You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

ममता बॅनर्जी यांचा आरोप : 'भाजपने 100 हून अधिक जागा लुटल्या, त्यांचा विजय अनैतिक'

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभांचे आज (4 मे) निकाल जाहीर होत आहेत.

थोडक्यात

  • विधानसभा निवडणूक 2026 चे ताजे निकाल याठिकाणी पाहा
  • गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत कमळ फुलले आहे, भाजपच्या विजयानंतर काय म्हणाले पंतप्रधान मोदी
  • ममता बॅनर्जी यांचा सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूर मतदारसंघातून पराभव केला
  • तामिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांची आश्चर्यकारक कामगिरी, डीएमकेला पछाडत टीव्हीके पहिल्या स्थानी
  • तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांना कोलाथूर मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला.
  • आसाममध्ये भाजपाला स्पष्ट आघाडी मिळत असल्याचं चित्र
  • केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटला मोठी आघाडी
  • पुद्दुचेरीमध्ये भाजपप्रणित आघाडी पुढे

लाईव्ह कव्हरेज

नितीन सुलताने आणि प्रविण सिंधू

  1. 'भाजपने 100 हून अधिक जागा लुटल्या, त्यांचा विजय अनैतिक आहे' - ममता बॅनर्जी

    पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसवर भाजपने मोठी आघाडी घेतल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर 'मतचोरी' केल्याचा आरोप केला.

    त्या पत्रकारांना म्हणाल्या की, "भाजपने 100 हून अधिक जागा चोरल्या आहेत. भाजपने घोटाळा केला आहे. निवडणूक आयोग आता भाजप आयोग बनला आहे. आम्ही वेळोवेळी याबद्दल तक्रार केली आहे. पण कोणी ऐकलं नाही."

    ममता बॅनर्जी म्हणाल्या, "भाजपचा विजय अनैतिक आहे. निवडणूक आयोगाने पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या संगनमताने जे काही केले आहे ते पूर्णपणे अनैतिक आहे. त्यांनी जबरदस्तीने एसआयआर (SIR) राबवला. त्यांनी अत्याचार केले. त्यांनी मतमोजणी प्रतिनिधींना अटक केली. आम्ही प्रत्युत्तर देऊ."

    पश्चिम बंगालमध्ये, रात्री 8.25 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, भाजपने 136 जागा जिंकल्या होत्या आणि 72 जागांवर आघाडी घेतली होती. दरम्यान, तृणमूल काँग्रेसने 49 जागा जिंकल्या होत्या आणि 30 जागांवर आघाडी घेतली होती.

  2. गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत कमळ फुलले आहे, विजयानंतर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

    पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुचेरीमध्ये भाजप आघाडीने विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात दाखल झाले.

    पंतप्रधान मोदींनी या निकालांना भारताच्या संविधानाचा आणि लोकशाही प्रक्रियेचा विजय म्हटलं आहे.

    पंतप्रधान म्हणाले, "बिहार निवडणुकीच्या निकालानंतर गेल्या नोव्हेंबरमध्ये मी म्हटलं होतं की, गंगा नदी बिहारमधून गंगासागरला जाते. बिहारनंतर गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत सर्वत्र कमळ फुललं आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि आता पश्चिम बंगाल. गंगा मातेच्या काठावर वसलेल्या या राज्यांमध्ये भाजप आणि एनडीएची सत्ता आहे."

    ते म्हणाले, "2013 मध्ये, जेव्हा भारतीय जनता पक्षाने मला पंतप्रधानपदाचा उमेदवार बनवले होते, तेव्हा मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काशीला गेलो होतो. मी पत्रकारांना सांगितले की, मी आलो नव्हतो आणि मला कोणी पाठवलेही नव्हते; गंगा मातेनेच मला बोलावले होते. आजही मला प्रत्येक क्षणी जाणवते की गंगा मातेच्या आशीर्वादाचा वर्षाव आमच्यावर अविरतपणे होत आहे."

    आम्हाला गंगा तसेच ब्रह्मपुत्रा नद्यांचा आशीर्वाद लाभला आहे. आसामच्या जनतेने सलग तिसऱ्यांदा भाजप-एनडीएवर विश्वास ठेवला आहे.

    ते म्हणाले की, पश्चिम बंगालमधील 92 टक्के मतदान ऐतिहासिक असून, ते भारतीय लोकशाहीचं सर्वात उज्ज्वल चित्र ठरत आहे.

    पंतप्रधान मोदींनी निवडणूक आयोग आणि त्याच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

    पंतप्रधान मोदी म्हणाले, "भाजप कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर मला हे यश दिसत आहे. एक कार्यकर्ता म्हणून, मी प्रत्येक भाजप कार्यकर्त्याच्या आनंदात सहभागी आहे. आजचा दिवस अनेक अर्थांनी खास आहे. हा देशाच्या उज्ज्वल भविष्याची घोषणा करण्याचा दिवस आहे. हा विश्वासाचा दिवस आहे."

    मी बंगाल, आसाम, पुदुचेरी आणि तामिळनाडू-केरळच्या जनतेला आदरपूर्वक सलाम करतो. आज मी कोट्यवधी भाजप कार्यकर्त्यांचेही मनःपूर्वक अभिनंदन करतो. भाजपच्या प्रत्येक लहान-मोठ्या कार्यकर्त्याने पुन्हा एकदा अद्भुत कामगिरी केली आहे.

  3. पश्चिम बंगालमधील आघाडीबाबत गडकरींची प्रतिक्रिया, म्हणाले-'स्वप्न साकार झाले आहे'

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या भक्कम आघाडीवर, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, राज्यात भाजपचा एक संकल्प आणि स्वप्न साकार झालं आहे.

    त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिलं की , "एक संकल्प पूर्ण झाला, एक स्वप्न साकार झालं. पश्चिम बंगालमधील भाजपचा ऐतिहासिक विजय हा प्रत्येक कार्यकर्त्यासाठी एक अत्यंत भावनिक क्षण आहे."

    "या ऐतिहासिक आणि निर्णायक विजयासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष शुभेंदू अधिकारी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, राज्य निवडणूक प्रभारी सुनील बन्सल यांचे हार्दिक अभिनंदन," असंही ते म्हणाले.

    निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, सायंकाळी 6.50 पर्यंत पश्चिम बंगालमध्ये भाजपने 55 जागा जिंकल्या होत्या आणि 149 जागांवर आघाडी घेतली होती. तर, तृणमूल काँग्रेसने 24 जागा जिंकल्या होत्या आणि 59 जागांवर आघाडी घेतली होती. पश्चिम बंगालमध्ये 293 जागांसाठी निवडणुका झाल्या.

  4. कोलाथूर मतदारसंघात टीव्हीकेचे व्ही. एस. बाबू यांच्याकडून तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा पराभव

    तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन यांचा कोलाथूर विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे.

    टीव्हीकेचे व्ही. एस. बाबू यांनी त्यांचा 8795 मतांनी पराभव केला. व्ही. एस. बाबू यांना 82,997 मतं मिळाली, तर स्टॅलिन यांना 74,202 मते मिळाली.

    स्टॅलिन 2011 पासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते.

    तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्रीपदावर असताना पराभव होणारे स्टॅलिन हे चौथे राजकीय नेते ठरले आहेत.

    1996 मध्ये जे. जयललिता यांच्या पराभवानंतर, विद्यमान मुख्यमंत्र्यांनी जागा गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे.

    1952 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे पी. एस. कुमारस्वामी राजा श्रीविल्लिपुथूर मतदारसंघातून पराभूत झाले होते.

    1967 मध्ये राज्यात काँग्रेसला सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं आणि डीएमके सत्तेवर आली.

    तत्कालीन मुख्यमंत्री एम. भक्तवत्सलम हेही श्रीविल्लिपुथूर मतदारसंघातून पराभूत झाले.

    1996 च्या विधानसभा निवडणुकीत, तमिळ मानिला काँग्रेससोबत युती करून डीएमकेने प्रचंड विजय मिळवला. तत्कालीन सत्ताधारी एआयएडीएमकेच्या मुख्यमंत्री जे. जयललिता बरगुर मधून पराभूत झाल्या.

    जवळपास तीन दशकांत, सत्तेत असताना जागा गमावणारे स्टॅलिन हे तामिळनाडूचे चौथे मुख्यमंत्री ठरले आहेत. असं करणारे ते द्रमुक पक्षाचे पहिले मुख्यमंत्री आहेत.

  5. केरळ : यूडीएफच्या आघाडीवर प्रियंका गांधी काय म्हणाल्या?

    केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफला मिळालेल्या आघाडीबद्दल काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी राज्यातील मतदारांचे आभार मानले आहेत.

    "केरळमधील सर्व बंधू आणि भगिनींनो, तुमच्या विश्वासासाठी आणि प्रचंड पाठिंब्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, तोच UDF साठी शक्ती ठरेल, कारण आम्ही तुम्हा सर्वांसाठी एक चांगले भविष्य घडवण्यासाठी कठोर परिश्रम करत आहोत," असं त्यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले.

    "मला वायनाडमधील माझ्या कुटुंबाला सांगायचं आहे की, तुम्ही पुन्हा एकदा प्रचंड जनादेश देऊन UDF वर विश्वास दाखवला आहे. 7 पैकी 7 जागा. आता वायनाडच्या विकासासाठी तुमचे 8 प्रतिनिधी एकत्र काम करत आहेत. तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करू," असंही प्रियंका गांधी म्हणाल्या.

    काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी केरळमध्ये प्रचंड विजयाच्या तयारीत दिसत आहे. केरळमध्ये विधानसभेच्या 140 जागा असून, त्यापैकी 102 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत.

  6. विजयची कहाणी: चित्रपटांपासून ते राजकारणातला थला बनण्यापर्यंत

    तामिळनाडूच्या राजकारणात, टीव्हीके नेते विजय यांनी पहिल्याच निवडणुकीत नवा इतिहास रचला आहे.

    त्यांचा पक्ष द्रमुक आणि एआयएडीएमके सारख्या द्रविड पक्षांपेक्षा चांगली कामगिरी करत असल्याचं दिसतं.

    ही एक अभूतपूर्व घटना मानली जात आहे, कारण या पक्षांनी 1967 पासून राज्याच्या राजकारणात वर्चस्व राखले होते.

    एमजीआर यांच्यानंतर तामिळनाडूतील आपल्या पहिल्याच निवडणुकीत, विजय यांनी सत्तेतील सर्व प्रमुख पक्षांना पराभूत करून जनतेमधील आपला प्रभाव सिद्ध केला आहे.

    33 वर्षांपूर्वी एका लाजाळू नायकाच्या रुपात तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेला विजय, आता राजकारणात प्रवेश केल्यापासूनच्या पहिल्याच निवडणुकीत एक नवीन आदर्श रचताना दिसत आहे.

    त्याचे वैयक्तिक आयुष्य आणि चित्रपट कारकीर्द बऱ्याच अंशी तशीच राहिली आहे, पण विजय राजकारणात एक नवीन शैली अवलंबत आहे.इथे वाचाविजय : बहिणीच्या निधनाचा धक्का, सिनेमा सोडून थेट राजकारणात आणि आता तामिळनाडूच्या सत्तेपर्यंत

  7. ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा, सुरक्षा व्यवस्था वाढवली

    कोलकाता येथील कालीघाट परिसरातील पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

    पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, निवडणूक आयोगाच्या निर्देशांनंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

    पीटीआयच्या वृत्तानुसार, काही लोकांनी ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी जाऊन 'जय श्री राम'च्या घोषणा दिल्या. यानंतर निवडणूक आयोगाने या सूचना जारी केल्या.

    निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, राज्य सचिवालय 'नबन्ना'च्या परिसरातही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली.

    निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, दुपारी 3.30 वाजेपर्यंत 294 सदस्य असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेत भाजप 195 जागांवर आघाडीवर होता, तर बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसी 92 जागांवर आघाडीवर होती.

  8. बारामतीमध्ये रेकॉर्डब्रेक आघाडी, सुनेत्रा पवार भावूक, म्हणाल्या-'मन खूप भरून येतंय...'

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना विक्रमी विजयी आघाडी मिळाली आहे. त्यासाठी मतदारांचे आभार मानताना सुनेत्रा पवार भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

    यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, "दादानंतरची ही पहिली निवडणूक आहे. अशा निवडणुकींना सामोरं जावं लागेल असं कधीही वाटलं नव्हतं. मन खूप भरून येतंय, पण आज बारामतीकरांनी दादांवर विश्वास दाखवला आहे.

    दादांनी केलेल्या विकासकामांचं प्रतिक म्हणून त्यांना मतदारांनी भावांजली वाहिली. दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी मतांमधून व्यक्त केलं आहे," असं सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत. पाहा व्हीडिओ.

  9. केरळ: कलांनुसार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आघाडीला बहुमत, शशी थरूर काय म्हणाले?

    केरळमध्ये आतापर्यंतच्या कलांनुसार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आघाडीने बहुमत मिळवले आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभा खासदार शशी थरूर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

    शशी थरूर यांनी ट्विटरवर लिहिलं, "सकाळपासून केरळमध्ये यूडीएफचा विजय होताना दिसत आहे. निम्मी मतमोजणी झाली असतानाच, आम्ही 100 हून अधिक जागांवर आघाडीवर आहोत, महिनाभरापूर्वी कोणी याची कल्पनाही केली नव्हती."

    ते पुढे म्हणाले, "जनतेने बदलासाठी स्पष्टपणे मतदान केलं आहे. काँग्रेस उत्कृष्ट कामगिरी करत आहे, आमचे मित्रपक्षही सर्वत्र खूप चांगली कामगिरी करत आहेत."

    केरळमध्ये एकूण 140 जागा असून, बहुमतासाठी 71 जागांची आवश्यकता आहे. सध्या काँग्रेस 99 जागांवर आघाडीवर आहे.

  10. आसाम : काँग्रेसचा मुख्य चेहरा असलेले गौरव गोगोई 23 हजार मतांनी पराभूत

    आसाममधील जोरहाट विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार गौरव गोगोई यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे.

    भाजपचे हितेंद्र नाथ गोस्वामी यांनी त्यांचा 23 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.

    निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, भाजपचे हितेंद्र नाथ गोस्वामी यांना 64,439 मतं मिळाली, तर गौरव गोगोई यांना 46,257 मते मिळाली.

    काँग्रेसकडून गौरव गोगोई यांना आसाम निवडणुकीतील एक प्रमुख चेहरा म्हणून पुढे केलं जात होतं, पण त्यांनाच पराभव स्वीकारावा लागला आहे.

    गौरव गोगोई हे जोरहाट लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ते आसाम काँग्रेसचे अध्यक्षही आहेत.

  11. 'पश्चिम बंगालच्या लोकांनी पंतप्रधान मोदींवर विश्वास व्यक्त केलाय'

    पश्चिम बंगालच्या विजयावर मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री कैलास विजयवर्गीय म्हणाले, “...आम्ही ही निवडणूक जिंकली आहे. पश्चिम बंगालमधील लोकांनी पंतप्रधान मोदींवर आपला विश्वास व्यक्त केला आहे. आम्ही पश्चिम बंगालच्या जनतेचे आभार मानतो. देशाच्या सुरक्षेसाठी पश्चिम बंगाल अत्यंत महत्त्वाचे आहे...”

  12. तामिळनाडूच्या कलांवर द्रमुकची पहिली प्रतिक्रिया...

    तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या कलांमध्ये खराब कामगिरी दिसत असूनही डीएमकेचे संघटन सचिव आर. एस. भारती यांनी राज्यात पक्षाने आपले कर्तव्य पूर्ण जबाबदारीने पार पाडलेय असं बीबीसी तमिळला सांगितलं.

    ते म्हणाले, “माझा अंदाज आहे की विधानसभा त्रिशंकू (हंग) होईल. या निकालाकडे मी एक शांततेत झालेली क्रांती म्हणून पाहतो.”

    डीएमके आणि एम. के. स्टालिन यांच्या आक्रमक निवडणूक प्रचारानंतरही आलेल्या निकालांवर भाष्य करताना त्यांनी बीबीसीला सांगितले, “डीएमकेने आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडली आहे. मात्र लोक आपले कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरले. या निकालामागच्या कारणांचं विश्लेषण आम्हाला करावं लागेल.”

  13. 'वाघासारखं लढत राहू', तृणमूलच्या पिछाडीवर ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया

    पश्चिम बंगालच्या निकालांमध्ये आतापर्यंत समोर आलेले कल पाहता भाजपला मोठी आघाडी मिळाली आहे. त्यामुळं पश्चिम बंगालची मोठी पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

    यानंतर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतक्रिया समोर आली आहे. यात त्यांनी केंद्रीय दल आणि पोलीस बळाचा वापर करून तृणमूल काँग्रेसवर अत्याचार केला जात असल्याचं म्हटलं आहे.

    काय म्हणाल्या ममता?

    "सर्वांना हात जोडून सांगते, कृपया मतमोजणी प्रतिनिधी आणि उमेदवार यांनी मतदान क्षेत्र सोडून येऊ नये. स्ट्राँग रूममध्ये जिथे मतमोजणी होत आहे, म्हणजे केंद्रात, तिथे कोणीही येऊ नये. हाच भाजपाचा डाव आहे.

    पहिल्या दोन-तीन फेऱ्यांबाबत मी काल पासूनच सांगत होते की त्यांचे आधी कल दाखवतील, आमचे नंतर कल दाखवतील आणि अनेक ठिकाणी दोन-तीन फेऱ्यांची मतमोजणी केल्यानंतर जवळजवळ शंभर ठिकाणी मतमोजणी बंद ठेवली आहे. कल्याणीमध्ये सात यंत्रं सापडली आहेत. पोलीस, केंद्रीय दल वापरून सर्व बाजूंनी तृणमूल काँग्रेसवर अत्याचार केला जात आहे.

    कार्यालयं तोडत आहेत, जबरदस्तीने ताबा घेत आहेत. SIRच्या नावाखाली मतं लुटली हे तुम्ही पाहिलं. पण अजूनही अशा 70-100 जागा आहेत, ज्यात आम्ही आघाडीवर आहोत, मात्र ते सांगत नाहीत. सर्वच खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. निवडणूक आयोग स्वतःच्या मर्जीनुसार खेळत आहे आणि केंद्रीय दलांना सोबत घेऊन आणि आमचे पोलीस पूर्णपणे मान तुकवून केंद्रीय दलांच्या अधीन काम करत आहेत. त्यामुळे मी आमच्या सर्व मतमोजणी प्रतिनिधींना, आमच्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगेन की इतकं वाईट वाटून घेऊ नका.

    मी म्हणाले होते की सूर्यास्तानंतर तुम्ही जिंकाल. तीन फेऱ्या, चार फेऱ्या मोजल्या तरी हे 14 ते 18 फेऱ्यांपर्यंत मोजलं जातं. तेव्हा तुम्ही जिंकाल. थांबा आणि पाहा, लक्ष ठेवा. आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत. तुमच्यापैकी कोणीही घाबरू नका. निश्चिंत राहा. आम्ही वाघांसारखे लढत राहू," अशी ममता गांधींची पहिली प्रतिक्रिया आहे.

  14. विजयच्या TVK ला तामिळनाडूमध्ये आघाडीनंतर जल्लोषाला सुरुवात

    तामिळनाडूमध्ये आतापर्यंतच्या कलांमध्ये अभिनेता विजयच्या पक्षाला मोठी आघाडी मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं विजय यांच्या कुटुंबासह पक्षातील नेते, कार्यकर्ते यांनी आनंद साजरा करायला सुरुवात केली आहे.

    विजय यांच्या पक्षाचं चिन्हं शिट्टी आहे. त्यामुळं कुटुंबासह सर्वांनी शिट्टी वाजवत आनंद साजरा केला आहे. पाहा व्हीडिओ.

  15. पश्चिम बंगाल : निकालाच्या आतापर्यंतच्या कलात भाजपा आघाडीवर, ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टीएमसीच्या कार्यकर्त्यांना मतमोजणी केंद्रावरच थांबण्याचे आवाहन केले आहे.

    ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ जारी करत म्हटलं, "मी हात जोडून विनंती करते की, कोणत्याही 'व्होटिंग एजंट'ने मतमोजणी केंद्र सोडू नये. ही भाजपाची योजना आहे. निवडणूक आयोग आधी त्यांचे निकाल जाहीर करेल, त्यानंतर आपल्या पक्षाचे निकाल जाहीर करेल, हे मी कालपासून ​​सांगत आहे."

    "सुमारे 100 ठिकाणी मतदानाच्या 2-3 फेऱ्यांनंतर मतमोजणी थांबवण्यात आली आहे. कल्याणीमध्ये मोजणीच न झालेले 7 मशीन्स आढळून आले," असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

    त्या पुढे म्हणाल्या, "केंद्रीय सुरक्षा दल तृणमूल काँग्रेसवर अत्याचार करत आहे. लोक आमच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी कार्यालयाचा ताबा घेतला आहे. एसआयआरच्या माध्यमातून लूटमार करून जागा कशा जिंकल्या जात आहेत, हे तुम्ही पाहिले आहे. आम्ही अजूनही 70-100 जागांवर आघाडीवर आहोत, पण त्याविषयी सांगितले जात नाहीये. सर्व काही खोटे सांगितले जात आहे."

    "निवडणूक आयोग केंद्रीय दलांशी संगनमत करून स्वतःचा खेळ खेळत आहे. आमचे पोलीसही केंद्र सरकारशी संगनमत करून काम करत आहेत. मला पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सांगायचे आहे की, दुःखी होण्याची गरज नाही. मतमोजणीच्या केवळ 3-4 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत आणि 14-18 फेऱ्यांनंतर आपण जिंकू. वाट पाहा. आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. आम्ही वाघासारखे लढत राहू," असंही ममता बॅनर्जी यांनी नमूद केलं.

    सध्याच्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपा 192 जागांसह आघाडीवर आहे, तर टीएमसी 96 जागांवर पुढे आहे.

  16. केरळ : निकालाच्या कलांनुसार यूडीएफ आघाडीवर, तिरुवनंतपुरममधील काँग्रेस कार्यालयातील वातावरण कसे आहे?

    इम्रान कुरेशी, बीबीसी हिंदीसाठी, तिरुवनंतपुरम

    केरळमधून येणाऱ्या निवडणूक कलांनुसार, डाव्यांचा शेवटचा बालेकिल्ला कोसळत आहे. सध्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ) आघाडीवर आहे, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) नेतृत्वाखालील डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) मागे पडली आहे.

    तिरुवनंतपुरममधील काँग्रेस मुख्यालयात पक्षाचे कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. जेव्हा जेव्हा एखादा कम्युनिस्ट नेता मतमोजणीत मागे पडल्याची बातमी येते, तेव्हा काँग्रेस कार्यकर्ते आनंदाच्या घोषणा देतात.

    जेव्हा मुख्यमंत्री पिनारयी विजयन त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा मागे पडले होते, तेव्हा काँग्रेस मुख्यालयात सर्वाधिक आनंदाचे वातावरण दिसून आले.

    केरळ विद्यार्थी संघटनेचे सदस्य आलोक वेरियावल्ली यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितले, "मुख्यमंत्री 3 हजार ते 4 हजार मतांनी मागे पडणे हे एलडीएफच्या खराब प्रशासनाचे लक्षण आहे."

    विशेष म्हणजे, 2011 मध्ये पश्चिम बंगालमध्ये पराभव झाल्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) नेतृत्वाखालील एलडीएफने भारतातील डाव्या चळवळीला नवीन बळ दिले.

    मागील अनेक दशकांपासून केरळमधील जनता सीपीएम किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीला आलटून पालटून निवडून देत आली आहे. 2021 मध्ये हा ट्रेंड बदलला आणि एलडीएफने राज्यात सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन केले.

  17. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि टीएमसी समर्थक भिडले

    विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे जसजसे कल समोर येत आहेत तसतसे राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि टीएमसी समर्थक भिडल्याचं समोर आलं आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या

  18. आसाम: हिमंता बिस्वा सरमा यांच्या मतदारसंघात काँग्रेसची स्थिती कशी आहे?

    आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा जालुकबारी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

    मतमोजणीच्या 6 व्या फेरीनंतर हिमंता बिस्वा सरमा 23 हजार 931 मतांनी आघाडीवर आहेत.

    हिमंता बिस्वा सरमा यांना 39 हजार 214 मते मिळाली आहेत, तर काँग्रेस उमेदवाराला 15 हजार 283 मते मिळाली आहेत.

    विशेष म्हणजे हिमंता बिस्वा सरमा 2001 पासून सातत्याने या जागेवर विजयी होत आहेत.

    यावेळी त्यांच्या विरोधात काँग्रेसने विदिशा नियोग यांना उमेदवारी दिली होती.

  19. केरळमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? काँग्रेस खासदार आणि भाजपाने काय म्हटले?

    केरळमधील 140 विधानसभा जागांसाठी राज्यातील 43 ठिकाणी 140 मतदान केंद्रांवर मतमोजणी होत आहे.

    केरळमध्ये मुख्य लढत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) नेतृत्वाखालील डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ) यांच्यात आहे.

    मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानुसार यूडीएफ आघाडीवर आहे. काँग्रेस खासदार एम. के. राघवन यांनी म्हटले आहे की, जर पक्ष जिंकला, तर मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय हायकमांड घेईल आणि तो सर्वांना मान्य असेल.

    भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर म्हणाले की, निकाल काहीही लागो, या निवडणुकांनंतर केरळचे राजकारण निर्णायकपणे बदलेल.

    राजीव चंद्रशेखर म्हणाले, "मला अजून निकालांवर भाष्य करायचे नाही. निवडणुकीचे संपूर्ण निकाल जाहीर झाल्यावरच मी भाष्य करू शकेन. पण या संधीचा उपयोग करून मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि एनडीएच्या उमेदवारांचे अभिनंदन करू इच्छितो. आम्ही खूप मेहनत घेतली आहे आणि केरळच्या भविष्याबाबत एक संदेश दिला आहे."

  20. आसाम: मतमोजणीच्या कलानुसार बहुमत मिळवलेल्या भाजपाच्या कार्यालयातील वातावरण कसे आहे?

    प्रेरणा, बीबीसी प्रतिनिधी

    आसाममधील 126 विधानसभा जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. प्राथमिक कलानुसार भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीवर आहे. विशेष म्हणजे गुवाहाटीतील भाजपा कार्यालयात रविवारी (3 मे) रात्रीच विजयाचे पोस्टर्स लावण्यात आले.

    या पोस्टरवर लिहिले होते, "आसामच्या जनतेचे त्यांच्या अभूतपूर्व पाठिंब्याबद्दल आणि आशीर्वादाबद्दल मनःपूर्वक आभार!"

    तेथे उपस्थित असलेले भाजपाचे राज्य कोषाध्यक्ष राजकुमार शर्मा म्हणाले, "आम्ही जिंकणारच, असा आम्हाला आधीच विश्वास होता. म्हणूनच आम्ही काल रात्री आसामच्या जनतेचे आभार मानणारे पोस्टर लावले."

    सध्या भाजपा कार्यालयात फारशी हालचाल नाही. तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या मते, बहुतेक कार्यकर्ते सध्या मतमोजणी केंद्रावर आहेत. दुपार होताच लोक कार्यालयाबाहेर गर्दी करू लागतील आणि जर ट्रेंडनुसार निकाल लागले, तर जल्लोष होईल.

    आसाममध्ये दोन आघाड्यांमध्ये निर्णायक लढत आहे. एका आघाडीचे नेतृत्व भाजपाने केले, तर दुसऱ्या आघाडीचे नेतृत्व काँग्रेसने केले. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे.