शिक्षक दिन: नाशिक मनपा शाळेचा चेहरामोहरा बदलणाऱ्या कुंदा मॅडमची गोष्ट
नाशिक मनपाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यामंदिरातील शिक्षिका कुंदा बच्छाव यांना यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
महानगरपालिकेच्या शाळांबद्दलची ‘गुणवत्ता कमी’ अशी धारणा बदलण्याचा निर्धार त्यांनी केला. त्यासाठी शाळेची इमारत बदलण्यापेक्षा त्यांनी वर्गातलं शिकणं बदललं.
खेळ, गोष्टी, प्रयोग आणि अनुभवातून शिक्षण देण्यासोबतच अभ्यासात मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ‘निपुण कोपरा’ तयार केला. ‘दत्तक मैत्रीण’ या उपक्रमातून विद्यार्थी एकमेकांना वेगवेगळे विषय शिकवतात. तर ‘संविधान सापशिडी’ या खेळातून मुलं हक्क आणि कर्तव्य शिकतात.
कुंदा बच्छाव यांचं काम वर्गाच्या चार भिंतींपुरतं मर्यादित राहिलं नाही.
कोरोना काळात घरोघरी केलेल्या सर्वेक्षणादरम्यान त्यांनी शिक्षणापासून दूर जाणाऱ्या आणि लग्न झालेल्या काही मुलींना पाहिलं. त्यानंतर 2021 मध्ये पाच मुलींपासून ‘शैक्षणिक पालकत्व’ उपक्रमाची सुरुवात झाली. समाजातील अनेक लोक या उपक्रमाशी जोडले गेले आहेत आणि आज 150 मुली उच्च शिक्षण घेत आहेत, असं कुंदा बच्छाव सांगतात.
रिपोर्ट- आशय येडगे
शूट- प्रज्वल भालेराव
व्हीडिओ एडिट- निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






