200 वर्षांपूर्वी नकळत लागला होता 'आगपेटी'चा शोध; जबरदस्त शोध घेणाऱ्या अज्ञात संशोधकाची कहाणी

200 वर्षांपूर्वी नकळत लागला होता, 'आगपेटी'चा शोध, एका अज्ञात शोधकाची कहाणी

फोटो स्रोत, Alan Middleton and the British Matchbox Label and Bookmatch Society

फोटो कॅप्शन, आगपेटीचा शोध लावणारे वॉकर यांचं कोणतंही प्रमाणित चित्र नसल्यामुळे ब्रिटिश मॅचबॉक्स लेबल अँड बुकमॅच सोसायटीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे त्यांचा फोटो विकसित केला आहे
    • Author, स्वामीनाथन नटराजन
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

आजपासून बरोबर 200 वर्षांपूर्वी म्हणजे 1826 साली नकळत घडलेल्या एका घटनेमुळे मानवजातीचा मोठा फायदा झाला. त्यामुळे आग तयार करण्याची आणि दिवे लावण्याची किंवा प्रकाश निर्माण करण्याची पद्धत कायमची बदलली.

त्याचं झालं असं की जॉन वॉकर नावाचा एक प्रयोगशील मात्र अनामिक फार्मासिस्ट त्याच्या प्रयोगशाळेत रसायनांवर काम करत होता. तो वेगवेगळी रसायन मिसळत होता. त्याचवेळेस नकळत त्याच्या हातातून एक जबरदस्त शोध लागला.

ही घटना अतिशय ऐतिहासिक स्वरुपाची होती. या शोधामुळे आग तयार करणं किंवा आगीचा वापर करणं मानवासाठी सोपं झालं.

जॉन वॉकर हे इंग्लंडमधील एक प्रयोगशील फार्मासिस्ट होते. ते त्यावेळेस स्फोटकं बनवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यासाठी ते वेगवेगळ्या रसायनांचं मिश्रण तयार करत होते.

त्याचवेळेस लाकडाला लागलेलं एक मिश्रण चुकून त्यांच्या फायरप्लेसच्या (शेकोटीसाठी केलेली व्यवस्था) दगडांवर घासलं गेलं आणि त्यानं अचानक पेट घेतला.

वाफेच्या इंजिनाला वॉकर यांच्या आगपेटीनं कशी दिली गती?

फोटो स्रोत, Stockton Borough Council

फोटो कॅप्शन, 29 मे रोजी स्कॉकटनमध्ये आगपेटीचा शोध लागल्याला 200 वर्षे झाल्याचा जल्लोष सुरू झाला, तो वॉकर यांचा जन्मदिवस आहे

त्यानंतर 1827 मध्ये आगपेटीचा व्यावसायिक वापर सुरू झाला.

वाफेच्या इंजिनाला वॉकर यांच्या आगपेटीनं कशी दिली गती?

जॉन वॉकर यांचा जन्म 1781 साली ब्रिटनच्या डरहममधील स्कॉकटन-ऑन-टीज या बंदर असलेल्या शहरात झाला होता.

त्यावेळेस औद्योगिक क्रांती शिखरावर पोहोचलेली होती. या क्रांतीचा प्रमुख आधार होतं जेम्स वॅट यांचं वाफेचं इंजिन. नंतर वॉकर यांच्या आगपेटीच्या शोधानं इंजिनमध्ये आग पेटती ठेवण्याचं काम सोपं केलं.

जेम्स वॅट यांच्या वाफेच्या इंजिनाच्या व्यावसायिक वापराबद्दल बोलायाचं तर, त्याची सुरुवात 1776 मध्ये झाली होती. मात्र त्याचा वापर करून तयार करण्यात आलेली सार्वजनिक रेल्वे वॉकर यांच्या स्कॉकटन शहरात पोहोचण्यासाठी 49 वर्षे लागली. म्हणजेच ती 1825 मध्ये स्कॉकटन शहरात आली.

वाफेच्या इंजिनाला वॉकर यांच्या आगपेटीनं कशी दिली गती?

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतर 4 वर्षांनी 1829 मध्ये जॉर्ज स्टीफन्सन यांनी वाफेच्या इंजिनाचा वापर करून एक लोकोमोटिव्ह (इंजिन) रॉकेट तयार केलं. त्यातून हे सिद्ध झालं की, वाफेचं इंजिन ताशी 50 किमी वेगानं प्रवासी ट्रेन ओढू शकतं.

अशाप्रकारे प्रवास करणं सोपं झालं. जो प्रवास करायला घोड्यांचा वापर करून 12 दिवस लागत होते, तोच प्रवास आता फक्त 8 तासांमध्ये होऊ लागला.

मात्र अजूनही वाफेचं इंजिन चालवण्यासाठी आग पेटवणं हे कठीण काम होतं. लोक आग पेटवण्यासाठी चकमकीचा दगड आणि पोलाद वापरत असत किंवा कोळसे, निखारे सतत पेटते ठेवत असत. मात्र वॉकर यांच्याकडून अचानक लागलेल्या शोधामुळे आगीचं उत्पादन, वापर आणि सहजपणे नेण्याची क्षमता औद्योगिक क्रांतीला मिळाली आणि ही परिस्थिती बदलली.

वॉकर यांनी कशी तयार केली आगपेटी?

आगपेटीचा शोध लावणारे जॉन वॉकर एक प्रशिक्षित सर्जन होते. मात्र 18 व्या शतकाच्या रक्तरंजित काळात त्यांनी त्यांचा व्यवसाय बदलला. ते सर्जनचे औषध विक्रेते झाले.

ॲलन मिडलटन या लेखकानं 'अ टेल ऑफ होप अँड डिस्पेयर: नॉर्थ ऑफ इंग्लंड मॅच कंपनी, वेस्ट हार्टलपूल (1932–1954)' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी जॉन वॉकर यांचा उल्लेख केला आहे.

वॉकर यांनी कशी तयार केली आगपेटी?

फोटो स्रोत, Preston Park Museum

फोटो कॅप्शन, वॉकर यांनी त्यांच्या प्रयोगांसाठी अशाप्रकारच्या तराजूचा वापर केला होता, असं मानलं जातं

त्यानुसार, 1826 मध्ये वॉकर त्यांचा बहुतांश वेळ माणसांबरोबरच घोडे, गुरं-ढोरं आणि इतकंच काय कोंबड्यांसाठीदेखील औषधं बनवण्यात घालवत होते. त्याचबरोबर ते रसायनांवर प्रयोगदेखील करत होते.

ॲलन मिडलटन म्हणतात, "वॉकर एक बुद्धिमान आणि खूपच दयाळू व्यक्ती होते. काहीजण त्यांना एक वेगळ्याच प्रकारचा माणूसदेखील मानतात. त्यांना रसायनशास्त्राची विशेष आवड होती."

"ते त्यांच्या शेतकरी मित्रांसाठी परकशन कॅप (बंदूक चालवण्याचं उपकरण) तयार करण्यासाठी रसायनांचं मिश्रण करायचे."

एक दिवस ते एक मिश्रण तयार करत होते. त्यांनी ते सुकण्यासाठी ठेवून दिलं.

"ते मिश्रण सुकल्यानंतर, त्यांनी त्याला एक लाकडाच्या तुकड्यावर रगडलं आणि त्यानं पेट घेतला."

ते म्हणतात, "तो एक अद्भूत क्षण होता. असं यापूर्वी कोणीही केलं नव्हतं."

आगपेटीची विक्री करण्यास सुरुवात, मात्र पेटंट घेतलं नाही

मिडलटन यांनी असंही लिहिलं आहे की, याप्रकारे आग पेटवण्याच्या शोधाची व्यावसायिक क्षमता 1826 च्या सुमारास वॉकर यांच्या लक्षात आली. मात्र त्याची नेमकी तारीख अज्ञात आहे. मग एप्रिल-1827 मध्ये आगपेटीची पहिल्यांदा विक्री सुरू झाली.

लेखानुसार, "वॉकर यांनी याला 'फ्रिक्शन मॅच' असं नाव दिलं. सुरुवातीला याची विक्री टिनमध्ये शेकडोंच्या संख्येनं केली जात असे."

आगपेटीची विक्री करण्यास सुरुवात मात्र पेटंट घेतलं नाही

फोटो स्रोत, Preston Park Museum

फोटो कॅप्शन, स्टॉकटनमधील प्रेस्टन पार्क म्युझियममध्ये वॉकर यांच्या फ्रिक्शन लाईट्सशी मिळत्या-जुळत्या आगपेटी ठेवलेल्या आहेत

वॉकर यांच्या 'फ्रिक्शन लाइट्स' पातळ लाकडी काड्या होत्या. त्यांचं एक टोक पोटॅशियम क्लोरेट, अँटीमनी सल्फाईड, अरबी डिंक आणि पाण्याच्या मिश्रणात बुडवलेलं असायचं. त्यांना जेव्हा सँडपेपरवर घासलं जायचं, तेव्हा त्या पेट घ्यायच्या.

वॉकर यांनी त्यांचा हा फॉर्म्युला गुप्त ठेवला होता. मात्र त्यांनी त्याचं पेटंट घेतलं नव्हतं. त्यांनी शोधलेलं हे उत्पादन म्हणजे आगपेटी स्वस्त होती. त्यांच्या स्टॉकटन शहरातील याची मागणी पूर्ण करण्यास ते सक्षम होते.

अर्थात, फार्मास्युटिकल जर्नलनुसार, "वॉकर यांची आगपेटी काही खूप चांगली नव्हती. पेटलेला सल्फर कधी-कधी लाकडी काडीवरून पडून जायचा. त्यामुळे आगपेटी पेटवणाऱ्या व्यक्तीच्या कपडे किंवा फरशीचं नुकसान होण्याचा धोका असायचा."

वॉकर यांच्या आगपेटीची नक्कल

लंडनमधील सॅम्युअल जोन्स यांनी 1829 पर्यंत 'लूसिफर्स' नावानं आगपेटी बाजारात आणली. वॉकर यांच्या 'फ्रिक्शन लाईट्स'ची ती हुबेहुब नक्कल होती. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात उत्पादन होणारी ती पहिली आगपेटी होती.

'ब्रिटिश मॅचबॉक्स लेबल अँड बुकमॅच सोसायटी'चे अध्यक्ष डेरेक जूड बीबीसी न्यूजला म्हणाले की, इतर लोकदेखील या फॉर्म्युल्यात सुधारणा करू लागले होते. आगपेटीच्या डब्याचा आकार आणि डिझाईन यामध्ये देखील बदल झाले.

वॉकर यांच्या आगपेटीची नक्कल करणाऱ्या आगपेटी बाजारात आली आणि लोकप्रिय झाली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तामिळनाडू सारख्या अनेक भागात अजूनही घरांमध्ये आगपेट्या तयार केल्या जातात

ते सांगतात, "1844 मध्ये स्वीडनमध्ये आगपेटीची एक नवीन आवृत्ती पुढे आली. तिथूनच आगपेटी तिच्या आधुनिक स्वरुपात लोकप्रिय झाली."

डेरेक जूड म्हणतात की, अनेक ठिकाणी आगपेटी तयार करणं हा गृहउद्योग किंवा कुटीरउद्योग बनला. कुटुंब आगपेट्यांचं उत्पादन घरीच करायचे. ते काम जोखमीचं होतं, मात्र त्यातून अतिरिक्त उत्पन्नदेखील मिळत होतं."

"महिला आणि मुलं कारखान्याच्या जवळपासच्या घरांमध्ये डब्बे बनवायचे. त्यांना त्यांच्या उत्पादनानुसार मोबदला मिळायचा. नंतर यंत्रं आल्यामुळे याचं रुपांतर एका प्रचंड उद्योगात झालं," असं डेरेक जूड सांगतात.

लायटरचा आगपेट्यांच्या बाजारावर झाला परिणाम

नंतर सिगारेट लायटरचा शोध लागल्यानंतर आगपेटीच्या वापरावर मोठा परिणाम झाला. जूड म्हणतात, "कालांतरानं हा उद्योग आक्रसत गेला आणि अनेक कंपन्या बंद पडल्या."

मिडलटन यांच्यानुसार, आजदेखील जगभरात आगपेटी ही सामान्य आणि गरजेची वस्तू आहे. आता ती एक फॅशनची वस्तूदेखील झाली आहे. विशेष डिझाईन असणारे पॅक 250 डॉलरपर्यंत विकले जातात.

मात्र या आगपेटीचा शोध लावणारे वॉकर आजदेखील बऱ्याच अंशी अनामिकच आहेत, त्यांच्याबद्दल लोकांना फारसं माहीत नाही.

मिडलटन आणि जूड या दोघांना वाटतं की, 200 वर्षांनंतर आता त्यांना ओळख, मान्यता मिळाली पाहिजे.

लायटरचा आगपेट्यांच्या बाजारावर झाला परिणाम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बाजारात लायटर आल्यानंतर आगपेटीच्या डबीची मागणी बऱ्याच अंशी घटली आहे

जूड म्हणतात, "वॉकर असे व्यक्ती होते, ज्यांनी त्यांचा शोध पुढे नेण्याचा प्रयत्न केला नाही. जर त्यांनी तसं केलं असतं, तर ते प्रसिद्ध होऊ शकले असते."

स्टॉकटनमध्ये 29 मे पासून वॉकर यांच्या 200 व्या जन्मदिनानिमित्त कार्यक्रम सुरू झाले आहेत.

या कार्यक्रमांमधून वॉकर यांच्या कामाबद्दल अधिक लोकांना माहीत होईल, अशी आशा स्थानिक लोकांना आहे.

कौन्सिलच्या लीडर लिसा इव्हान्स म्हणतात, "फ्रिक्शन मॅचचा शोध लागल्यामुळे आग लगेच आणि सहजपणे पेटवता येणं शक्य झालं. यामुळे औद्योगिक आणि घरगुती, दोन्ही गरजांना प्रचंड गती मिळाली. त्यांनी निर्माण केलेली ठिणगी आजदेखील लोकांना प्रेरणा देते आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)