महाराष्ट्रात तापमानात वाढ, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत आगामी दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

फोटो स्रोत, ANI
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 3 मिनिटे
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाली असून, पुढच्या काही दिवसांत मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
त्याशिवाय मान्सूनच्या ऑनसेटविषयी भाकित वर्तवलं आहे.
हवामान विभागानं काय म्हटलं आहे? मान्सूनचा प्रवास कधी सुरू होऊ शकतो आणि सध्या महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट आहे, जाणून घेऊयात.
मान्सून ऑनसेटसाठी अनुकूल स्थिती?
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र कायम असून, इथे मोठ्या प्रमाणात बाष्प जमा झालं आहे. उपग्रहानं टिपलेल्या दृश्यांमध्ये हे ढग दिसतात.
या परिसरातली हवामानाची स्थिती मान्सूनची सुरुवात होण्यासाठी म्हणजे मान्सून ऑनसेटसाठी अनुकूल ठरत असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे.
या आठवडाअखेरीस अंदमान निकोबार बेटांमध्ये मान्सून ऑनसेट म्हणजे मान्सूनच्या प्रवासाची सुरुवात होऊ शकते, असंही भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे.
दक्षिण भारतात आणि ईशान्य भारतातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात कशी असणारी स्थिती?
अरबी समुद्रातलं चित्र पाहिलं, तर इथे चक्राकार वारे वाहतायत, परिणामी महाराष्ट्राच्या किनारी भागात उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा प्रभाव दिसतोय.
मराठवाडा आणि विदर्भातही उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव दिसतो आहे. पंधरा मे पर्यंत हा प्रभाव कायम राहील.
परिणामी राज्यात येत्या आठवडाभरात कमाल तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ होऊ शकते.
राज्यात पुढचे चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. कोकणात 12 मे रोजी, मध्य माहाराष्ट्रात 12 ते 14 मे दरम्यान, मराठवाड्यात 12 ते 15 मे आणि विदर्भात 12 ते 16 मेदरम्यान उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.

फोटो स्रोत, IMD
19 मे नंतरच्या दोन तीन दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यासह देशाच्या अंतर्गत भागांत मोठ्या प्रदेशात तापमान 45 ते47 अंश किंवा त्यापेक्षाही जास्त जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या आठवड्यात उष्णतेपासून बचावासाठी जास्तीत जास्त काळजी घ्यायला हवी.
12 मे रोजी रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर इथे उष्ण आण दमट हवामानासाठी तर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, जालना, अकोला, बीड, अहिल्यानगर आणि पुणे या जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेसाठी यलो अलर्ट आहे.
13 मे रोजीही अकोला, अमरावती, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अहिल्यानगर आणि पुणे या जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेसाठी यलो अलर्ट आहे.

फोटो स्रोत, IMD
यंदा महाराष्ट्रात किती पाऊस पडेल?
यावर्षी महाराष्ट्रासह भारतात बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागानं 13 एप्रिल रोजी 2026 रोजी यंदाच्या वर्षासाठीचा मान्सूनविषयीचा पहिला दीर्घकालीन अंदाज जारी केला आहे.
त्यानुसार जून ते सप्टेंबर या नैऋत्य मान्सूनच्या कालावधीत देशात दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 92 टक्के (± 5%) पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात जून 2026 ते सप्टेंबर 2026 या कालावधीत बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे.
मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी यापेक्षाही कमी पाऊस पडू शकतो.
तर काही ठिकाणी सरासरीएवढा आणि गडचिरोलीसारख्या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, असंही हवामानविभागानं तयार जाहीर केलेल्या नकाशातून दिसून येतं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.



























