वजन कमी करण्यासाठी जेलसारखी शिक्षा? 'फॅट जेल्स'ची ही संकल्पना किती कठोर?

फोटो स्रोत, TL Huang
- Author, सारा बेल
- Role, ग्लोबल डिजिटल हेल्थ
- वाचन वेळ: 6 मिनिटे
मोठ्या क्रीडागृहात (स्पोर्ट्स हॉल) लोक व्यायाम करतानाचे, कँटीनमध्ये रांगेत उभे राहून जेवण घेतानाचे आणि बेड असलेल्या वसतिगृहात झोपतानाचे व्हीडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत.
ही नवीन फिटनेस व्यवस्था लक्झरी स्पा रिट्रीट नाही तर चीनमधील लष्करी शैलीतील वजन कमी करण्याचे कॅम्प्स आहेत.
काही लोक त्यांना 'फॅट जेल्स' असे म्हणतात. इथे स्नॅक्स खाण्यावर पूर्ण बंदी असते आणि दिवसातून दोनदा वजन तपासावं लागतं.
चिनी माध्यमांत आलेल्या वृत्तांनुसार, चीनमध्ये असे सुमारे 1 हजार कॅम्प्स आहेत. जागतिक स्तरावर वाढणाऱ्या लठ्ठपणाच्या समस्येचा चीनलाही सामना करावा लागत आहे.
इथे सुमारे 600 डॉलरमध्ये (सुमारे 56 हजार रुपये) एक महिन्यासाठी बुकिंग करता येते. ज्यात राहण्याची सोय, जेवण आणि दैनंदिन व्यायामाचे क्लासेस दिले जातात.
कंटेंट क्रिएटर टीएल हुआंगने इन्स्टाग्रामवर 'एगईट्स' नावाने तिचा अनुभव शेअर केला. तिने बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या 'व्हॉट इन द वर्ल्ड' पॉडकास्टला सांगितलं की, तिला तो अनुभव 'जणू तुरुंगासारखा वाटला'.
कारण ती 28 दिवस तिथून बाहेर गेली नाही आणि तिला सतत तिचं वजन ट्रॅक करावं लागत होतं.
"आमचे प्रशिक्षक आमच्यावर लक्ष ठेवून होते, आम्ही लपून जंक फूड तर खात नाही ना हे ते पाहत होते, आम्ही सर्व क्लासेसला जातोय का यावरही ते लक्ष ठेवत होते. योग्य कारणाशिवाय क्लास चुकवणं किंवा कॅम्प सोडण्यास आम्हाला परवानगी नव्हती," असं ती सांगते.
हुआंगच्या मते ही पद्धत परिणामकारक होती. पण तरीही पोषणतज्ज्ञ (न्यूट्रिशनिस्ट) सांगतात की, अशा अत्यंत कठोर पद्धतींमुळे शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
"काही कॅम्प्समध्ये दररोज 1 किलो वजन कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवलं जातं, असं सांगितलं जातं. परंतु, हे प्रमाण वैद्यकीय देखरेखीखाली असलेल्या प्रौढांसाठीही सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मर्यादेपेक्षा जास्त आहे," असं पर्सनल ट्रेनर आणि न्यूट्रिशनिस्ट ल्यूक हॅना सांगतात.
मग हे कॅम्प्स किंवा शिबिरं कशी चालतात आणि ती इतकी लोकप्रिय कशी झाली?
'बदलाची वेळ आली आहे'
हुआंग सांगते की, तिला या कॅम्पबद्दल सर्वात आधी तिच्या आईकडून माहिती मिळाली. तिची आई चिनी आहे. ती चीनमध्ये एकट्याने प्रवास करत असताना तिला स्वतःबद्दल 'खूप अस्वस्थ' वाटत होतं, कारण तिची दिनचर्या बिघडली होती आणि ती फूड डिलिव्हरीवरून खूप पदार्थ मागवून खात होती.
हुआंग सांगते की, तीन वर्षांत तिचं वजन सुमारे 20 किलोने वाढलं. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला सांगितलं की, आता 'बदल करण्याची वेळ आली आहे'.
"मला असं वाटत होतं की, माझं वजन वाढल्यामुळे मला टोचून बोललं जात आहे. पण त्याचवेळी मला असंही वाटलं की, ते माझ्या भल्यासाठी कठोरपणे सांगत होते," असं ती म्हणते.

फोटो स्रोत, TL Huang
कॅम्पला जाणं तिच्यासाठी एक 'मोठा सांस्कृतिक धक्का' होता, पण तिथल्या सहभागी लोकांमध्ये, वजन कमी करण्याच्या प्रवासामुळे एकमेकांशी चांगली मैत्री आणि जवळीकता निर्माण झाली.
प्रत्येक दिवस सकाळी 7.30 वाजता वजन तपासणीने सुरू होत असत. त्यानंतर 4 तास व्यायाम केला जात असे, ज्यात स्पिन क्लास, ट्रॅम्पोलिन, हाय-इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग (एचआयआयटी), टॅबाटा (एचआयआयटीपेक्षाही जास्त तीव्र प्रकार) आणि वजन उचलण्याच्या व्यायाम यांचा समावेश होता.
नाश्त्यात चार उकडलेली अंडी, अर्धा टोमॅटो आणि काकडीचे दोन तुकडे दिले जात असत. एका व्हीडिओमध्ये हुआंग तिच्या दुपारच्या जेवणाबद्दल सांगते, ज्यात कोळंबी, वाफवलेल्या भाज्या आणि दही किंवा वाफवलेले मासे, चायनीज सेलेरी, पानभाज्या आणि फुलकोबी यांचा समावेश होता.
ती म्हणते की, हे जेवण 'चांगलं, संतुलित आणि रोजच्या चिनी जेवणासारखं डिझाइन केलेलं' आहे.
जेवणानंतर पाहुण्यांनी शेवटच्या एका तासाच्या स्पिन क्लासमध्ये भाग घ्यायचा होता. त्यानंतर सायंकाळी 7.30 वाजता पुन्हा वजन तपासलं जात असत. मग आंघोळ करून त्यांना विश्रांती घेता येत असे.
हुआंग सांगते की, पहिल्या आठवड्यात हा दिनक्रम तिला 'खूप वेगळा आणि नवीन' वाटला. पण नंतर तिला समजलं की, आणखी तीन आठवडे असंच सुरू ठेवावं लागणार आहे. त्या काळात ती आपल्या मित्रांना मेसेज करत राहिली, त्यामुळे तिला पुढे जाण्यासाठी मदत झाली.
जरी हुआंगला त्या सुविधा तुरूंगासारख्या वाटल्या, तरी तिला वाटतं की तो अनुभव उपयोगी ठरला. 28 दिवसांत तिने सुमारे 6 किलो वजन कमी केलं होतं.
"या अनुभवामुळे मला पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची (हार्ड रिसेट) संधी मिळाली आणि मला हवी असलेली शिस्तही मिळाली," असं हुआंग सांगते.
'सामान्य वाढीवर परिणाम'
परंतु, तज्ज्ञ सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतात. लंडनमधील पर्सनल ट्रेनर ल्यूक हॅना सांगतात की, या कॅम्पची पद्धत चिंताजनक आहे, कारण वजन कमी करताना फक्त चरबी नाही तर स्नायूंचं (मसल्स) ऊतकही कमी होतं.
त्यामुळे जर जास्त व्यायामासारख्या अतिशय कठोर पद्धती वापरल्या तर स्नायूतील ऊती कमी होण्याचा धोका आणखी वाढतो.
हे मुलं किंवा तरुण लोक अशा पद्धतीने वजन कमी करत असतील तर चिंतेचं ठरतं.
"यामुळे शरीराची नैसर्गिक वाढ बिघडू शकते. त्यामुळे तुमची उंची किती वाढेल आणि हाडांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो," असं ते सांगतात.
याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो आणि खाण्याशी संबंधित विकार (इटिंग डिसऑर्डर) होण्याचा धोका वाढू शकतो.
"काही लोक मोठ्या प्रमाणात वजन कमी करतात, त्यामुळे ते आकर्षक वाटू शकतं. पण अनेकांचं सामान्य आयुष्यात परत गेल्यावर वजन पुन्हा लवकर वाढतं, कारण या पद्धतीत वजन वाढण्यामागची खरी कारणं सोडवलेली नसतात," असं ते म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
यूकेची राष्ट्रीय आरोग्य सेवा (एनएचएस) हळूहळू वजन कमी करण्याचा सल्ला देते, म्हणजे आठवड्याला सुमारे 1 ते 2 पाउंड (0.5 ते 1 किलो) वजन कमी करण्याची शिफारस करतात.
हॅना सांगतात की, लोकांनी त्यांच्या रोजच्या जीवनात हळूहळू सवयी बदलण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. नियमित पौष्टिक जेवणाचा आनंद घ्यावा, पुरेसं प्रोटीन घ्यावं आणि व्यायाम हा शिक्षा म्हणून नाही तर कौशल्य, खेळ आणि आनंदासाठी करावा.
नंतरच्या इन्स्टाग्राम व्हीडिओमध्ये टीजे हुआंग सांगते की, सर्वात कठीण गोष्ट घरी परतणं होतं, कारण तिच्या शरीराला आता 'सामान्य' पद्धतीने खाणं कसं असतं हेच समजत नव्हतं.
आरोग्यदायी आहारात रोज किमान 5 वेळा फळं आणि भाज्या असाव्यात. तसेच आठवड्यात सुमारे 150 मिनिटे शारीरिक हालचाल किंवा व्यायाम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
साखर असलेल्या पेयांऐवजी पाणी पिणं आणि जास्त फॅट (चरबीयुक्त) व जास्त साखर असलेले पदार्थ कमी खाणं यामुळेही आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होऊ शकते.
वजन अधिक असल्यास भेदभावाची शक्यता
बीबीसीच्या ग्लोबल चायना युनिटमधील वानकिंग झांग सांगतात की, 2000 च्या सुरुवातीला चीनमध्ये हे कॅम्प सुरू झाले. तेव्हा एक टीव्ही कार्यक्रम वजन कमी करण्याच्या संस्थांबद्दल दाखवत असत, त्यातून प्रेरणा घेऊन काही ट्रेनर्सनी स्वतःचे कॅम्प सुरू केले. परंतु, हा ट्रेंड खऱ्या अर्थाने वाढला तो मागील 10 वर्षांत, तेही सोशल मीडियामुळे.
झांग सांगतात की, "तुम्ही जर चिनी सोशल मीडियावर गेलात, तर तुम्हाला वजन कमी करण्याच्या कॅम्पचे आयोजक किंवा तिथे सहभागी झालेल्या लोकांकडून अनेक व्हीडिओ आणि पोस्ट दिसतील."
झांग म्हणतात की, हे कॅम्प वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही हुआंगच्या कॅम्पसारखे कठोर नियम असलेले असतात, तर काही ठिकाणी वसतिगृहांच्या बाहेर सीसीटीव्ही लावलेले असतात, जेणेकरून कोणी बाहेरून फूड डिलिव्हरीवरून जेवण तर मागवत नाही ना हे पाहता येईल.
काही कॅम्प अगदी उलट असतात, "खूपच आलिशान आणि उच्च दर्जाचे असतात. तिथे तुम्ही सुंदर तलाव पाहत ट्रेडमिलवर धावत व्यायाम करू शकता."

फोटो स्रोत, TL Huang
यामागचं मुख्य कारण म्हणजे जगभरात वाढत चाललेली लठ्ठपणाची समस्या. सुमारे दोन-तृतीयांश देशांमध्ये 50 टक्केपेक्षा जास्त प्रौढ लोक जास्त वजनाचे किंवा लठ्ठ मानले जातात.
चिनी आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, चीनमध्ये अंदाजे 34 टक्के प्रौढ लोक जास्त वजनाचे मानले जातात, तर 16 टक्के लोक लठ्ठ मानले जातात.
बीबीसीचे झांग सांगतात की, यामागे सांस्कृतिक कारणही आहे. चीनमध्ये वेगवेगळ्या शरीराच्या आकारांना स्वीकारण्याची आणि सहनशीलतेची पातळी तुलनेने कमी आहे.
याचा अर्थ असा आहे की, "जर एखादी व्यक्ती जास्त वजनाची असेल, तर तिला नोकरीच्या ठिकाणी किंवा डेटिंगच्या जगात भेदभावाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे."
भात, डम्प्लिंग्ज आणि नूडल्समध्ये असलेले रिफाइंड कार्बोहायड्रेट्स एक समस्या आहे. तसेच जगभरात लोक मोकळा वेळ बाहेर घालवण्याऐवजी घरात बसून फोन किंवा टॅबलेट वापरण्यात घालवत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
दरम्यान, हुआंगच्या इन्स्टाग्रामवरुन लक्षात येतं की, ती आता थायलंडमध्ये आहे आणि तिथे 30 दिवसांच्या आणखी एका वजन कमी करण्याच्या चॅलेंजमध्ये सहभागी झाली आहे. ती तिथे प्रचंड उष्णतेत दिवसातून दोन तास व्यायाम करत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



























