भारतातील पहिल्या जेन-झी आंदोलनानं डॉ. आंबेडकरांचीच निवड आयकॉन म्हणून का केली?

संसद मार्चमधील सगळ्या धुमश्चक्रीवेळीही अभिजीतच्या हातात आंबेडकरांचीच तसबीर होती.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संसद मार्चमधील सगळ्या धुमश्चक्रीवेळीही अभिजीतच्या हातात आंबेडकरांचीच तसबीर होती.
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

"डॉ. आंबेडकर आणि 'जय भीम' हा या देशातील त्या प्रत्येक व्यक्तीचा आवाज आहे, जो वंचित आणि शोषित आहे. कृपा करून त्याला एका समूहापुरतं मर्यादित करण्याची चूक करू नका."

एका मुलाखतीमध्ये अभिजीत दिपके सांगताना दिसतो. खरंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या काळात दिलेल्या शेकडो मुलाखतीमध्ये जेव्हा-केव्हा त्याला या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तो याच आशयानं बोलता झालेला दिसतो.

मी जेव्हा-जेव्हा जंतर-मंतरवर हे आंदोलन कव्हर करण्यासाठी फिरलो, तेव्हा-तेव्हा मला एक प्रतिमा आणि एक घोषणा प्रत्येक दिवशी ठिकठिकाणी पहायला-ऐकायला अवश्य मिळाली.

ती म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि 'जय भीम' ही घोषणा.

अर्थात, तिथे आलेला प्रत्येक आंदोलक आंबेडकरवादीच होता वा अभिजीत दिपके आंबेडकरांबाबत जे मत मांडतो, ते प्रत्येकाला मान्यच होतं, असं मानणं भाबडेपणाचं ठरेल.

पण, व्यापक अर्थानं या आंदोलनानं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा चेहरा आणि 'जय भीम' ही घोषणा आपली ओळख म्हणून निर्विवादपणे आत्मसात केली.

'आंबेडकरांना दलितांपुरतं मर्यादित करू नका'

'कॉक्रोच जनता पार्टी' नावाचं नवं वादळ घेऊन अभिजीत दिपके जेव्हा दिल्ली एअरपोर्टवर उतरला, तेव्हा अत्यंत कडेकोट सुरक्षाव्यवस्थेच्या घेऱ्यामध्ये सगळ्या माध्यमांचे कॅमेरे त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले होते.

डोक्यावर टोपी, कानात हेडफोन, टी-शर्ट-जॅकेट आणि हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं छायाचित्र असलेलं पुस्तक माध्यमांच्या कॅमेऱ्यांना दाखवतच त्याने जंतर-मंतरकडे कूच केलं होतं.

तेव्हापासून ते अगदी काल (29 जुलै) आपल्या घरी म्हणजेच छत्रपती संभाजीनगरला तो परतला, तेव्हाही अभिजीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करताना दिसला.

डोक्यावर टोपी, कानात हेडफोन, टी-शर्ट-जॅकेट आणि हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं छायाचित्र असलेलं पुस्तक माध्यमांच्या कॅमेऱ्यांना दाखवतच अभिजीतने जंतर-मंतरकडे कूच केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डोक्यावर टोपी, कानात हेडफोन, टी-शर्ट-जॅकेट आणि हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं छायाचित्र असलेलं पुस्तक माध्यमांच्या कॅमेऱ्यांना दाखवतच अभिजीतने जंतर-मंतरकडे कूच केलं होतं.

त्याने सुरूवातीलाच स्पष्टपणे सांगितलं की, 'मी दलित आहे. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानतो. मी आज जो काही आहे, तो त्यांच्यामुळेच आहे.'

या आंदोलनात जेव्हा जेव्हा तीव्र संघर्षाचे प्रसंग आले, तेव्हा तेव्हा या जेन-झी आंदोलकांचा नेता असलेल्या अभिजीतनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रतीक त्या संघर्षाला उत्तर म्हणून पुढे केलं.

या आंदोलनातील असे तीन प्रसंग मला प्रकर्षानं आठवतात.

पहिला म्हणजे, वर उल्लेख केला त्याप्रमाणे एअरपोर्टवरील पहिल्या एंट्रीचा प्रसंग. दुसरा, शाईफेकीचा प्रसंग आणि तिसरा, संसद मार्चमध्ये संसदेकडे कूच करत असताना त्यांचा ट्रक अडवण्यात आला तेव्हाचा प्रसंग.

मी जेव्हा अभिजीत दिपकेवर झालेल्या शाईफेकीचा व्हीडिओ पुन्हा पाहिला, तेव्हा एक गोष्ट मला फार गंमतीशीर वाटली. त्याच्यावर शाईफेक होत असतानाच तो बोलत होता की, "हे आंदोलन गांधी आणि आंबेडकरांच्याच मार्गाने चालेल. त्यांच्या प्रतिमेसह चालेल आणि संविधानाच्या मार्गानेच चालेल."

शाईफेकीच्या घटनेवर उत्तर देताना अभिजीतनं म्हटलं की, "निळा हा माझा रंग आहे, जयभीम."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शाईफेकीच्या घटनेवर उत्तर देताना अभिजीतनं म्हटलं की, "निळा हा माझा रंग आहे, जयभीम."

या वाक्यानंतरच त्याच्यावर एका महिलेकडून शाईफेक झाली. शिवाय, या घटनेवर उत्तर देतानाही अभिजीतनं म्हटलं की, "निळा हा माझा रंग आहे, जयभीम."

संसद मार्चकडे कूच करत असताना पोलीसांनी त्यांची वाट अडवली. त्यांच्या ट्रकच्या चाकांची हवाही काढली आणि तिथे लाठीमारही केला. या सगळ्या धुमश्चक्रीवेळीही अभिजीतच्या हातात आंबेडकरांचीच तसबीर होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

फोटो स्रोत, Getty Images

गांधी, भगतसिंह आणि फुलेही!

या आंदोलनात बाबासाहेब तर होतेच, याशिवाय, भगतसिंह, महात्मा फुले-सावित्रीबाई फुले आणि महात्मा गांधींच्याही प्रतिमा लक्षणीयरीत्या होत्या.

जंतर-मंतरवर सोनम वांगचूक ज्या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते, तिथे मुख्य मंचावरच टेबलवर बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध, गांधी यांच्या प्रतिमा होत्या.

आंदोलनात असणाऱ्या अशाच प्रकारच्या साहित्यांची विक्री करणारी एक महिला जंतर-मंतरवर होती.

'या सगळ्या साहित्यातलं सगळ्यात जास्त काय विकलं जातंय,' या प्रश्नावर 'संविधान आणि बाबासाहेबांचा फोटो,' असं सांगताना ती दिसते.

आंदोलनात तिरंग्याखालोखाल कोणता झेंडा सर्वांत जास्त प्रमाणात होता तर तो जयभीम लिहिलेला निळा झेंडा.

या आंदोलनात बाबासाहेब तर होतेच, याशिवाय, भगतसिंह, महात्मा फुले-सावित्रीबाई फुले आणि महात्मा गांधींच्याही प्रतिमा लक्षणीयरीत्या होत्या.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, या आंदोलनात बाबासाहेब तर होतेच, याशिवाय, भगतसिंह, महात्मा फुले-सावित्रीबाई फुले आणि महात्मा गांधींच्याही प्रतिमा लक्षणीयरीत्या होत्या.

एका मुलाखतीत अभिजीत म्हणाला की, "जयभीमचा अर्थ समजून घेण्यासाठी तुम्हाला डॉ. आंबेडकर समजून घ्यावे लागतील. डॉ. आंबेडकर फक्त दलितांचा आवाज नाहीत. ते अशा प्रत्येक व्यक्तीचा आवाज आहेत, जो या देशात दबलेला आहे, शोषित आहे."

या आंदोलनातून अनेक चेहरे उदयास आले. इरफान मोहम्मद हा साधा अशिक्षित असा दिल्लीतील बर्फविक्रेता. त्याच्या घरी जाऊन राहुल गांधींनीही भेट दिली.

संविधानाची प्रास्ताविका, तिची सद्यकाळातील प्रस्तुतता आणि वंचितांचं जगणं कधी सुधारणार, यावर तो पोटतिडकीनं व्यक्त झाला आणि रातोरात व्हायरल झाला. त्याच्या बोलण्यातूनही हाच आशय अधोरेखित झाला.

आंबेडकरांची वेशभूषा करून मुंबईहून आलेले सुरेश गवई

फोटो स्रोत, Facebook/Dr.Suresh Gawai

फोटो कॅप्शन, आंबेडकरांची वेशभूषा करून मुंबईहून आलेले सुरेश गवई

आंबेडकर आणि गांधींची वेशभूषा करून आलेल्या व्यक्तीही आंदोलनातील आकर्षणाचं केंद्रबिंदू होतं.

आंबेडकरांची वेशभुषा करून मुंबईहून आलेले सुरेश गवई एका मुलाखतीत म्हणाले की, "आंबेडकर जर आज असते, तर देशाची अशी अवस्था झालीच नसती. कुणावरही अन्याय होणार नाही, असं संविधान त्यांनी लिहिलंय, पण तेच चुकीच्या लोकांच्या हातात पडलेलं असल्याकारणाने आज हे दिवस पहावे लागत आहेत."

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

फोटो स्रोत, Getty Images

'आंबेडकर हे सिम्बॉल जातीचं नव्हे, तर ते मुक्तीचं, स्वातंत्र्याचं आणि न्यायाचं'

आंदोलनाचं एक मैदान 'जंतर-मंतर' जसं होतं, तसंच एक महत्त्वाचं मैदान सोशल मीडिया हेदेखील होतं. खरं तर, सोशल मीडियावरूनच कॉक्रोच जनता पार्टीची सुरूवात झाली असल्याकारणाने तिथं घडणाऱ्या घडामोडीही निर्णायक ठरल्या.

पण आयकॉन म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरच का, तसेच जयभीमची घोषणा कशासाठी? यासंदर्भातील घुसळण सोशल मीडियावर पहायला मिळत होती.

'डॉ. आंबेडकरांनी असं काय केलं होतं की, जेव्हा केव्हा क्रांतीची लाट येते, तेव्हा डॉ. आंबेडकरच त्याचा चेहरा बनलेले दिसतात,' याबाबत एक मुलगी दीड मिनिटात सोप्या शब्दात मांडणी करताना दिसते.

ती सांगताना दिसते की, "जयभीम हा नारा समतेसाठी, स्वातंत्र्यासाठी प्रतिनिधित्व करतो."

खरंतर आंदोलनाच्या काळात अनेक कॉन्टेट क्रिएटर्सनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात केलेले असे अनेक रिल्स पाहण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

'कॉक्रोच जनता पार्टी'ला समांतर असं 'रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन' नावाचं एक नवं पेज सुरू होण्यामागचं प्रमुख कारणच हे आहे की, या आंदोलनामध्ये डॉ. आंबेडकर आयकॉन म्हणून ठसलेले आहेत, असं मत अनुब जॉर्ज व्यक्त करतो.

पुण्यातील आंदोलनात तो सहभागी होता. याबाबत बीबीसीशी बोलताना तो म्हणाला की, "खरं तर आंदोलन सुरू असतानाच या आंदोलनातील विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी हे आरक्षण हटावचं नरेटीव्ह पुढे केलं जात होतं, पण त्याला अजिबात यश आलं नाही. कारण, आंदोलनात जी ताकद तयार झाली होती, त्या ताकदीला जयभीमचा नारा देण्यात काहीच अडचण वाटली नाही."

पुढे तो म्हणाला की, "आंबेडकरांचा चेहरा आरक्षण या विषयाशी ढोबळमानाने जोडला जात असला तरीही या आंदोलनाचं वैशिष्ट्य असं होतं की, कोणत्याही विशिष्ट समाजाचं हे आंदोलन नव्हतं. या आंदोलनानं धार्मिक रेषा जशी ओलांडली तशीच जातीचीही ओलांडली. शिवाय, हे आंदोलन अराजकीयही होतं. त्यामुळे, इथे ज्या घोषणा होत्या, त्यादेखील ऑर्गॅनिक पद्धतीच्याच होत्या. कुणी जबरदस्तीनं वदवून घेतलेल्या नव्हत्या. आंदोलनातील गर्दीनेच 'जयभीम'सारख्या घोषणा उचलून धरल्या."

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

फोटो स्रोत, ANI

आंबेडकर हे प्रतीक जातीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, हेच या आंदोलनानं ठामपणे दाखवून दिलंय, असं मत मुंबईतील आंदोलनात सहभागी असलेल्या साम्या कोरडे मांडतात.

त्या सांगतात की, "बाबासाहेबांनीच 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' म्हटलंय आणि या आंदोलनात ग्रामीण ते शहरी भागातील विद्यार्थी होते आणि त्या सर्वांनीच 'जयभीम'च्या घोषणा दिल्या. संवैधानिक चौकटीत राहूनच आम्ही हे आंदोलन करतो आहोत, हे दाखवण्यासाठी आंबेडकरांचा फोटो हे प्रतीक पुरेसं ठरताना दिसतं. शिवाय, जिथे जिथे अन्याय आहे, तिथे तिथे संघर्षासाठीचं प्रतीक हा फोटो ठरतो."

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

फोटो स्रोत, Getty Images

या आंदोलनातील नव्या पिढीनं आंबेडकर हे सिम्बॉल जातीचं म्हणून नव्हे तर ते मुक्तीचं, स्वातंत्र्याचं आणि खऱ्या अर्थानं न्यायाचं तसेच आधुनिकतेचं सिम्बॉल म्हणून वापरलेलं आहे, असं दलित हक्क कार्यकर्ते आणि अभ्यासक केशव वाघमारे सांगतात.

बीबीसी मराठीशी बोलताना ते सांगतात की, "90 च्या दशकापर्यंत, आंबेडकर एका जातीचे नेते म्हणून फ्रेम करण्यात आले होते. मराठवाडा नामांतराच्या लढ्यासारख्या उदाहरणातून दिसतं की, महाराष्ट्रानेही आंबेडकरांना किती 'स्टीग्मटाइज' केलेलं आहे. पण आताची जेनझी पिढी ही जातीच्या पूर्वग्रहापासून थोडीशी लांब आहे. आधीच्या पिढीचे जातीचे पूर्वग्रह जितके स्ट्राँग आहेत, तितके नव्या पिढीचे नाहीयेत."

"अलीकडच्या काळात, आंबेडकर म्हणजे केवळ दलित आयकॉन राहिलेले नाहीत, तर भारतीय समाजाला आधुनिकता शिकवणारा माणूस, स्वातंत्र्य शिकवणारा माणूस, लॉजिक तसेच कॉन्स्टिट्यूशनलिझम काय असतो, ते शिकवणारा माणूस, या अर्थानं आंबेडकर हे या रिप्रेशनच्या काळामध्ये एक फ्रीडमचं सिम्बॉल बनलेलं आहे. या आंदोलनातील नवी पिढी ते जातीचं सिम्बॉल म्हणून मिरवत नाहीये, तर त्या माणसाला 'आयडिया ऑफ इंडिया' म्हणून मिरवत आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)