'मी सेक्स वर्कर असल्याचा अर्थ माझ्यावर गँगरेप करावा असा होतो का?'; दिल्लीत बसमध्ये बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दिलनवाज पाशा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
(इशारा: या वृत्तातील काही भाग तुम्हाला अस्वस्थ करू शकतो)
"मी सेक्स वर्कर आहे. याचा अर्थ त्यांनी माझ्यावर सामूहिक बलात्कार करावा असा होतो का?"
एका महिलेनं दिल्लीतील एका स्लीपर बसमध्ये काहीजणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या घटनेची माहिती देताना ही महिला सर्वात आधी हाच प्रश्न विचारते.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11-12 मे दरम्यानच्या रात्री 12 वाजून 15 मिनिटं आणि 2 वाजून 30 मिनिटांदरम्यान ही घटना घडली.
या घटनेसंदर्भात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. ते दिल्ली आणि बिहारदरम्यान चालणाऱ्या स्लीपर बसचे ड्रायव्हर आणि क्लीनर आहेत.
या घटनेचं प्रसारमाध्यमांमधून ज्याप्रकारे वृत्तांकन झालं, त्यामुळे त्रस्त होऊन या महिलेनं तिचं घर बदललं आहे.
'मला सेक्सच्या बदल्यात पैसे देण्यास सांगितलं'
सर्व्हायवर महिलेनं बीबीसीला रडत सांगितलं, "प्रसारमाध्यमांचे कॅमेरे माझ्या घरापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे माझ्याबरोबर काय घडलं हे संपूर्ण वस्तीला समजलं. मी कुटुंबासह राहते. खूपच नाईलाज झाला म्हणून काही दिवसांपूर्वीच मी 'सेक्स वर्कर' म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती."
"माझ्या घरातील लोकांनादेखील याबद्दल माहीत नव्हतं. आता लोक माझ्या बाबतीत काय घडलं याबद्दल चर्चा करत नाही, तर मी माझं घर चालवण्यासाठी काय करत होती, यावरून माझी बदनामी करत आहेत."
या महिलेनं सांगितलं की, भलेही गेल्या काही दिवसांपासून ती घर चालवण्यासाठी 'सेक्स वर्कर' म्हणून काम करत होती. मात्र त्या रात्री ती या कामासाठी घरातून बाहेर पडली नव्हती.
"मी माझ्या भावाची रूम बदलली होती. त्यानंतर मी घरी परतत होते. बस स्टँडवर ही बस थांबली आणि त्याच्या कंडक्टरनं मला बोलावलं. मी दरवाजाजवळ उभी राहून बोलत होते. मी काम करण्यास नकार दिला. मात्र तरीदेखील त्यांनी मला बसमध्ये ओढून घेतलं," असं या महिलेनं सांगितलं.
"त्यांनी मला सेक्सच्या बदल्यात पैसे देण्यास सांगितलं. मात्र मी नकार दिला. बसमध्ये एकूण 5 जण होते. एक जण झोपलेला होता. त्यांना संपूर्ण रात्रभर मला त्यांच्यासोबत ठेवायचं होतं. मी वारंवार नकार दिला. मात्र असं असूनही त्यातील 2 जणांनी माझ्यावर बलात्कार केला," असं ही महिला पुढे म्हणाली.

फोटो स्रोत, @dcpouter
दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) बलात्कार, सामूहिक बलात्कार आणि सामान्य उद्देश म्हणजे कॉमन इंटेशनच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
डीसीपी (बाह्य दिल्ली) विक्रम सिंह यांनी घटनेबद्दल एका निवेदनातून माहिती दिली, "पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यात कॉलरनं सांगितलं होतं की, तिच्याबरोबर 2 जणांनी चुकीचं कृत्य केलं आहे. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पीडितेला मदत केली आणि 2 आरोपींना अटक केली. या प्रकरणात पोलीस कठोर कारवाई करत आहेत."
'पोलिसांनी मदत केली'
महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, बसमधून उतरताच तिनं पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल केला होता. त्यानंतर 5 मिनिटांच्या आतच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते.
"घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी लगेचच माझं म्हणणं ऐकून घेतलं. मला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. माझ्या तक्रारीवरून तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी शक्य त्या सर्व प्रकारे मला मदत करण्याचा प्रयत्न केला. माझी वैद्यकीय चाचणी करण्यात आली. मला जेवणाबद्दल देखील विचारण्यात आलं," असं महिला म्हणाली.

फोटो स्रोत, ANI
दिल्ली पोलिसांनुसार, घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर काही तासांच्या आतच दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती.
"माझे पती अनेक वर्षांपासून गंभीर आजारी आहेत. मला 3 छोट्या मुली आहेत. माझ्या घरात कमावणारं कोणीही नाही. मी इतर कामं करण्याचा प्रयत्न केला. मात्र माझ्या कुटुंबाचा खर्च भागवू शकेन असं कोणतंही काम मला मिळालं नाही. मग काही दिवसांपूर्वीच मी हे काम सुरू केलं," असं महिलेनं सांगितलं.
"3 मुलींची आई जर घरातून बाहेर पडून सेक्स वर्कर म्हणून काम करते आहे, याचा अर्थ तिचा खूपच नाईलाज झाला असेल. कोणीही तिच्या असहायतेचा गैरफायदा घेऊ शकत नाही," असं ती महिला रडत म्हणाली.
एका प्रश्नाला उत्तर देताना ती असंही म्हणाली की, आरोपींशी तिचा कोणताही परिचय किंवा जुनी ओळख नाही.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तांकनावर प्रश्नचिन्ह
या महिलेचे पती बीबीसीला म्हणाले, "माझी पत्नी घर चालवण्यासाठी काय करते आहे, हे आमच्या घरात कोणालाही माहीत नव्हतं. तिनं मलादेखील सांगितलं नव्हतं. हे सर्व तिनं घर चालवण्यासाठी केलं."
"अनेक पत्रकार आमच्या घरापर्यंत पोहोचले. मोठ-मोठे कॅमेरे घेऊन बाहेर व्हीडिओ बनवू लागले. ते माझं आणि माझ्या पत्नीचं नाव विचारत होते. आता तिथे सर्वजण आमच्याकडे संशयानं पाहत आहेत. अशा परिस्थितीत आम्ही तिथे राहू शकू का?" असा प्रश्न या महिलेच्या पतीने विचारला.

फोटो स्रोत, ANI
या महिलेनं ठामपणे सांगितलं की, जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही, तोपर्यंत ती तिचा खटला लढवेल.
"हा फक्त माझ्या सुरक्षेचा प्रश्न नाही. माझ्यासारख्या हजारो मुलींच्या सुरक्षेशी निगडीत हा प्रश्न आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या मुलीला देखील सुरक्षेचा तितकाच अधिकार आहे, जितका इतर कोणत्याही मुलीला आहे," असं ती महिला म्हणाली.
"मला 3 मुली आहेत. मला त्यांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे. मी ज्या परिस्थितीला तोंड दिलं आहे, तशी वेळ त्यांच्यावर कधीही येऊ नये, असं मला वाटतं. जोपर्यंत माझ्या प्रकरणात कठोर शिक्षा दिली जात नाही, तोपर्यंत मी मागे हटणार नाही. मग मला पोलीस ठाण्याच्या किंवा न्यायालयाच्या कितीही चकरा माराव्या लागल्या तरी चालतील," असंही या महिलेनं नमूद केलं.
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
भारतातील न्यायालयांनी अनेकदा स्पष्ट केलं आहे की, कोणत्याही इतर नागरिकाला जितका घटनात्मक सन्मान, सुरक्षा आणि न्यायाचा अधिकार आहे, तितकाच अधिकार सेक्स वर्करला देखील आहे.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं 2022 मध्ये दिलेल्या एका महत्त्वाच्या आदेशात म्हटलं होतं की, सेक्स वर्क हा एक 'व्यवसाय' आहे. एखादी महिला निव्वळ सेक्स वर्कर आहे म्हणून त्या आधारे पोलीस किंवा समाजाला तिचे अधिकार नाकारता येणार नाहीत.
न्यायालयानं असंही म्हटलं होतं की, कोणत्याही सेक्स वर्करच्या तक्रारीला समान संवेदनशीलपणे नोंदवून घेतलं पाहिजे. तिची ओळख आणि गोपीनीयता (प्रायव्हसी) जपली पाहिजे.

फोटो स्रोत, ANI
न्यायालयानं असंही स्पष्टपणे म्हटलं होतं, "प्रत्येक महिलेला, मग तिचा व्यवसाय काहीही असो, लैंगिक हिंसाचार आणि शोषणापासून संरक्षण मिळवण्याचा अधिकार आहे."
भारताच्या कायद्यानुसार, संमतीशिवाय करण्यात आलेल्या कोणत्याही लैंगिक संबंधांना बलात्कार मानलं जातं. तसंच कोणत्याही महिलेची सेक्स वर्कर असल्यामुळे तिची संमती आहे, असं गृहित धरता येणार नाही.
सर्वोच्च न्यायालय आणि वेगवेगळ्या उच्च न्यायालयांनी त्यांच्या निकालांमध्ये असंही म्हटलं आहे की, बलात्काराच्या प्रकरणांमध्ये महिलेच्या 'चारित्र्या'वर प्रश्न उपस्थित करून किंवा तिच्या व्यवसायाचं कारण देऊन गुन्ह्याचं गांभीर्य कमी करता येणार नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्युजरूमचे प्रकाशन)

























