वर्तमानपत्रावर ठेवून समोसा किंवा भजी खाणे आरोग्यासाठी का घातक आहे?

वर्तमानपत्रावर ठेवून समोसा खाल्ल्याने छपाईच्या शाईमधील रसायने समोशाच्या तेलात सहज विरघळतात.
फोटो कॅप्शन, वर्तमानपत्रावर ठेवून समोसा खाल्ल्याने छपाईच्या शाईमधील रसायने समोशाच्या तेलात सहज विरघळतात.
    • Author, शेख अंसारी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

अनेक शहरांमध्ये समोसा अनेकदा वर्तमानपत्राच्या कागदावर ठेवून दिला जातो.

अनेक दुकानदार समोसे आणि इतर तळलेले खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात किंवा छापील कागदांमध्ये गुंडाळून पार्सल म्हणूनही देतात.

खरं तर असे खाद्यपदार्थ पारंपरिकरीत्या पत्रावळीवर किंवा पानांपासून बनवलेल्या द्रोणांमध्ये देण्याची जुनी पद्धत होती. पार्सल देतानाही हेच वापरले जायचे. पण गेल्या काही वर्षांत हे चित्र पूर्णपणे बदलले आहे.

आता समोसे, भजी आणि अशाच तळलेल्या पदार्थांसाठी मोठ्या प्रमाणावर वर्तमानपत्राचा वापर केला जात आहे. तसेच पार्सल देण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्या जात आहेत.

नुकतीच 'एफएसएसएआय'ने (भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण) स्ट्रीट फूड विक्रेते, हॉटेल्स आणि इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी एक महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत.

एफएसएसएआयने काय इशारा दिला?

FSSAI ने म्हटले आहे की, समोसा, बटाटावडा किंवा बोंडा आणि भजी यांसारखे तळलेले पदार्थ वर्तमानपत्रात किंवा छापील कागदात गुंडाळून देणे अथवा त्या कागदावर ठेवून देणे आरोग्याला बाधक ठरू शकते.

कागदावर छपाई करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये घातक रसायनांसोबतच शिशाचे प्रमाण असू शकते.

अशा कागदावर गरम समोसा किंवा इतर खाण्याचे पदार्थ ठेवल्यास ही रसायने अन्नात उतरू शकतात. अन्नातून हे घटक पोटात गेल्याने गंभीर आजार उद्भवण्याचा धोका निर्माण होतो.

या विषयावर अधिक जाणून घेण्यासाठी बीबीसीने आरोग्य तज्ज्ञांशी संवाद साधला.

नुकतेच मुंबईत एका हातगाडीवाल्याला पेपरमध्ये अन्न गुंडाळून देताना FSSAI च्या निदर्शनास आले होते.

याबाबतचे नियम आधीपासूनच लागू आहेत. तरीसुद्धा खाद्यपदार्थ देण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर करू नये, असे आदेश FSSAI ने नव्याने जारी केले आहेत.

FSSAI च्या फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स (पॅकेजिंग) रेग्युलेशन्स 2018 नुसार, खाण्याचे पदार्थ ठेवण्यासाठी किंवा वाढण्यासाठी वर्तमानपत्र अथवा अशा कोणत्याही साहित्याचा वापर करण्यावर बंदी आहे.

वर्तमानपत्राचा वापर कोणत्या कामांसाठी करू नये?

1- अन्नातील अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी.

2- खाद्यपदार्थ किंवा स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य झाकून ठेवण्यासाठी.

3- अन्न वाढण्यासाठी किंवा देण्यासाठी.

4- अन्न पॅक (पार्सल) करण्यासाठी.

डॉक्टर काय सांगतात?

वर्तमानपत्रावर गरम समोसा अथवा इतर तळलेले पदार्थ ठेवून खाल्ल्याने आरोग्यावर काय वाईट परिणाम होऊ शकतात, हे समजून घेण्यासाठी बीबीसीने कर्नूल मेडिकल कॉलेजचे सोनोग्राफी तज्ज्ञ डॉ. श्याम प्रसाद यांच्याशी चर्चा केली.

उत्तर भारतामध्ये वर्तमानपत्रात समोसा देण्याची पद्धत वेगाने वाढली आहे.
फोटो कॅप्शन, उत्तर भारतामध्ये वर्तमानपत्रात समोसा देण्याची पद्धत वेगाने वाढली आहे.
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पेपरच्या छपाईची शाई पोटात गेल्यावर काय होते, त्यातून कोणकोणते गंभीर आजार जडू शकतात आणि शरीरातील अंतर्गत अवयवांवर त्याचा नेमका कसा घातक परिणाम होतो, याबद्दल त्यांनी सविस्तर खुलासा केला.

प्रश्न: छपाईची शाई पोटात गेली, तर काय होऊ शकतं?

उत्तर: कागदाच्या छपाईच्या शाईमध्ये 'लेड' म्हणजेच शिसे हा घातक धातू असतो. गरम अन्नासोबत हा धातू सहज पोटात जातो आणि थेट लिव्हरवर परिणाम करतो.

पुढे हा घटक रक्तात मिसळल्यास शरीराचे इतर अवयव निकामी होण्याचा धोका असतो. इतकंच नाही तर काही बाबतीत यामुळे मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतो.

प्रश्न: घरांमध्ये चपात्या किंवा पुऱ्या बनवून जुन्या पेपरवर ठेवल्या जातात, हे कितपत घातक आहे?

उत्तर: या सवयीचा फटका मोठ्यांपेक्षा लहान मुलांना जास्त बसतो.

यामुळे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक वाढीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. लहान मुलांच्या शरीराचे अवयव पूर्णपणे विकसित झालेले नसतात, त्यामुळे त्यांच्यावर याचा प्रभाव अधिक तीव्रतेने पडू शकतो.

प्रश्न: गरोदर महिलांवर याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात?

उत्तर: गरोदर महिलांनी पेपरमध्ये किंवा छापील कागदावर ठेवलेले अन्न खाणे पूर्णपणे टाळले पाहिजे. हे त्यांच्यासाठी आणि बाळासाठी अतिशय घातक ठरू शकते.

गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात ही विषारी रसायने पोटात गेल्यास गर्भपात होण्याचा, बाळ मतिमंद जन्माला येण्याचा किंवा मृत बाळ जन्माला येण्याचा मोठा धोका असतो. म्हणूनच गरोदर स्त्रियांनी याविषयी विशेष काळजी घेतली पाहिजे.

'फूड-ग्रेड पॅकेजिंग' वापरण्याचा सल्ला

अन्नपदार्थांची विक्री आणि पार्सल देण्यासाठी केवळ सुरक्षित आणि प्रमाणित फूड-ग्रेड साहित्याचाच वापर करा: FSSAI
फोटो कॅप्शन, अन्नपदार्थांची विक्री आणि पार्सल देण्यासाठी केवळ सुरक्षित आणि प्रमाणित फूड-ग्रेड साहित्याचाच वापर करा असा सल्ला FSSAI ने दिला आहे.

अन्नपदार्थ विकणाऱ्या आणि पोहोचवणाऱ्या व्यावसायिकांनी सुरक्षित आणि शासनाने प्रमाणित केलेले फूड-ग्रेड पॅकेजिंगच वापरावे, असे FSSAI ने स्पष्ट केले आहे.

त्याचप्रमाणे ग्राहकांनीही या बाबतीत डोळस आणि जागरूक राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

खाण्याचे पदार्थ ठेवण्यासाठी जे कागद, खोके, डिश किंवा कप बनवण्यासाठी वापरले जाणारे साहित्य अन्न सुरक्षेच्या नियमांत बसणारेच असायला हवेत. अशा साहित्यातून कोणत्याही प्रकारचे विषारी घटक किंवा जंतू अन्नात जाता कामा नयेत, असा नियम आहे.

आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो?

वर्तमानपत्र छापताना वापरल्या जाणाऱ्या शाईत बाइंडर, रंगद्रव्ये, रसायने, मिनरल ऑईल हायड्रोकार्बन्स आणि जड धातू असतात.

जेव्हा गरम समोसा किंवा इतर अन्नपदार्थ वर्तमानपत्रावर ठेवले जातात तेव्हा उष्णतेमुळे शाईमधील ही रसायने अन्नात मिसळण्याची दाट शक्यता असते.

असे अन्न खाल्ल्यामुळे हे रासायनिक घटक शरीरात पोहोचू शकतात आणि आरोग्याच्या विविध गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

स्वच्छतेशी संबंधित समस्या

डॉ. श्याम प्रसाद यांच्या मते, "वर्तमानपत्र हे शेकडो लोकांच्या हातातून गेलेले असते आणि अनेक अस्वच्छ ठिकाणांवरून प्रवास करून आलेले असते."

"त्यामुळे त्यावर भरपूर धूळ, जंतू आणि कचरा बसलेला असतो. यावर अन्न ठेवून खाल्ल्यास थेट संसर्ग होऊन लोक आजारी पडण्याचा धोका असतो."

तुम्हीही घरात वर्तमानपत्राचा वापर करता का?

काही लोक घरांमध्येही पुऱ्या किंवा इतर तेलकट पदार्थ ठेवण्यासाठी आणि ते पॅक करण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर करतात. मात्र घरामध्येही वर्तमानपत्रावर ठेवून अन्न किंवा कोणताही तळलेला पदार्थ खाऊ नये. तज्ज्ञांच्या मते, समोसा किंवा इतर खाद्यपदार्थ खाण्यासाठी स्टेनलेस स्टीलची भांडी, पत्रावळी किंवा काचेच्या भांड्यांचा वापर करणे अधिक सुरक्षित आणि उत्तम आहे.

वर्तमानपत्रात अन्न विकल्यास तक्रार कुठे करावी?

एखादा दुकानदार किंवा व्यावसायिक वर्तमानपत्रात अथवा छापील कागदांमध्ये समोसा किंवा इतर खाद्यपदार्थ ठेवून विकत असल्यास नागरिक याविषयी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवू शकतात.

FSSAI चे अधिकृत संकेतस्थळ:www.fssai.gov.in वर तक्रार नोंदवता येऊ शकते.

अन्न सुरक्षा तक्रार पोर्टल (FoSCoS):foscos.fssai.gov.in/consumergrievance

मोबाईल ॲप: तक्रारीचा थेट फोटो पाठवण्यासाठी आणि तक्रारीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवर उपलब्ध असलेल्या ॲपचा वापर करता येईल.

टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक: 1800-11-2100 (ही सेवा 24 तास उपलब्ध असते).

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूचे प्रकाशन)