मुंबईच्या डबेवाल्यांना घरघर; अनेकांनी व्यवसाय सोडला, उरलेल्यांवर पार्टटाईम काम करण्याची वेळ का?

बबन कदम

फोटो स्रोत, BBC/ShahidShaikh

फोटो कॅप्शन, बबन कदम
    • Author, नीलेश धोत्रे आणि शाहिद शेख
    • Role, बीबीसी न्यूज मराठी
    • Reporting from, नवी दिल्ली
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

मुंबईचे डब्बेवाले. 99.99 टक्के अचूक डब्ब्यांच्या डिलिव्हरीसाठी जगभरात कुतुहलाचा विषय ठरलेले. इंग्लंडचे राजे किंग चार्ल्सपासून जगातल्या सर्वंच नामांकित विद्यापीठांना भुरळ घालणारे.

मॅनेजमेंट गुरु म्हणून जगभरात अभ्यासले जाणारे आणि आता झपाट्याने कमी कमी होत जाणारे. हो, हेच डब्बेवाल्याचं सध्याचं वास्तव आहे.

2019 पर्यंत मुंबईत तब्बल 4 हजार 500 डब्बेवाले काम करत होते आता त्यांची सध्या 1500 च्या आसपास उरली आहे. पण, गेल्या 6 वर्षांत असं काय घडलं की या मुंबईच्या अन्नदात्यांनाच घरघर लागली?

त्याचं सर्वांत पहिलं कारण आहे, कोव्हीडचं लॉकडाऊन आणि त्यापाठोपाठ मुंबईत आलेलं वर्क फ्रॉम होमचं कल्चर. दुसरं कारण आहे वाढती महागाई आणि तिसरं कारण आहे नव्या पिढीच्या नव्या आकांक्षा..

आधीचा डब्बेवाला, आताचा रिक्षावाला

बाळू भागू शिंदे. वय 41 वर्षं. आयुष्यातली 20 वर्षं त्यांनी डब्बावाला म्हणून काम केलं. पण आता मुंबईत रिक्षा चालवतात. 2020 मध्ये कोरोनाची साथ आली आणि त्यानंतर सर्वत्र वर्क फ्रॉम होमचं कल्चर सुरू झालं.

मुंबईतही अनेक कंपन्यांनी ते सुरू केलं. कोव्हिडची साथ गेली, पण हे कल्चर कायम राहिलं. परिणामी आठवड्यातून 2 किंवा 3 दिवस कामावर येणाऱ्या ग्राहकांनी डब्बावाल्यांची सेवा घेणं बंद केलं.

लॉकडाऊनपर्यंत 15 ते 20 डब्बे रोज उचलणाऱ्या बाळू यांच्याकडे 2020 साल संपेपर्यंत फक्त दोनच डब्बे उरले होते.

कुटंबातील 5 जणांचा खर्च, घराचं 9 हजार रुपये भाडं आणि 3 मुलांच्या शिक्षणासाठी बाळू यांनी डब्ब्याच्या व्यवसायाला रामराम ठोकला आणि रिक्षा चालवायला सुरुवात केली.

बाळू भागू शिंदे.

फोटो स्रोत, BBC/ShardulKadam

फोटो कॅप्शन, बाळू भागू शिंदे

बीबीसी मराठीशी बोलताना बाळू म्हणाले, "डब्बेच नाहीत, कस्टमर नाहीत, पैसे नाहीत, मग काय करणार आम्ही? लॉकडाऊनच्या आधीपर्यंत 20 हजार पगार मिळत होता. लॉकडाऊननंतर आमचे कस्टमर आणि डब्बे कमी झाले. तेव्हापासून मग पैसे कमी मिळायला लागले. त्यामुळे मला काम सोडावं लागलं.

मग मी रिक्षा चालवायला सुरुवात केली. मनात थोडे वेगवेगळे विचार येतात. डब्ब्यावर जास्त पैसे मिळायचे. इथं कमी पैसे मिळतात."

"रिक्षा दुसऱ्याची आहे. मालकाला 300 रुपये द्यावे लागतात, 300 रुपये गॅसला जातात. 400-500 रुपये हातात वाचतात. घरातला खर्च कधी कमी, कधी जास्त असं होत असतं, पण ऍडजस्ट करावं लागतं."

डब्ब्यांचं काम परत सुरू व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. पण सध्या त्यांच्यासमोर पर्याय नाही.

बाळू भागू शिंदे

फोटो स्रोत, BBC/ShardulKadam

फोटो कॅप्शन, बाळू भागू शिंदे

गेल्या 6 वर्षांमध्ये डब्ब्यांच्या व्यवसायातला रोजगार गमावणारे बाळू एकटे नाहीत. हा आकडा हजारांमध्ये आहे.

डबेवाल्यांची संघटना Mumbai tiffin box suppliers association चे सक्रेटरी किरण गवांदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर डब्बेवाल्यांवर ओढावलेल्या या संकटाची खरी व्याप्ती समोर आली.

बीबीसी मराठीशी बोलताना किरण गवांदे म्हणाले, "2018ला आमच्याकडे 4 हजार 500 नोंदणीकृत डबेवाले होते. तसंच 1 हजार ते दिड हजार लोक व्यक्तिगत पातळीवर डबे पोहोचवण्याचं काम करत होते."

"सध्या 2026 मध्ये आमच्याकडे 1500 डबेवाले नोंदणीकृत आहेत. तर नोंदणी नसलेले 1 हजार ते 1500 लोक काम करत आहेत. डब्याचं काम मिळेल का म्हणून काम मागण्यासाठी आजही लोक आमच्याकडे येत आहेत. पण आमच्याकडे सध्या तशा पद्धतीचा व्यवसाय उपलब्ध नाहीये.

लॉकडाऊननंतर जे वर्क फ्रॉम होम सुरू झालं. काही लोक आता आठवड्यातून 2 वेळा ऑफिसला जातात. त्याचा मोठा परिणाम मुंबईच्या डबेवाल्यांवर झाला आहे."

'पार्टटाईम जॉबशिवाय पर्याय नाही'

सध्या जे काही डबेवाले आता उरलेत, त्यांच्यावर डब्यांच्या व्यवसायासह पार्टटाईम काम करण्याची वेळ आली आहे.

40 वर्षांचे माऊली बच्छे त्यांपैकीच एक. ते गेल्या 20 वर्षांपासून या व्यवसायात आहेत. माऊली मुंबईतील दहिसरमध्ये 10 बाय 10 च्या खोलीत राहतात. तिथून ते दररोज सकाळी 7 वाजता डबे उचलण्याच्या कामासाठी निघतात.

विलेपार्ले भागातील डबे ते उचलतात. जे त्यांच्या घरापासून 36 किलोमीटर दूर आहे.

साधारण 9 वाजता त्याचं डबे उचलण्याचं काम सुरू होतं. 10.30 पर्यंत ते डबे उचलण्याचं काम करतात.

त्यानंतर विलेपार्ले रेल्वे स्टेशनवर वेगवेगळे रंग, इंग्रजी अक्षरं आणि सांकेतिक चिन्हांचा वापर करून ते डब्यांचं सॉर्टिंग करतात. या चिन्हांमुळेच मुंबईचे डबेवाले त्यांच्या अचूक डिलिव्हरीसाठी ओळखले जातात.

माऊली बच्छे

फोटो स्रोत, BBC/ShahidShaikh

फोटो कॅप्शन, माऊली बच्छे
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सॉर्टिंगनंतर डबे त्यांच्या पुढच्या प्रवासाला निघतात. माऊलीसुद्धा मग या डब्याबरोबर त्यांच्या डबे पोहोचवण्याच्या कामावर पुढे जातात. मुंबईच्या दादर भागात सर्व डबे पोहोचवल्यानंतर मध्ये 1 तासाचा जेवणाचा ब्रेक घेतात.

त्यानंतर परत दुपारी 2 नंतर डबे उचलण्याचं काम सुरू होतं. 4 पर्यंत सर्व डबे परत विलेपार्ले भागात लोकांच्या घरी पोहोचवतात. मग सुरू होते त्यांची दुसरी नोकरी. एका फायनान्स कंपनीत कलेक्शन ऑफिसर म्हणून.

बीबीसी मराठीकडे आपली व्यथा मांडताना माऊली म्हणाले, "कोव्हिडच्याआधी माझ्याकडे 25 डबे होते आता फक्त 15 डबे आहेत. काही ग्राहकांना वर्क फ्रॉम होम मिळालं. काहींच्या नोकऱ्या गेल्या. ज्याचा 100 टक्के परिणाम आमच्या डब्ब्याच्या व्यवसायावर झाला आहे.

सकाळी 7 वाजल्यापासून धरले तर माझ्या कामाचे 15 तास होतात. त्यासाठीच प्रत्येक जण पार्टटाईम जॉब करत आहे. प्रत्येकजण काही ना काही डबल काम करत आहे. त्यातून आमच्या आर्थिक गरजा आम्ही भागवू शकतो. डब्बेवाल्याचं उत्पन्न तुटपुंज आहे."

रोजच्या 15 तासांच्या कामात माऊलींचा लोकल ट्रेन, मोटरसायकल, सायकल आणि चालत असा किमान 100 किमीचा दररोज प्रवास होतो.

मुंबईचे हे डबेवाले प्रति डबा फक्त 1500 ते 2000 रुपये महिना एवढ्या कमी पैशात त्यांची सेवा देतात. 2 वर्षांतून एकदाच 100 रुपयांनी फी वाढवतात. तरीही डबेवाल्यांचं काम कमी झालंय.

डबावाला

फोटो स्रोत, BBC/ShahidShaikh

एकीकडे कमी होणारं काम, तुटपुंज उत्पन्न आणि महागाई झेलणाऱ्या डबेवाल्यांसमोर आणखी एक मोठं संकट आहे ते म्हणजे त्यांची नवी पिढी या व्यवसायात यायला फारशी उत्सुक नाही.

बबन कदम गेल्या 35 पेक्षा जास्त वर्षांपासून डबावाला म्हणून काम करत आहेत. या व्यावसायात झालेले वेगवगेळे बदल त्यांनी अनुभवले आहेत. पण आताची स्थिती वेगळीच असल्याचं ते सांगतात.

"महागाईच्या दृष्टीने आता हा व्यवसाय परवडू शकत नाही. आमच्या काळात सर्व बरं होतं. त्यामुळे आम्ही एवढे दिवस सावरलो.

पण वाढलेली महागाई आणि घेतलेलं शिक्षण पाहाता नवी पिढी मागे वळून पाहिल असं नाही वाटत. सर्वांना वाटतं की आपण ऑफिसर, मॅनेजर म्हणून काम करावं, इतर चांगला व्यवसाय करावा."

मुंबई डबावाला

फोटो स्रोत, BBC/ShahidShaikh

माऊली बच्छे यांना 2 मुलं आहेत. मुलगी 12वीला आहे, तर मुलगा 10वीला आहे. महागाई पाहता आता डब्याचा व्यवसाय परवडू शकत नाही, म्हणून मुलांना चांगलं शिक्षण देण्याकडे त्यांचा कल आहे.

त्यांच्या मुलाला क्रिकेटर व्हायचं आहे. त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्याला क्रिकेट अकॅडमीमध्ये घातलं आहे. त्यासाठी ते पोटाला चिमटा काढत आहेत. पण मुलाचं उज्ज्वल भविष्य त्यांना महत्त्वाचं वाटत आहे.

मग यावर उपाय काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. सध्याच्या घडीला डबेवाल्यांकडेसुद्धा या प्रश्नाचं उत्तर नाही. पण तरीही त्यांची धडपड सुरू आहे.

डबावाला

फोटो स्रोत, BBC/ShahidShaikh

डबेवाल्यांच्या संघटनेचे अध्यक्ष रामदास करवंदे यांना जेव्हा आम्ही हा प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, "सुरुवातीला संपूर्ण मुंबईभर आम्ही व्यवसाय करत होतो. पण आता डब्बेवाल्यांची संख्या कमी झाल्यामुळे आम्ही जास्त लांबचे डब्बे पुरवत नाही.

सध्या आम्ही काम करत आहोत, पण पुढच्या पिढीचं आम्हाला नाही सांगता येत. पुढे काय होईल हे आम्ही सांगू शकत नाही. व्यवसाय टिकवण्यासाठी आम्ही शिफ्टमध्ये व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहोत. म्हणजे 3 शिफ्टमध्ये डब्बेवाले काम करतील.

तिथे राहतात तिथूनच ते व्यवसाय करू शकतील. प्रत्येकाला शेवटपर्यंत प्रवास करावा लागणार नाही. जेणेकरून प्रत्येकाला दुसरा जोडधंदा किंवा व्यवसाय नीट करता येईल."

फूड डिलिव्हरी अॅपची स्पर्धा किती?

ऑनलाईन फूड डिलिव्हरी अॅपचा काहीच धोका किंवा स्पर्धा नसल्याचं डबेवाल्यांचं म्हणणं आहे.

त्याबाबत करवंदे सांगतात, "ज्यांना घरचं जेवणं खायची सवय आहे ते बाहेरचं जेवण खात नाहीत. ते घरूनच जेवण मागवतात. त्यामुळे आमच्या धंद्यावर त्याचा काही परिणाम झालेला नाही. कारण आम्ही घरंच जेवणं पुरवण्याचं काम करतो. ते लोक हॉटेलातील जेवण पुरवतात."

डबावाला

फोटो स्रोत, BBC/ShahidShaikh

135 वर्षं जुनी सेवा अडचणीत

1890 मध्ये महादू बच्छे यांनी या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. गेल्या 135 वर्षांहून जास्त काळापासून हा व्यवसाय अव्याहतपणे सुरू आहे. मुंबईत अनेक संकटं आली, पण डबेवाल्यांनी त्यांच्या सेवेत कधीच खंड पडू दिला नाही. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे डबेवाल्यांनी वेळोवेळी स्वीकारलेले बदल.

आधी मोठ्या टोपल्यांमध्ये वाहिले जाणारे डब्बे नंतर आयताकृती खोक्यात वाहिले जाऊ लागले. आता थेट डब्ब्यांच्या बॅगा काखेत मारून ते वाहिले जातात.

डबावाला

फोटो स्रोत, BBC/ShahidShaikh

आधी पायी चालणारे डबेवाले नंतर सायकल वापरू लागले. आता दुचाकी वाहनांचा वापर वाढला आहे.

सुरुवातीला डब्ब्यांच्या अचूक डिलिव्हरीसाठी वेगवेगळ्या रंगांचे धागे डब्ब्यांना बांधले जायचे. नंतर वेगवेगळ्या रंगांची सांकेतिक चिन्ह डब्यांवर काढली जाऊ लागली.

कालंतराने अशिक्षित आणि अल्पशिक्षित डबेवाल्यांनी इंग्रजी अक्षरं शिकून घेतली आणि त्यांचा वापर कोडींगसाठी सुरू केला. या बदलांनंतरही डबेवाल्यांकडून क्वचितच चूक घडते. 99.99 टक्के अचूकपणे त्यांच्याकडून डबा ठरलेल्या वेळेला योग्य व्यक्तीकडे पोहोचलेला असतो.

डब्बेवाल्यांचा इतिहास उलगडून पाहिला, तर त्यांच्या या सेवेसमोर वेळोवेळी वेगवेगळी संकटं आणि आव्हानं आलेली दिसून येतात. कधी भ्रष्टाचार, कधी अंतर्गत कलह तर कधी नव्या बदलांना विरोध तर कधी आणखी काही.

या व्यवसायातली मुख्य गुंतवणूक आणि भांडवल कुठलीही टेक्नोलॉजी किंवा महागडी मशिनरी नाही तर ती आहे स्मरणशक्ती आणि अथक परिश्रम.

ज्याचं मोल गेल्या अनेक वर्षांमध्ये सतत घसरतंय. आशा आहे की, मुंबईचे डबेवाले याही परिस्थितीत त्यांचे पाय घट्ट रोवून उभे राहतील आणि या संकटावर मात करतील.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)