'कॉक्रोच जनता पार्टी' काय आहे? पक्षाचा 'संस्थापक' आहे एक मराठी तरुण

फोटो स्रोत, ABhijeet DIpake
- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
झुरळ...हे नाव ऐकलं की अनेकांची झोप उडते. पण भारतात सध्या हे नाव प्रचंड ट्रेंडिंग आहे.
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतीय युवक आणि झुरळ यावरुन एक विधान केले होते. त्यानंतर निर्माण झालेल्या वादानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले आणि त्या टिप्पणीचा चुकीचा अर्थ काढला गेला असल्याचं त्यांनी नंतर स्पष्ट केलं.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर एका खास उपहासात्मक ट्रेंडची चर्चा आहे. त्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे 'कॉक्रोच जनता पार्टी.'
मूळच्या छत्रपती संभाजीनगरच्या एका तरुणाने अमेरिकेच्या बोस्टनमध्ये बसून 'कॉक्रोच जनता पार्टी' नावाने एक वेबसाईट, इंस्टाग्राम हॅन्डल आणि एक्सचं खातं बनवलं. आणि बघता बघता संपूर्ण देशभर ही कॉक्रोच जनता पार्टी अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरली आहे.
बीबीसी मराठीने या पक्षाचे 'संस्थापक आणि समन्वयक' अभिजित दिपके यांच्याशी चर्चा केली आणि अशा प्रकारचा उपक्रम हाती घेण्यामागची त्यांची भूमिका काय आहे हे समजून घेतले.
इंस्टाग्रामवर फक्त 3 दिवसांत 40 लाख फॉलोअर्स आहेत. 2 लाखांहून अधिक लोकांनी वेबसाईटवर सदस्यत्वासाठी नोंदणी केली आहे, असं अभिजित दिपके सांगतात.
अभिजित सध्या अमेरिकेतल्या बोस्टन येथे पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.
देशातल्या तरुणाईचे विशेषतः जेन-झीला भेडसावणाऱ्या समस्या, शिक्षणाचा खालावत चाललेला दर्जा, न्यायपालिकेतल्या त्रुटी, बेरोजगारी आणि अशा अनेक समस्यांना जवळून बघितलेल्या अभिजित यांनी सहज हा पक्ष सुरू केल्याचं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, X/CockroachJantaParty
तर डिजिटल क्षेत्रात सध्या चर्चेत असलेल्या या पार्टीची सुरुवात नेमकी कशी झाली? सध्या या उपक्रमाला कसा प्रतिसाद मिळतो आहे?
कॉक्रोच पार्टीच्या सदस्यांची तक्रार नेमकी काय आहे आणि हे प्रकरण फक्त एका सोशल मीडिया ट्रेंडपुरतं मर्यादित आहे का? अभिजित दिपके यांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बीबीसी मराठीला दिली आहेत.
'एक्सवर सहज केलेल्या एका पोस्टमधून या पार्टीची मुहूर्तमेढ रोवली गेली'
अभिजित म्हणतात की कॉक्रोच पार्टीची ही कल्पना कुठलंही नियोजन करून, खूप विचार करून सुरू केली नव्हती.
ते सांगतात, "मी सोशल मीडियावर भारताच्या सरन्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भातील वाद वाचला. खरंतर ते वाचून रागही आला पण मग माझ्या मनात एक प्रश्न आला 'जर सगळे कॉक्रोच एकत्र आले तर?' मग मी एक्सवर एक पोस्ट केली, ज्यात असं लिहिलं, 'What if all cockroaches come together?' आणि तिथून ही गोष्ट सुरू झाली."

दिपके सांगतात की त्या पोस्टला अनेकांचे रिप्लाय आले, शेकडो रीट्विट्स करण्यात आले. विशेषतः जेन झी (Gen-Z) वयोगटातील तरुणांकडून, 'आपण एकत्र आलो पाहिजे' अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यानंतर त्यांनी AI च्या मदतीने एक पोस्टर तयार केलं आणि 'कॉक्रोच पार्टी'चा सदस्य होण्यासाठीची एक नियमावली तयार केली.
"मी म्हणालो सरन्यायाधीश जे म्हणाले त्याला अनुसरून, तुम्ही आळशी असाल, बेरोजगार असाल आणि सतत ऑनलाईन राहत असाल तर तुम्ही आमच्या पार्टीचे सदस्य होऊ शकता. लोकांना याच्यात गंमत वाटली. पण त्याहून महत्त्वाचं, देशातल्या विशीतल्या अनेक तरुणांना हा पक्ष 'आपला' वाटू लागला. हजारो बेरोजगार मुलांना ही पार्टी त्यांची वाटली आणि मग काय मागच्या चार दिवसात चार मिलियन फॉलोअर्सचा टप्पा आम्ही पार केला," असं दिपके यांनी सांगितलं.
अभिजित यांनी कॉक्रोच जनता पार्टी नावाची एक वेबसाईट बनवली. त्यात तुम्हाला सदस्य व्हायचं असेल तर एक फॉर्म दिला आणि याच्याच आधारे 20 मे पर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी या पार्टीचं सदस्यत्व घेतल्याचा दावा दिपके यांनी केला आहे.
हा फक्त सरन्यायाधीशांच्या विरोधातला राग होता का?
अभिजित म्हणाले की, "मी आतापर्यंत किमान 30 मुलाखती दिल्या आहेत. अनेकांना असं वाटतं की हा केवळ सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावर असणारा राग आहे. पण तुम्ही नीट बघाल तर हे तसं नाहीये. हा कोणत्याही एका व्यक्तीवरचा राग नाही. हा पूर्ण व्यवस्थेवरचाच राग आहे. मागची अनेक वर्षं तरुणांमध्ये एक नाराजी जमा होत गेली आहे. त्यांना फक्त बोलण्यासाठी व्यासपीठ मिळालं नव्हतं. आणि आता कॉक्रोच पार्टीने त्यांना ती जागा मिळवून दिलीय."

फोटो स्रोत, Getty Images
ते पुढे सांगतात की गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी ज्या तरुणांशी संवाद साधला, त्यांच्यात रोजगार, शिक्षण आणि राजकारणाविषयी मोठी निराशा आहे.
"ही मुलं म्हणतायत की आमचा ज्यांनी अपमान केला त्यांना तुम्ही त्यांच्याच भाषेत दिलेलं हे उत्तर आहे. आमचा आवाज कुणीही उचलत नाही, तुम्ही ते काम केलं आहे. त्यामुळे तुम्ही मागे फिरू नका," दिपके म्हणाले की ही खूप मोठी जबाबदारी आहे.
सोशल मीडियावरून राष्ट्रीय चर्चेपर्यंत
कॉक्रोच जनता पार्टी हा केवळ तरुण पिढीचा ट्रेंड राहिलेला नाही. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा, कीर्ती आझाद यांनी सोशल मीडियावर या पक्षात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी देशातील युवकांच्या नाराजीचं हे चिन्ह असल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावर कॉक्रोच पार्टीची मोठी चर्चा सुरू आहे. काही वापरकर्ते याला या वर्षीचं सर्वात मोठं डिजिटल आंदोलन म्हटलं आहे तर काहींनी हा 'नोटा'चा पर्याय असल्याचं म्हटलं आहे.
काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही या घटनेकडे फक्त विनोद म्हणून न पाहता, भारतातील तरुणांच्या अस्वस्थतेचा डिजिटल चेहरा म्हणून पाहायला सुरुवात केली आहे.
हा फक्त सोशल मीडिया ट्रेंड आहे की याला काही भविष्य आहे?
अभिजित दिपके 'ही तर फक्त सुरुवात असल्याचं' म्हणतात. त्यांना वाटत की आता या पार्टीला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. देशातील तरुणांना झुरळ होण्यास भाग पडणारी परिस्थिती का निर्माण झाली? याचा विचार होणं गरजेचं असल्याचं ते म्हणतात.
अभिजित म्हणाले, "सरन्यायाधीश हे फक्त निमित्त होतं. अनेक वर्षं साचलेला राग कुठूनतरी बाहेर येणारच होता. नव्या पिढीला हिंदू-मुस्लिम, जात-पात हे सगळे भेद नको आहेत. आम्हाला चांगलं शिक्षण, रोजगार आणि नवनवीन तंत्रज्ञान हवं आहे. महिलांना आरक्षण हवं आहे हे सगळं असताना धर्माच्या नावावर देशाचं विभाजन करणाऱ्यांना आम्ही थारा देत नाही."

कॉक्रोच जनता पार्टीच्या वाढत्या लोकप्रियतेनंतर आणखी एक प्रश्न चर्चेत आला. भारतातील जेन झीची तुलना नेपाळ, श्रीलंका किंवा बांगलादेशमधील युवा आंदोलनांशी करता येईल का?
अभिजीत दिपके यांना मात्र ही तुलना चुकीची वाटते, "नेपाळ आणि बांगलादेशमध्ये जे झालं त्या त्यांच्यासोबत भारताच्या जेन झीची तुलना करणं खूप चुकीचं आहे," असं ते म्हणतात.
त्यांच्या मते, भारतातील तरुण पिढीला केवळ सोशल मीडिया ट्रेंड किंवा संतप्त जमाव म्हणून पाहणं चुकीचं आहे. गेल्या काही दिवसांत शेकडो तरुणांशी संवाद साधल्यानंतर त्यांना वेगळंच चित्र दिसलं.
"प्रत्येकजण मला सांगतोय की आपण जे काही करायचं आहे ते संविधानाच्या चौकटीतच राहूनच केलं पाहिजे. भारताचा तरुण लोकशाहीवर विश्वास ठेवणारा आहे, त्यामुळे तो नाराजी व्यक्त करेल, आंदोलन करेल; पण जे काही करेल ते तो शांततेच्या मार्गाने करेल," असं दिपके सांगतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.


















