रघु राय यांनी इंदिरा गांधींचा काढलेला तो फोटो, जो वृत्तपत्रात छापायला संपादकही घाबरले होते

रघु राय

फोटो स्रोत, PREETI MANN

फोटो कॅप्शन, रघु राय
वाचन वेळ: 5 मिनिटे

प्रसिद्ध फोटोग्राफर रघु राय यांचं वयाच्या 83 व्या वर्षी निधन झालं.

आपल्या कारकीर्दीत त्यांनी केवळ फोटो काढले नाहीत, तर भारताचा इतिहास कॅमेऱ्यात बंदिस्त केला. भारताला राजकीय, सामाजिक अशा विविध अंगानी घडवणाऱ्या घटनांना त्यांनी फोटोग्राफीच्या माध्यमातून जतन केलं.

त्यांनी काढलेल्या फोटोंची केवळ चर्चा झाली नाही, तर त्या फोटोंनी भारताचं चर्चाविश्वही बदललं.

रघु राय यांनी काढलेले निवडक फोटो पाहूया आणि त्यामागील किस्साही या फोटो गॅलरीतून जाणून घेऊया.

जेव्हा संपादकही फोटो छापायला घाबरले होते

1977 मध्ये इंदिरा गांधी यांच्या पराभवालाही रघु राय यांनी एका प्रतिकात्मक छायाचित्रात बंदिस्त केलं होतं. त्या छायाचित्रात एक कचरा उचलणारा माणूस इंदिरा गांधींचं फाटलेलं पोस्टर उचलताना दिसतो आणि समोरच्या भिंतीवर कुटुंब नियोजनाची घोषणा लिहिलेली आहे, ज्यामुळे इंदिरा गांधींचा पराभव झाला होता.

रघु राय यांनी हे छायाचित्र निवडणूक संपण्याच्या दिवशी टिपलं होतं.

ते जेव्हा हे छायाचित्र त्यांचे संपादक कुलदीप नय्यर यांच्याकडे घेऊन गेले, तेव्हा नय्यर म्हणाले, "हे छायाचित्र भारताच्या आजच्या राजकीय परिस्थितीचं चित्रण करतं, पण मी ते छापणार नाही."

राय यांनी त्यांना याचं कारण विचारलं असता, कुलदीप नय्यर म्हणाले, "जर इंदिरा गांधी जिंकल्या, तर त्या मला आणि तुला तुरुंगात टाकतील."

1977 चा फोटो

फोटो स्रोत, Raghu Rai

फोटो कॅप्शन, 1977 चा फोटो

रघु यांनी त्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला की, इंदिरा गांधी निवडणूक हरत आहेत, पण कुलदीप यांनी त्यांचं काहीच ऐकलं नाही.

रघु राय यांनी रागाच्या भरात ते छायाचित्र तिथेच फाडून टाकलं. दुसऱ्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागला आणि इंदिरा गांधी पराभूत झाल्या.

तेव्हा कुलदीप नय्यर यांना त्या छायाचित्राची आठवण झाली. त्यांनी रघु राय यांचा शोध घ्यायला लावला, पण ते त्या दिवशी कार्यालयात आले नव्हते.

खूप प्रयत्नांनंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला. दुसऱ्या दिवशी 'द स्टेट्समन'मध्ये ते छायाचित्र फोटो एडिट म्हणून प्रकाशित झालं.

इंदिरा गांधींच्या सत्तेचा अर्थपूर्ण फोटो

इंदिरा गांधी या भारताच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली पंतप्रधान मानल्या जातात. त्यांच्याबद्दल विनोदाने म्हटलं जायचं, "आपल्या मंत्रिमंडळात त्या एकट्याच पुरुष होत्या."

रघु राय 1969 मध्ये इंदिरा गांधींच्या आयुष्यातील एका दिवसावर फोटो फीचर करत होते. अचानक त्यांनी पाहिलं की, गुजरातमधील काही आमदार त्यांच्या संसदेतील कार्यालयात आले आहेत.

आमदारांनी इंदिरा गांधींना एक निवेदन दिलं. त्या चष्मा लावून ते वाचत होत्या, तेवढ्यात रघु राय यांनी इंदिरा गांधींच्या मागून, त्यांच्या खांद्यावरून एक फोटो काढला.

इंदिरा गांधी या भारताच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली पंतप्रधान मानल्या जातात. त्यांच्याबद्दल विनोदाने म्हटलं जायचं, "आपल्या मंत्रिमंडळात त्या एकट्याच पुरुष होत्या."

फोटो स्रोत, Raghu Rai

फोटो कॅप्शन, इंदिरा गांधी या भारताच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली पंतप्रधान मानल्या जातात. त्यांच्याबद्दल विनोदाने म्हटलं जायचं, "आपल्या मंत्रिमंडळात त्या एकट्याच पुरुष होत्या."

रघु राय यांनी या फोटोबद्दल सांगितलं होतं, "सर्वप्रथम माझं लक्ष तिथल्या सगळ्यांच्या चेहऱ्यांवर दिसणाऱ्या उत्कंठा आणि प्रतीक्षेच्या भावांकडे गेलं. त्यातून इंदिरा गांधी किती शक्तिशाली होत्या, हे दिसून येत होतं."

"एकाही व्यक्तीने इंदिरा गांधींना एक शब्दही म्हटलं नाही की, तुम्ही हे करा, ते करा. ते फक्त त्यांच्या निर्णयाची वाट पाहत राहिले."

भोपाल वायू दुर्घटनेचं छायाचित्र

भोपाळ वायू दुर्घटना

फोटो स्रोत, Raghu Rai

फोटो कॅप्शन, भोपाळ वायू दुर्घटना

भोपाळ वायू दुर्घटनेनं भारतासह जगाला हदरवलं. या दुर्घटनेचा चेहरा बनला लहान मुलाला दफन करतानाचा फोटो.

हा फोटो रघु राय यांनी काढला होता. या फोटोनं रघु राय यांना बरीच प्रसिद्धीही मिळवून दिली.

युद्ध आणि त्यानंतर

रघु राय यांनी 1971 मध्ये बांग्लादेशमधून आलेल्या निर्वासितांचेही फोटो काढले. या फोटोंनी त्यांना जगातील आघाडीच्या फोटोग्राफर्सच्या रांगेत उभं केलं.

1971 चा फोटो

फोटो स्रोत, Raghu Rai

फोटो कॅप्शन, 1971 चा फोटो

जनरल जगजीत सिंह अरोरा जेव्हा जनरल नियाझी यांचं शरणागतीपत्र स्वीकारण्यासाठी पोहोचले, तेव्हा रघु राय आधीपासूनच ढाका विमानतळावर उपस्थित होते. त्यांनी त्याच वेळी दोन्ही जनरल्सची छायाचित्रं टिपली.

रघु राय म्हणतात, "जनरल अरोरा यांच्या देहबोलीत विजेत्याचा रुबाब होता, तर जनरल नियाझी यांच्या झुकलेल्या चेहऱ्यावरून शरमेची भावना आणि पराभव स्पष्ट दिसत होता."

जखमी पाकिस्तानी युद्धकैदी जमिनीवर पडलेला आहे आणि त्याला दमलेल्या भारतीय सैनिकांनी घेरलेले आहे.

फोटो स्रोत, Raghu Rai

रघु राय यांच्या मुलीने अलीकडेच त्यांच्यावर एक डॉक्युमेंटरी बनवली आहे.

त्यात त्यांनी काढलेले एक छायाचित्र दाखवण्यात आले आहे, ज्यामध्ये एक जखमी पाकिस्तानी युद्धकैदी जमिनीवर पडलेला आहे आणि त्याला दमलेल्या भारतीय सैनिकांनी घेरलेले आहे.

गाढवाच्या फोटोनं कारकीर्दीची सुरुवात

रघु राय यांच्या कारकिर्दीची सुरुवात गाढवाच्या फोटोपासून झाली.

भारताच्या गेल्या 50 वर्षांच्या प्रवासाला आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करणाऱ्या मोजक्या लोकांपैकी रघु राय एक आहेत.

त्यांच्या प्रवासाची सुरुवात 1965 मध्ये झाली, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा गाढवाच्या पिल्लाचे छायाचित्र टिपले.

रघु राय यांनी काढलेला पहिला फोटो

फोटो स्रोत, Raghu Rai

फोटो कॅप्शन, रघु राय यांनी काढलेला पहिला फोटो
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

रघु राय यांनी या फोटोबद्दल सांगितलं होतं, "एकदा मी माझ्या भावाचा मित्र योग जॉय यांच्यासोबत दिल्लीपासून 50 किलोमीटरवर त्यांच्या गावात 2-3 दिवसांसाठी गेलो होतो."

"निघताना माझ्या भावाने मला आग्फा सुपर सिलेट कॅमेरा दिला आणि तो कसा वापरायचा हे समजावलं. योग त्यांच्या गावात मुलांचे फोटो काढत होते."

ते पुढे म्हणाले, "तेवढ्यात मला एका कोपऱ्यात गाढवाचं एक पिल्लू उभं दिसलं. मी त्याचा फोटो घ्यायला जवळ गेलो, तर ते पळायला लागलं. तिथे खेळणारी मुलं मोठ्याने हसायला लागली."

"त्यांचं मनोरंजन करण्यासाठी मीही त्या गाढवाच्या पिल्लामागे धावू लागलो. थोड्या वेळाने ते पिल्लू थकून थांबलं. तेव्हा मी त्याचं छायाचित्र घेतलं."

रघु राय यांनी अनेक फोटो काढले. त्यातली काही फोटो तर ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची ठरली. काही फोटोंनी देशाच्या सीमा ओलांडून जगभरात कौतुकाची थाप मिळवली. त्यातले हे काही फोटो.

(बीबीसीचे प्रतिनिधी रेहान फजल यांनी 2017 साली रघु राय यांच्याशी संवाद साधून या फोटोंमागील किस्से लिहिले होते. त्याआधारे ही फोटो गॅलरी आणि फोटोंमागील किस्से इथे देण्यात आले आहेत.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)