अमेरिकेकडून नागपुरातील कंपनीवर सुदान गृहयुद्धाला खतपाणी घालण्याचा आरोप करत निर्बंध

    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी
    • Reporting from, नागपूर
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

नागपुरातील SBL एनर्जी लिमिटेड कंपनीवर अमेरिकेनं निर्बंध घातले आहेत. कंपनीवर सुदानमधील गृहयुद्धात वापरली गेलेली स्फोटकं पुरवत या संघर्षाला खतपाणी घालण्याचा आरोप कंपनीवर ठेवण्यात आला आहे.

याच कंपनीत मार्च 2026 मध्ये भीषण स्फोट होऊन 27 कामगारांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये 24 महिलांचा समावेश होता. त्यानंतर ही कंपनी चर्चेत आली होती.

ही कंपनी मूळची छत्तीसगडमधील रायपूरची असून त्यांचं नागपुरातही युनिट आहे.

अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाच्या अंतर्गत असेलल्या 'ऑफिस ऑफ फॉरेन असेट कंट्रोल'ने 26 जूनला 8 व्यक्ती आणि संस्थांवर ही कारवाई केली.

या संस्था सुदानमधील सुदानी सशस्त्र सेना आणि रॅपिड सपोर्ट फोर्सेस (आरएसएफ) यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला एका नेटवर्कद्वारे शस्त्रपुरवठा करत असल्याचा आरोप केला आहे.

याच नेटवर्कचा भाग असल्याचा आरोप करत SBL एनर्जी लिमिटेड या कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे.

अमेरिकेनं काढलेल्या प्रेस रिलिजमध्ये म्हटलंय की, डिफेन्स इंडस्ट्रीज सिस्टम (DIS) ही सुदानमधील सर्वात मोठी संरक्षण उद्योग संस्था असून ती सुदानी सशस्त्र सेनेसाठी शस्त्रं, दारूगोळा, वाहनं आणि इतर लष्करी साहित्याचा पुरवठा आणि त्याची देखभाल करण्याचं काम करते. हा शस्त्रसाठा इराण आणि इतर ठिकाणांहून मागवली जाते.

DIS नियंत्रणाखाली अनेक उपकंपन्या आहेत. त्यापैकी जियाड इंडस्ट्रियल ग्रुप ( GIAD) किंवा सुदान मास्टर टेक्नॉलॉजी या प्रमुख कंपन्या आहेत. यामधून DIS ने अब्जावधी डॉलर्सची कमाई केली आहे.

अमेरिकेनं 2023 मध्ये DIS आणि Giad या दोन्ही कंपन्यांवर निर्बंध लादले होते. या दोन्ही कंपन्यांच्या नियंत्रणखाली काम करणारी टार्गेट मल्टीअक्टीव्हिटीज कंपनी लिमिटेड ही सुदानस्थित कंपनी आहे. याच कंपनीनं इजिप्त आणि भारतातील कंपनीकडून स्फोटकं आयात केली असल्याचा आरोप केला आहे.

हे स्फोटकं पुरवणारी कंपनी ही SBL एनर्जी लिमिटेड असून ही कंपनी भारतीय आहे. या कंपनीनं पुरवलेली स्फोटकं सुदानी सशस्त्र सेनेनं बॉम्ब बनवण्यासाठी वापरली. या कंपनीनं 2024 पासून 200 हून अधिक स्फोटकं आणि संबंधित साहित्याच्या खेपा पुरवल्या आहेत. त्यामुळे ही कंपनी तसेच कंपनीचे सीईओ आलोक चौधरी यांच्यावर निर्बंध लादले आहेत.

निर्बंध लादलेल्या कंपन्यांची अमेरिकेतील सर्व मालमत्ता गोठवली जाईल असा इशारा सुद्धा अमेरिकेनं दिलेला आहे. तसेच अमेरिकेतील नागरिक आणि संस्थांना सुद्धा या कंपन्यांसोबत आर्थिक व्यवहार करण्यावर बंधन घालण्यात आली आहेत.

नागपुरातील स्फोटामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या SBL एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या अडचणी आणखीच वाढल्या आहेत.

कंपनीचं म्हणणं काय आहे?

अमेरिकेनं कारवाई केल्यानंतर आम्ही SBL एनर्जी लिमिटेड या कंपनीसोबत संपर्क साधला त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

कंपनीनं म्हटलं, "संबंधित पुरवठा हा कुठलाही गुप्त किंवा अनधिकृत पुरवठा नसून औद्योगिक आणि नागरी वापरासाठी असलेल्या उत्पादनांचा होता. खरेदीदारानं खाणकाम आणि नागरी बांधकामासाठी वापर होणार असल्याची प्रमाणपत्रे सादर केली होती."

"आयात परवानग्यांची सुद्धा अधिकृत माध्यमांतून पडताळणी करण्यात आली होती. भारत सरकारच्या वैधानिक स्फोटक नियामक संस्था पेट्रोलियम अँड एक्स्प्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनने (पीईएसओ) निर्यात परवाना जारी केल्यानंतरच सर्व मालाची निर्यात करण्यात आली होती."

"SBL कंपनी भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय नियमांचा पूर्ण आदर करते. कंपनी संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण पारदर्शकतेनं सहकार्य करत असून आपल्या अनुपालन प्रणाली,एंड युज व्हेरीफिकेशन आणि नियामक प्रक्रियांना अधिक मजबूत करण्यासाठी कटीबद्ध आहे."

"त्यामुळे SBLकडे फक्त खासगी कंपनी म्हणून न बघता भारताच्या धोरणात्मक उत्पादन क्षमतेतील एक महत्वपूर्ण राष्ट्रीय औद्योगिक संपत्ती म्हणून पाहिलं जावं. आम्हाला न्याय्य वागणूक मिळावी," असं देखील कंपनीनं म्हटलंय.

नागपुरात झालेल्या स्फोटात 27 जणांचा मृत्यू

1 मार्च रोजी नागपुरातील राऊळगाव इथल्या याच कंपनीत स्फोट होऊन 27 कामगारांचा मृत्यू झाला होता. यामध्ये 24 महिलांचा समावेश होता.

कंपनीत स्फोटक हाताळताना हा स्फोट झाला होता. त्यावेळी SBL एनर्जी लिमिटेड ही कंपनी चर्चेत आली होती.

या स्फोटाच्या आरोपाखाली 11 जणांना अटक करण्यात आली होती. तसेच कंपनीच्या नागपुरातील युनिटचा परवाना देखील पेसोनं रद्द केला होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)