तृणमूलचे 20 बंडखोर खासदार ज्या 'नॅशनॅलिस्ट सिटिझन पार्टी'त विलीन होत आहेत, त्या पक्षाबद्दल जाणून घ्या

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आहे.

या भेटीनंतर टीएमसीच्या खासदारांनी आपला गट नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियामध्ये (एनसीपीआय) मध्ये विलीन करणार असल्याची घोषणा केली आहे.

काकोली घोष दस्तीदार यांनी ओम बिरला यांच्याशी भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, "आम्ही अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसमधून निवडून आलेले खासदार होतो. आम्ही लोकसभा स्पीकर यांना आपल्या नाराजीबद्दल सांगितलं."

दस्तीदार यांनी पुढे सांगितलं की, "आम्ही सभागृहात स्वतंत्रपणे बसण्याची व्यवस्था असावी अशी मागणी केली आहे आणि आम्ही नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करत आहोत. आमच्यासोबत 20 खासदार आहेत. ही संख्या तृणमूलच्या एकूण 28 खासदारांच्या एक-तृतीयांशहून अधिक आहे. आम्ही तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडून एनडीएसोबत काम करू."

त्यांच्या या वक्तव्यानंतर, अनेकजण नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टीबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत. हा कोणता पक्ष आहे आणि याची राजकीय ताकद किती आहे, ज्यामुळे टीएमसीचे 20 खासदार या पक्षात विलीनीकरण करण्याबद्दल बोलत आहेत.

तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते नीलांजन दास यांनी पक्षातील बंडखोर नेत्यांवर टीका करत एक्सवर लिहिलं, "या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (एनसीपीआय)च्या राष्ट्रीय अध्यक्ष सिउली कुंडू आहेत. त्या आता तृणमूल काँग्रेसच्या पक्षांतर करणाऱ्या 20 जणांच्या नव्या नेत्या आहेत."

त्यांनी पुढे लिहिलं आहे, "जे लोक ट्विन फ्लॉवर्स या निवडणूक चिन्हावर (टीएमसी) जिंकून आले होते, ते आता अशा पक्षात आश्रय घेत आहेत, ज्याच्याबद्दल बंगालनं कधीही ऐकलं नव्हतं. काकोली घोष दस्तीदार यांनी लोकसभा अध्यक्षांकडे एनसीपीआय (एनडीएचा घटक पक्ष) म्हणून मान्यता देण्याची मागणी करत दावा केला की त्यांच्यासोबत टीएमसीच्या संसदीय पक्षाचे 2/3 सदस्य आहेत."

नीलांजन दास यांच्यानुसार, "आतापर्यंत टीएमसीच्या कोणत्याही कार्यकर्त्यानं सार्वजनिकरीत्या या पक्षात सामील होण्याबाबत कोणताही रस दाखवलेला नाही. एनसीपीआयची पश्चिम बंगालमध्ये कोणतीही संघटना नाही आणि फेसबुकवर त्यांचे 72 फॉलोअर्स आहेत."

बीबीसी बांग्लाच्या प्रतिनिधी प्रचेता पांजा यांच्याशी बोलताना सिउली कुंडू यांनी म्हटलं की, त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे आणि पक्षाशी निगडीत अलीकडच्या घटनाक्रमाशी त्यांचा कसलाही संबंध नाहीये.

या पक्षाच्या मुख्य कार्यालयाची काय आहे स्थिती?

पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील हटगाछा गावातील एका दुर्गम ठिकाणी, जून महिन्यातील एका रणरणत्या दुपारी, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे जवान, राज्य पोलीस अधिकारी आणि स्थानिक पत्रकार यांचा समावेश असलेला एक गट पोहोचला.

या दुमजली मालमत्तेची देखभाल करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या दोन महिलांनी प्रसारमाध्यमांच्या नजरेपासून वाचण्यासाठी स्वतःला आत कोंडून घेतलं.

अगदी आदल्या रात्रीपर्यंत, बागेनं वेढलेली ही साधीशी वास्तू केवळ 'जागो बिस्वा' या फारसं परिचित नसलेल्या एका बंगाली वर्तमानपत्राचं आणि 'अनऑर्गनाइज्ड वुमन वर्कर्स असोसिएशन' (असंघटित महिला कामगार संघटना) या सामाजिक संस्थेचं कार्यालय होती.

या वास्तूच्या समोरील अंगणामध्ये 'प्रेस' असं लिहिलेलं एक वाहन उभं होतं.

एका रात्रीत ही रहस्यमय वास्तू राजकीय कुतूहल आणि जिज्ञासेचा केंद्रबिंदू बनली. कारण ती 'नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया'चे (NCPI) नोंदणीकृत मुख्यालय असल्याचं निष्पन्न झालं. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाल्यानंतर, नवीन राजकीय ओळख शोधणाऱ्या तृणमूलच्या 20 बंडखोर खासदारांसाठी हे ठिकाण आता नवं राजकीय केंद्र बनलं आहे.

एका रात्रीत, 'एनसीपीआय' (NCPI) हा लोकसभेत 20 सदस्य असलेला पक्ष झाल्याचा दावा करत आहे. जानेवारी 2023 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाकडे 'नोंदणीकृत परंतु अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष' (RUPP) म्हणून नोंदणी झाल्यापासून, संसदेत किंवा कोणत्याही राज्याच्या विधानसभेत या पक्षाचा एकही सदस्य नव्हता.

या राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून शिउली कुंडू, सरचिटणीस सैकत दास आणि खजिनदार म्हणून सुदाम जेट्टी यांची नोंद आहे.

तीन वर्षांपूर्वी, त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत या पक्षाने कैलासहर, अंबासा आणि चावमानू या तीन जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यांनी सात किरणांनी वेढलेल्या 'पेनच्या निब'चे चिन्ह वापरून निवडणूक लढवली होती. या तिन्ही मतदारसंघांत एनसीपीआयला (NCPI) पराभवाचा सामना करावा लागला.

या पक्षाच्या 2023 च्या निवडणूक पोस्टर्सच्या वरच्या भागात लिहिलेलं होतं की, "तुमच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी, पक्ष बदलणाऱ्यांपासून दूर राहा."

ही गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी आहे.

तृणमूलचे नेते एनसीपीआयमध्ये (NCPI) सामील होत असल्याची घोषणा दिल्लीत झाल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद हजारो किलोमीटर दूरवर उमटत असतानाच, एनसीपीआयचे मुख्यालय मात्र शांत दिसत होतं.

घरापुढील बाग उन्हाळी फुले आणि फणसाच्या फळांनी बहरलेली होती. मर्यादित राजकीय हालचाली असूनही, या मुख्यालयाची नियमितपणे देखभाल केली जात असल्याचं दिसून येतं.

पक्षाच्या प्रमुख आणि अध्यक्षा शिउली कुंडू या कलकत्ता उच्च न्यायालयात वकिली करतात. पक्षाचे उपाध्यक्ष उत्तिया कुंडू हे गणित विषयाचे शिक्षक, प्रेरणादायी वक्ते आणि 'जागो बिस्वा'चे संपादक आहेत. मंगळवारी हे दोघेही पक्षाच्या कार्यालयात उपस्थित नव्हते.

दोन्ही व्यक्तींची नावे, शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक कामाविषयीचा तपशील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठ्या अक्षरांमध्ये प्रदर्शित करण्यात आल्याचं दिसून आलं.

मंगळवारी कोलकाता उच्च न्यायालयाच्या परिसरात स्थानिक वृत्तवाहिनी 'एबीपी आनंद'शी बोलताना शिउली कुंडू म्हणाल्या, "आम्ही 2022 मध्ये पक्षाची नोंदणी केली आणि त्यानंतर त्रिपुराच्या निवडणुका लढवल्या. आमचे नोंदणीकृत कार्यालय हावडा येथे होते आणि आम्ही एनडीएशी (NDA) युती केली होती. अलीकडील घडामोडींमुळे आम्हाला आनंद होत आहे; पक्षाला ओळख मिळत असून तो एका महत्त्वपूर्ण टप्प्याकडे वाटचाल करत आहे."

निवडणूक आयोगाच्या ऑडिट रिपोर्टमध्ये काय?

पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या ऑडिट रिपोर्टमध्ये एनसीपीआयबद्दल थोडी माहिती मिळते.

पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या 2022-23 च्या आर्थिक वर्षासाठीच्या अहवालानुसार, या पक्षाला नऊ देणगीदारांकडून पार्टी फंडात पैसे मिळाले. ही एकूण रक्कम एक लाख रुपयांहून थोडी अधिक आहे.

तर 2023-24 च्या अहवालानुसार, एनसीपीआयनं त्या वर्षी मिळालेल्या देणग्या, त्यांचा वार्षिक ऑडिट रिपोर्ट आणि निवडणूक खर्चाबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

तर 2024-25 या वर्षासाठीच्या पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या वार्षिक अहवालात एनसीपीआयच्या नावाचासुद्धा उल्लेख नाही.

(कोलकात्याहून मयुरी सोम यांच्या इनपुटसह)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)