राज्यात पावसाची कुठे काय स्थिती? हवामान विभागाचा काय आहे अंदाज?

फोटो स्रोत, Getty Images
मान्सूनची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रात पाऊस हळूहळू सक्रिय होत आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात आज 21 जूनच्या सकाळी अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या.
पुढच्या दोन तीन दिवसांत किनारी प्रदेशात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी विदर्भात मात्र उष्णतेची तीव्रता कायम आहे. हवामान विभागानं काय अंदाज वर्तवला आहे आणि कुठल्या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि यलो अलर्ट आहेत, जाणून घेऊयात.
नैऋत्य मोमसी वाऱ्यांच्या उत्तरेकडील सीमेत आज कुठलाही बदल झालेला नाही. महाराष्ट्रात तर 8 जूनपासून मान्सून पुढे सरकलेला नाही.
पण ही परिस्थिती पुढच्या दोन तीन दिवसांत बदलेल. सध्या राज्यात नैऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांची गती वाढलेली दिसते आहे.

फोटो स्रोत, @RMC_Mumbai
यासोबतच अरबी समुद्रात ढगांचा संच तयार होत असून, तो हळूहळू वर सरकताना दिसतो आहे. साधारण 23 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात आगेकूच करू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं मांडला आहे.
23-24 तारखेनंतरची भारत फोरकास्टिंग मॉडेलची चित्रंही दिलासा देणारी आहेत. साधारण आठवडाभर किनारी भागात पावसाचं प्रमाण हळूहळू वाढत जाताना दिसतंय. तर जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीला राज्यात अंतर्गत भागांमध्येही चांगला पाऊस अपेक्षित आहे.
अर्थात ही स्थिती सातत्यानं बदलत असते, त्यामुळे नेमका किती पाऊस पडेल हे आत्ताच सांगता येणं कठीण आहे.
सध्या मात्र मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची तीव्रता कायम आहे विदर्भात तर बहुतांश ठिकाणी पारा 40 अंश सेल्सियसच्या वरच आहे. पुढचे दोन तीन दिवस इथे ही स्थिती कायम राहील. उलट किनारी भागांतलं कमाल तापमान मात्र आता हळूहळू कमी होऊ लागलं आहे.
पण रात्रीच्या किमान तापमानात मात्र अजून फारशी घट झालेली नाही. विशेषतः किनाऱ्यालगतचा भाग आणि विदर्भातील काही ठिकाणी रात्रीही पारा 28 अंश सेल्सियसपेक्षा वर राहू शकतो.
त्यामुळेच 21 तारखेच्या रात्रीसाठीही विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गोंदिया इथे तुरळक ठिकाणी उष्णतेच्या तीव्र लाटेसाठी ऑरेंज अलर्ट आहे. तर नांदेड, संभाजीनगर, नाशिकचा पठारी भाग, पालघर, रायगड इथेही उष्णतेसाठी यलो अलर्ट आहे.

फोटो स्रोत, Getty Images
22 जून रोजी अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया इथे उष्णतेसाठी यलो अलर्ट आहे. या भागांत तसंच वर्धा, भंडारा आणि गडचिरोलीत उद्या थंडरस्टॉर्म्स म्हणजे मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट अनुभवायला मिळू शकतो.
तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशीव, लातूर, बीड, संभाजीनगरमध्येही थंडरस्टॉर्मसाठी यलो अलर्ट आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.



























