कैरोत इंधनाच्या टँकरचा भीषण अपघात; आगीत 31 जणांचा मृत्यू

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अलेक्स फिलिप्स
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
कैरोमधील एका गजबजलेल्या महामार्गावर इंधनाच्या टँकरचा अपघात होऊन लागलेल्या भीषण आगीत 31 जणांचा मृत्यू झाला असून 21 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती इजिप्तच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
बुधवारी संध्याकाळी जुन्या शहराच्या मध्यवर्ती भागाच्या उत्तरेला असलेल्या वराक परिसरातील रिंग रोडच्या एका भागात ही घटना घडली. भाजल्यामुळे जखमी झालेल्या आणि धुरामुळे त्रास झालेल्या रुग्णांवर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले.
सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हीडिओंमध्ये रात्रीच्या आकाशात उंच उसळणाऱ्या ज्वाळा आणि दाट काळा धूर दिसत आहे. तसेच जवळची अनेक वाहनं जळून खाक झाल्याचंही या दृश्यांमध्ये दिसतं.

फोटो स्रोत, Getty Images
आग नेमकी कशी लागली याबाबत अधिकाऱ्यांनी अद्याप माहिती दिलेली नाही. मात्र, सरकारी मालकीच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, टँकर उलटल्यानंतर त्यातील पेट्रोल आजूबाजूच्या वाहनांवर पसरलं.
प्रादेशिक सरकारी वकिलांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून मृतांच्या मृतदेहांमधून डीएनए नमुने घेण्याचे आदेश दिले आहेत.
अल-अहरामनं तपासाशी संबंधित सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, खासगी कंत्राटदाराच्या मालकीचा हा टँकर महामार्गावरून जात असताना त्याच्या समोर उच्चदाबाची वीजवाहिनी कोसळली. त्यामुळे चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं.
त्यानंतर टँकरनं रस्त्यावरील दुभाजक ओलांडला, तो उलटला आणि त्याला आग लागली, असं सरकारी मालकीच्या या वृत्तपत्रानं म्हटलं आहे.
अलीकडच्या काही वर्षांत इजिप्तमध्ये अशा अनेक प्राणघातक आग लागण्याच्या घटना लागल्या आहेत. अनधिकृत वस्त्या आणि अनेक ठिकाणी जीर्णावस्थेत असलेली पायाभूत सुविधा यांमुळे अशा घटना तुलनेनं अधिक घडतात.
त्यातच आपत्कालीन यंत्रणांच्या संथ प्रतिसादामुळे आणि स्थानिक पातळीवर उभ्या केल्या जाणाऱ्या तात्पुरत्या बचाव मोहिमांमुळे, विशेषतः कैरोसारख्या विस्तीर्ण राजधानीत, अशा परिस्थिती हाताळणं अधिक गुंतागुंतीचं ठरतं.

फोटो स्रोत, Getty Images
End of podcast promotion
घटनास्थळावरील छायाचित्रांमध्ये आग विझवल्यानंतर महामार्गावर मोठी गर्दी जमल्याचं दिसत आहे. तसेच आपत्कालीन सेवांनी विविध प्रवेशमार्ग बंद केल्याचंही दिसून येतं.
आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, या घटनेनंतर घटनास्थळी 39 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. तसेच कैरोमधील एका रुग्णालयात जखमींवर सुरू असलेल्या उपचारांची पाहणी करतानाची इजिप्तच्या आरोग्यमंत्र्यांची छायाचित्रंही मंत्रालयानं प्रसिद्ध केली.
इजिप्तमध्ये रस्ते दुर्घटनाही वारंवार घडतात. वाहनांची अपुरी देखभाल आणि वाहतूक नियमांचं मोठ्या प्रमाणावर होणारं उल्लंघन ही त्यामागची प्रमुख कारणं मानली जातात.
सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी इजिप्तमधील रस्ते दुर्घटनांमध्ये जवळपास 6,000 जणांचा मृत्यू झाला. हा आकडा त्याच्या आदल्या वर्षाच्या तुलनेत काहीशेनी अधिक होता.
सरकारी प्रसारक संस्था एनएमएनं दिलेल्या माहितीनुसार, आपत्कालीन पथकांनी महामार्गावरील अवशेष हटवल्यानंतर तो पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
यापूर्वी घटनास्थळी एक बुलडोझर जळालेल्या वाहनांचे अवशेष हटवताना दिसला होता.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.




























