मद्यपान, नाईटक्लबमधील गोंधळामुळे इंग्लंड क्रिकेट विश्वात वादळ; बेन स्टोक्स आणि टीमला हे प्रकरण भोवणार का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, स्टीफन शेमिल्ट
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
इंग्लंड क्रिकेट संघासमोर एक नवीन अडचण उभी राहिली आहे.
ॲशेस मालिकेत 4-1 असा पराभव झाल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील विजय इंग्लंडसाठी दिलासादायक मानला जात होता.
पण इंग्लंडचे खेळाडू पुन्हा एकदा मद्यपानाशी संबंधित वादात अडकल्याचे दिसत आहेत.
गेल्या 9 महिन्यांत इंग्लंड संघातील किमान 6 खेळाडू मद्यपानाशी संबंधित वादात अडकले आहेत.
हॅरी ब्रूक वेलिंग्टनमध्ये बाउन्सरशी भिडला होता. त्यावेळी जेकब बेथेल आणि जोश टंग हेही त्याच्यासोबत होते.
नुसा येथील एका व्यक्तीने बेन डकेटचा मद्यधुंद अवस्थेतील व्हीडिओ रेकॉर्ड केला होता. ती क्लिप प्रचंड व्हायरल झाली होती.
आता कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस ॲटकिन्सन सोमवारी (8 जून) सकाळी लंडनमधील एका नाईटक्लबमध्ये सारासेन्स अकादमीच्या एका खेळाडूसोबत अशाच एका घटनेत सहभागी असल्याचे समोर आले आहे.
या घटनेनंतर, इंग्लंडच्या संघात नशेची किंवा अंमली पदार्थांच्या सेवनाची संस्कृती नाही असा दावा करणे त्यांच्यासाठी अधिकाधिक कठीण होत चालले आहे. या ताज्या घटनेनंतर असं स्पष्टपणे सांगता येणार नाही.
ऑस्ट्रेलियाच्या कठीण दौऱ्यात बेन स्टोक्स या वादापासून दूर राहिला. त्यावेळी त्यानं कर्णधार म्हणून तो त्याच्यासाठी सर्वात कठीण काळ होता, असं म्हटलं होतं.
परंतु, ताज्या वादात स्टोक्सचा सहभाग असल्यामुळे हे प्रकरण जास्तच गंभीर झाले आहे. ॲशेस मालिकेदरम्यान मद्यपानाशी संबंधित बातम्या समोर आल्या होत्या, त्यानंतर मालिकेदरम्यान संघासाठी मद्यपानावर एक प्रकारची बंदी घालण्यात आली होती.
पण हा नियम पहिल्या सामन्यानंतरच मोडला गेला. बेन स्टोक्स एक नेता म्हणून आदर्श निर्माण करण्यात अपयशी ठरला आहे.
आता यावर चर्चा होईल की, व्यावसायिक खेळाडूंना कर्फ्यू मध्ये ठेवावं का? आणि ठेवलं तर मोठ्या कसोटी सामन्यातील विजयानंतर त्यात सूट किंवा शिथिलता द्यावी का, हा प्रश्नही निर्माण होतो.
पण या चर्चांनंतरही 35 वर्षांचा बेन स्टोक्स सध्या एका नवीन अडचणीत सापडला आहे.
जुना इतिहास
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने (ईसीबी) सार्वजनिकपणे मान्य केलं आहे की, नियमांचं (प्रोटोकॉल) उल्लंघन झाले आहे. त्यांनी आपल्या निवेदनात 'सोमवारच्या सकाळ'च्या घटनांचा उल्लेख करत स्टोक्स आणि ॲटकिन्सन यांना थेट जबाबदार धरलं आहे.
आता पुढे काय होईल, यावरूनच स्टोक्सचं कर्णधार म्हणून आणि कदाचित आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून भवितव्य ठरेल.
सारासेन्सचा 21 वर्षीय फॉरवर्ड टोटोआ अउवा आणि स्टोक्स आमनेसामने आले होते. इंग्लंडचे क्रिकेटपटू आणि सारासेन्सचे खेळाडू अनेकदा एकाच वर्तुळात वावरत असतात. सारासेन्सचे काही खेळाडू लॉर्ड्सवरही उपस्थित होते. सारासेन्स हा इंग्लंडमधील एक व्यावसायिक रग्बी युनियन क्लब आहे.
पण ही घटना नेमकी कशी घडली हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. या घटनेत इंग्लंडच्या सुरक्षा पथकातील एक गार्ड जखमी झाला आणि त्याला उपचारांची गरज पडली. त्यानं मद्यपान केलेलं नव्हतं.

फोटो स्रोत, Getty Images
जर त्या घटनेच्या वेळी स्टोक्स आणि ॲटकिन्सन केवळ तिथे उपस्थित असतील, तर हा गुन्हा किती गंभीर मानायचे हे ईसीबीवर अवलंबून असेल.
पण इंग्लंड संघाच्या सध्याच्या स्थितीचा विचार करता, बेन स्टोक्सची त्या ठिकाणी उपस्थिती हीच कर्णधार बदलण्याच्या चर्चेसाठी पुरेशी ठरली आहे.
स्टोक्सचा याआधीचा इतिहासही असाच आहे. 2013 मध्ये इंग्लंड लायन्सच्या दौऱ्यावेळी अतिमद्यपान केल्यामुळे त्याला घरी पाठवण्यात आलं होतं.
2017 मध्ये ब्रिस्टल नाईटक्लबबाहेर घडलेल्या घटनेमुळे त्याचं इंग्लंडमधील करिअर जवळपास संपण्याच्या स्थितीत आलं होतं. त्याच्यावर मारहाणीचा आरोप होता, पण नंतर त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
तो सामान्य लोकांचं संरक्षण करत होता, असं त्याने सांगितलं होतं. नंतर त्याने म्हटलं की, या घटनेचा त्याच्या मानसिक आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम झाला.
गेल्या वर्षाच्या सुरुवातीला स्टोक्सने हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून बरं होण्यासाठी मद्यपान सोडल्याचे सांगितलं होतं. त्याने एका अल्कोहोल-फ्री ड्रिंक ब्रँडमध्ये गुंतवणूकही केली होती.
परंतु, रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर लगेच तो पुन्हा मद्यपानासाठी उत्सुक झाल्याचं दिसून आला.
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत स्टोक्स म्हणाला की, "जोपर्यंत मी सहकाऱ्यांसोबत बिअर शेअर करत नाही, तोपर्यंत मला खरोखर आनंद मिळणार नाही."
क्रिकेट आणि मद्यपान यांचा संबंध
कदाचित स्टोक्स हा क्रिकेट आणि मद्यपान यांच्यातील गुंतागुंतीच्या नात्याचं एक छोटं उदाहरण आहे.
2005 च्या ॲशेस विजयानंतर अँड्रयू फ्लिंटॉफने मद्यपान केलेल्या घटनेचा इंग्लंडच्या क्रीडाविश्वातील प्रसिद्ध किस्स्यांमध्ये समावेश आहे.
अलीकडेच ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी सांगितलं होतं की, ट्रॅव्हिस हेडने मागील ॲशेस मालिकेमध्ये मैदानावर जितका आनंद घेतला, तितकाच मैदानाबाहेरही घेतला होता.

फोटो स्रोत, Getty Images
बहुतांश आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू तरुण असतात आणि ते अनेक महिने घरापासून दूर राहतात. दीर्घ दौऱ्यांचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम चांगल्या प्रकारे नोंदवला गेला आहे.
पण या सगळ्यांनंतरही दीर्घकाळच्या दौऱ्यांमध्ये क्रिकेटपासून थोडा आराम घेण्यासाठी इतरही अनेक मार्ग आहेत आणि त्यासाठी पबला जाण्याची गरज नसते. अनेक क्रिकेटपटू अजिबात मद्यपान करत नाहीत. तसेच इतर अनेक खेळांतील व्यावसायिक खेळाडूही कधीच मद्यपान करत नाहीत.
उच्च कामगिरीच्या (हाय-परफॉर्मन्स) दृष्टीने पाहिल्यास, रात्री उशिरा मद्यपान करणे हे पुढच्या आठवड्यात ओव्हलमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी तंदुरुस्त राहण्याचा योग्य मार्ग नाही.
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने अलीकडेच सांगितलं की, 2023 ची जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर मद्यपान केल्यामुळे त्याच्या पिंडरीच्या दुखापतीत वाढ झाली. त्यामुळे तो तीन आठवड्यांनी ॲशेसमधील दुसऱ्या कसोटीत जखमी झाला.
या प्रश्नांची उत्तरं कुठे आहेत?
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीला फार वेळ उरलेला नाही. संघाची घोषणा होणार असून स्टोक्स आणि ॲटकिन्सन यांचा त्यात समावेश नसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
ॲटकिन्सनने लॉर्ड्समध्ये 7 विकेट घेतल्या होत्या. कठीण ॲशेस मालिकेनंतर त्याचं उत्कृष्ट पुनरागमन होतं. त्याची संघात निवड झाली नाही तर त्याच्यासाठी हा वैयक्तिक मोठा धक्का असेल.
परंतु, इंग्लंडकडे वेगवान गोलंदाजांमध्ये चांगले पर्याय उपलब्ध आहेत. जोफ्रा आर्चर पुनरागमन करू शकतो.
नियमांचं उल्लंघन झालं आहे हे ईसीबीने मान्य केलं आहे. आणि स्टोक्सच्या उपस्थितीमुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. पण आता प्रश्न असा आहे की, कर्णधारपद कोणाला द्यायचं?
इंग्लंड खरोखरच ब्रूकला कर्णधारपद देऊ शकतं का? एका कर्णधाराला नाईटक्लब वादामुळे बाहेर जावं लागेल आणि त्याचा पर्याय स्वतः काही महिन्यांपूर्वी नाईटक्लब वादात अडकला होता, हे कसं शक्य आहे?
याच द्विधा मनस्थितीचा सामना प्रशिक्षक मॅक्युलम, रॉब की, ईसीबीचे मुख्य कार्यकारी रिचर्ड गोल्ड आणि अध्यक्ष रिचर्ड थॉम्पसन करत आहेत. या ताज्या वादामुळे इंग्लंड संघाची संपूर्ण व्यवस्था हादरून गेली आहे.
'ॲशेस' नंतर ईसीबीने मैदानावरील आणि मैदानाबाहेरील कामगिरीचा आढावा घेतला होता आणि व्यवस्थापन रचनेत बदल करण्याची गरज नाही असं ठरवलं होतं. परंतु, पहिल्याच कसोटी सामन्यानंतर ते अडचणीत आले आणि त्यांच्या निर्णयांवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अधिकाराच्या रचनेत स्टोक्सपेक्षा वरच्या स्थानावर असलेल्या सर्वांना असं म्हणण्याचा अधिकार आहे की, स्टोक्सने त्यांची निराशा केली. पण त्यांनाही जबाबदारी घ्यावी लागेल, कारण त्यांनी असं वातावरण तयार केलं की स्टोक्सला नियम मोडणे योग्य वाटलं.
मॅक्युलम यांनी त्यांच्या व्यवस्थेला 'अनौपचारिक' असं म्हटलं होतं. आता कदाचित त्यांना त्याच अनौपचारिकतेचा पश्चात्ताप होत असावा.

फोटो स्रोत, Getty Images
काही प्रश्नांची उत्तरं अजून मिळायची बाकी आहेत.
- लंडनमधील 'ती' रात्र स्टोक्सकडून इंग्लंडचं कर्णधारपद काढून घेण्यासाठी पुरेशी आहे का?
- परिस्थिती आता आपल्यासाठी अनुकूल राहिलेली नाही, याची जाणीव स्टोक्सला होईल का?
- 'आता पुरे झालं' हे ईसीबी मान्य करेल का आणि कोणताही खेळाडू- अगदी बेन स्टोक्ससुद्धा- संघाच्या व खेळाच्या प्रतिष्ठेपेक्षा मोठा नाही, हे कबूल करेल का?
- किंवा, इंग्लंडची जर्सी परिधान करणाऱ्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एकाला केवळ 'चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी' असण्याच्या कारणास्तव वगळणे योग्य नाही, हे मान्य करायचं का.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



























