'पेपरफुटीसाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांच्या स्थापनेची घोषणा म्हणजे विद्यार्थ्यांची क्रूर थट्टा'

पंतप्रधान मोदी आणि अभिजीत दिपके

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 7 मिनिटे

पेपरफुटी प्रकरणातील दोषींना शिक्षा देण्यासाठी देशात फास्ट-ट्रॅक न्यायालयांची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. त्यांच्या या घोषणेवर कॉक्रोच जनता पार्टीने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की पेपरफुटीसाठी न्यायालयांच्या स्थापनेची घोषणा करणे म्हणजे विद्यार्थ्यांची क्रूर थट्टा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट लिहून सांगितले की देशातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या लोकांची गय केली जाणार नाही. त्यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना कॉक्रोच जनता पार्टीने म्हटले आहे की देशात जलदगती न्यायालय नसणे हे पेपरफुटीचे कारण नाही.

कॉक्रोच जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोश रांका यांनी म्हटले आहे की जलदगती न्यायालयांची घोषणा ही केवळ लक्ष विचलित करण्यासाठी आहे. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत पंतप्रधानांनी केलेली ही क्रूर थट्टा आहे.

देशात जलदगती न्यायालये नाहीत म्हणून पेपरफुटी होत नाहीये तर धर्मेंद्र प्रधान हे अकार्यक्षम आहेत त्यामुळे या घटना घडत आहेत. धर्मेंद्र प्रधान हे परीक्षांबाबत एक चांगली आणि सुरक्षित व्यवस्था निर्माण करण्यास अपात्र ठरले आहेत. असे कॉक्रोच जनता पार्टीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

पंतप्रधानांनी दिलेला प्रस्ताव म्हणजे फ्रॅक्चर झालेल्या भागाला बँडेज लावण्यासारखे आहे. आपली परीक्षा व्यवस्था आतून पूर्णपणे कोलमडली आहे. जोपर्यंत ही व्यवस्था ठीक केली जात नाही तोपर्यंत पेपरफुटी होतच राहील असे कॉक्रोच जनता पार्टीने म्हटले.

जोपर्यंत सरकार आमच्या या मागण्या स्वीकार करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असे कॉक्रोच जनता पार्टीने स्पष्ट केले आहे.

कॉक्रोच जनता पार्टीने आपल्या मागणी सांगितल्या आहेत.

1. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

2. आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना 1 कोटीचा मदतनिधी

3. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर गुन्ह्यांची नोंद केली जाऊ नये.

4. आंदोलनाच्या काळात आंदोलकांवर अत्याचार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.

फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करणार - मोदी

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मागील काही आठवड्यांपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमध्येही आता आंदोलनं सुरू झाली आहेत. या आंदोलनाला देशभरातून समर्थन मिळत आहे.

दरम्यान, काल बुधवारी 22 जुलै रोजी दिल्लीमध्ये अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या.

विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला कला, सामाजिक, मनोरंजन क्षेत्रातूनही पाठिंबा मिळत आहे.

देशातील तरुणांचे हित आणि त्यांचे भविष्य याला सरकार सर्वोच्च प्राधान्य देईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

पेपरफुटीच्या प्रकरणांतील दोषींना शिक्षा देण्यासाठी सरकारने फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा त्यांनी आज (23 जुलै) केली.

यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. विद्यार्थी हिताच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे मोदी यांनी म्हटले आहे.

विद्यार्थी

फोटो स्रोत, Getty Images

पेपर फुटीच्या घटना आणि विविध परीक्षांमधील कथित गैरप्रकारांविरोधात विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू असतानाच पंतप्रधानांचे हे वक्तव्य आले आहे..

दुसरीकडे पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याला उत्तर देताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर लिहिले, देशातील तरुणांना सर्वाधिक नुकसान तुमच्यामुळेच पोहचले आहे.

शिक्षण व्यवस्थेवर केवळ तुम्ही ताबाच मिळवून ती उद्ध्वस्त केली नाही तर त्या गोष्टीला तुम्ही प्रोत्साहन देखील दिले आहे. यासाठी जबाबदार असणाऱ्यांना तुम्ही पाठीशी घातले आहे, असे राहुल गांधींनी म्हटले.

'धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर कोणतीही तडजोड नाही' - सीजेपी

दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कॉक्रोच जनता पार्टीच्या मुख्य प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं की, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास म्हणाले, "आज माझी सोनम वांगचूक यांच्याशी अनेकदा चर्चा झाली. त्यांनी सर्व आंदोलनकर्त्यांना शांतता राखण्याचे आणि आंदोलन योग्य पद्धतीने करण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी देशातील अनेक आंदोलनांमध्ये सत्ताधारी पक्षाकडून समाजकंटकांची घुसखोरी घडवून आणली गेली आणि त्याचा ठपका आंदोलनावर ठेवण्यात आला. यावेळी असे होता कामा नये."

केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांच्या पत्रकार परिषदेनंतर, कॉक्रोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास म्हणाले की, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांच्या पत्रकार परिषदेनंतर, कॉक्रोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास म्हणाले की, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देताना सौरव दास म्हणाले, "जे. पी. नड्डा यांनी लाज वाटायला हवी. लोक येथे 30 हून अधिक दिवसांपासून येथे आंदोलन करत आहेत आणि ते म्हणत आहेत की याचे राजकारण होऊ नये. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर कोणतीही तडजोड होणार नाही. त्यांना पद सोडावेच लागेल. तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील."

यापूर्वी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला होता की, विरोधी पक्ष या आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

ते म्हणाले, "आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. सखोल चर्चा व्हावी. त्यासाठी संसद हेच सर्वात योग्य ठिकाण आहे. आपल्याला एक ठोस धोरण तयार करायलाच हवे, कारण मुले देशाचे भविष्य आहेत. ही केवळ सरकारचीच नव्हे, तर विरोधी पक्षाचीही जबाबदारी आहे."

आंदोलकांच्या समर्थनार्थ हुमा कुरेशी जंतर-मंतरवर

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीनेही कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ दिल्लीतील जंतर-मंतरवर हजेरी लावली आहे.

कॉक्रोच जनता पार्टीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हुमाचा फोटो शेअर करत लिहिले, "बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी शांततापूर्ण आंदोलनकर्त्यांच्या समर्थनार्थ जंतर-मंतरवर पोहोचल्या आहेत."

या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, "हे जनतेचं आंदोलन आहे. न्याय आणि जबाबदारीची मागणी करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन या आंदोलनाला पाठिंबा द्यायला हवा."

अभिनेत्री हुमा कुरेशी

फोटो स्रोत, Getty Images

दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या या आंदोलनाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी, सेलिब्रिटींनी पाठिंबा दर्शवला आहे.

यापूर्वी ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करून आंदोलनकर्त्यांना पाठिंबा व्यक्त केला होता.

तसेच, ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनीही जंतर-मंतरवर जाऊन आंदोलनकर्त्यांच्या समर्थनार्थ उपस्थिती दर्शवली होती.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभिनेता सलमान खानचा पाठिंबा

अभिनेता सलमान खाननंही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

अभिनेता सलमान खान यानेही या आंदोलनाच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिलीय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये सलमान खान म्हणाला, "हे अतिशय शांततापूर्ण आंदोलन होते, ते हिंसक वळणावर गेले याबद्दल खूप दुःख वाटते. ज्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना त्रास झाला, त्यांच्याबद्दल मनापासून सहानुभूती वाटते. पेपरफुटी हा खूप गंभीर मुद्दा आहे आणि आपल्या देशातील मुलं एका चांगल्या शिक्षण व्यवस्थेसाठी एकत्र आली आहेत व त्यांच्या पालकांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे, हे पाहून आणि जाणून आनंद होतोय.

त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे मी मनापासून कौतुक करतो. या मुलांची कठोर मेहनत, एक चांगला आणि सुशिक्षित भारत घडवण्यासाठी दाखवलेली निष्ठा, प्रामाणिकपणा आणि उत्सुकता वाखाणण्याजोगी आहे."

अभिनेता सलमान खाननंही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अभिनेता सलमान खाननंही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

सलमान खान पुढे म्हणाला, "हे आंदोलन, हा विरोध ही योग्य दिशा आहे आणि विद्यार्थ्यांनी ते अत्यंत शांततेने केले आहे. अत्यंत धाडसी आणि शूर! शिक्षणासाठी प्रेरित असलेली ही पिढी नक्कीच भारताला अभिमान वाटेल असे काम करेल.

"हा मुद्दा विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्था यांच्यातील आहे, त्याचं राजकारण होता कामा नये. याचे सर्व श्रेय फक्त आणि फक्त आपल्या देशातील विद्यार्थ्यांनाच मिळायला हवे. मला खात्री आहे की सरकारही त्यांना पूर्ण पाठिंबा देईल आणि शिक्षण व्यवस्था अधिक मजबूत होईल. मी एका चांगल्या व सकारात्मक निर्णयाची आशा आणि प्रार्थना करतो. शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तुम्हा सर्वांवर देवाचा आशीर्वाद असो."

शिक्षण हा पुढचा 'ट्रेंड' आणि 'फॅशन' बनायला हवा आणि दरवर्षी तो अधिक ट्रेंडी व फॅशनेबल होत गेला पाहिजे. इतका की परदेशातील लोक भारतात शिकायला येतील आणि भारत एक शैक्षणिक केंद्र बनेल, अशी भावना त्याने व्यक्त केली.

दरम्यान, यापूर्वी सोनाक्षी सिन्हा, प्रीती झिंटा, सोनू सूद, दिलजीत दोसांझ, रितेश देशमुख, अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि जेनेलिया देशमुख यांच्यासह अनेक कलाकारांनीही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली आहे.

'राजकीय पोळी भाजू नका', जे. पी नड्डांचं विरोधकांना आवाहन

दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली.

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी काल 22 जुलै रोजी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर टीका केली.

नड्डा म्हणाले, "तुम्हाला या मुद्द्यावर राजकीय पोळ्या भाजायच्या आहेत, हे दुर्दैवी आहे. हा अत्यंत गंभीर विषय आहे. अशा घटनांची मोठी यादी आहे, ज्या वेळी यूपीएची सरकारे सत्तेत होती आणि पेपरफुटी झाली होती."

ते पुढे म्हणाले, "आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. या विषयावर सखोल चर्चा व्हावी. संसदेतच यावर गांभीर्याने चर्चा होऊ शकते. आपण ठोस धोरण घेऊन यायला हवे, कारण देशातील मुले हे देशाचे भविष्य आहेत. ही केवळ सरकारचीच नव्हे तर विरोधकांचीही जबाबदारी आहे."

जे. पी. नड्डा यांनी सांगितले की, ते आंदोलकांशी चर्चेसाठी तयार आहेत. आंदोलक जेव्हा म्हणतील तेव्हा सरकार त्यांच्याशी चर्चा करेल. मात्र, आज कोणतीही चर्चा झालेली नाही.

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा

फोटो स्रोत, JP NADDA

फोटो कॅप्शन, भाजप नेते आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा

दरम्यान, सोनम वांगचूक यांनी काल एक व्हीडिओ संदेश प्रसिद्ध करत मी अजूनही जिंवत असून उपोषणाच्या 25 व्या दिवशी आपलं 11 किलो वजन कमी झाल्याचं त्यांनी सांगितलंय.

जंतर-मंतरवरून हलवल्यानंतर सोनम वांगचूक पहिल्यांदाच समोर आलेले आहेत.

त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं की, "माझ्या बऱ्याच मांसपेशी कमकुवत होत आहेत. पण, मी ठीक आहे. काल मला गुरूग्राममधील एका खासगी दवाखान्यात आणण्यात आलंय."

सोनम वांगचूक

फोटो स्रोत, X/Sonam Wangchuk

ते म्हणाले की, "मी त्या सगळ्या विद्यार्थ्यांची पाठ थोपटू इच्छितो ज्यांनी स्वत: लाठी झेलत इतक्या शांततेमध्ये आंदोलन पार पाडलं. इतकं चिथावून सुद्धा तुम्ही प्रतिहल्ला केला नाही. आधीपासूनच दगडं आणून ठेवण्यात आली, तरीही तुम्ही शांत राहिलात, हे पाहून माझं मन भरून आलं. फारच क्रूरपणे हल्ले होत होते म्हणून मी माझं उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आताही अनेक राजकीय नेते माझ्याकडे उपोषण सोडण्याची विनंती करण्यासाठी आले होते. यामध्ये सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधीही 65 खासदारांची स्वाक्षरी असलेलं पत्रही घेऊन आले होते.

"मात्र, मी सरकारला विनंती करतो की, त्यांनी पुन्हा अशा प्रकारे बळाचा वापर करू नये विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होणार नाहीत, हे आश्वासन मला तातडीनं मिळालं तरच मी आज उपोषण सोडेन. मात्र, जर असं आश्वासन मला मिळालं नाही, तर मी उपोषण सुरू ठेवेन," असंही ते म्हणाले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.