सिंगापूरच्या लहानशा घरात शशांकच्या फोनवर फॅमिली ग्रुपवर 'हॅपी दिवाली'चे मेसेज येत आहेत.
थोड्याचवेळात त्याला त्याच्या आईचा फोन येतो. फक्त एका स्वाईपनं तो त्याच्या मुंबईच्या घरात पोहोचतो. घरामध्ये त्याच्या नातलगांनी सणासुदीला घालायचे कपडे घातलेत आणि फटाक्यांचा आवाजही येतोय. काही क्षणापुरती शशांकची ती सिंगापूरची खोली भरुन गेल्यासारखी वाटते. पण फोन संपल्या संपल्या सगळं शांत आणि रितं झाल्यासारखं वाटतं.
"एरव्ही जे प्रत्यक्ष संबंध असतात... ते अगदीच नाहीसे झालेत"
ही भावना शशांकसाठी काही नवी नाही. गेली सात वर्षं तो आधी शिक्षण आणि मग नोकरीसाठी सिंगापूरला एकटा राहातोय. सणासुदीला त्याला घराची आठवण येते. तिकडं मुंबईत दिवाळी, होळी, गणेश चतुर्थी असली की पाहुणे येतात,
जेवायला पक्वान्नं असतात आणि मित्रमंडळी आणि शेजारी एकत्र धमाल करतात. पण सिंगापूरमध्ये शशांकला त्या सगळ्याचे फोटो पाहून आणि फोनवरच समाधान मानावं लागतं.
तो सांगतो: "कधीकधी हे सगळं खायला उठतं. पण कालांतराने तुम्हाला याची सवय होते."
सिंगापूरला आल्यावर सुरुवातीच्या काळात शशांक या एकटेपणाविरोधात लढायचे मार्ग शोधायचा. तो कामाच्या ठिकाणी जेवणाचं आयोजन करायचा तसंच सहकाऱ्यांच्या जेवणाचे पैसे द्यायचा. ओळखीचं रुपांतर आपलेपणात होईल अशी त्याला आशा असायची.
पण अशा महाकाय नगरामध्ये तेही प्रौढ वयात मैत्र मिळणं कठीण असल्याचं त्याला समजलं.
तो सांगतो, "त्यांना कुटुंबीय वगैरे मानणं अगदीच भाबडेपणाचं होतं. लोकांना त्यांचं वैयक्तिक आयुष्यही असतं."
तो विचार करतो, "हां तंत्रज्ञानाची तुम्हाला मदत होते. तुम्ही आई-वडिलांना व्हीडिओ कॉल करू शकता पण प्रत्यक्ष संबंध हरवतातच."
शशांकला वाटणाऱ्या या भावनेला संशोधकांनी 'सोशल स्नॅक्स" असं नाव दिलंय.
यात थोडका डिजिटल संवाद होतो मात्र त्यामुळे विश्वास,जवळीकता, आपुलकी यासारख्या भावनांची गरज मात्र पूर्ण होत नाही. म्हणजे वरवर हे 'कनेक्शन' वाटतं पण त्यानं जोडलं गेल्यासारखं मात्र वाटत नाही.
हे सगळ्या जगभरात दिसून येतंय. जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने एकटेपणाला जागतिक आरोग्य समस्या म्हणून वर्गीकृत केलंय. या संघटनेच्या माहितीनुसार पौगंडावस्थेतील आणि नुकतेच प्रौढ झालेले लोक जे आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त डिजिटली कनेक्टेड आहेत, त्यांच्यावर याचा सर्वात जास्त परिणाम दिसून येतो.
जगातील प्रत्येक 6 लोकांपेकी एका व्यक्तीला 2014-2023 या काळात एकटेपणाला सामोरं जावं लागलं.

डब्ल्यूएचओ कमिशन ऑन सोशल कनेक्शन, 2025
2014 ते 2019 या काळात एकटेपणा आणि समाजापासून तुटलेपणाच्या भावनेमुळे दरवर्षी 8,71,000 मृत्यू झाले.

13-17 या वयोगटातील प्रत्येक 5 जणांपैकी एक व्यक्ती एकटी पडल्याचं दिसून येतं.


आजवरच्या इतिहासात सर्वात जास्त डिजिटली जोडले जाऊनही जगभरात 18-29 या वयोगटातील लोकांमध्ये इतर लोकांपेक्षा जास्त एकटेपणा दिसतो.


बहुतांश लोक विश्वासू असतात असं म्हणणाऱ्या भारतीयांची संख्या 1993 ते 2014 या काळात कमी झाली आहे.
(वर्ल्ड व्हॅल्यूज सर्वेक्षण, WHO)
"एकटेपणा ही काही फक्त सामाजिक समस्या राहिलेली नाही. त्याचे आता लक्षणीय मानसिक आणि शारीरिक परिणाम दिसून येतायत. लोकांशी सतत जोडलेलं असणं म्हणजे तुमच्या एकटेपणावर मात करता येईलच असं नाही." - डॉ. कीर्ती आनंद, सीनियर कन्सल्टंट, पारस हेल्थ, पंचकुला

स्वातंत्र्याचा विरोधाभास
इकडे शशांक सतत घरच्या आठवणी काढतोय. तर यशोदाला मात्र ती ज्या शहराला आपलं घर मानत होती ते सुरक्षित वाटत नाहीये.
2022 साली पदव्युत्तर शिक्षणासाठी यशोदा बर्लिनला आली. तेव्हा तिला आपण होमसिक होऊ असं वाटलेलं. आणि बर्लिनमध्ये राहाण्यात भाषेचा अडथळा, वेगळी संस्कृती, घरापासून-मित्रांपासून लांब राहाणं असे अडथळे होतेच.
पण दिल्लीत जे शक्य नव्हतं ते मात्र तिला इथं मिळालं. ते म्हणजे आपल्याला पाहिजे तसं शहरात फिरण्याची संधी. ती रात्री उशिरा रस्त्यावरुन फिरू शकते. कार्यक्रमांना जाऊ शकते.सुरक्षेची धाकधूक मनात न ठेवता ती सार्वजनिक जागी जाऊ शकते.
ती सांगते, "पहिल्यांदाच मला पुरुष हे फक्त मानवच आहेत, असं जाणवलं"
मात्र दिल्लीत आल्यावर तिला एकटं वाटायला लागलं. बाहेर जाण्यासारख्या जागा आहेत पण अंधार पडायच्या आधी परतावं लागतं. मित्र-मैत्रिणी आहेत पण बर्लिनसारखा इथला प्रवास सुखावह नाही. परत रस्तेही सुरक्षित नाहीत.
"इथं सगळं आहे पण मला ते वापरता येत नाही"

प्रौढावस्थेतलं एकटेपण
रिषभसाठी मुंबईत सुरक्षित जागा शोधणं काही कठीण नव्हतं. इतर भारतीय मेट्रो शहरांपेक्षा गुन्ह्यांचं प्रमाण कमी असलेल्या मुंबईत त्याच्यासारख्या पुरुषानं एकटं राहाणं काळजीचं नव्हतं. यशोदाला दिल्लीत बाहेर पडताना काळजी वाटते तसं कारण रिषभच्या बाबतीत नाही.
तरीही त्याला एकटं वाटतं. त्याच्यासाठी एकटेपण ठराविक काळापुरतं येतं.- आठवड्यातून एकदा.
तो सांगतो, "सोमवार ते शुक्रवार ऑफिस असतं. पण विकेंडला काय करायचं हा प्रश्न येतो."
2 कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत त्याचे मित्र वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले आहेत. त्यामुळे एकत्र येण्याचे प्लॅन्स प्रत्यक्षात आणणं कठीण जातं.
सामाजिक जीवन तयार करण्यासाठी त्यानं क्विझ नाईट्स, बुक क्लब, कम्युनिटी ग्रुप्सना जायला सुरुवात केली. कालांतराने ओळखी होऊ लागल्या, ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं.
तो सांंगतो, "त्या तीन तासांपुरतं तरी मी सगळं विसरतो"

एकटेपणाची घडण
शशांक, रिषभ, यशोदा यांच्यासाठी एकटेपणा वेगवेगळ्या आकारात, प्रकारात आलेलं आहे. तरिही त्यांच्या कहाण्यांमध्ये एक सूत्र दिसतं.
शहरांमध्ये एकटेपण हे जीवनशैलीतून आलेलं दिसतं. शहरं की समुदायांसाठी तयार झालेली नसून ती कामाच्याभोवती बांधलेली दिसतात. इथं प्रवासात वेळ जातो. एकमेकांशी जोडण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत पण तिथं जवळीक तयार होत नाही. सामाजिक अवकाश शांतपणे आकसत जातं. कामाच्या विशिष्ट पद्धतीमुळे वेळच उरत नाही.
WHO ने 142 देशांतील सहभागींच्या केलेल्या अभ्यासातून आशियामध्ये सुमारे 18% लोक एकटेपणा अनुभवत आहेत. युरोपमध्ये असलेल्या 10% प्रमाणापेक्षा हे प्रमाण दुप्पट आहे, असं दिसलंय.
भारतात एकत्र कुटुंबांचा ऱ्हास, शहराकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर आणि शहरी जीवनात जवळीकतेची जागा फक्त संपर्कानं घेणं अशी कारणं यामागे दिसतात.
जी पिढी सतत ऑनलाईन असते ती कनेक्टेड आहे का? हा खरा प्रश्न नसून ते खरंच 'ऐकत' आहेत का? हा प्रश्न आहे.
यावर योग्य उतारा म्हणजे आपण काहीतरी गमावतोय हे न लाजता धाडसानं स्विकारलं पाहिजे, असं तज्ज्ञ सांगतात.
"डिजिटल कनेक्शन्समुळे तुमची संपर्कयादी वाढते पण प्रत्यक्ष नात्यांतून येणारी गुणवत्ता त्यात नसते. अनेक लोकांना हजारो फॉलोअर्स आणि मित्र असू शकतात पण त्यांना तितकी सखोल जवळीक जाणवत नसते" - डॉ. संदीप वोहरा, सायकियाट्रिस्ट आणि द इमोशनल इंडेक्स या भारताच्या पहिल्या एआयद्वारे मानसिक आरोग्याची तपासणी करणाऱ्या यंत्रणेचे निर्माते.




















एकटेपणामुळे डायबेटिसही होऊ शकतो?
एकटं वाटतंय? उदास वाटतंय? मग हा उपाय करुन पाहा
एकटेपणा आपल्यावर कसा परिणाम करतो, त्याचे काय धोके आहेत?