना तोंड ध्यावे लागले होते. मुलींच्या शाळा सुरू करताना या मुलींनी शिक्षण सोडू नये यासाठी प्रयत्न करताना अनेक प्रसंगी त्यांना अपयश येत असे.
अमेरिकन मराठी मिशनच्या 1845 आणि 1846 सालच्या अहवालात म्हटले होते, "मिस फरार यांच्या सुपरिंटेंडंटपदाच्या देखरेखीखाली मुलींच्या 4 शाळा सुरू आहेत आणि या शाळांमध्ये 100 विद्यार्थिनी आहेत.''
या शाळांच्या अधीक्षक या नात्याने फरार यांनी केलेल्या परिश्रमामुळे या क्षेत्रात आधी इतरांना अपयश आले होते. तसे त्यांच्या बाबतीत झाले नाही. त्यांना ज्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते ते पाहता इतर कुणी असे कष्ट करण्याचे धाडसच केले नसते.
मुलींना शिक्षण देण्याबाबत समाजात विरोध असल्याने या शाळांतील मुलींनी शिक्षणात केलेल्या प्रगतीबद्दल त्यांच्या पालकांना अजिबात कौतुक नसायचे. त्यामुळे आपल्या मुली नियमितपणे शाळांत जाण्याची गरज आहे, असे त्यांना बिलकुल वाटत नसे.
कुठल्याही निमित्ताने किंवा कारणाखाली या मुलींना शाळेत पाठवणे अचानक बंद केले जाई किंवा या मुलींना कुठल्याही निमित्ताने परगावी महिनाभर किंवा थेट काही महिन्यांसाठी पाठवले जाई.

फोटो स्रोत, Camil Parkhe
मुलींचे लहानपणीच लग्न लावून देण्याची पद्धत तर त्यांच्या शिक्षणासाठी एक मोठा अडसर होता.
सिंथिया फरार यांनी त्यांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींचे प्रेम संपादन केले, त्यांच्यामध्ये शिकण्याची गोडी निर्माण केली आणि अशाप्रकारे शिक्षणात किमान थोडीफार प्रगती होईल इतका काळ या मुलींनी शाळांमध्ये येण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात त्या यशस्वी ठरल्या.
तरीसुद्धा "आपल्या शाळांतील अनेक मुलींना लवकरच शाळेतून काढले गेले आणि त्यामुळे आपल्या आयुष्यभरातल्या शैक्षणिक कामात फार थोडे यश मिळाले'' अशी खंत फरार मॅडम अनेकदा व्यक्त करत असत.
सिंथिया फरार आणि त्यांच्याप्रमाणेच इतर मिशनरी महिलांनी भारतात मुलींच्या शिक्षणाच्या प्रसारासाठी केलेल्या कामामुळे हळूहळू मुलींच्या शिक्षणाबाबत त्यांच्या पालकांचा आणि एकूणच संपूर्ण समाजाचा असलेला विरोध मावळत गेला आणि मग मुली अधिक संख्येने शाळांत येऊ लागल्या.

फोटो स्रोत, Camil Parkhe
स्थानिक समाज महिलांकडे एक दुय्यम, हलकी व्यक्ती अशा नजरेने पाहत असायचा, त्या लोकांसाठी फरार यांची निष्ठा, जीवनातील पावित्र्य, मनातील चांगुलपणा आणि स्त्रियांसाठी त्यांनी घेतलेले परिश्रम खूप नवलाईची बाब होती.
फरार यांच्या शाळांमधील अनेक माजी विद्यार्थिनी पत्नी आणि माता बनल्यानंतर आपल्या या शिक्षिकेची आठवण करत असत.
फरार यांच्याविषयी प्रेम व्यक्त करणारी आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी या विद्यार्थिनींची पत्रे फरार यांना वेळोवेळी यायची.
मिस फरार यांच्याविषयी स्थानिक लोकांमध्ये खूप आदर होता. या लोकांच्या त्यांच्या स्वतःच्या स्त्रियांबाबत असलेल्या दृष्टिकोनामुळे फरार यांना हे लोक एखादी दैवी व्यक्तीच मानत असत. फरार यांच्या जीवनातली शुद्धता आणि पावित्र्य, त्यांच्या हृदयाचा चांगुलपणा आणि स्त्रियांच्या कल्याणासाठी त्या करत असलेले परिश्रम या लोकांसाठी एक अत्यंत नवलाची बाब होती.''
जोतिबा आणि फरारबाईंची भेट
अहिल्यानगर येथील मुलींच्या शाळेबद्दलची माहिती ऐकून जोतिबा फुले यांनी या शाळेला भेट दिली आणि त्यानंतर आपल्या पत्नी सावित्रीबाई यांना या शाळेत अध्यापनाच्या प्रशिक्षणासाठी दाखल केले.
सिंथिया फरार यांच्या स्त्रीशिक्षणविषयक कार्याचा महात्मा फुले यांच्यावर गाढ प्रभाव पडला होता असे त्यांनी स्वतः लिहिले आहे.
अहिल्यानगर येथे नोकरीला लागलेले त्यांचे मित्र सदाशिवराव गोवंडे यांच्यामुळे ते फरार मॅडमच्या शाळेत गेले होते. याबाबत धनंजय कीर यांच्या 'महात्मा जोतीराव फुले - आमच्या समाजक्रांतीचे जनक' या पुस्तकात खालील उल्लेख आहे.
''दृढनिश्चयी मनुष्य आणि धबधबा हे आपला मार्ग आपणच काढीत पुढेपुढे जातात तसेच जोतिबा आपला मार्ग चोखाळू लागले. ते मुलींची शाळा उघडण्याच्या विचारात असता त्यांचे परम स्नेही सदाशिवराव गोवंडे यांची 'रस्ते आणि थळी खाते' कार्यालयातून अहमदनगरच्या न्यायखात्याच्या कचेरीत बदली झाली."
"नोकरीवर रुजू होण्यासाठी सदाशिवराव गोवंडे अहमदनगरला गेले तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर जोतिबांना नेले. त्याकाळी अहमदनगर हे ख्रिस्ती मिशनऱ्यांनी चालविलेल्या शिक्षणकार्याचे एक मोठे केंद्र बनले होते. तेथे गेल्यावर एके दिवशी सदाशिवराव गोवंडे व जोतिबा यांनी अमेरिकन मिशनमधील मिस फरारबाईंच्या शाळेला भेट दिली."
मुलींची शाळा काढण्यापूर्वी आपण कोणत्या गोष्टी केल्या ह्याविषयी जोतिबा म्हणतात, "माझ्या देशबांधवांपैकी महार-मांग-चांभार या कनिष्ठ जातींतील बंधू हे दुःख आणि अज्ञान यांत साफ बुडालेले आहेत. त्यांची स्थिती सुधारण्यासाठी दयाळू देवाने मला प्रेरणा दिली."
"स्त्रियांच्या शाळेने प्रथम माझे लक्ष वेधले. पूर्ण विचारांती माझे असे मत झाले की, पुरुषांच्या शाळेपेक्षा स्त्रियांच्या शाळेची अधिक गरज आवश्यकता आहे. स्त्रिया आपल्या मुलांना त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षांत जे वळण लावतात त्यातच त्यांच्या शिक्षणाची बीजे असतात."
"अशा विचारात मी असताना अहमदनगर येथील अमेरीकन मिशनमधील मिस फरार या बाईने चालविलेल्या शाळा मी एका मित्रांसमवेत पाहिल्या. ज्या पद्धतीने त्या मुलींना शिक्षण देण्यात येत होते ती पद्धत पाहून मी फार खुश झालो. ''

फोटो स्रोत, Camil Parkhe
हिंदुस्थानात स्त्रीशिक्षणाकडे दुर्लक्ष करण्यात येते याबद्दल जोतिबा आणि गोवंडे यांच्याजवळ मिस फरार यांनी अत्यंत दुःख व्यक्त केले. आपल्या देशाची सुधारणा करण्यासाठी परकीय लोक जे चिकाटीने प्रयत्न करीत होते ते पाहून जोतिबा आणि गोवंडे यांच्या मनावर फारच चांगला परिणाम झाला.
आपल्या देशबांधवांच्या सुधारणेकडे आपले लोक दुर्लक्ष करतात याविषयी त्यांना खंत वाटली. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या पत्नीस शिक्षण देऊन शिक्षणप्रसाराच्या कार्यात तिचे साहाय्य घ्यावे, असे त्यांनी ठरविले.
त्याप्रमाणे जोतीराव पुण्यास परत आल्यावर त्यांची पत्नी सावित्रीबाई यांचे शिक्षण सुरू करण्यात आले आणि त्यांनी स्वतः कनिष्ठ वर्गातील मुलींसाठी. एक शाळा उघडली.
जोतिबा म्हणतात, ''मी पुण्यास येताच कनिष्ठ वर्गातील मुलींसाठी एक शाळा सुरू केली. मात्र त्या शाळेत ज्या मुलांना शिक्षण घेण्याची आवड असेल त्यांनाही प्रवेश दिला. या शाळेत मी वाचन, अंकगणित आणि व्याकरणाची मूलतत्त्वे हे विषय शिकवीत असे''.
सन 1860 नंतर वृद्धत्वाकडे झुकलेल्या फरारबाईंची प्रकृती ढासळत गेली. अहिल्यानगरमधील लष्कर लाईन्समधल्या मुलींची शाळा आणि धर्मशिक्षणासंबंधित (कॅथेखिस्ट) असलेल्या मुलांची शाळा फरारबाई यांच्या देखरेखीखाली चालू राहिल्या.
त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे या शाळांचे काम त्यांना थांबवणे भाग पडले. ते काम पुन्हा सुरू करणे त्यांना शक्यच झाले नाही. वर दिलेल्या तारखा, महिने आणि वर्ष अमेरिकन मराठी मिशनच्या वेळोवेळी लिहिलेल्या अहवालांमध्ये आणि इतर दस्तऐवजांमध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत.
फरारबाईंची अहिल्यानगर येथील मुलींची शाळा म्हणजे माळीवाडा बस स्टॅन्डजवळ आजही चालू असलेली क्लारा ब्रूस गर्ल्स स्कूल.

फोटो स्रोत, Camil Parkhe
जोतिबांनी सावित्रीबाई फुले यांना अहिल्यानगर येथील फरारबाईंच्या शाळेत अध्यापनाच्या प्रशिक्षणासाठी पाठवले होते. त्यामुळे अध्यापनाचे रीतसर प्रशिक्षण घेणाऱ्या सावित्रीबाई फुले पहिल्या भारतीय प्रशिक्षित शिक्षिका ठरतात.
या प्रशिक्षणानंतर सावित्रीबाई यांनी आपल्या स्वतःच्या शाळांमध्ये हेड मिस्ट्रेस म्हणून कार्य केले. पुणे शहरात आणि नजिकच्या परिसरात जोतिबा आणि सावित्रीबाईंनी अनेक शाळा उघडल्या होत्या.
अमेरिकन मराठी मिशनच्या 1813 च्या स्थापनेपासून त्यांचे अनेक अहवाल आणि कागदपत्रे आजही उपलब्ध आहेत. त्या आधारावर फरारबाईंच्या चरित्राची आणि कार्याची माहिती देणारे 'सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षिका सिंथिया फरार' हे त्यांचे पहिलेवहिले चरित्र मी 2 वर्षांपूर्वी लिहिले. या जुन्या दस्तऐवजांत फरार स्कुल्सच्या मुलींचा एक कृष्णधवल फोटो मला सापडला.
मात्र, फरारबाईंच्या छायाचित्राचा शोध मला आजपर्यंत लागलेला नाही. फरारबाईंच्या समाधीचा आता शोध लागल्यानंतर त्यांच्या छायाचित्राचा शोध लागणे फार मुश्किल असेल असे मला आता वाटत नाही.

फोटो स्रोत, Camil Parkhe
सिथिया फरारबाईंचे वयाच्या 67 व्या वर्षी 25 जानेवरी 1862 रोजी आपल्या कर्मभूमीत अहिल्यानगर येथे निधन झाले. अहिल्यानगर येथेच त्यांना चिरनिद्रा देण्यात आली.
फरारबाईंच्या निधनाचे आणि अंत्यविधीचे हृदयद्रावक वर्णन अमेरिकन मिशनच्या 1862 च्या वार्षिक अहवालात दिले आहे. आज शोधण्यात आलेल्या फरारबाईंच्या समाधीवरील स्मृतीवचने त्याच धर्तीची आहेत.
अमेरीकन मराठी मिशनच्या याच वार्षिक अहवालात सिंथिया फरारबाई यांच्यावर लिहिलेल्या मृत्युलेखात महात्मा जोतिबा फुले यांचे प्रत्यक्ष नाव न घेता पुढील संदर्भ देण्यात आला आहे:
"मुलींना शिक्षण देण्याची खूप इच्छा असलेल्या पुणे शहरातील एका तरुण सद्गृहस्थाला मिस फरार यांनी आनंदाने सल्ला आणि मार्गदर्शन पुरवले. मुलींच्या शाळा सुरू करण्याबाबत आणि या शाळांचे व्यवस्थापन करण्याबाबत फरार यांनी या तरुणाला मार्गदर्शन केले."
"अहमदनगरहून पुण्याला परतल्यावर या तरुणाने हिंदू मुलींना शिक्षण देण्यासाठी तेथे शाळा सुरू केल्या. मुलींच्या या शाळांना स्थानिक लोकांनी तसेच काही सत्प्रवृत्त ब्रिटिश लोकांनी मदत केली आणि या शाळांनी पुढील काही वर्षांत खूप प्रगती केली."

फोटो स्रोत, Camil Parkhe
अमेरीकन मराठी मिशनच्या 1862 अहवालात सिंथिया फरारबाई यांच्यावर लिहिलेल्या मृत्युलेखात म्हटले आहे :
"फरारबाईंच्या निधनामुळे स्थानिक महिलांना धक्का बसला. यापैकी शेकडो महिला त्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाल्या होत्या. त्याआधी या महिलांनी कधीही कुठल्याही ख्रिस्ती विधीला हजेरी लावली नव्हती. त्यांच्या नेहेमीच्या परिचयाच्या चेहेऱ्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी या महिला शवपेटीजवळ आल्या तेव्हा एखाद्या दैवताचे दर्शन घ्यावे अशा पद्धतीने त्यांनी मान लववून वंदन केले."
"या लोकांना नेहेमी जाता येईल अशा ठिकाणी जर फरारबाईंना चिरविश्रांती दिली असती तर कदाचित यापैकी अनेक महिलांनी एखाद्या पवित्र तिर्थक्षेत्राप्रमाणे त्या ठिकाणी वेळोवेळी भेट देऊन त्या कबरीवर फुले वाहिली असती."
विशेष म्हणजे फरारबाई यांच्या निधनाच्या वेळी 20 वर्षे आधी अहिल्यानगर येथील अमेरिकन मराठी मिशनच्या कुठल्याही मिशनरीचे किंवा सहाय्यक मिशनरींचे कार्य करत असताना निधन झाले नव्हते.
अहिल्यानगर येथील कबरस्थानात त्यावेळी आधीच्या केवळ 3 मिशनरींच्या कबरी होत्या.
त्यापैकी एक रेव्हरंड विल्यम हर्व्हे यांची होती, अहिल्यानगर येथे अमेरिकन मराठी मिशनचे केंद्र स्थापन झाल्यानंतर 6 महिन्यांतच 1832 ला त्यांचे निधन झाले होते.
दुसरी कबर 1842 साली निधन झालेल्या मिसेस बर्जेस यांची होती आणि तिसरी कबर आता 1862 साली निधन झालेल्या फरारबाईंची होती.

फोटो स्रोत, Camil Parkhe
फरारबाईंच्या समाधीचा शोध घेणे इतके सोपे काम नव्हते. एकतर अहिल्यानगर येथील नेमक्या कुठल्या ख्रिस्ती कबरस्थानांत त्यांना चिरविश्रांती देण्यात आली होती याविषयी काहीही माहिती उपलब्ध नव्हती. जुन्या अमेरिकन मराठी मिशनचा हल्ली वारसा चालवणाऱ्या अहिल्यानगर येथील मराठी मिशनकडे याबाबत काहीही माहिती नव्हती.
अहिल्यानगर येथील इतिहासप्रेमी मंडळाच्या तुकडीने सर्वप्रथम रेव्हरंड नारायण वामन टिळक यांची आणि रेव्हरंड सॅम्युएल फेअरबँक यांची समाधी असलेल्या लाल टाकी जवळील सिद्धार्थनगर कब्रस्थानात फरारबाईंच्या चिरविश्रांती स्थानाचा शोध घेतला.
या शोध मोहिमेत एकदा मीसुद्धा सामील झालो होतो. शेकडो जुन्या-नव्या कबरी असलेल्या कबरस्थानात 150 वर्षांपूर्वी दफन झालेले ठिकाण शोधणे मुश्किल आहे याची मला त्याक्षणीच जाणीव झाली होती. मात्र इतिहासप्रेमी मंडळाच्या या संशोधकांनी हार मानली नाही.
त्यानंतर या संशोधकांनी शहरातल्या दुसऱ्या ख्रिस्ती दफनभूमीकडे, सेंट झेव्हियर्स कब्रस्थानाकडे आपला मोहरा वळवला.
शुक्रवारी 16 ऑक्टोबरला अगदी पहाटेपासून सेंट झेव्हियर्स कब्रस्थानात त्यांनी आपले ठाण मांडले. जुन्या एकेक कबरीच्या ठिकाणी जाऊन ते तिथल्या नावांचा आणि शिलालेखांचा शोध घेऊ लागले आणि सकाळी 10.30च्या सुमारास अभिजीत एकनाथ वाघ जोराने 'युरेका, युरेका' ओरडले, तसे भैरवनाथ वाकळे आणि आसिफ खान हे दोघेही त्यांच्या दिशेने धावले.
द रेस्ट इज हिस्ट्री
अहिल्यानगर येथील दगडी मशीद परिसरातील बुऱ्हाणनगर रस्त्यापाशी सेंट झेव्हियर्स कबरस्थानातली फरारबाईंची ही कबर आजही सुस्थितीत आहे. या सेंट झेव्हियर्स दफनभूमीत अनेक कबरी आहेत.
फरारबाईंच्या चिरनिद्रेची जागा एका बोरीच्या झाडापाशी असून या समाधीवरील या अमेरिकन मिशनरीचे `सिंथिया फरार' हे नाव स्पष्टपणे दिसते. त्याशिवाय या समाधीवरील फरारबाईंविषयी लिहिलेली आदरांजलीसुद्धा स्पष्टपणे वाचता येते हे विशेष.
त्यामुळे जोतिबांना प्रेरणा देणाऱ्या आणि सावित्रीबाईंच्या शिक्षिका असणाऱ्या फरारबाईंचीच ही समाधी आहे याविषयी काही संशय राहत नाही.
या काळ्या, भक्कम दगडी समाधीच्या चिरा आजही शाबूत आहे, पण तिथे कुठल्या काळी कुणी पणती वा मेणबत्ती लावली असेल याची शक्यता खूप कमी.
गेल्या पावणेदोनशे वर्षांच्या काळात या अमेरिकन मिशनरीच्या चिरविश्रांतीच्या ठिकाणी कुणी आदरांजली किंवा फुले वाहिली असतील, असे मला वाटत नाही.
अखेर 16 ऑक्टोबरला या समाधीपाशी जमलेल्या आम्ही लोकांनी ही कसर काही प्रमाणात भरून काढली. तिथे आदराने नतमस्तक होऊन काही फुले वाहिली. दोन-चार मेणबत्त्या पेटवल्या आणि आधुनिक भारतातील या महान शिक्षिकेला आदरांजली वाहिली.
सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबा फुले यांना प्रेरणास्थान असलेल्या फरारबाईंचे हे स्मारक जपायलाच हवे. एक अभिमानास्पद ऐतिहासिक वारसा म्हणून या समाधीचे संवर्धन व्हायला हवे.
त्याचप्रमाणे सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या चरित्रात महत्वाची भुमिका असणाऱ्या इतर व्यक्ती, स्थळे आणि वास्तू यांनादेखील उजेडात आणायाला हवे. त्यामुळे भारताचा सामाजिक इतिहास पूर्णतः बदलणाऱ्या सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या चरित्रांवर अधिक आणि नव्याने प्रकाशझोत टाकण्यात मदत होईल आणि पर्यायाने फुले दाम्पत्याची चरित्रे अधिक परिपूर्ण होतील.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)




























