'कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके दिल्लीत दाखल, पहिली प्रतिक्रिया देत केलं 'हे' आवाहन

फोटो स्रोत, X/Cockroachisback
सोशल मीडिया चळवळ 'कॉक्रोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके आज (6 जून) सकाळी भारतात दाखल झाले आहेत. त्यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. तसेच समर्थकांना आवाहन केलं.
यानंतर ते दिल्लीतील जंतरमंतर मैदानात आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यासाठी जाणार आहेत.
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ते करणार असल्याचं अभिजीत दिपके यांनी यापूर्वी सांगितलं आहे.
या संदर्भात त्यांच्या पक्षाच्या 'कॉक्रोच इज बॅक' या X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून एक व्हीडिओ पोस्ट करण्यात आला. त्यामध्ये त्यांच्या कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यात आली होती.
या व्हीडिओमध्ये सीजेपीचे प्रवक्ते व पत्रकार सौरव दास म्हणाले , "अभिजीत दिपके सकाळी 8 वाजता दिल्ली विमानतळावर पोहोचतील. तिथून ते इतर कार्यकर्त्यांसोबत पार्लमेंट स्ट्रिट पोलीस स्टेशनला जातील. तुम्हा सर्वांना तिथे पोहोचण्याची विनंती आहे."

फोटो स्रोत, Dilnawaz Pasha
दरम्यान, अभिजीत दीपके यांच्या दिल्लीतील आगमनाच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अभिजीत दिपके यांचं दिल्लीत आगमन, पहिली प्रतिक्रिया देत काय म्हणाले?
अभिजीत दिपके म्हणाले, "मी दिल्लीत दाखल झालो आहे. जंतर मंतर येथे तुम्हा सर्वांना भेटण्यास उत्सुक आहे. पुस्तक आणि आपला तिरंगा सोबत आणायला विसरू नका!"
"करुणा आणि कृतज्ञतेची भावना म्हणून पोलिसांना फुले भेट द्या. आपल्याला ही चळवळ प्रेम आणि शांततेने पुढे न्यायची आहे", असं आवाहन त्यांनी केलं.

फोटो स्रोत, X/Cockroachisback
पोलिसांना आंदोलनाची परवानगी मागून त्यांच्याकडे सहकार्य करण्याची विनंती केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
सौरव दास पुढे म्हणाले की, संपूर्ण प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत राहून पार पाडली जाईल आणि त्यानंतर सर्वजण पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनमधून जंतरमंतर मैदानावर जातील.
"आम्ही आमचा विरोध पूर्णपणे शांततापूर्ण मार्गाने व्यक्त करू आणि लोकशाही पद्धतीने आंदोलन करू," असंही त्यांनी नमूद केलं.
पंतप्रधान मोदींना आवाहन
सौरव दास यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थकांना शांतता राखण्याचे आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी, आशुतोष रांका यांनी समर्थकांना सोबत तिरंगा ध्वज, पुस्तकं आणि फुलं आणण्याचं तसेच आपल्या कुटुंबीयांनाही सोबत आणण्याचं आवाहन केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करत त्यांनी म्हटलं, "तुमचे शिक्षणमंत्री अकार्यक्षम आहेत. त्यांच्यामुळं आपली शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. अनेक प्रश्नपत्रिका फुटल्या आहेत. कोट्यवधी मुलं त्रस्त आहेत. अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. मोदीजी, कृपया धर्मेंद्र प्रधान यांची हकालपट्टी करून लोकशाहीवरील आमचा विश्वास पुन्हा दृढ करा."

फोटो स्रोत, ANI
पोस्टमध्ये लिहिलं होतं, "6 जून, सकाळी 9 वाजता - भेटूया, झुरळांनो. आपण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ."
आता या छोट्याशा विनोदाचे चळवळीत रूपांतर करण्याची वेळ आली आहे. शांततेने आणि प्रेमाने निषेध करण्यासाठी दिल्लीच्या रस्त्यांवर मोठ्या संख्येने एकत्र येण्यास सज्ज व्हा.
पण काय करायचं आणि काय नाही करायचं हे लक्षात ठेवा. सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे आहेत!
यापूर्वी, अभिजीत दिपके यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, दिल्ली पोलिसांच्या परवानगीशिवाय हे आंदोलन कसे होणार, हे अस्पष्ट आहे.
'मी माझं भविष्य संविधानाच्या हाती सोपवतो. जय भीम.'
दीपके यांनी शुक्रवारी (5 जून) सकाळी एक्सवर भारतात रवाना होत असल्याची माहिती देताना म्हटलं, "मी माझं भविष्य संविधानाच्या हाती सोपवतो. जय भीम."
रवाना होण्यापूर्वी एका व्हीडिओ संदेशात त्यांनी लोकांना दिल्ली विमानतळावर मोठ्या संख्येने जमू नये, अशी विनंती केली. यामुळे सामान्य लोक आणि सुरक्षा यंत्रणांना अडचण होऊ शकते, असंही त्यांनी नमूद केलं.
त्यांनी सांगितलं की, ते थेट संसद मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी परवानगी मागणार आहेत.

फोटो स्रोत, @abhijeet_dipke
दीपके म्हणाले, "आम्ही कायद्याचं पालन करणारे लोक आहोत. त्यामुळे कोणीही कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, याची काळजी घ्या."
याआधी गुरुवारी, सीजेपीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं होतं की त्यांचं आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण असेल आणि कोणत्याही प्रकारच्या हिंसेला किंवा अव्यवस्थेचं समर्थन केलं जाणार नाही.
याआधी एका पत्रकार परिषदेत सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितलं होतं, "अभिजीत दीपके 6 जून रोजी सकाळी 8 वाजता दिल्ली विमानतळावर उतरतील. त्यांनी सोनम वांगचुक यांच्यासह आपल्या समर्थकांना संसद मार्गावर यावं आणि जंतर-मंतर येथे आंदोलनासाठी परवानगी मागावी, असं आवाहन केलं आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























