लठ्ठपणामुळे तुमचे आयुष्य कमी होऊ शकते का? तज्ज्ञांनी सांगितले वजन घटवण्याचे सुरक्षित मार्ग

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रियांका धीमान
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
2025 मध्ये आलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या एका रिपोर्टनुसार, 2022 पर्यंत जगभरात दर 8 पैकी 1 व्यक्ती लठ्ठपणाने त्रस्त होती.
आज जगभरात लठ्ठपणा ही एक अत्यंत गंभीर समस्या बनली असून त्यामुळे इतर अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे.
मग लठ्ठपणा मुळापासून घालवण्यासाठी नक्की काय करायला हवे? आणि दैनंदिन दिनचर्येत कोणते बदल करून लठ्ठपणाची समस्या उद्भवण्याआधीच टाळता येऊ शकते?
लठ्ठपणाशी संबंधित अशाच महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आम्ही दिल्लीच्या फोर्टिस हॉस्पिटलमधील ओबेसिटी विभागाच्या प्रमुख डॉ. मुग्धा यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
लहान मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या इतकी का वाढते आहे?
आजच्या घडीला मुलांमधील लठ्ठपणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे 'स्क्रीन टाइम'. जेव्हा मुलं तासनतास मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉपसमोर बसून राहतात तेव्हा त्यांच्या शारीरिक हालचाली पूर्णपणे थंडावतात.
स्क्रीन पाहता पाहता मुलं काही ना काही खात राहतात. यामुळे शरीरात प्रमाणापेक्षा जास्त कॅलरीज जातात ज्या पुढे जाऊन लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरतात.

फोटो स्रोत, Getty Images
मुलांमध्ये मित्रांना प्रत्यक्ष भेटण्याऐवजी ऑनलाइन संवाद साधण्याचा कल वाढत चालला आहे, ज्यामुळे लठ्ठपणासारख्या समस्या निर्माण होत आहेत.
यात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, जर मूल वयाच्या पहिल्या 5 वर्षांतच लठ्ठपणाचे शिकार झाले तर मोठेपणीही त्याचे वजन जास्त असण्याची शक्यता 70 ते 80% असते.
पालक मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी कशा बदलू शकतात?
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी स्वतः आधी आरोग्यदायी खाण्याची सुरुवात केली पाहिजे.
पालक जर चांगला आहार घेत असतील तर मुलंही त्यांना बघून त्याच गोष्टी शिकतात. मुलांना शक्य तितके बाहेरच्या खाण्यापासून दूर ठेवा आणि आठवड्यातून एक पेक्षा जास्त वेळा बाहेरचे पदार्थ अजिबात खाऊ देऊ नका.
शाळांमध्ये शिक्षकांनीही मुलांमध्ये आरोग्याविषयी जाणीव निर्माण केली पाहिजे. शाळेच्या कँटीनमध्ये तळलेल्या पदार्थांऐवजी पौष्टिक अन्न आणि पॅकबंद ज्यूसऐवजी लिंबू सरबत उपलब्ध करून द्यायला हवे.
या छोट्या-मोठ्या बदलांच्या मदतीने आपण मुलांना लठ्ठपणाच्या समस्येपासून सहज वाचवू शकतो.
मुलांच्या जेवणाचे ताट कसे असावे?
5 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांच्या ताटात सॅलड, प्रोटीनयुक्त पदार्थ जसे की पनीर, अंडी किंवा चिकन, तसेच हिरवी भाजी आणि चपाती असायलाच हवी.
याशिवाय मुलांच्या रोजच्या डाएटमध्ये ताजी फळे आणि लस्सीचा समावेश करावा. तर मैदा आणि जास्त गोड असलेल्या पदार्थांना पूर्णपणे बाजूला ठेवले पाहिजे.
लठ्ठपणाचा तुमच्या आयुष्यावर किंवा वयावरही परिणाम होतो का?
जर लठ्ठपणा प्रमाणापेक्षा जास्त वाढला असेल तर व्यक्तीचे आयुष्य 10 ते 20 वर्षांनी घटू शकते. मात्र वजन फक्त 5% कमी करूनही आरोग्याच्या अनेक मोठ्या समस्या सहज टाळता येतात.

फोटो स्रोत, Getty Images
समजा एखाद्याचे वजन 100 किलो आहे आणि त्याने ते कमी करून 95 किलो केले तरी त्याचा ब्लड प्रेशर आणि शुगर लेव्हल लगेच नियंत्रणात येऊ लागते. जर वजन 10% घटवले, म्हणजेच 100 वरून 90 किलो केले तर रात्री झोपताना श्वास गुदमरण्याचा जो त्रास होतो तो बऱ्याच अंशी कमी होतो.
तुमचे वजन जर 15 ते 20% घटले, तर शरीरातील कित्येक आजार मुळापासून नाहीसे होऊ शकतात. यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका टळतो. फॅटी लिव्हर पूर्णपणे बरे होऊ शकते आणि हार्ट अटॅकसारख्या धोक्यांपासून स्वतःचा जीव वाचवता येतो.
लठ्ठपणाविषयी लोकांमध्ये कोणते गैरसमज पसरलेले आहेत?
लठ्ठपणाविषयी लोकांमध्ये असा एक सर्वसामान्य समज आहे की, वजन वाढणे म्हणजे केवळ आपण काय खातो आणि किती कॅलरीज बर्न करतो यावरच अवलंबून असते. हा विचार एका मर्यादेपर्यंत योग्य असला तरी 100 टक्के खरा नाही.
लठ्ठपणामध्ये अनुवांशिकतेचा फार मोठा वाटा असतो आणि आपल्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलनही यासाठी तितकेच कारणीभूत असते.

फोटो स्रोत, Getty Images
लठ्ठपणासाठी अनुवांशिकता कशी कारणीभूत ठरते?
जर आई-बाबा दोघेही लठ्ठ असतील तर मुलांमध्ये लठ्ठपणा येण्याची शक्यता तब्बल 70 ते 80% पर्यंत असते. तर दोघांपैकी एकालाच हा त्रास असेल तर ही शक्यता 50% असते.
पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीच करू शकत नाही. हे बऱ्याच अंशी तुमच्या हातातही असते. आपल्या घरात अनुवांशिकतेने हा त्रास होऊ शकतो हे आधीच ठाऊक असेल तर तुम्ही पहिल्यापासूनच सावध राहू शकता.
योग्य जीवनशैली आणि काळजी घेतल्यास हे आजार तुम्हाला होणारच असा कोणताही नियम नाही. तुम्ही यापासून सहज दूर राहू शकता.
लठ्ठपणा टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?
सुरुवातीलाच शरीरातील हार्मोन्सच्या पातळीची तपासणी करून घेतली पाहिजे. जर घरात अनुवांशिकतेने कोणाला लठ्ठपणाचा त्रास असेल तर वयाच्या 30 नंतर नियमितपणे हेल्थ चेकअप केले पाहिजेत. यासोबतच आपल्या जीवनशैलीत अनेक महत्त्वाचे बदल करणे गरजेचे आहे.
सकस आहार, दररोज कमीत कमी 1 तास व्यायाम आणि रोज 7 ते 8 तासांची पुरेशी झोप तुम्हाला लठ्ठपणा आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांपासून वाचवू शकते.

लठ्ठपणाची लक्षणे काय आहेत? वजन वाढल्याचे वेळीच कसे ओळखावे?
पायऱ्या चढताना अचानक दम लागणे, गुडघे आणि पायांमध्ये वेदना सुरू होणे किंवा पटकन प्रचंड थकवा जाणवणे…ही सर्व वाढत्या वजनाची धोक्याची घंटा असू शकते. अशा वेळी वजनाबाबत वेळीच सतर्क होणे गरजेचे असते.
ही सर्व वाढत्या लठ्ठपणाची सुरुवातीची लक्षणे आहेत. वजन वाढण्यास सुरुवात होताच त्यावर वेळेत नियंत्रण ठेवले नाही तर नकळत तुम्ही लठ्ठपणाच्या गंभीर विळख्यात कधी अडकलात हे तुमचे तुम्हालाच समजणार नाही.
लठ्ठपणामुळे कोणते मोठे आजार होऊ शकतात?
लठ्ठपणामुळे हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक आणि ब्लड प्रेशरचा धोका 2 पटीने वाढतो.
चयापचयाशी संबंधित आजारांचा विचार केला, तर मधुमेह हायपोथायरॉईड, कोलेस्ट्रॉल, मेटाबॉलिक सिंड्रोम आणि पीसीओडी यांसारख्या समस्या वाढण्याची दाट शक्यता असते.
कित्येक प्रकारचे कॅन्सर थेट लठ्ठपणाशी जोडलेले आहेत. जसे की गर्भाशयाचा कॅन्सर, आतड्यांचा आणि पित्ताशयाचा कॅन्सर. याव्यतिरिक्त लठ्ठपणामुळे किडनीच्या कार्यावर परिणाम होतो आणि मेंदूला सूज येण्याचा धोकाही वाढतो.

फोटो स्रोत, Getty Images
सांगायचे झाले तर लठ्ठपणामुळे जवळपास 200 पेक्षा जास्त गंभीर आजार होतात. आपण या गोष्टी फार हलक्यात घेतो पण प्रत्यक्षात लठ्ठपणा म्हणजे कित्येक मोठ्या आजारांचे मूळ कारण ठरते.
लठ्ठपणासारख्या आजाराला मुळापासून नष्ट करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात?
लठ्ठपणा कमी करण्याचे 3 प्रभावी उपाय आहेत. त्यातील पहिला उपाय म्हणजे योग्य डाएट आणि व्यायाम. वजन कमी करण्यात 70 ते 80% वाटा हा आहाराचा असतो, तर 20 ते 30% वाटा नियमित व्यायामाचा असतो.
मात्र याव्यतिरिक्त हार्मोनल चढ-उतार आणि इतर वैद्यकीय समस्यांचाही यात मोठा प्रभाव असतो. त्यामुळे या समस्येचे मूळ कारण शोधून योग्य उपचारांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे ठरते.
सोशल मीडियावरील रील्स किंवा व्हिडिओ बघून कोणताही डाएट प्लॅन फॉलो करू नका. तिथली माहिती प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार नसते तर ती सरसकट सर्वांसाठी असते, ज्यामुळे त्याचा योग्य परिणाम दिसत नाही. यासाठी नेहमी एखाद्या आहारतज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा वैयक्तिक सल्ला घेणे गरजेचे ठरते.
आपल्या आहारात कोणते महत्त्वाचे बदल करायला हवेत?
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार 'मेडिटेरेनियन डाएट' घेणे सर्वात उत्तम मानले जाते. यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असावे, जे ताजी फळे आणि हिरव्या पालेभाज्यांतून मिळते.
डाएटमध्ये प्रोटीन जास्त घ्या जसे की डाळी, अंडी, चिकन, मासे आणि सुकामेव.. पण रेड मीट खाणे मात्र टाळा. यासोबतच 'पोर्शन कंट्रोल' म्हणजेच एका वेळी आपण किती प्रमाणात खातोय यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
रोज न चुकता शारीरिक व्यायाम करा. केवळ कार्डिओ म्हणजे सायकलिंग, ट्रेडमिल किंवा वॉक करून चालणार नाही, तर स्ट्रेंथ ट्रेनिंग करणेही खूप महत्त्वाचे आहे.
ज्यांना जिममध्ये जाणे शक्य नाही ते घरीच योग करू शकतात. सूर्यनमस्कार, वॉल पुश-अप्स, सिट-अप्स, कुठलाही आधार न घेता बैठका मारणे आणि प्लँक यांसारखे साधे व्यायामही वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.

फोटो स्रोत, Getty Images
क्रॅश डाएटचा शरीरावर काय परिणाम होतो? यामुळे नुकसान होते का?
जेव्हा आपण आहारातील कॅलरीज अचानक खूप कमी करतो तेव्हा शरीर उपाशी राहण्याच्या स्थितीत जाते. अशा वेळी शरीरात असे काही एंझाइम्स तयार होतात जे आरोग्यास हानी पोहोचवतात.
यामुळे स्नायूंचे नुकसान होऊन उलट चरबी जमा होण्याचा धोका वाढतो. तर शरीराला ताकद देण्यासाठी स्नायू सर्वात जास्त गरजेचे असतात.
वजन झटपट घटवण्यासाठी क्रॅश डाएट केल्यास पित्ताशयात खडे होणे आणि स्नायू अत्यंत कमजोर होणे अशा अनेक तक्रारी उद्भवतात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही हा क्रॅश डाएट सोडून पुन्हा नेहमीप्रमाणे जेवायला सुरुवात करता, तेव्हा वजन कमी होण्याऐवजी आधीपेक्षाही वेगाने आणि जास्त वाढते.
लठ्ठपणामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास आणि मानसिक स्वास्थ्य कितपत खालावते?
लठ्ठपणाचा सामना करणाऱ्या अनेक व्यक्तींना शाळा, कॉलेज, ऑफिस किंवा समाजात बॉडी शेमिंगचा सामना करावा लागतो. याचा त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर वाईट परिणाम होतो.
कित्येक जण डिप्रेशनमध्ये जातात. डिप्रेशनमध्ये आल्यावर बऱ्याच लोकांना प्रमाणापेक्षा जास्त खाण्याची सवय लागते. त्यामुळे वजन आणि डिप्रेशनचे एक न संपणारे दुष्टचक्र सुरू होते, ज्यामुळे लठ्ठपणा अधिकच बळावतो.
लठ्ठपणाचा सामना करणाऱ्या लोकांसाठी आपला काय संदेश आहे?
लठ्ठपणा म्हणजे फक्त अति खाणे किंवा आळशीपणा असा गैरसमज करून घेऊ नका. हे लक्षात घ्या की, ज्याप्रमाणे थायरॉईड, बीपी, शुगर आणि कोलेस्ट्रॉल हे आजार आहेत अगदी तसाच लठ्ठपणा हासुद्धा एक आजार आहे.
त्यामुळे जर तुम्ही लठ्ठपणाने त्रस्त असाल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःच्या मनाने उपचार करण्याचे प्रयत्न करू नका.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

























