टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : एका फोन कॉलद्वारे माग काढत पोलिसांनी तीन आरोपींना असं घेतलं ताब्यात

टायगर श्रॉफ
Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर शनिवारी (17 ऑक्टोबर) झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांकडून त्याला सुरक्षा पुरवण्यात आली आहे. त्याचबरोबर स्थानिक पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्यासह अतिरिक्त पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी राजस्थानमधील कोटा इथून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. चौकशीसाठी त्यांना ट्रान्झिट रिमांडवर मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मुंबई क्राइम ब्रँचचे पोलिस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं, "तीन आरोपींचे वय 18 ते 22 वर्षांच्या दरम्यान आहे. त्यापैकी दोघे हरियाणातील सोनीपतचे, तर एक जण बिहारचा रहिवासी आहे.

तिघांपैकी दोघांनी बारावीपर्यंत, तर एकाने नववीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याबद्दलची तपासणी सुरू आहे. तिन्ही आरोपींपैकी कोणीही अल्पवयीन नाही."

कोटाचे एसीपी सुभाष चंद्र मिश्रा यांनी मंगळवारी (20 ऑक्टोबर) सांगितले, "सोमवारी (19 ऑक्टोबर) अटक केल्यानंतर आरोपींना ट्रान्झिट रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने ट्रान्झिट रिमांड मंजूर केल्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले."

मिश्रा यांनी म्हटलं, "सोमवारी (19 ऑक्टोबर) रात्री आरोपी कोटा पोलिसांच्या कोठडीत होते. बराच वेळ प्रवास केल्यामुळे पोलिसांचे पथक थकले होते. पोलिसांनी आरोपींची सविस्तर चौकशी केली. तसंच सुरक्षेच्या कारणास्तव रात्रीच्या वेळी त्यांना घेऊन रवाना होणे योग्य ठरणार नाही, असे पोलिसांना वाटले."

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

शनिवारी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर टायगर श्रॉफ पूर्णपणे सुरक्षित असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं होते.

डीसीपी मोहित गर्ग यांनी याबद्दलची माहिती देताना म्हटलं होतं की, शनिवारी (17 ऑक्टोबर) संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. टायगर श्रॉफ एका खाजगी कार्यक्रमाला गेले होते. तेथून बाहेर पडताच त्यांच्या कारवर गोळीबार करण्यात आला.

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या घटनेत दोन जण जखमी झाले होते. त्यापैकी एक जण टायगर श्रॉफचा ड्रायव्हर फिरदौस होता. त्याच्या हाताला गोळी लागली होती. आणखी एक व्यक्ती जखमी झाली होती. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या घटनेनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टायगर श्रॉफची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली होती. यावेळी त्यांनी दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे तसेच प्रसिद्ध व्यक्तींच्या सुरक्षानव्यवस्थेचा आढावा घेण्याचे आश्वासन दिले होते.

सोमवारी (19 ऑक्टोबर) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, या घटनेमागील सूत्रधार महाराष्ट्रात नाहीयेत. ते राज्याबाहेर किंवा देशाबाहेर राहून या गोष्टींची अंमलबजावणी करून घेत आहेत.

ते म्हणाले, "लपून, दूरवरून सूचना देणाऱ्या या सूत्रधारांचा आम्ही शोध घेऊ. यांपैकी कोणीही महाराष्ट्रात राहून काम करत नाही. राज्यात राहून अशी कृत्यं करणाऱ्यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे."

"हे लोक महाराष्ट्राबाहेर किंवा अगदी देशाबाहेर राहून आपल्या कारवाया करत आहेत. ते ज्या राज्यांतून काम करत आहेत, त्या राज्यांशी समन्वय साधून आम्ही त्यांचा शोध घेऊ. परदेशात असलेल्या व्यक्तींबाबत केंद्र सरकारची मदत घेऊ आणि त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करू," असंही त्यांनी म्हटलं.

संशयितांना कसं पकडण्यात आलं?

या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी लगेचच 15 पथके तयार केली होती. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकेही दाखल झाली होती.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात होते आणि संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होता.

सोमवारी संशयितांना पकडल्याची बातमी समोर आली.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार गुजरातमधील सुरत रेल्वे स्थानकावर संशयित पुणे–जयपूर एक्स्प्रेसमध्ये घाईघाईने चढताना दिसत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याचं कोटा रेल्वे पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.

या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्यावर गोळीबार झाल्यानंतर काही तासांतच संशयित टॅक्सीने सुरतला पोहोचले होते. मुंबईपासून सुरतचे अंतर सुमारे 275 किलोमीटर आहे. त्यानंतर सोमवारी पहाटे 1.30 वाजण्याच्या सुमारास ते जयपूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढले.

पश्चिम रेल्वेच्या वडोदरा विभागाचे पोलीस अधीक्षक (एसपी) अभय सोनी यांनी सांगितलं की, संशयितांचा शोध घेण्याच्या मोहिमेत गुजरातमधील रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) मुंबई पोलिसांसोबत समन्वय साधून मदत केली.

मुंबई क्राइम ब्रँचचे डीसीपी राज तिलक रोशन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती दिली होती.
फोटो कॅप्शन, मुंबई क्राइम ब्रँचचे डीसीपी राज तिलक रोशन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती दिली होती.

कोटाचे डीआरएम यांनी त्यांच्या एक्स हँडलवर संशयितांना पकडल्याचा व्हीडिओ शेअर केला. आरपीएफ आणि कोटा शहर पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करून संशयितांना पकडल्याचे त्यांनी म्हटले.

'एक्स'वर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलं, "मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीला लक्ष्य करून गोळीबार करण्यात आल्याच्या प्रकरणात मिळालेल्या माहितीच्या आधारे कोटा स्थानकावर गाडी क्रमांक 12939 पुणे–जयपूर एक्स्प्रेसमधून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. मुंबई पोलीस आणि संबंधित तपास यंत्रणांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. या घटनेत संशयितांचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे."

कोटा रेल्वे कॉलनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामस्वरूप मीणा यांनी पत्रकारांना सांगितलं की, संशयितांकडून कोणतेही शस्त्र किंवा पैसे जप्त करण्यात आलेले नाहीत.

मंगळवारी (20 ऑक्टोबर) त्यांनी म्हटलं, "महाराष्ट्र पोलिसांचे अधिकारी तेथे आधीपासूनच उपस्थित होते. त्यांनी संशयितांची चौकशी केली आहे. संशयितांना महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे."

कॅबचालकाच्या फोन कॉलमुळे मिळाला महत्त्वाचा धागा

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार संशयितांपैकी एकाने सुरतमधील कॅबचालकाला केलेल्या फोन कॉलमुळे मुंबई पोलिसांना त्यांच्या हालचालींचा महत्त्वाचा धागा मिळाला.

आपला माग काढला जाऊ नये यासाठी संशयितांनी त्यांचे मोबाइल फोन बंद केले होते. तसंच, ते आपलं ठिकाण आणि प्रवासाची साधनं बदलत होते. मात्र, रविवारी (18 ऑक्टोबर) रात्री एका संशयिताने बोरिवली रेल्वे स्थानकाबाहेरून एका कॅबचालकाला फोन केला आणि भेटण्याचे ठिकाण सांगितले.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने 'इंडियन एक्स्प्रेस'ने जे वृत्त दिले, त्यानुसार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने संशयितांची ओळख पटवण्यात आली होती. तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांच्या मोबाइल फोनचाही माग काढण्यात आला होता.

संशयितांनी कॅबचालकाला फोन केल्यानंतर पोलिसांना त्या चालकाचा मोबाइल क्रमांकही मिळाला. मात्र, संशयितांनी त्यांचे फोन बंद ठेवले होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत टायगर श्रॉफ
फोटो कॅप्शन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत टायगर श्रॉफ

या वृत्तानुसार, कॅबचालक पोलिसांना त्या ठिकाणी घेऊन गेला, जिथे त्याने संशयितांना उतरवले होते. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, काही वेळ बसची वाट पाहिल्यानंतर संशयित सुरतहून पुणे–जयपूर एक्स्प्रेसमध्ये चढल्याचे समोर आले. फलाटावरील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ते ट्रेनच्या कोणत्या डब्यात चढले होते, हेही स्पष्ट झाले.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या ट्रेनचा पुढचा थांबा कोटा इथं होता. त्यामुळे कोटा पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर तेथे संशयितांना पकडण्यात आले.

यापूर्वी मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं होतं की, फूल सिंह, रेहान आर. आणि ऋतिक महतो हे तिन्ही आरोपी एकाच मोटारसायकलवर तिघे बसून जुहू येथून अंधेरी रेल्वे स्थानकापर्यंत गेले होते. तेथून त्यांनी बोरिवलीला जाणारी लोकल ट्रेन पकडली होती.

एका आरोपीच्या आईने काय सांगितले?

तीन आरोपींपैकी एक ऋतिक कुमार ऊर्फ रोशन हा बिहारमधील बेगुसरायचा रहिवासी आहे.

पाटणा येथून बीबीसीचे प्रतिनिधी सीटू तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऋतिक कुमार हा बेगुसराय जिल्ह्यातील पिपराई येथील रहिवासी असून मुंबईतल्या अंधेरी पश्चिम भागात राहत होता.

कोटा पोलिसांनी सोमवारी ट्रेनमधून तीन संशयितांना पकडले.
फोटो कॅप्शन, कोटा पोलिसांनी सोमवारी ट्रेनमधून तीन संशयितांना पकडले.

रतनपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी गणेश शंकर यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितले, "आमचे पथक चौकशीसाठी गेले होते. ऋतिकचे वडील किराणा दुकान चालवतात. त्याच्या आईचे नाव संयुक्ता देवी आहे. संयुक्ता यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा ऋतिक स्वयंपाकाचे काम करतो. तो आधी दिल्लीत राहत होता, पण काही महिन्यांपूर्वीच मुंबईला गेला. तो सतत फिरत असायचा. कामानिमित्त तो सुरत आणि वडोदरा इथेही गेला होता."

ऋतिक रॅपिडोसाठी काम करत होता का? असे विचारले असता त्याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे रतनपूर पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी सांगितले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)