गृहकर्ज आणि HRA वर कर वजावटीचा लाभ एकाच वेळी घेता येतो का? जाणून घ्या '5' महत्त्वाचे मुद्दे

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अजित गढवी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 6 मिनिटे
यंदाच्या अर्थसंकल्पात, घरभाडे भत्त्या (हाऊस रेंट अलाउन्स किंवा एचआरए) बाबत एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली.
पगारदार कर्मचारी, त्यांच्या घरभाडे भत्त्याच्या (एचआरए) 50 टक्क्यांपर्यत कर सवलत किंवा कर वजावटीचा दावा ज्या शहरांमध्ये करू शकतात, अशा शहरांमध्ये यावेळेस अहमदाबादचा समावेश करण्यात आला आहे.
आतापर्यंत, दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार मेट्रो शहर किंवा महानगरांमध्ये वास्तव्यास असलेले पगारदार लोकच घरभाडे भत्त्याच्या 50 टक्क्यांपर्यत कर वजावटीच्या लाभासाठी पात्र होते. तर उर्वरित शहरांमध्ये ही मर्यादा 40 टक्के होती.
मात्र, यापुढे म्हणजे, 1 एप्रिलपासून, अहमदाबाद, हैदराबाद, पुणे आणि बंगळुरू या शहरांमध्ये राहणारे पगारदार कर्मचारीदेखील घरभाडे भत्त्यावर (एचआरए) 50 टक्क्यांपर्यंत कर वजावटीचा दावा करू शकणार आहेत.
एचआरए म्हणजे काय, त्याचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं आणि ज्या लोकांनी गृहकर्ज घेतलं आहे आणि त्याचबरोबर घरभाडंदेखील भरत आहेत, असे लोक गृहकर्जासाठीची कर वजावट आणि घरभाडे भत्ता (एचआरए) यावरील कर वजावट या दोघांचाही लाभ कशाप्रकारे घेऊ शकतात, याविषयी जाणून घेऊया.
एचआरए किंवा घरभाडे भत्ता म्हणजे काय?
करीम लखानी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आणि कर तज्ज्ञ आहेत.
"कंपनी किंवा आस्थापनांकडून कर्मचाऱ्यांना जो पगार दिला जातो, त्यात घरभाडे भत्ता किंवा एचआरएचा देखील समावेश असतो. हा पगारातील असा भाग असतो, जो घरासंदर्भातील खर्चाची पूर्तता करण्यासाठी दिला जातो. जुन्या कररचना किंवा कर प्रणाली अंतर्गत एचआरए हे कर बचत करण्याचं एक महत्त्वाचं साधनदेखील होतं," असं करीम लखानी म्हणाले.
"जर पगारदार लोक भाड्याच्या घरात राहत असतील तर घरभाडे भत्त्याच्या (एचआरए) माध्यमातून ते काही प्रमाणात प्राप्तिकरात बचत करू शकतात. मात्र जर तुम्ही स्वत:च्याच मालकीच्या घरात राहत असाल तर तुम्हाला एचआरएद्वारे मिळणाऱ्या कर वजावटीचा दावा करता येत नाही," असं करीम पुढे म्हणाले.
इथे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, एचआरएचा लाभ घेण्यासाठी तुम्ही काम करत असलेल्या कंपनी किंवा आस्थापनानं तुमच्या पगाराच्या रचनेमध्ये एचआरएचा लाभ समाविष्ट केलेला असला पाहिजे.
काही ठिकाणी, खूप अधिक पगार दिला जातो किंवा पगाराच्या रचनेमध्ये एचआरएचा उल्लेख केलेला नसतो. अशा परिस्थितीत त्या कर्मचाऱ्यांना एचआरएद्वारे कर वजावटीचा लाभ घेता येणार नाही.
जेव्हा तुम्ही गृहकर्ज घेतलेलं असतं आणि भाड्याच्या घरात राहत असता...
भारतात, अनेकजण घर विकत घेतात, त्या घराचे हफ्ते (ईएमआय) भरत असतात आणि त्याचवेळी ते घर इतरांना भाड्यानं देतात. जुन्या करप्रणालीनुसार गृहकर्जाच्या हफ्त्यांचा कर वजावटीसाठी लाभ होतो. तसंच घरभाडे भत्त्याद्वारे कर वजावटीवर देखील दावा करता येतो.
"अनेक वेळा, असं होऊ शकतं की तुम्ही तुमच्या शहरात किंवा मूळ गावी एक घर विकत घेतलं असेल आणि नोकरीसाठी तु्म्हाला दुसऱ्या शहरात राहावं लागत असेल. तिथे तुम्ही स्वत:च्या घराऐवजी भाड्याच्या घरात राहत असता," असं करीम लखानी म्हणाले.

"समजा, तुम्ही वडोदरा इथं एक घर विकत घेतलं आहे. त्यासाठी तुम्ही गृहकर्ज घेतलं आहे आणि त्याचे हफ्ते भरत आहात. नंतर नोकरीसाठी तुम्हाला अहमदाबादमध्ये येऊन राहावं लागतं," असं ते म्हणाले.
"अहमदाबादमध्ये तुम्ही स्वत:च्या मालकीचं घर घेतलं नसेल आणि तिथे तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल, तर अशा परिस्थितीत, तुम्ही एचआरएद्वारे कर वजावटीसाठी दावा करू शकता," असं ते पुढे म्हणाले.
जेव्हा तुम्ही एका घरासाठी गृहकर्जाचे हफ्ते भरत असता आणि त्याचवेळी एखाद्या भाड्याच्या घरात राहत असता, त्याचं घरभाडं भरत असता, तेव्हा तुम्हाला कर वजावटीचा लाभ घेता येतो.
करीम लखानी म्हणाले, "तुमचं स्वत:च्या मालकीचं घर आणि तुम्ही जिथे भाड्यानं राहत आहात ते घर, अशी दोन्ही घरं जरी एकाच शहरात असली तरीदेखील असं होऊ शकतं. समजा तुमचं मूल शहराच्या दूरवरच्या भागात असलेल्या शाळेत शिकत आहे."
"अशावेळी तुम्ही त्या शाळेच्या जवळ भाड्याच्या घरात राहत आहात. त्यावेळेस देखील ही परिस्थिती उद्भवू शकते. मात्र त्या बाबतीत, तुम्हाला एचआरएद्वारे कर वजावटीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांबरोबर कारणंदेखील सादर करावी लागतील,"
एचआरएसाठीच्या कर वजावटीचे नवे नियम काय आहेत?
बीबीसीशी बोलताना चार्टर्ड अकाउंटंट करीम लखानी म्हणाले, "एचआरए अंतर्गत कर वजावटीचा लाभ मिळण्याची सुविधा फक्त जुन्या कर प्रणालीमध्येच उपलब्ध आहे. नव्या कर प्रणालीमध्ये एचआरएची सर्व रक्कम करपात्र आहे."

फोटो स्रोत, Getty Images
"याशिवाय, एचआरएच्या कर वजावटीचा लाभ घेण्यासाठी, त्या कर्मचाऱ्याला भाडेकरार (लीज ॲग्रीमेंट), घरमालकाचा पॅन नंबर आणि घरभाड्याची पावती (रेंट स्लिप) या गोष्टीदेखील सादर कराव्या लागतील. याव्यतिरिक्त, घरमालकाशी असलेले नातेसंबंधदेखील स्पष्ट करावे लागतील," असं ते म्हणाले.
"सध्या, अनेक शहरांमध्ये घरभाड्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे, ज्या शहरांसाठी एचआरएसाठीच्या कर वजावटीची मर्यादा 40 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यत वाढवण्यात आली आहे, तिथे कर्मचाऱ्यांना करात बचत करण्यास मदत होईल," असं लखानी म्हणाले.
एचआरएद्वारे मिळणारी कर वजावट कशी कॅल्क्युलेट होते?
एचआरएवरील कर वजावटीचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी 3 गोष्टी विचारात घेतल्या जातात. कर्मचाऱ्याचा मूळ पगार (बेसिक सॅलरी), त्याला मिळणारा घरभाडे भत्ता (एचआरए) आणि त्याचं दर महिन्याचं घरभाडं.
एचआरएचं कॅल्क्युलेशन कसं कसं जातं हे उदाहरणासह पाहूया.
समजा,
- एखाद्या कर्मचाऱ्याचा दरमहा मूळ पगार: 30,000 रुपये आहे
- त्याला दरमहा मिळणारा एचआरए: 13,000 रुपये आहे
- त्याचं मासिक घरभाडे: 10,000 रुपये असेल
- तसंच तो कर्मचारी मेट्रो शहरात म्हणजे महानगरात राहतो असं समजू.
एचआरएद्वारे कर वजावटीचा लाभ मिळवण्यासाठी तीन रकमा लक्षात घेतल्या जातात,
1) प्रत्यक्ष मिळणारा एचआरए
13,000 रुपये × 12 = 1,56,000 रुपये (वार्षिक पातळीवर)
2) प्राप्तिकर नियमानुसार महानगरांसाठी याची मर्यादा 50 टक्के आहे.
म्हणजेच, बेसिक किंवा मूळ पगाराच्या 50% रक्कम (महानगरांसाठी),
वार्षिक मूळ पगार = 30,000 रुपये (दरमहा) × 12 = 3,60,000 रुपये.
कर वजाटीचा लाभ घेण्यासाठी या रकमेच्या 50 टक्के मर्यादा असते.
या रकमेच्या 50% रक्कम म्हणजे 1,80,000 रुपये होतात
(बिगर-मेट्रो शहरात राहणाऱ्यांसाठी ही मर्यादा 40% असतं.)
3) दिलेले घरभाडे वजा 10 टक्के बेसिक पगार
वर्षभरात दिलेले घरभाडे- 10,000 × 12 = ₹1,20,000 रुपये
बेसिक पगाराच्या 10 टक्के रक्कम- 36,000 रुपये
म्हणून 1,20,000 – 36,000 = 84,000 रुपये

फोटो स्रोत, Getty Images
मग किती कर वजावट मिळेल?
त्यासाठी पुढील तीन रकमा लक्षात घ्याव्या,
- 1,56,000 रुपये (वार्षिक एचआरए)
- 1,80,000 रुपये (वार्षिक मूळ पगाराच्या 50 टक्के रक्कम)
- 84,000 रुपये ( वार्षिक घरभाड्यातून मूळ पगाराचे 10 टक्के वजा केल्यानंतर येणारी रक्कम)
यातली सर्वात कमी रक्कम 84,000 रुपये आहे. त्यामुळे इथे 84,000 रुपये इतकी कर वजावट एचआरएवर मिळेल.
किती रक्कम करपात्र असेल?
या उदाहरणात, वर्षाकाठी एकूण एचआरए 1,56,000 रुपये आहे. तर एचआरएवरील कर वजावटीची रक्कम 84,000 रुपये होते. त्यामुळे उरलेली 72,000 रुपयांची रक्कम करपात्र ठरेल. म्हणजेच त्यावर कर भरावा लागले. या रकमेवर कर्मचाऱ्याच्या उत्पन्नाच्या संबंधित टॅक्स स्लॅबनुसार कर भरावा लागेल.
पुढील महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या :
1. एचआरएवरील कर वजावट नेहमी तीन रकमांपैकी सर्वात कमी रक्कम असते
2. "सगळ्यात जास्त रकमेवर करमाफी मिळते" हा गैरसमज आहे
3. मेट्रो आणि बिगर-मेट्रो शहरांसाठी नियम वेगळे आहेत
4. घरभाड्याचा पुरावा (घरभाड्याची पावती) आवश्यक असू शकतो
या गोष्टी लक्षात ठेवा
जर तुमचं कार्यालय किंवा कामाचं ठिकाण तुमच्या स्वत:च्या मालकीच्या घरापासून दूर असेल आणि तुम्ही ज्या घरात भाड्यानं राहत आहात ते तुमच्या कार्यालयापासून जवळ असेल, तरीदेखील तुम्ही एचआरएद्वारे कर वजावटीसाठी दावा करू शकता. मात्र त्यावेळेस तुमच्या मालकीचं घर तुम्ही स्वत: वापरत असला पाहिजे किंवा ते रिकामं असलं पाहिजे. तुमच्या मालकीचं घर तुम्ही भाड्यानं दिलेलं नसावं.
अविनाश तलरेजा चार्टर्ड अकाउंटंट आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
"तुम्ही जे घरभाडं देत आहात, त्याची कागदपत्रं, म्हणजे भाडेकरार आणि घरभाड्याच्या पावत्या, किमान 6 वर्षे जपून ठेवल्या पाहिजेत, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे संभाव्य पडताळणीच्या वेळेस तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही," असं अविनाश म्हणाले.
ज्या घरासाठी तुम्ही गृहकर्ज घेतलं आहे, त्याच घरासाठी तुम्हाला एचआरएद्वारे कर वजावटीसाठी दावा करता येणार नाही.
याव्यतिरिक्त, जर तुम्ही तुमच्या पालकांना घरभाडं देत असाल, तरीदेखील तुम्हाला एचआरएद्वारे कर वजावटीसाठी दावा करता येईल. मात्र ही रक्कम तुमच्या पालकांच्या इन्कम टॅक्स रिटर्न्स म्हणजे प्राप्तिकर विवरणपत्रात दाखवलेली असणं आवश्यक आहे.
जुनी आणि नवीन कर प्रणाली
सध्या भारतात दोन कर प्रणाली अस्तित्वात आहेत. एक म्हणजे जुनी कर प्रणाली आणि दुसरी म्हणजे नवीन कर प्रणाली. करीम लखानी यांना वाटतं की बहुतांश लोकांसाठी नवीन कर प्रणाली फायदेशीर आहे.
करीम लखानी म्हणाले, "सरकारनं नोकरदारांना त्यांच्या वार्षिक उत्पन्नानुसार कर प्रणाली निवडण्याची मुभा दिली आहे. ज्या लोकांचं वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपयांपर्यंत आहे, अशांसाठी नवीन कर प्रणाली अधिक चांगली आहे."

फोटो स्रोत, Getty Images
"जर कोणत्याही कर वजावटीसाठी दावा करण्यापूर्वी स्टँडर्ड डिडक्शन लक्षात घेतलं, तर ज्या नोकरदारांचं वार्षिक उत्पन्न 12.75 लाख रुपयांपर्यंत आहे, अशांना कोणताही प्राप्तिकर भरावा लागत नाही. मात्र जर वार्षिक उत्पन्न यापेक्षा अधिक असेल, तर अशावेळी एखाद्या आर्थिक तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केलं पाहिजे."
करीम लखानी पुढे म्हणाले, "जर तुमच्या गृहकर्जावरील वार्षिक व्याज 2 लाख रुपयांपर्यंत असेल, तसंच त्यातील मुद्दलाची परतफेड 1.50 लाख रुपयांपर्यंत असेल आणि तुम्हाला एचआरए म्हणून मोठी रक्कम मिळत असेल, तर अशा परिस्थितीत जुनी कर प्रणाली अधिक फायदेशीर ठरते."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























