'पेट्रोल-डिझेल कमी वापरा, सोने खरेदी टाळा', पंतप्रधान मोदींनी नागरिकांना असे आवाहन का केले?

फोटो स्रोत, ANI
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील एका सभेत बोलताना नागरिकांना परकीय चलन वाचवण्यासाठी काही पावलं उचलण्याचं आवाहन केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाचा दौरा केला. त्यावेळी सिकंदराबादमधील जाहीर सभेत बोलताना त्यांनी नागरिकांना आवाहन केलं.
यासाठी काय करायला हवं याचे काही मार्गही मोदी यांनी नागरिकांना सांगितले.
पेट्रोल डिझेलचा संयमानं वापर करावा, वर्क फ्रॉम होम, यासह वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आणि स्वयंपाकाचे तेल कमी वापरण्याचे आवाहनही मोदींनी केले.
काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याऐवजी पंतप्रधान मोदी जनतेला आवाहन करत असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "पुरवठा साखळीच्या संकटाच्या काळात गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या शेजारी एक मोठं युद्ध सुरू आहे. याचा परिणाम संपूर्ण जगावर झाला असून भारताला तर अधिकच गंभीर फटका बसला आहे."
"भारताकडे तेलाच्या मोठ्या विहिरी नाहीत. आपल्याला आवश्यक असलेलं पेट्रोल, डिझेल आणि गॅस हे सर्व इतर देशांकडून मोठ्या प्रमाणात आयात करावं लागतं. युद्धामुळं जगभरात पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खतांच्या किमती लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत. त्या गगनाला भिडल्या आहेत. शेजारील देशांमध्ये काय घडत आहे, हे वर्तमानपत्रांमध्ये येत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून भारत सरकार देशवासियांना या संकटातून वाचवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे. नागरिकांवर भार पडू नये, यासाठी सरकार संपूर्ण भार स्वतःच्या खांद्यावर घेत आहे," असंही मोदी म्हणाले.
'पेट्रोल, डिझेल आणि खाद्यतेलाचा वापर कमी करा'
युद्धामुळं संपूर्ण जगात पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खतांचे दर आकाशाला भिडले आहेत.
पुरवठा साखळीवरचं संकट कमी होत नसेल तर कितीही उपाय केले तरी समस्या वाढतात. त्यामुळं देशाला सर्वोच्च मानत आपल्याला एक होऊन लढावं लागेल. देशासाठी मरणंच देशभक्ती नसते. देशासाठी जगणं आणि देशासाठी कर्तव्य पार पाडणं ही देखील देशभक्ती असते, असं पंतप्रधान म्हणाले.
"आपल्याला पेट्रोल डिझेलचा वापर कमी करावा लागेल. शहरांमध्ये मेट्रो असेल तिथं मेट्रोचाच वापर करू असं ठरवावं. कारमध्ये जाणं गरजेचंच असेल तर कारपुल सारख्या पद्धती अवलंबाव्या. कारमध्ये आपल्याबरोबर इतरांनाही घेऊन जा.
कुठे सामान पाठवायचं असेल तर ते रेल्वेच्या माध्यमातून पाठवण्याचा प्रयत्न करावा. इलेक्ट्रिक वाहनं असतील तर त्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न करा," असे पर्यात नरेंद्र मोदींनी सुचवले.

फोटो स्रोत, ANI
कोरोनाच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन मिटींग असे अनेक पर्याय तयार केले. त्याची आपल्याला सवयही झाली. आज त्यांचा वापर करणं ही काळाजी गरज बनली आहे. त्यानं देशाला फायदा होईल, असं मोदींनी म्हटलं.
"खाद्यतेलाच्या बाबतीतही हेच आहे. त्याच्या आयातीसाठी मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च करावं लागतं. प्रत्येक जेवणात वापरल्या जाणाऱ्या तेलाचे प्रमाण कमी करणे हेदेखील एक देशभक्तीचे कृत्य आहे.
यामुळं देशाती आणि शरीराची सेवा होईल. यामुळे देशाच्या तिजोरीचे आणि कुटुंबीयांच्या आरोग्यात सुधारणा होईल," असंही पंतप्रधान म्हणाले.
काँग्रेसची टीका
काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
इराण-अमेरिका युद्धाला तीन महिने उलटले आहेत, पण भारताची ऊर्जा सुरक्षा कशी सुनिश्चित करायची हे पंतप्रधान मोदींना अजूनही कळलेले नाही, असं ते म्हणाले.
"या जागतिक संकटातून देशाच्या अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी आपत्कालीन योजना तयार करण्याऐवजी पंतप्रधान सामान्य नागरिकांना अडचणीत आणत आहेत, ही लज्जास्पद, बेजबाबदार आणि पूर्णपणे अनैतिक गोष्ट आहे," असं वेणुगोपाल यांनी 'एक्स'वर लिहिलं.
जेव्हा निवडणुका आणि क्षुद्र राजकारण यालाच पंतप्रधानांचं प्राधान्य असतं, तेव्हा त्याचा परिणाम म्हणजे अटळ आर्थिक संकट आहे.
पंतप्रधान आणि सरकारनं आपल्याकडे पुरेसा इंधनसाठा असेल आणि त्यांच्या खराब नियोजनामुळे कोणत्याही नागरिकाला त्रास होणार नाही, हे सुनिश्चित करावं, असंही त्यांनी म्हटलं.
सोन्याबद्दल काय म्हणाले पंतप्रधान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सोन्याच्या खरेदीबाबतही नागरिकांना आवाहन केलं.
परकीय चलन वाचवण्याबाबत ज्या काही उपाययोजना करता येतील त्या कराव्या लागतील, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
"सोन्याची खरेदी हा एक असा पैलू आहे, ज्यामुळं मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च होतं. एक काळ असा होता जेव्हा संकटाच्या काळात लोक देशाच्या हितासाठी सोन्याचे दान करत असत.
आज दानाची गरज नाही, परंतु देशाच्या हितासाठी आपल्याला वर्षभर आपण सोन्याचे दागिने खरेदी करणार नाही, असा निर्णय घ्यावा लागेल," असं मोदी म्हणाले.
आम्ही सोने खरेदी करणार नाही. आमची देशभक्ती आम्हाला परकीय चलन वाचवण्याचं आव्हान देत आहे आणि आम्हाला ते स्वीकारून परकीय चलन वाचवावे लागेल, असं त्यांनी म्हटलं.
सोन्याचा भाव का वाढत आहे?
अमेरिका आणि इस्रायल यांच्यात इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, शेअर बाजारापासून ते कच्चे तेल, सोने-चांदी आणि रुपयापर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये प्रचंड अस्थिरता दिसून येत आहे.
सोन्याच्या किमतीत 2025 मध्येच ऐतिहासिक वाढ दिसून आली. तेव्हा सोन्याच्या किमतीत 60 टक्क्यांहून अधिक वाढ झाली.
सोन्याच्या किमती वाढण्यामागे अनेक कारणे आहेत, पण ती सर्व एकमेकांशी जोडलेली आहेत.
अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षांसारख्या भू-राजकीय तणावांमुळे जागतिक अस्थिरता वाढत आहे.
गुंतवणूकदार जोखीम पत्करण्याऐवजी अधिकाधिक पारंपरिक मालमत्तांमध्ये गुंतवणूक करत आहेत. भू-राजकीय तणावांमुळे डॉलरचा वापरही कमी होत आहे आणि सोन्यावरील अवलंबित्व वाढत आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे शेअर बाजारात अनेक धक्के बसले आहेत. परिणामी, गुंतवणूकदार आता सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करत आहेत.
अमेरिकेने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतर सोन्याच्या किमती वाढल्या.
मध्यवर्ती बँकांकडून होणारी मोठ्या प्रमाणातील खरेदी हे सोन्याच्या दरवाढीमागील सर्वात मोठ्या कारणांपैकी एक आहे.
अमेरिकन डॉलरचे वर्चस्व कमी होत असल्यामुळे चीन, पोलंड, तुर्की, भारत, कझाकस्तान इत्यादी देशांच्या मध्यवर्ती बँका राखीव मालमत्ता म्हणून सोन्याचा वापर वाढत्या प्रमाणात करत आहेत.
याचा परिणाम सोन्याच्या किमतींवरही झाला आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन


























