You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोव्हिएत तुरुंगातून जन्मलेली चोरांची 'गुप्त भाषा', आता बोलतात लाखो लोक
- Author, टॅमलिन मॅगी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 10 मिनिटे
जोसेफ स्टॅलिनच्या गुलाग तुरुंगांमध्ये 'फेन्या' नावाची गुप्त जेल भाषा रक्षकांना (गार्ड्स) गोंधळात टाकण्यासाठी वापरली जात होती. आता त्याच भाषेचा वापर रशियातील सायबर गुन्हेगारांकडून केला जात आहे.
'रासबेरीमध्ये लपणं' कधी म्हटलं जातं? 'सिक्सर' का व्हायचं नाही? आणि 'अकादेमिया'ला जाण्याचा अर्थ काय?
रशियन भाषेत 'मॅट' नावाची शिव्यांची एक खास आणि गुंतागुंतीची पद्धत आहे. पण अगदी एका मॅटरशिनिकलाही (शिवीगाळ करण्यात पारंगत असलेला व्यक्ती), वरची वाक्यं कदाचित समजणार नाहीत. कारण ती वाक्यं 'फेन्या' नावाच्या तुरुंगात वापरल्या जाणाऱ्या गुप्त भाषेतील आहेत.
ही गुन्हेगारांची भाषा शेकडो वर्षांपासून अंडरवर्ल्डमधील लोक इतरांना गोंधळात टाकण्यासाठी, अटक टाळण्यासाठी किंवा पळवाटा शोधण्यासाठी वापरत आले आहेत. परंतु, 20व्या शतकात सोव्हिएत तुरुंगांमध्ये या भाषेत द्विअर्थी शब्द आणि इतर भाषांमधून घेतलेले शब्द खूप वाढले.
जर्मन, ग्रीक आणि यिडिश भाषांचा प्रभाव असलेली 'फेन्या' ही भाषा अनेक गुप्त आणि गुंतागुंतीच्या अर्थांनी भरलेली आहे. उदाहरणार्थ, रशियन भाषेत 'बाबकी' म्हणजे 'आजी', पण फेन्यामध्ये त्याचा अर्थ 'पैसे' असाही होतो.
'वारेझका' म्हणजे 'हातमोजा' (मिट्टेन), पण कधी कधी तो 'तोंड' असा अर्थही होतो. तर 'खाल्यावा', जो हिब्रू भाषेतील 'दूध' या शब्दावरून आला आहे, त्याचा अर्थ 'फुकट किंवा मोफत मिळालेली गोष्ट' किंवा 'मोफत वस्तू' असा होतो.
फेन्या भाषेमधील एकच शब्द अनेक गुप्त अर्थ किंवा कोड म्हणजेच छुपे संकेत दडवू शकतो, जे केवळ ती भाषा जाणणाऱ्या लोकांनाच समजतात.
जसं पूर्वी ही भाषा तुरुंगातील रक्षकांना गोंधळात टाकण्यासाठी वापरली जात होती, तसंच आता हीच भाषा इंटरनेटवर सायबर गुन्हेगार आपले हेतू लपवण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना गोंधळात टाकण्यासाठी वापरत आहेत.
उदाहरणार्थ, रशियन भाषेत 'मायकॉप' (मुसोर) म्हणजे साधारणपणे 'कचरा' असा अर्थ होतो. पण फेन्या भाषेत आज त्याचा अर्थ 'पोलीस' असा घेतला जातो, विशेषतः असा पोलीस जो डार्क वेबवरील त्या फोरममध्ये घुसखोरी करून सायबर हल्ल्यांची माहिती गोळा करत असतो.
रशियामध्ये सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्यामुळे तपास करणाऱ्यांना गुन्हेगारांपेक्षा पुढे राहण्यासाठी ही गुप्त भाषा नीट समजून घ्यावी लागते. परंतु, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखं (एआय) आधुनिक तंत्रज्ञान असलं तरीही, फेन्या भाषेतील सतत बदलणारे सूक्ष्म अर्थ समजून घेणं मशीनसाठीही कठीण जाऊ शकतं.
तर आपण इथंपर्यंत कसे पोहोचलो? फेन्या ही भाषा झारकालीन रशियाच्या काळापासून रस्त्यांवर बोलली जात होती. परंतु, सोव्हिएत न्यायव्यवस्थेने घेतलेल्या काही निर्णयांमुळे ही भाषा मोठ्या प्रमाणात पसरली आणि नंतर ती मुख्य प्रवाहात आली. अखेरीस हीच भाषा इंटरनेटपर्यंतही पोहोचली.
गुप्त भाषेची सुरुवात
सोप्या भाषेत सांगायचं तर, फेन्या हा क्रिप्टोलेक्ट म्हणजेच एक गुप्त भाषा आहे. ती इतरांना गोंधळात टाकण्यासाठी आणि आपलं बोलणं लपवण्यासाठी किंवा गुप्त ठेवण्यासाठी वापरली जात असे.
पण आज मात्र या भाषेतील अनेक शब्द रशियन भाषेत इतके मिसळून गेले आहेत की, ते मूळचे गुन्हेगारी जगतातून आले आहेत हे अनेकांना माहीतही नसेल.
'फेन्या'ची सुरुवात नेमकी कशी झाली, याबद्दल आजही निश्चित माहिती नाही. एक लोकप्रिय (परंतु वादग्रस्त) सिद्धांत असं सांगतो की, याची सुरुवात 'ओफेनी' नावाच्या फिरत्या विक्रेत्यांपासून झाली.
हे लोक रशियाभर पायी फिरून धार्मिक वस्तू विकत असत. असं मानलं जातं की, 17व्या शतकातील एका धार्मिक वादानंतर त्यांच्या काही वस्तूंना धर्मविरोधी ठरवण्यात आलं. त्यामुळे या भटक्या विक्रेत्यांनी आपापसांत संवाद साधण्यासाठी एक वेगळी आणि गुप्त बोलण्याची पद्धत विकसित केली.
फेन्या ही भाषा कशी पसरली याबाबत मात्र अधिक माहिती उपलब्ध आहे.
आधुनिक रशियाचे तज्ज्ञ, गुप्तचर सल्लागार आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे मानद प्राध्यापक मार्क गॅलिओटी यांनी त्यांच्या 2018 मधील 'द व्होरी: रशियाज सुपर माफिया' या पुस्तकात म्हटलं आहे की, 19व्या शतकात या भाषेतील शब्दसंग्रह वेगाने वाढू लागला. त्या काळात रस्त्यावरची भटकी मुले आणि गुन्हेगार शब्दांच्या मधोमध 'फे' आणि 'न्ये' असे ध्वनी वापरू लागले. त्यामुळे त्यांचं बोलणं इतर लोकांना सहज समजत नसत.
मार्क गॅलिओटी लिहितात की, गुन्हेगारांच्या जगात वापरले जाणारे हे खास शब्द (पिग लॅटिन) आणि बोलण्याच्या पद्धती नंतर हळूहळू बंद झाल्या. परंतु, त्याआधीच खिसेकापू आणि फसवणूक करणाऱ्या टोळ्यांनी फेन्या भाषा स्वीकारली होती.
त्यांच्या टोळीत सामील होण्यासाठी या भाषेचं किमान ज्ञान असणं आवश्यक मानलं जात असत. 1863 मध्ये प्रकाशित झालेल्या डिक्शनरी ऑफ लिव्हिंग रशियन या रशियन शब्दकोशात या भाषेतील अनेक शब्द आणि वाक्प्रचारांची नोंदही करण्यात आली होती. ज्यात रशियन भाषा जशी जगली आणि बोलली जात होती, तिचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला होता
फेन्या भाषेत गुन्हेगारांच्या गटातील पदं आणि दर्जा म्हणजेच श्रेणीक्रम सांगण्यासाठी पत्त्यांच्या खेळातील शब्द वापरले जातात. पत्त्यांतील काही चिन्हे खऱ्या गुन्हेगारांचे प्रतीकं मानली जातात (उदा. बदाम, किलवर आदी).
तसेच प्राण्यांच्या नावांनाही गुप्त अर्थ असतात. उदाहरणार्थ, माकड म्हणजे आरसा, तर कोल्हा म्हणजे घडीची सुरी (फोल्डिंग नाइफ). एकूणच, फेन्या भाषेत सुमारे 10 हजार ते 27 हजार शब्दांचा समावेश असल्याचे मानले जाते.
झारशाहीच्या अखेरच्या काळात, समाजातील सुशिक्षित आणि बुद्धिजीवी लोकांना गुन्हेगारांच्या या गुप्त जगाविषयी खूप कुतूहल, आकर्षण वाटू लागलं.
याच आकर्षणातून 'व्हॅगाबॉन्ड म्युझिक' (लोकसंगीताचा प्रकार) नावाचा संगीतप्रकार लोकप्रिय झाला. या गाण्यांमधून फेन्या भाषा वापरली जात असत आणि झोपडपट्टीतील किंवा भटक्या जीवनाचं रोमँटिक चित्र रंगवलं जात असे.
परंतु, फेन्या भाषेचा खरा प्रसार युद्धं आणि क्रांती यांमुळे झालेल्या मोठ्या सामाजिक उलथापालथीनंतरच झाला. याच काळात या भाषेनं समाजात मजबूत स्थान मिळवलं.
'फेन्या'चा झपाट्याने प्रसार
1922 मध्ये रशियन गृहयुद्ध जिंकून सोव्हिएत संघाची (यूएसएसआर) स्थापना केल्यानंतर बोल्शेविकांनी तुरुंग छावण्यांचा विस्तार करण्यास सुरुवात केली.
पुढे कुख्यात गुलाग व्यवस्थेचं रूप घेणाऱ्या या छावण्यांमध्ये छोट्या-मोठ्या गुन्हेगारांसोबत सामान्य लोकांनाही ठेवलं जात असत. त्यामुळे शेतकऱ्यांपासून ते सुशिक्षित म्हणजेच बुद्धिजीवी लोकांपर्यंत अनेकांना फेन्या भाषा प्रत्यक्ष ऐकण्याची आणि शिकण्याची संधी मिळाली.
स्टॅलिन सत्तेत आल्यानंतर लाखो लोकांना तुरुंगात टाकण्यात आलं. त्यामुळे फेन्या भाषेतील हे गूढ शब्द आणखी मोठ्या प्रमाणावर कैद्यांमध्ये पसरलं. गुन्हेगारांमध्ये तिला एक प्रमाणित स्वरूप प्राप्त झालं.
कालांतराने ही भाषा गुन्हेगारांमध्ये ठरावीक स्वरूपात वापरली जाऊ लागली आणि तुरुंगातील जीवनाशी संबंधित अनेक नवीन शब्दही त्यात जोडले गेले.
अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील इंग्रजी आणि तुलनात्मक साहित्याचे प्राध्यापक आणि 'द लँग्वेज ऑफ थीव्हज: द स्टोरी ऑफ रॉटवेल्श अँड वन फॅमिलीज् सिक्रेट हिस्टरी' या पुस्तकाचे लेखक मार्टिन पुचनर म्हणतात, "त्या काळात भाषा ही तुरुंगातील कठीण परिस्थितीत टिकून राहण्यासाठी आणि एकमेकांशी संपर्क ठेवण्यासाठी साधन बनली होती."
तुरुंगांत सराईत गुन्हेगारांनी फेन्या भाषेला 'वोरोव्स्कॉय झाकोन' म्हणजेच 'चोरांचा नियम' असं एक ठराविक किंवा औपचारिक रूप दिलं. हा माफिया शैलीतील नियमांचा म्हणजेच कायद्यांचा संच होता, जो एखाद्याचा दर्जा आणि ओळख दाखवत असत.
या नियमांची माहिती असलेले लोक गुन्हेगारांच्या गटातील मानले जात, तर सामान्य लोक किंवा 'मुझिक' (शेतकरी) हे फक्त त्यांच्या फसवणुकीचे किंवा गुन्ह्यांचे लक्ष्य मानले जात.
दरम्यान, स्टॅलिनने गुन्हेगारी आणि तिच्याशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी, जसं की फेन्या भाषेलाही संपवण्याचा प्रयत्न केला. 1930 पासूनच अधिकृत सोव्हिएत मासिकांमध्ये 'चोरांची गाणी' ही कामगार वर्गाच्या संस्कृतीला धोकादायक आणि अपमानास्पद असल्याचे म्हटलं जाऊ लागलं.
लोकप्रिय कलाकारांनी आपली शैली बदलून ती सरकारला मान्य होईल अशी केली. प्रसिद्ध सोव्हिएत एस्ट्राडा गायक लिओनिड युटेसोव्ह यांनीही आपली दिशा बदलली.
ते आधी 'फ्रॉम द ओडेसा गेल' सारखे चोरांच्या जीवनावर आधारित गाणी गात असत. लोकांना ही गाणी खूप आवडायची. पण नंतर त्यांनी सैन्यासाठी कार्यक्रम करायला सुरुवात केली आणि आपली गायनशैली बदलून ती अतिशय साधी आणि 'सोव्हिएत विचारसरणीला अनुरूप' अशी केली.
तुरुंगाबाहेर फेन्याचा प्रसार
1953 मध्ये स्टॅलिनच्या मृत्यूनंतरच्या दिवसांनी फेन्या भाषेच्या कथेला आणखी एक नवीन वळण मिळालं.
सामूहिक माफी जाहीर झाल्यामुळे 10 लाखांहून अधिक कैदी तुरुंगातून मुक्त झाले. हे छोटे गुन्हेगार मोठ्या संख्येने गुलागमधून बाहेर पडले आणि ते आपल्या घरी परतले. ते फेन्या भाषा आपल्यासोबत घेऊन आले. त्यामुळे देशभरातील दारूच्या अड्ड्यांमध्ये 'ब्लातनाया पेस्न्या' म्हणजेच चोरांची गाणी ऐकू येऊ लागली.
त्या काळात अनेकांना वाटत होतं की, गुन्हेगारांची संस्कृती ही एक प्रकारची लोकसंस्कृती आहे, पण ती अधिकृत पक्षाने दाबून ठेवली होती.
लंडन मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटीच्या समाजशास्त्राच्या प्राध्यापिका आणि 'गँग्स ऑफ रशिया: फ्रॉम द स्ट्रीट्स टू द कॉरिडॉर्स ऑफ पॉवर' या पुस्तकाच्या लेखिका स्वेतलाना स्टीफन्सन म्हणतात, "त्या काळात बुद्धिजीवी वर्गात या गुन्हेगारी जगाबद्दल एक प्रकारचं आकर्षणही निर्माण झालं होतं."
चोरांची गाणी दडपण्याचे प्रयत्न झाले तरी ती आणखी लोकप्रिय होत गेली. सोव्हिएत संघाने सेन्सॉरशिप वाढवल्यानंतर काही हुशार लोकांनी गुपचूप संगीत कॉपी करायला सुरुवात केली.
त्यांनी एक्स-रे शीट्स कात्रीने डिस्कच्या आकारात कापल्या आणि घरगुती उपकरणांच्या मदतीने त्यावर आवाज रेकॉर्ड केला. याला 'हाडांवरील जॅझ' म्हटलं जात असे आणि ते ग्रामोफोनवर वाजवता येत असत.
या शीट्सच्या वाढत्या काळ्या बाजारामुळे लोकांना बंदी घातलेल्या रशियन कलाकारांचे संगीत ऐकता येऊ लागले आणि स्वतःची गाणीही रेकॉर्ड करणं शक्य झालं.
चोरांची गाणी लोकांनी घरच्या घरी रेकॉर्ड करून मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार केला. नंतर कॅसेट टेप आल्यावर ही गाणी आणखी सहजपणे ऐकता येऊ लागली.
त्यामुळे भूमिगत कलाकारांचे, जसं की अर्काडी सेव्हरनी आणि स्थलांतरित गायिका दीना विएर्नी यांची गाणी संपूर्ण सोव्हिएत संघात ऐकू येऊ लागली. या गाण्यांत लैंगिकता, दरोडे, हिंसाचार आणि गुलाग येथील कठीण जीवनाच्या कथा असायच्या.
1991 मध्ये सोव्हिएत संघाचे विघटन होईपर्यंत, फेन्या ही भाषा लोककथेचा एक भाग बनून रुजली होती. सरकारने ती दडपण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला होता. तरीही, सुसंस्कृत समाजात फेन्या बोलणं अजूनही योग्य मानलं जात नव्हतं.
नव्या सहस्रकाच्या सुरुवातीलाचा (2000 च्या आसपास) मात्र फेन्या भाषेला अचानक स्वीकारार्हता मिळू लागली. युनायटेड किंगडममधील एडिनबर्ग विद्यापीठात रशियन भाषा आणि समाजभाषाशास्त्राच्या प्राध्यापिका लारिसा रियाझानोव्हा-क्लार्क यांच्या मते, रशियन राजकीय नेत्यांनी, अगदी व्लादिमीर पुतिन यांच्यासह, अधिकृत निवेदनांमध्येही फेन्या भाषेचा वापर सुरू केला.
त्या काळात भाषेचे नियम मोठ्या प्रमाणात बदलत होते आणि समाजातही मोठे बदल घडत होते, त्यामुळे 'भाषेत एक प्रकारचा गोंधळ' आणि 'मोठी उलथापालथ दिसत होती'.
अधिकाऱ्यांनी कदाचित जनसामान्यांमध्ये आपली प्रतिमा उंचावण्यासाठी या भाषेचा वापर केला, असे स्टीफन्सन सांगतात. त्यांनी या प्रवृत्तीला 'क्रेमलोव्स्काया फेन्या' म्हणजेच 'क्रेमलिन फेन्या' असं नाव दिले आहे.
त्यांच्या मते, ही भाषा समाजातील हिंसाचाराची संस्कृती दाखवते, जी रशियन समाजाच्या अगदी उच्च स्तरापर्यंत पोहोचलेली आहे. गंमत म्हणजे, तुरुंगांमध्ये फेन्या भाषा बोलण्यावर बंदी होती, परंतु सरकारी अधिकाऱ्यांनी स्वतः मात्र याच भाषेत बोलणं सुरू ठेवलं.
इंटरनेटवर गुप्तता वाढवणं
21व्या शतकाच्या सुरुवातीला फेन्या भाषा दैनंदिन भाषेत मिसळू लागली आणि त्याच वेळी डिजिटल क्रांतीमुळे तिचा एका नव्या क्षेत्रातही विकास होऊ लागला.
1999 मध्ये रशियाच्या सुरुवातीच्या इंटरनेटवर (रुनेट) फिडोनेट नावाच्या बुलेटिन बोर्डवर एका युजरने 'अँटी-लिटरेसी मॅनिफेस्टो' प्रकाशित केला.
लारिसा मोर्कोबोरोडोव्हा यांच्या मते, या लेखात 'इंटरनेटवरील तथाकथित शुद्धलेखनाच्या नियमांना' विरोध करण्यात आला होता. त्यात सर्व रशियन भाषेतील जाणकारांना आवाहन करण्यात आलं की, त्यांनी यंत्रमानवांकडून (ऑटोमॅटन्सकडून) आपली जिवंत भाषा नष्ट होऊ देऊ नये यासाठी त्याविरुद्ध आवाज उठवावा.
त्यांच्या मुद्दामहून केलेल्या चुकीच्या स्पेलिंग्स म्हणजेच चुकीच्या शब्दलेखनातून आणि शब्दांवरील रचनांमधून 'पडोंकी' नावाची नवी स्लँग भाषा तयार झाली, जिला उपरोधिकपणे 'ओल्बेनियन' असंही म्हटलं जातं.
मोर्कोबोरोडोवा यांच्या मते, दर महिन्याला लाखो लोक ऑनलाइन ही भाषा वापरतात आणि ती हळूहळू समाजातही पसरली आहे. त्यामुळे अनेक रशियन लोकांना ही भाषा समजते, पण त्यापैकी सगळेच गुन्हेगार नाहीत किंवा नसतात. तरीही, या भाषेतील गुंतागुंतीचे आणि वेगवेगळे अर्थ सायबर तपासकर्त्यांसाठी अडचणीची किंवा डोकेदुखीची ठरू शकतात.
ही भाषा मुद्दाम रशियन भाषेचे संकेत मोडते. त्यात शब्दांमध्ये दुहेरी व्यंजनांचा वापर केला जातो आणि शब्द जसं ऐकू येतात तसेच ते लिहिले जातात. तसेच इंग्रजीमधून घेतलेले शब्दही वापरले जातात, पण त्यांचे मूळ अर्थ बदलून वेगळ्या अर्थाने वापरले जातात.
उदाहरणार्थ, रशियन लोक 'ईमेल' हा शब्द 'मायलो' असा लिहू शकतात, ज्याचा खरा अर्थ 'साबण ठेवण्याचा डबा किंवा भांडं' असा होतो.
रशियामध्ये डिजिटल युगाच्या सुरुवातीला 'ईमेल' साठी योग्य शब्दच नव्हता, म्हणून नजीकचा उच्चार असलेला शब्द वापरला गेला, असं सायबर-सुरक्षा तज्ज्ञ रोमन सानिकोव्ह सांगतात.
ते पुढे म्हणतात की, "मशीन ट्रान्सलेशन वापरल्यास कधी कधी 'ईमेल' ऐवजी चुकून 'साबण' असा अर्थही वाचायला मिळू शकतो."
त्या काळात सिरिलिक (रशियन) कीबोर्ड सहज उपलब्ध नव्हते. त्यामुळे काही इंटरनेट वापरकर्ते 'च' असा आवाज लिहिण्यासाठी अंक '4' चा वापर करू लागले, कारण रशियन भाषेत '4' (चार) हा शब्द 'चेतिरे' (चार) असा वापरला जातो.
रोमन सानिकोव्ह सांगतात की, "यात अनेक शब्द इंग्रजीतून घेतले गेले, कारण त्या काळात रशियन भाषेत त्यांचे योग्य किंवा पूरक शब्दच नव्हते. उदाहरणार्थ, 'हार्ड ड्राइव्ह'ला अनेकदा 'विंच' असं म्हटलं जायचं, कारण त्या काळातील बऱ्याच हार्ड ड्राइव्हवर 'विंचेस्टर' नावाचा ब्रँड असायचा."
'सायबर-फेन्या'
सानिकोव्ह सांगतात की, "सायबर स्लँग (इंटरनेटवरील विशिष्ट बोलीभाषा) तयार करणारे बहुतेक लोक हे लहान मुलं किंवा तरुण होते. हे पूर्वीच्या काळातील फेन्या बोलणाऱ्या 'वोरी' (चोर) वर्गापेक्षा अगदी वेगळं आहे."
म्हणून जेव्हा कधी फेन्या भाषेतील शब्द सायबर जगतात दिसतात, तेव्हा त्यामागे एक वेगळाच एकत्रित प्रभाव असू शकतो, असे सायबर सुरक्षा कंपनी 'ट्रेंड मायक्रो'चे संशोधक फ्योदोर यारोचकिन सांगतात.
हे असे गुन्हेगार असू शकतात जे पारंपरिक गुन्हेगारीतून 'व्हाईट-कॉलर' सायबर गुन्हेगारीकडे वळलेले असतात आणि कधी कधी ते प्रत्यक्ष स्वरुपाच्या (शारीरिक बळाचा वापर किंवा प्रत्यक्ष कृतीशी संबंधित) गुन्ह्यांबद्दलही चर्चा करत असतात.
काही लोक गँगस्टर चित्रपटांमधून असे शब्द शिकलेले असू शकतात. ते असे शब्द आपल्या मित्रांवर छाप पाडण्यासाठी आणि स्वतःला 'कणखर' (टफ) दाखवण्यासाठी वापरतात, असे ते सांगतात. अशा वेळी फेन्या भाषा ही आपला दर्जा किंवा ओळख दाखवण्यासाठी वापरली जाते.
तरीही, 2022 मध्ये रशियन सायबर-गुन्हेगारी टोळी कॉन्टीचे चॅट लॉग्स लीक झाले, तेव्हा त्यात कामाचे तपशील, शिव्या किंवा अश्लील शब्द आणि सामान्य गप्पांसोबत फेन्या भाषेतून आलेले काही शब्दही दिसून आले.
जागतिक सायबर-सुरक्षा कंपनी 'चेक पॉइंट'च्या संशोधकांनी सांगितलं की, काही चॅट लॉग्स समजायला खूप कठीण होते. मशीन ट्रान्सलेशनलाही त्यांचा अर्थ नीट समजत नव्हता.
उदाहरणार्थ, गुन्हेगार एकमेकांना "माझं साबण आंघोळ करत नाही, मी त्यांना अनेक महिन्यांपासून गरम करत आहे" असं विचित्र वाक्य लिहित होते. पण प्रत्यक्षात त्यांचा अर्थ वेगळाच होता. ते ईमेल ब्लॅकलिस्टपासून कसं वाचायचं याबद्दल बोलत होते.
'इनिशियल ॲक्सेस ब्रोकर' नावाचे फोरम्स असतात, जिथे कंपन्यांमधील आतल्या लोकांशी संबंधित धोके म्हणजेच अंतर्गत धोके असलेले लोक बोलतात. हे लोक सायबर हल्लेखोरांना कंपनीच्या सिस्टिममध्ये प्रवेश मिळवून देतात. अशा फोरम्समध्ये फेन्या आणि मॅट (शिव्यांची रशियन पद्धत) अशी मिश्र भाषा वापरली जाते, जेणेकरून ते काय करत आहेत हे बाहेरच्या लोकांना नीट समजू नये.
सानिकोव्ह यांच्या मते, "फेन्या भाषा आणि सायबर गुन्हेगारांची बोलीभाषा वेगवेगळ्या काळात तयार झाल्या असल्या तरी त्यांचा विकास जवळपास सारखाच किंवा एकत्रितच झाला आहे. त्यामुळे त्या दोन्ही मिळून एक गुंतागुंतीचे आणि समजायला कठीण असे भाषिक जाळे तयार होते. या ऑनलाईन गुन्हेगारी भाषेला ते 'सायबर-फेन्या' असेही म्हणतात."
इंटरनेटवरील हा वापर केवळ एक नवीन उदाहरण आहे की, गुन्हेगारांची ही खास भाषा सतत बदलत गेली, सौम्य होत गेली आणि कधी कधी मुख्य रशियन भाषेतही मिसळली गेली.
आज फेन्याचा इतका प्रसार होण्यामागे शेवटी स्टॅलिनचा काळ आणि गुलाग व्यवस्थाच कारणीभूत ठरली, कारण त्यामुळे ही भाषा जगातील सर्वाधिक पसरलेल्या गुप्त भाषांपैकी एक बनली.
तिथल्या अनेक कैद्यांना ही भाषा चांगलीच माहिती होती. त्यांच्या मते 'रास्पबेरी' म्हणजे लपण्याची गुप्त जागा किंवा अड्डा होता. 'सिक्सर' म्हणजे गुन्हेगारांच्या श्रेणीत सर्वात खालचा दर्जा किंवा स्तरावर असलेला व्यक्ती. आणि 'अकादेमिया' म्हणजे तुरुंग- जिथे कोणालाही जायची इच्छा नसते, पण तिथे गेल्यावर फेन्या भाषा मात्र चांगली शिकता येत असे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)