सँड फ्लाय म्हणजे काय? गुजरातमध्ये मुलांच्या मृत्यूचे कारण ठरलेला हा कीटक नेमका काय आहे?

फोटो स्रोत, Pavan Jaishwal
- Author, रॉक्सी गागडेकर छारा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
हिम्मतनगरच्या सरकारी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात चांदीपुरा विषाणूची लागण झाल्याचा संशय असलेल्या ईशा असारीवर उपचार सुरू आहेत. तिचे वृद्ध आजी-आजोबा रुग्णालयाबाहेर आतुरतेने वाट पाहत आहेत.
या रुग्णालयातील बहुतांश बेड रिकामे आहेत. पण, जी काही मुलं उपचारासाठी दाखल करण्यात आली आहेत, त्यापैकी बहुतांश जणांना व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे. ईशासारखीच अवस्था रुग्णालयात दाखल असलेल्या तीन वर्षांच्या जानकी परमारचीही आहे.
जानकी पुन्हा पूर्वीसारखी हसू-खेळू लागेल, अशी आशा तिच्या कुटुंबीयांना आहे.
या दोन्ही मुली ॲक्यूट इन्सेफलायटिस सिंड्रोम (एईएस) म्हणजेच मेंदूवर परिणाम करणाऱ्या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत.
या रुग्णांपैकी काहींमध्ये चांदीपुरा विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा विषाणू 'सँड फ्लाय' (वाळू माशी) नावाच्या अतिशय लहान कीटकाच्या चाव्यामुळे शरीरात प्रवेश करतो.
गुजरातच्या 'या' गावांमध्ये नेमकं काय घडत आहे?
सध्या गुजरातमधील गांधीनगर, साबरकांठा, खेडा, अरवली आणि पंचमहाल या जिल्ह्यांमध्ये या विषाणूचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत.
हा विषाणू प्रामुख्याने 15 वर्षांखालील मुलांमध्ये सँड फ्लाय (वाळू माशी) चावल्यामुळे पसरतो. हा विषाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर मुलांना तीव्र ताप, उलट्या, जुलाब, थंडी वाजणे आणि शरीरात पेटके येणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

फोटो स्रोत, Pavan Jaishwal
तज्ज्ञांच्या मते, अशी लक्षणे दिसताच मुलाला त्वरीत डॉक्टरांकडे घेऊन जावे. उपचाराला उशीर झाल्यास मुलाची प्रकृती गंभीर होऊ शकते.
राज्याचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी सांगितलं की, "आतापर्यंत गुजरातमध्ये 7 मुलांमध्ये चांदीपुरा विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यापैकी तिघा मुलांचा मृत्यू झाला असून 4 मुलांवर उपचार सुरू आहेत."
असंही दिसून आलं आहे की, काही गावांमध्ये मुलं आजारी पडल्यावर त्यांना आधी डॉक्टरांकडे न नेता मांत्रिक किंवा बुवांकडे नेलं जातं. त्यामुळे उपचार सुरू होण्यास उशीर होतो आणि मुलांची प्रकृती अधिकच गंभीर होते.
याच कारणामुळे ईशा असारीलाही वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत. तब्येत बिघडल्यानंतर तिला आधी गावातील दोन वेगवेगळ्या बुवांकडे (स्थानिक मांत्रिक) नेण्यात आले. तिची प्रकृती गंभीर झाल्यानंतर अखेर तिला हिम्मतनगरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

फोटो स्रोत, Pavan Jaishwal
कालजीभाई सांगतात, "मी शेतातून बैलं घेऊन घरी आलो तेव्हा ईशा अंथरुणावर झोपली होती. मी खाली बसत असतानच ती अचानक मोठ्याने 'मम्मी... मम्मी... मम्मी...' म्हणत रडू लागली."
ते म्हणाले, "सुरुवातीला आम्हाला वाटलं की, तिच्या अंगात एखादी बाधा झाली असेल. त्यामुळे आम्ही तिला एका भुवाकडे नेलं. पण तिची तब्येत आणखी बिघडू लागली आणि तिला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. तेव्हा आम्ही तिला लगेचच रुग्णालयात नेलं."
आता कलजीभाई आपल्या नातीने डोळे उघडावेत आणि पुन्हा ती आपल्याशी बोलावी, याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दोन वर्षांच्या आकृतीची कहाणीही अशीच आहे. 7 जुलै रोजी तिची तब्येत बिघडली. तिला तीव्र ताप आला आणि उलट्या सुरू झाल्या. तिला साबरकांठामधून हिम्मतनगरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, अवघ्या 24 तासांत तिची प्रकृती गंभीर झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.
आकृतीचे वडील गोहिल परमार यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं की, "मला तिची खूप आठवण येते. ती माझी एकुलती एक मुलगी होती आणि कायम माझ्यासोबत असायची."
"तिला नेमकं काय झालं, हे समजून घेण्याचीही आम्हाला संधी मिळाली नाही. तोपर्यंत तिची प्रकृती इतकी बिघडली होती की तिचा त्यात मृत्यू झाला."
चांदीपुरा विषाणूबाबत (व्हायरस) मी पहिल्यांदाच ऐकलं असल्याचं गोहिल यांनी सांगितलं.
या गावात चांदीपुरा विषाणू कसा पसरत आहे?
केवळ औषधोपचार करून हा धोका कमी होणार नाही. चांदीपुरा विषाणू रोखण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता असणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि पावसानंतर त्वरीत कीटकनाशकांची फवारणी करणेही तितकंच आवश्यक आहे.
बीबीसीची टीम चार वेगवेगळ्या गावांमध्ये गेली. त्यात साबरकांठा जिल्ह्यातील देमतीमेरा, अरवलीतील मेरी टिंबा आणि जालमपूर, तसेच राजस्थानमधील खेरवाडा येथील बाबरी गावाचा समावेश होता.

फोटो स्रोत, Pavan Jaishwal
ही चारही गावं वेगवेगळ्या जिल्ह्यांत असली तरी त्यांच्यात अनेक साम्यं आहेत. या गावांमध्ये मातीची घरं, भिंतींना तडे, घराजवळ गुरांचे गोठे, कच्ची अंगणं (मातीचे किंवा साध्या माती-शेणाने सारवलेले उघडे अंगण) आणि प्राथमिक आरोग्य केंद्रापासून दूर असलेली वस्ती आहे. तसेच, या गावांतील बहुतांश पुरुष मजुरीसाठी बाहेरगावी जातात.
सहा वर्षीय राजकुमार डामोरची तब्येत अचानक बिघडली तेव्हा त्याची आई पारुलबेन यांनी मध्यरात्री त्याला खांद्यावर घेऊन अनेक किलोमीटर पायी प्रवास केला. त्यानंतरच त्यांना रुग्णवाहिका मिळाली. त्या वेळी राजकुमारचे वडील मुकेशभाई मजुरीसाठी ईडरला गेले होते.
पारुलबेन सांगतात, "राजकुमार शाळेतून घरी आला. घरी आल्यावर तो अंथरुणावर बसून राहिला. त्याने आपला गृहपाठ केला, तिथेच जेवला आणि झोपलाही. पण रात्री अचानक त्याला उलट्या होऊ लागल्या. मला काही समजायच्या आतच त्याला फिट्स येऊ लागले."

फोटो स्रोत, Pavan Jaishwal
राजकुमारला आधी भिलोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (पीएचसी) नेण्यात आलं. पण, तो बेशुद्ध असल्यामुळे तेथून त्याला हिम्मतनगरला रेफर करण्यात आलं. दुर्दैवाने, दुसऱ्या दिवशी दुपारी सुमारे 12 च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
या गावांमध्ये चांदीपुरा विषाणूबाबत लोकांमध्ये जनजागृती नसल्याचे दिसून आले. अनेकांनी बीबीसी गुजरातीला सांगितले की, 'सँड फ्लाय' म्हणजे काय किंवा हा आजार कसा पसरतो, याची त्यांना माहितीही नाही.
आकृतीचे वडील गोहिलभाई असोत, राजकुमारचे वडील मुकेशभाई असोत किंवा त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य, बहुतांश लोकांना अजूनही सँड फ्लायची पैदास कशी रोखायची किंवा त्यापासून बचावासाठी कोणती काळजी घ्यावी, याची काहीच माहिती नाही.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनेक गावांतून सँड फ्लायचे नमुने गोळा केले आहेत. तसेच त्या भागातील गाय, मांजर आणि कुत्रे यांसारख्या प्राण्यांचेही नमुने घेतले आहेत.
प्रत्यक्षात, ज्या मुलांचा मृत्यू झाला, त्या सर्वांमध्ये चांदीपुरा विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झालेली नव्हती. त्यांचा मृत्यू ॲक्यूट एन्सेफलायटिस सिंड्रोम (एईएस) या गंभीर आजारामुळेही झाला असण्याची शक्यता आहे.
एईएस हा एक क्लिनिकल सिंड्रोम आहे. मेंदूला सूज आल्यावर दिसणाऱ्या लक्षणांचा समूह आहे. यामागे अनेक कारणं असू शकतात आणि त्यापैकी चांदीपुरा विषाणू हे एक प्रमुख कारण मानलं जातं.
साबरकांठा आणि अरवली जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये अशा प्रकारची प्रकरणे तुलनेने अधिक समोर येत आहेत.
साबरकांठाचे मुख्य जिल्हा आरोग्य अधिकारी (सीडीएचओ) डॉ. राजकुमार सुतरिया यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं की, "या भागातील गावांमध्ये मातीची घरं असल्यामुळे त्यांच्या भिंतींना तडे जातात, भेगा पडतात. तसेच घराजवळ गुरांचे गोठे आणि मातीची अंगणं असल्याने अशा ठिकाणी सँड फ्लायची पैदास सहज होते."
ते पुढे म्हणाले, "पावसानंतर मातीच्या भिंती ओलसर होतात. त्यामुळे भिंतींमधील भेगांमध्ये सँड फ्लायची पैदास होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होते. ही माशी सामान्य घरगुती माशीपेक्षा आकाराने खूपच लहान असते."
खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यातील सुमारे 61 भागांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना वेगाने सुरू केली आहे. त्याअंतर्गत निश्चित केलेल्या हॉटस्पॉट भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांची फवारणी केली जात आहे.
चांदीपुरा विषाणू रोखण्यासाठी कोणती पावलं उचलली जात आहेत?
या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने आवाहन केले आहे. त्यांच्या मते, चांदीपुरा विषाणूचा प्रसार सँड फ्लाय या कीटकामुळे होतो.
परंतु, काही प्रकरणांमध्ये हा विषाणू डासांसारख्या रक्त शोषणाऱ्या इतर कीटकांच्या चावण्यामुळेही पसरू शकतो.

फोटो स्रोत, Pavan Jaishwal
आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी आवाहन केलं आहे की, एखाद्या मुलाला ताप, उलट्या किंवा फिट्ससारखी लक्षणे दिसल्यास त्याला त्वरीत जवळच्या रुग्णालयात नेऊन तपासणी करून घ्यावी.
राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांना चांदीपुरा विषाणूची लागण झाल्याचा संशय असलेल्या कोणत्याही मुलाची त्वरीत तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ते पुढे म्हणाले, "ज्या भागांत रुग्ण आढळून आले आहेत, तेथे स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. तसेच विषाणू पसरवणाऱ्या माशांचा नायनाट करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणीही केली जात आहे. उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे."
2024 मध्ये चांदीपुरा विषाणूमुळे 28 मुलांचा मृत्यू झाला होता
चांदीपुरा विषाणूमुळे राज्यात मुलांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2024 मध्येही या विषाणूने थैमान घातले होते.

फोटो स्रोत, Pavan Jaishwal
ऑगस्ट 2024 मध्ये आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी विधानसभेत सांगितलं होतं की, गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणूसह इतर कारणांमुळे होणाऱ्या व्हायरल एन्सेफलायटिसचे 164 रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी 101 मुलांचा मृत्यू झाला होता. या मृत्यूंपैकी 28 मुलांचा मृत्यू चांदीपुरा विषाणूमुळे झाला होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























