हा आठवडाही कोरडाच राहणार? राज्यातील हवामानाचा अंदाज काय सांगतो? शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे

पावसाचा खंड

फोटो स्रोत, Bloomberg via Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

उत्तर कोकणात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात गेला आठवडाभर जोरदार बरसल्यानंतर आता पावसाने विश्रांती घेतल्याची चिन्हं दिसत आहेत.

गेल्या आठवड्यात तसेही मराठवाडा आणि विदर्भात कमी पाऊस पडला आहे. पण त्यातच आता मान्सूननं महाराष्ट्रात विश्रांती घेतलेली दिसते आहे.

राज्यात वेगवेगळ्या भागांत म्हणजे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज हवामान कसं असेल, कुठल्या जिल्ह्यांना काय अलर्ट दिले आहेत आणि येणाऱ्या आठवड्यासाठीचा हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो, जाणून घेऊयात.

राज्यातील पावसाचा अंदाज

महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी 9 जुलैपासून पावसात मोठी घट झालेली दिसते आहे. फण 20 जुलैपर्यंत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.

17 तारखेपासून कोकण आणि पुणे परिसरातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. हवामान मॉडेल्सनुसार, 17 तारखेपासून काही दिवस अरबी समुद्रावरून येणारे पश्चिमी वारे अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

तसेच, 20 तारखेच्या सुमारास बंगालच्या उपसागरात निर्माण होणारी हवामानाची प्रणाली आणि तिची संभाव्य वाटचाल यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यातील पावसाचा अंदाज

फोटो स्रोत, Getty Images

मराठवाडा वगळता उर्वरित राज्यात पुढील दोन दिवस तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर त्यानंतर दोन दिवस कोकण-गोव्यात काही ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आज 14 जुलै व 15 जुलै रोजी कोकण-गोवा तसेच मध्य महाराष्ट्रातील तसेच मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

15 जुलै रोजी विदर्भामध्ये चंद्रपूर, गडचिरोली तर 16 जुलै रोजी बुलढाणा, चंद्रपूर, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तिथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे शहर व परिसरामध्ये पुढील काही दिवस आकाश निरभ्र राहून दुपारी व संध्याकाळी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

पावसाचा खंड चिंता वाढवणारा

मान्सूनमधला खंड (मान्सून ब्रेक) पडला की हवामान कोरडं होतं, हवेतील आर्द्रता कमी होते आणि आकाश निरभ्र होतं. हा खंड काही भागांत महिनाअखेरपर्यंत कायम राहू शकतो. पण या अंदाजामध्ये कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सुधारणा होऊ शकते.

मात्र, या वेळचा खंड थोडा लांबण्याची चिन्हं आहेत. यामागे 'एल निनो'चा हात असल्याचं तज्ज्ञ सांगतात. एल निनो ही पॅसिफिक महासागरातील पाण्याच्या तापमानाची स्थिती आहे, जिचा परिणाम जगाच्या हवामानावर होतो. भारतातही एल निनोच्या काळात मान्सून कमकुवत होऊन दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

यंदा तर मान्सून्या अगदी सुरुवातीलाच एल निनो तयार झाला आणि तो वेगानं तीव्र बनतो आहे. अमेरिकेच्या 'नोआ' या संस्थेनुसार, या वर्षाच्या उत्तरार्धात तो आणखी तीव्र होऊ शकतो.

हवामान

फोटो स्रोत, Getty Images

तसंच एल निनोचा प्रभाव कमी करणारा हिंदी महासागरातला इंडियन ओशन डायपोलही सध्या न्यूट्रल स्थितीत आहे, मान्सून संपेपर्यंत तो सकारात्मक होण्याची फारशी आशा नाही. त्यामुळे जुलैचा उत्तरार्ध तुलनेनं कोरडा जाण्याची शक्यता आहे.

ही चिंतेची बाब आहे, कारण सध्या खरिपाचा हंगाम सुरू आहे. भारतातील बहुतांश शेती ही या जुलैतल्या पावसावर अवलंबून असल्याने, पुढचे 10 दिवस पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

भारतात यंदा जून महिन्यात सरासरीपेक्षा 40 टक्के कमी पाऊस झाला होता. ९ जुलैपर्यंत झालेल्या पावसामुळे ही तूट 12 टक्क्यांवर आली होती. पण आता लागलेल्या या दीर्घ 'मान्सून ब्रेक'मुळे ही पावसाची तूट पुन्हा एकदा अत्यंत चिंताजनक बनू शकते.

हवामान

फोटो स्रोत, Getty Images

13 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत भारत आणि आसपासच्या क्षेत्रांसाठी 'युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्ट'द्वारे पावसाची साप्ताहिक सरासरी विसंगती दर्शवलेली आहे.

ईशान्य भारत, तसेच उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड आणि छत्तीसगड व झारखंडच्या काही भागांसह गंगा-ब्रह्मपुत्रा-पश्चिम बंगाल मैदानी प्रदेशांत पावसाची सकारात्मक विसंगती (सरासरीपेक्षा जास्त पाऊस) दिसून येत आहे.

हवामान विभागाच्या विस्तारीत अंदाजानुसार या महिन्याच्या उत्तरार्धात राज्यात बराच कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

फोटो स्रोत, IMD

फोटो कॅप्शन, हवामान विभागाच्या विस्तारीत अंदाजानुसार या महिन्याच्या उत्तरार्धात राज्यात बराच कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

याउलट, मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पाच्या बहुतांश भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे.

हवामान विभागाच्या विस्तारीत अंदाजानुसार या महिन्याच्या उत्तरार्धात राज्यात बराच कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. चार आठवड्यांसाठीचा हा अंदाज दर गुरुवारी वर्तवला जातो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)