दिल्लीतील मालवीय नगरमध्ये रेस्टॉरंटला आग, 21 जणांचा होरपळून मृत्यू

मालवीय नगरमधील एका रेस्टॉरंटमध्ये आग लागली.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, मालवीय नगरमधील एका रेस्टॉरंटमध्ये आग लागली.
Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील लेमन ग्रीन नावाच्या रेस्टॉरंटमध्ये आग लागण्याची घटना घडली आहे. या घटनेतील मृतांची संख्या 21 वर पोहचली आहे.

स्थानिक भाजप आमदार सतीश उपाध्याय म्हणाले की, "21 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 47 जणांना वाचवण्यात आलं आहे."

आम आदमी पार्टीचे नेते सौरभ भारद्वाज म्हणाले की, "या आगीत 21 जण जिवंत जळालेले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अनेक लोक परदेशातून इथे आले होते. लोक आपल्या कुटुंबीयांच्या उपचारासाठी इथे आले होते. ते सर्व नाइलाजाने इथे राहत होते. सरकारने थोडी तरी लाज बाळगावी."

पंतप्रधान कार्यालय, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि नायब राज्यपाल तरनजीत सिंग संधू यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) एका पोस्टमध्ये, मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान कार्यालयानं लिहिलं आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की, दिल्लीतील मालवीय नगरमध्ये लागलेल्या आगीत झालेली जीवितहानी दुःखद आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती माझ्या संवेदना आहेत."

व्हीडिओ कॅप्शन, दिल्लीत रेस्टॉरंटला भीषण आग, अनेकांचा मृत्यू

दिल्ली पोलिसांनी काय माहिती दिली?

दिल्ली पोलिसांनी या घटनेबाबत सांगितलं की, "आज सकाळी 8 वाजून 48 मिनिटांनी मालवीय नगरमधील 'फ्लोरीश स्टे बी अँड बी' मध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. स्थानिक पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी बचावकार्य सुरू केलं.

"अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांच्या मदतीने आग यशस्वीरित्या विझवण्यात आली आहे. पोलीस, अग्निशमन दल आणि इतर प्रयत्नांतून 40 हून अधिक लोकांना वाचवण्यात आलं असून त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

"अत्यंत दुःखानं कळवावं लागत आहे की, या दुःखद घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव आणि शोधकार्य अजूनही सुरू असून, पीडितांना सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी सर्व संबंधित यंत्रणा घटनास्थळी तैनात आहेत."

अधिक तपशील प्राप्त झाल्यावर कळवण्यात येईल, असंही दिल्ली पोलिसांनी सांगितलं.

मालवीय नगरमधील एका रेस्टॉरंटमध्ये आग लागली.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, मालवीय नगरमधील एका रेस्टॉरंटमध्ये आग लागली.

दिल्ली प्रशासनानं काय म्हटलं?

दक्षिण दिल्लीतील दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) जितेंद्र कुमार म्हणाले की, "या इमारतीच्या खाली एक रेस्टॉरंट सुरू होतं आणि ही आग लागण्यामागचं कारण अद्याप निश्चित झालेलं नाही. रेस्टॉरंटमुळेच इमारतीला आग लागली असण्याची अधिक शक्यता आहे."

ते म्हणाले की, "आमच्याकडे अगदी अचूक माहिती नाहीये, पण आतापर्यंत चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अठ्ठ्याहत्तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे."

जितेंद्र कुमार म्हणाले की, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी अशा इमारतींवर कठोर कारवाई करणं आवश्यक आहे.

ते म्हणाले की, "जे लोक बेकायदेशीरपणे काम करत आहेत आणि दुसऱ्या परवान्याच्या नावाखाली हॉटेल्स चालवत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मी संबंधित विभागांना देईन. काही लोकांनी त्यांच्या खोल्यांमधून उड्या मारल्या. फक्त एकाच इमारतीला आग लागली आहे."

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

दक्षिण दिल्लीतील दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या एसडीएमने चार मृतदेह सापडल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, दक्षिण दिल्लीतील दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या एसडीएमने चार मृतदेह सापडल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्यांनी इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे की, "मालवीय नगरमधील भीषण आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे मी व्यथित झालो आहे. शोकाकुल कुटुंबियांप्रति माझ्या मनःपूर्वक संवेदना आहेत. घटनेची माहिती मिळताच, दिल्ली अग्निशमन सेवा, दिल्ली पोलीस, डीडीएमए, कॅट्स रुग्णवाहिका सेवा आणि आपत्कालीन यंत्रणांना तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आलं."

"यंत्रणांच्या जलद कारवाईमुळे अनेक लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं... बाधित कुटुंबांना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत आणि इतर साहाय्य पुरवलं जात आहे... या दुर्घटनेमुळे बाधित झालेल्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."

दिल्लीचे नायब राज्यपाल तरनजीत सिंग संधू यांनी 'एक्स'वर पोस्ट करताना या घटनेला दुःखद म्हटलं आहे.

ते म्हणाले की, "मालवीय नगरमधील हौझ राणी येथील हॉटेलला लागलेल्या आगीमुळे मला खूप दुःख झालं आहे. मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रति माझ्या संवेदना आहेत आणि जखमी झालेल्या व्यक्ती लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी मी सर्वांसोबत प्रार्थना करतो. पोलीस, नागरिक आणि अग्निशमन दलाची बचाव पथकं सध्या घटनास्थळी कार्यरत आहेत. अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना तातडीने वैद्यकीय मदत, साहाय्य आणि या दुःखद घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत."

सोमनाथ भारती काय म्हणाले?

मालवीय नगरचे माजी आमदार आणि आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितलं की, "या परिसरात तारांचे जाळे असल्याने बुधवारी सकाळी 8 वाजता आग लागली."

पुढे ते म्हणाले की, "सकाळी 8 वाजता आग लागली आहे. तिथे तारांचं जाळं आहे. कदाचित तिथेच शॉर्ट सर्किट होऊन त्यामुळे आग लागली असावी. जवळच एक हॉटेल आहे, ज्यात 20 ते 25 खोल्या आहेत. मॅक्स हॉस्पिटलही जवळच आहे. तिथे उपचार घेत असलेल्या रुग्णांचे कुटुंबीय याच हॉटेलमध्ये राहतात."

आम आदमी पक्षाचे नेते आणि मालवीय नगरचे माजी आमदार सोमनाथ भारती यांनी दावा केला आहे की, बाधित झालेल्यांपैकी बहुतांश परदेशी नागरिक होते.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, आम आदमी पक्षाचे नेते आणि मालवीय नगरचे माजी आमदार सोमनाथ भारती यांनी दावा केला आहे की, बाधित झालेल्यांपैकी बहुतांश परदेशी नागरिक होते.

"शॉर्ट सर्किटमुळे आधी स्वयंपाकघरात आग लागली. ती नंतर वरच्या मजल्यांवर पसरली. समोर एका रजई विक्रेत्याचं दुकान आहे; त्याने आपल्या सर्व रजया खाली पसरवल्या. त्यावर लोकांनी बाहेर पडण्यासाठी उड्या मारल्या."

पुढे ते म्हणाले की, "मी सकाळपासून स्थानिक लोकांसोबत घटनास्थळी आहे. अग्निशमन दलही पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. माझ्या मते चार ते पाच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यापैकी 99 टक्के परदेशी लोक असून, त्यामध्ये दक्षिण आफ्रिका, सोमालिया इत्यादी देशांतील लोकांचा समावेश आहे. त्यांच्यापैकी काही जण आखाती देशांमधलेही असू शकतात."

अग्निशमन दलाचे अधिकारी काय म्हणाले?

अग्निशमन दलाचे अधिकारी ए. के. मलिक यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितलं की, या घटनेची माहिती बुधवारी सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी मिळाली.

पुढे ते म्हणाले की, "अग्निशमन दलाला सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी फोन आला. सुरुवातीला घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सात गाड्या पाठवण्यात आल्या. आणखी वाहनंही मार्गावर होती, पण नंतर गरजेनुसार सर्व पथके घटनास्थळी पोहोचली. आमचे पथक घटनास्थळी पोहोचताच, त्यांनी तात्काळ इमारतीमधून 37 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले."

अग्निशमन अधिकारी ए. के. मलिक यांनी सांगितले की, त्या बहुमजली इमारतीत अनेक परदेशी नागरिक होते.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, अग्निशमन अधिकारी ए. के. मलिक यांनी सांगितले की, त्या बहुमजली इमारतीत अनेक परदेशी नागरिक होते.

पुढे त्यांनी स्पष्ट केलं की, ही एक बहुमजली इमारत असून, त्यात तळघर, तळमजला आणि त्याच्या वर पाच मजले आहेत.

त्यांच्या म्हणण्यानुसार, "घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांची चौकशी केल्यावर आम्हाला समजले की, या इमारतीचा वापर केवळ निवासी संकुल म्हणून केला जात नव्हता. असं दिसतं की, इथे राहणारे बहुतेक लोक हे रस्त्याच्या पलीकडेच असलेल्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचे नातेवाईक किंवा त्यांच्या ओळखीचे होते."

पुढे मलिक म्हणाले, "इथे थांबलेल्यांमध्ये परदेशी नागरिकही होते. आगीवर खूप लवकर नियंत्रण मिळवण्यात आलं. अगदी कमी वेळात आग आटोक्यात आणण्यात आली. आता आम्ही इमारत पूर्णपणे रिकामी केली असून पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात दिली आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)