पुण्यात विषारी दारूच्या बळींचा आकडा 14 वर, पिंपरी-चिंचवड आणि हडपसरमध्ये खळबळ

या घटनेनंतर गावात सूचना फलकावर देण्यात आलेली माहिती.

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, या घटनेनंतर गावात सूचना फलकावर देण्यात आलेली माहिती.
Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात गुरुवारी (28 मे) विषारी दारू प्यायल्यानं 10 जणांचा मृत्यू झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. तर हडपसरमध्ये विषारी दारूमुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेत आतापर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून ते सर्व फुगेवाडी, दापोडी परिसरातील रहिवासी आहेत. मृतांची ओळख पटवण्यात आली आहे आणि त्यांच्या मृतदेहांचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे.

पुढील तपासासाठी व्हिसेरा नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. तसेच आणखी काही जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, असं पिंपरी चिंचवड पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलीसांनी काही आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कर्नलसिंग विरका, गुरमंगतसिंग विरका, योगेश वानखेडे आणि राधेश्याम प्रजापती यांचा समावेश आहे.

आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना 8 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याशिवाय राज्य उत्पादन शुल्क विभागानेही या प्रकरणात काही संशयितांविरुद्ध कारवाई केली आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार26 ते 28 मे 2026 या कालावधीत दापोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुगेवाडी परिसरात विषारी हातभट्टीची दारू प्यायल्याने गंभीर घटना घडली.

या प्रकरणी 29 मे 2026 रोजी दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 114/2026 नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमांबरोबरच महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 ते 28 मे दरम्यान पांढरेमळा परिसरात हातभट्टीची दारू पिल्यानंतर काही व्यक्तींना उलट्या व चक्कर येण्याचा त्रास झाला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, राहुल क्षिरसागर (45), अरुण डाडर (60), दत्ता सूर्यवंशी (55) आणि अशोक चव्हाण (52) यांनी आरोपीकडून दारू विकत घेतली होती, आणि ती पिल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडून त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणात आकाश दीपक जाधव (30) हा मुख्य आरोपी असून त्याने विषारी द्रव्य मिसळून बेकायदेशीर दारू तयार करून विक्री केल्याचा आरोप आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करणार असल्याचं स्पष्ट केलंय.

कारवाईची मागणी

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, बंदी असलेल्या हातभट्टीच्या गावठी (विषारी) दारूमुळेच या नागरिकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

या परिसरात अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप करत, प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

या घटनेनंतर राजकीय वातावरणही तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी महापौर योगेश बहल यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

तसेच दोषींवर कडक कारवाई करावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे.

विषारी दारूने घेतले 7 बळी; पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

फोटो स्रोत, UGC

दरम्यान, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यात तातडीने 8 जणांना अटक करण्यात आली. आणखी काही जणांना अटक केली जाऊ शकते. या संपूर्ण यंत्रणेची पाळंमुळं शोधून ती नष्ट करण्यासाठी पोलिस प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तर या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे व पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला.

दुर्घटनेच्या मुळाशी जाऊन तपास करा आणि अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करावी,अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

गावठी दारू का बनते विषारी?

देशी दारूला कच्ची दारू असंही म्हणतात. तिचं मिश्रण करणं अतिशय सोपं असतं. पण या कच्च्या दारूची झिंग म्हणजे त्यामुळं होणारी नशा वाढवण्याच्या नादात ती विषारी बनते.

सामान्यत: गूळ आणि उसाच्या मळीपासून देशी दारू तयार केली जाते. त्यात युरिया आणि बेलाची पानं टाकली जातात. त्यामुळे त्याची नशा आणखी जास्त होते.

दारू जास्तीत जास्त चढावी, यासाठी त्यात ऑक्सिटॉसिन टाकलं जातं, ते मृत्यूला निमंत्रण देते. ट

गेल्या काही वर्षांत अशी माहिती मिळाली आहे की ऑक्सिटॉसिनमुळे वंध्यत्व येतं आणि मज्जासंस्थेशी निगडीत आजार होतात.

गावठी दारू बनवताना अशी कोणती चूक होते, ज्यामुळे ती विषारी होते?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संग्रहित छायाचित्र

त्याच्या सेवनामुळे डोळ्यात जळजळ, खाज आणि पोटात जळजळ होऊ शकते. दीर्घकाळ सेवन केल्यास डोळ्यांची दृष्टीही जाऊ शकते.

कच्च्या दारूत युरिया आणि ऑक्सिटॉसिन सारखे रासायनिक पदार्थ मिसळल्यास मिथिल अल्कोहोल तयार होतं आणि त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो.

मिथिल अल्कोहोल शरीरात जाताच झपाट्याने रासायनिक प्रक्रिया होते. त्यामुळे शरीराच्या आतले अवयव निकामी होतात आणि लगेच मृत्यू ओढवतो.

जे द्रव्य दारू म्हणून विकलं जातं ते 95 टक्के शुद्ध अल्कोहोल म्हणतात. त्याला इथेनॉलसुद्धा म्हणतात.

उसाचा रस, ग्लुकोज, पोटॅशियम नायट्रेट, मोहाची फुलं तसंच बटाटे, भात, जवस, मका असे स्टार्च असलेले पदार्थ एकत्र आंबवून इथेनॉल तयार केलं जातं.

या इथेनॉलमध्ये आणखी नशा टाकण्यासाठी त्यात मिथेनॉल टाकलं जातं. त्यात कास्ट अल्कोहोल किंवा कास्ट नॅप्था या नावाने ओळखलं जाणारं मिथेनॉल मिसळलं जातं की दारूचं संतुलन बिघडतं आणि ती धोकादायक बनते.

मिथेनॉल विषारी असतं

रसायनशास्त्रातील सर्वांत सोपंसरळ अल्कोहोल म्हणजे मिथेनॉल. सामान्य तापमानात ते द्रवरूपात आढळतं.

हे एक रंगहीन आणि ज्वलनशील द्रव्य आहे. त्याचा गंध इथेनॉलसारखाच असतो. त्याचा वापर अँटीफ्रीझर म्हणून, म्हणजे गोठणबिंदू कमी करण्यासाठी केला जातो. तसंच एखादा पदार्थ तयार करण्यासाठी आणि इंधन म्हणूनही मिथेनॉल वापरलं जातं.

मिथेनॉल अतिशय विषारी असतं, हे इथं लक्षात घेणं आवश्यक आहे. त्याचा वापर पिण्यासाठी अजिबात केला जात नाही. ते प्यायल्यामुळे मृत्यू ओढवतो तसंच दृष्टी जाण्याचाही धोका असतो.

औद्योगिक क्षेत्रात इथेनॉलचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, कारण इथेनॉलची विरघळण्याची क्षमता जास्त आहे. त्याचा वापर वॉर्निश, पॉलिश, औषधं, क्लोरोफॉर्म, कृत्रिम रंग, पारदर्शक साबण, अत्तर आणि इतर द्रव्यं तयार करण्यासाठी होतो.

दारूच्या अनेक प्रकारात, जखमा स्वच्छ करताना जंतू नष्ट करण्यासाठी तसंच प्रयोगशाळेत द्रावण (solvent) म्हणून त्याचा वापर करण्यात येतो.

मृत्यू कसा होतो?

विषारी दारू प्यायल्यामुळे शरीरात काय होतं?

या प्रश्नावर डॉ. अजित श्रीवास्तव म्हणतात, "सामान्य दारू ही इथाईल अल्कोहोल असते तर मिथाईल अल्कोहोल विषारी असते. कोणतंही अल्कोहोल शरीरात लिव्हरच्या माध्यमातून अल्डिहाईडमध्ये बदलतं. मात्र मिथाईल अल्कोहोलचं फॉर्मलडिहाईड नावाच्या विषात रूपांतर होतं.

"या विषाचा सगळ्यांत जास्त परिणाम डोळ्यांवर होतो. आंधळेपणा हे त्याचं पहिलं लक्षण आहे. एखाद्याने जास्त दारू प्यायली तर फॉर्मिक अॅसिड शरीरात तयार होतं. त्यामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतो," श्रीवास्तव सांगतात.

आश्चर्याची गोष्ट अशी की विषारी दारूचा उपचारही दारूनेच होतो.

डॉ. अजित श्रीवास्तव सांगतात, "मिथाईल अल्कोहोलचा उपचार इथाईल अल्कोहोल आहे. विषारी दारूला उतारा म्हणून गोळ्याही मिळतात. मात्र भारतात त्या जास्त प्रमाणावर उपलब्ध नाहीत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)