23 नाणी, 2 साखळ्या, नेलकटर, खिळे... 16 वर्षीय मुलाच्या पोटातून निघाल्या 40 वस्तू

- Author, मायाकृष्णन कन्नन
- Role, बीबीसी तमिळसाठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
एका 16 वर्षीय मुलाच्या पोटात खिळे, नेलकटर, हेअरपिन, साखळ्या आणि 23 नाणी अशा किमान 40 वस्तू आढळल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. हा मुलगा तामिळनाडूच्या तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील अय्यामपालायम गावात राहतो.
या मुलाला पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होत असल्यानं त्याची आई वनिता यांनी 22 ऑगस्ट रोजी त्याला रुग्णालयात नेलं.
त्यावेळी तपासणी करणाऱ्या डॉक्टरांना त्याच्या पोटात विविध वस्तू असल्याचं दिसलं. त्यानंतर त्याच रात्री त्याच्यावर उपचार करून त्या वस्तू काढण्यात आल्या.
पण या वस्तू त्याच्या पोटात गेल्याच कशा? या प्रकरणात नेमकं काय घडलं?
'नाणी गिळण्याची सवय'
"माझ्या मुलावर कोणतेही शुल्क न घेता उपचार करून त्याचा जीव वाचवणाऱ्या डॉ. सुंदरपांडियन यांचे आम्ही ऋणी आहोत," असे 16 वर्षीय पृथिक रोशनची आई वनिता यांनी बीबीसी तमिळला सांगितले.
त्या आणि त्यांचे पती महालिंगम मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, असं त्या सांगतात.
"आम्हाला 3 मुली आहेत. रोज कामाला गेलो तरच उत्पन्न मिळते. त्यावरच आमचं कुटुंब चालतं."
वनिता सांगतात, गेल्या महिन्यात 22 ऑगस्ट रोजी त्यांचा मुलगा पृथिक रोशन याला पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला होता.
"मला तेव्हा काहीच समजत नव्हतं. तो काही दिवसांपासून माझ्याकडं पैसे मागत होता. मी वेळोवेळी त्याला पैसे देत होते. पण तो सतत पैसे मागू लागल्यामुळे मला संशय आला. त्या दिवशीही त्यानं माझ्याकडून पैसे घेतले आणि काही सेकंदांत ते तोंडात टाकून गिळले. तेव्हाच मला कळलं की तो दररोज पैसे गिळून टाकतोय. काही क्षण तो पोट धरून बसला आणि नंतर त्याला उलटी झाली," असे त्यांनी सांगितलं.
"मला काय करावं ते सुचत नव्हतं. मी लगेच त्याला उचलून आमच्या अय्यामपालायम गावातून तिरुवन्नामलाई येथील रुग्णालयात घेऊन गेलं. तेथील डॉ. सुंदरपांडियन यांनी तात्काळ माझ्या मुलाच्या पोटाची तपासणी केली."
"पुढील तपासण्यांमध्ये त्याच्या पोटात धारदार धातूच्या वस्तू असल्याचे समोर आले," असे वनिता म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, "डॉक्टरांनी विचारणा केल्यावर मी त्यांना सांगितले की, घरातून नेलकटर, साखळ्या यांसारख्या वस्तू वारंवार गायब होत होत्या आणि तो काही दिवसांपासून माझ्याकडून रोज पैसे घेत होता. आम्ही गरीब आहोत हे समजल्यावर डॉक्टरांनी आणखी काही न बोलता, शक्य ती सर्व मदत करू असं सांगितलं."
'कबड्डी खेळताना पडला होता'
वनिता यांनी सांगितलं, त्यांचा मुलगा पृथिक रोशन नववीपर्यंत चांगला अभ्यास करत होता आणि त्याला कबड्डी खेळण्याची विशेष आवड होती.
"तो नववीत असताना कबड्डी खेळताना पडला. त्यामुळे त्याच्या जबड्याच्या भागाला गंभीर दुखापत झाली," त्या म्हणाल्या.

वनिता पुढे म्हणाल्या, "त्या दिवसापासून तो फारसा कोणाशी बोलत नसे. तो फक्त छताकडे बघत बसायचा. मी सुरुवातीला ते गांभीर्यानं घेतं नाही. पण एके दिवशी शाळेतील शिक्षकांनी, 'तो आधीसारखा अभ्यास करत नाही, स्वतःशीच काहीतरी बोलत असतो' असं, मला बोलावून सांगितलं."
"मला काहीच कळत नव्हतं. त्यामुळे मी त्याला कल्लाकुरिची, तिरुवन्नामलाई, वेल्लोर आणि इतर अनेक ठिकाणच्या न्यूरोलॉजिस्टकडे नेलं. पण त्यामध्ये काहीच सुधारणा झाली नाही. शेवटी मी त्याला बंगळुरूला नेलं. तिथं त्याच्या काही चाचण्या करण्यात आल्या आणि औषधं देण्यात आली. तो औषधं घेत असेपर्यंत ठीक होता, पण त्यानं त्याला फार झोप यायची. तरीही तो बरा होईल अशी मला खात्री होती. डॉक्टरांनी आम्हाला 15 दिवसांनी पुन्हा दाखवायला येण्यास सांगितलं होतं."
मात्र, कौटुंबिक परिस्थितीमुळे आणि पैशांच्या अभावामुळं बंगळुरूमधील उपचार सुरू ठेवणे शक्य झाले नाही, असे सांगताना वनिता म्हणाल्या, "याच दरम्यान ही घटना घडली."
डॉक्टरांनी काय सांगितलं?
डॉ. सुंदरपांडियन यांनी बीबीसी तमिळशी बोलताना सांगितलं, "वनिता 16 वर्षीय पृथिक रोशनला घेऊन आल्या तेव्हा आम्ही तात्काळ एक्स-रे काढला. त्यामध्ये मुलाच्या पोटात काही धारदार वस्तू असल्याचं दिसलं. त्याच्या आईला विचारल्यावर त्यांनी माहिती दिली. त्यांचा मुलगा काही दिवसांपासून पैसे घेत होता आणि घरातील नेलकटरसह काही वस्तू गायब झाल्या होत्या. तसंच त्या दिवशी (22 ऑगस्ट) त्याने तिच्या डोळ्यांसमोर एक नाणं गिळल्याचंही तिनं सांगितलं."
मध्यरात्री भूलतज्ज्ञांना बोलावून तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली, असे सांगताना डॉ. सुंदरपांडियन म्हणाले, "या शस्त्रक्रियेदरम्यान आम्ही त्याच्या पोटातून 23 नाणी, ताईत, नेलकटर, हेअरपिन, साखळ्या आणि खिळे यांसारख्या वस्तू सुरक्षितपणे बाहेर काढल्या."
"आम्ही त्याला एक आठवडा रुग्णालयात ठेवून उपचार केले. आता तो दर आठवड्याला तपासणीसाठी येतो," असंही त्यांनी सांगितलं.

"पचनमार्गात धारदार वस्तूंमुळे जखम होण्याचा किंवा छिद्र पडण्याचा धोका होता. त्यामुळे तातडीनं शस्त्रक्रिया करणं आवश्यक होती. शस्त्रक्रियेनंतर मुलाला अतिदक्षता वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं.. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्यात चांगली सुधारणा होत आहे," असे डॉक्टर म्हणाले.
"मुलांबाबत, विशेषतः मानसिक आरोग्याशी संबंधित उपचार घेत असलेल्या मुलांबाबत पालकांनी अधिक सतर्क राहणं आवश्यक आहे. मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींची काळजी घेणं आणि ते नियमितपणे औषधे घेतली आहेत की नाही हे पाहणं, ही पालकांची जबाबदारी आहे," असे डॉ. सुंदरपांडियन यांनी सांगितलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

























