'एफजीएम' : 'आजीने माझ्या नकळत बाळावर ही क्रूर प्रथा केली', अनेक समुदायांत अजूनही सुरू असलेली कुप्रथा

फोटो स्रोत, AFP via Getty Images
- Author, होसे कार्लोस कुएतो
- Role, बीबीसी न्यूज मुंडो, कोलंबिया
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
(महत्त्वाचं : या लेखात महिला जननेंद्रिय छेदन/विच्छेदन (एफजीएम-फिमेल जेनिटल म्युटिलेशन) या प्रथेबाबतचे काही अस्वस्थ करणारे वर्णन आहे.)
मागील आठवड्यात कोलंबिया हा लॅटिन अमेरिकेतील महिला जननेंद्रिय विच्छेदन (एफजीएम-फिमेल जेनिटल म्युटिलेशन) या प्रथेवर बंदी घालणारा पहिला देश ठरला आहे. कोलंबियात आता एफजीएम ही प्रथा अवैध ठरणार आहे.
महिला हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.
होसे कार्लोस कुएतो यांनी दिलेल्या वृत्तानुसार, कोलंबियाच्या संसदेत हे विधेयक एकमताने मंजूर झाले. परंतु, ही धोकादायक आणि अनेकदा गुप्तपणे केली जाणारी प्रथा बंद करण्यासाठी अनेक वर्षे संघर्ष करावा लागला, लढा द्यावा लागला.
कार्ला क्विनोनेझची मुलगी अवघी सहा महिन्यांची असताना, तिच्या पणजीने तिच्यावर महिला जननेंद्रिय विच्छेदन (एफजीएम) केलं.
क्विनोनेझ (हे तिचे खरं नाव नाही) सांगते की, जेव्हा आजीने बाळाला परत आणलं तेव्हा बाळाला ताप आला होता. तिच्या शरीराला सूज आली होती, रक्तस्राव झाल्याचं दिसत होतं आणि ती सतत रडत होती.
"मी आजीला याबाबत जाब विचारला. पण तिने हे सामान्य असल्याचं सांगितलं आणि कोणालाही याबद्दल सांगू नकोस, असं मला बजावलंही."
सर्वात जवळचं आरोग्य केंद्र खूप दूर असल्यामुळे क्विनोनेझच्या आईने, ज्या दाईचं (मिडवाईफ) काम करतात. त्यांनी औषधी वनस्पतींच्या मदतीने बाळाचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी क्विनोनेझच्या आजीलाही याबद्दल जाब विचारला. पण, आजीने त्यांचं काहीच ऐकलं नाही.
"ती म्हणाली, ज्या महिलांना क्लिटोरिस (शिश्निका- स्त्रियांच्या बाह्य जननेंद्रियाचा एक अत्यंत संवेदनशील अवयव) असते, त्यांची पुरुष खिल्ली उडवतात."
कोलंबियातील एफजीएमची प्रथा
एफजीएम म्हणजे वैद्यकीय गरज नसताना महिलेच्या बाह्य जननेंद्रियाचा काही भाग किंवा संपूर्ण भाग कापणे किंवा त्या अवयवाला इतर प्रकारची इजा करणे.
या प्रथेमुळे जास्त रक्तस्राव होणे, संसर्ग होणे यांसारख्या आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. पुढे मासिक पाळी आणि प्रसूतीच्या वेळीही अनेक अडचणी येऊ शकतात. तसेच, महिलांना लैंगिक सुखाचा अनुभव घेणंही कठीण होऊ शकतं.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, जगभरात आज जिवंत असलेल्या 23 कोटींहून अधिक महिला आणि मुलींवर महिला जननेंद्रिय छेदन (एफजीएम) करण्यात आले आहे. यापैकी बहुतांश महिला आफ्रिकेतील आहेत.

30 वर्षीय क्विनोनेझ कोलंबियात एफजीएमची ही प्रथा बंद करण्यासाठी मोहीम राबवत आहे. तिच्या एम्बेरा आदिवासी समुदायात ही प्रथा अजूनही पाळली जाते.
इतर कार्यकर्ते आणि कोलंबियाच्या काँग्रेसच्या (संसद) सदस्यांसोबत तिनेही या प्रथेवर बंदी आणण्यासाठी चालवलेल्या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.
ती सांगते की, जसजशी ती मोठी झाली, तिच्या लक्षात आलं की त्यांच्या समुदायात ही प्रथा गुप्तपणे सुरू आहे.
"जन्मानंतर काही दिवसांत मुलांच्या तुलनेत मुलींचा मृत्यू जास्त का होतो, हा प्रश्न मला नेहमी पडायचा."
"मला माझी एक लहान चुलत बहीण आठवते. तिच्या जन्मावेळी माझ्या आईनेही मदत केली होती. ती जन्माला आली तेव्हा ठणठणीत होती, परंतु अवघ्या तीन दिवसांनंतर तिचा मृत्यू झाला."
"मी आईला याबद्दल विचारलं. तेव्हा तिने सांगितलं की, त्या बाळाचा मृत्यू 'जाई' नावाच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आजारामुळे झाला होता."
'जाई' या आजारामुळे मृत्यू झाल्याचं सांगितल्या जाणाऱ्या अनेक मुलींचा मृत्यू प्रत्यक्षात एफजीएममुळे झालेल्या गुंतागुंतीमुळे झाला होता, असं क्विनोनेझला आता वाटतं.
बालरोगतज्ज्ञ काय सांगतात?
2020 ते जून 2026 या कालावधीत कोलंबियामध्ये एफजीएमची 240 प्रकरणं नोंदवली गेली. यापैकी बहुतांश मुली 6 वर्षांपेक्षाही लहान होत्या. पण, बालरोगतज्ज्ञ डायना रामोस मोस्केरा यांच्या मते, हे केवळ 'हिमनगाचं टोक' आहे. म्हणजेच, प्रत्यक्षात अनेक प्रकरणे समोरच येत नाहीत.
कोलंबियाच्या वायव्येकडील कॉफी उत्पादक भागातील पेरेरा शहरातील सॅन होर्खे विद्यापीठ रुग्णालयात काम करणाऱ्या डायना रामोस मोस्केरा सांगतात की, इतर आजारांवर उपचारासाठी आलेल्या लहान मुलींची तपासणी करताना त्यांना जखमांचे व्रण, भाजल्याच्या खुणा आणि छेदनाची चिन्हे अनेकदा दिसली आहेत.

फोटो स्रोत, Courtesy of Diana Ramos / Photo by David Jiménez
त्यांना एक अशी मुलगी आठवते, जिच्या योनीचं तोंड जवळपास पूर्णपणे बंद झालं होतं. त्यामुळे मोठी झाल्यावर तिला मासिक पाळी येणं आणि लैंगिक संबंध ठेवणं अशक्य झालं असतं.
"तिच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करून तो भाग पूर्ववत करावा लागला," असं डॉ. रामोस सांगतात.
त्यांच्या मते, एफजीएम हा महिलांवरील लैंगिक आणि लिंगभेदावर आधारित हिंसाचाराचा एक प्रकार आहे. त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. पण, ही प्रथा थांबवण्यासाठी केवळ शिक्षा करून चालणार नाही, तर लोकांमध्ये जागरूकता आणि शिक्षणाच्या माध्यमातून उपाय करणं गरजेचं आहे.
"या समुदायातील काही लोकांना ते काही चुकीचं किंवा नुकसान करत नाहीत, असं वाटतं," असं त्या सांगतात.
'संस्कृती जीव घेत नाही'
सुमारे 3 लाख लोकसंख्या असलेला ग्रेट एम्बेरा समुदाय हा कोलंबियातील सर्वात मोठ्या आदिवासी समुदायांपैकी एक आहे. या समुदायातील लोक कोलंबियासोबतच इक्वेडोर आणि पनामा या देशांमध्येही दिसून येतात.
लॅटिन अमेरिकेतील इतर भागांत ही प्रथा जवळपास दिसत नाही, परंतु एम्बेरा समुदायात ती का पाळली जाते, याबाबत एक मत आहे. आफ्रिकेतील देशांमधून गुलाम म्हणून आणलेल्या लोकांमुळे ही प्रथा या समुदायात आली असावी, असं काही संशोधकांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, José Carlos Cueto / BBC Mundo
यामुळे रिसाराल्डा, चोको आणि व्हाये डेल काउका या भागांत ही प्रथा अधिक का आढळून येते, याचंही स्पष्टीकरण मिळू शकतं. या भागांमध्ये मोठ्या संख्येने आफ्रो-कोलंबियन लोक राहतात किंवा हे भाग त्यांच्या परिसराला लागून आहेत.
यामागे आणखी एक असा मतप्रवाहही सांगितला जातो. शेकडो वर्षांपूर्वी इंटरसेक्स (स्त्री-पुरुष अशी स्पष्ट शारीरिक वैशिष्ट्ये नसलेल्या) बाळाचा जन्म झाल्यानंतर या समुदायात क्लिटोरिसबद्दल भीती निर्माण झाली. त्यामुळे आजही अनेक वयोवृद्ध महिलांना तो कापला नाही, तर पुढे त्याचं पुरुषाच्या जननेंद्रियात रूपांतर होईल, असा समज आहे.
काही जणांच्या मते, ही प्रथा पुरुषप्रधान विचारसरणीतून आली आहे. महिलेला लैंगिक आनंद देणारा अवयव असेल, तर ती अधिक लैंगिक संबंध ठेवेल, असा चुकीचा समज यामागे आहे.
ही प्रथा कशी सुरू झाली याबद्दल वेगवेगळी मतं असली, तरी ग्रेट एम्बेरा नेशनच्या नॅशनल कॉन्फेडरेशनच्या कायदेशीर प्रतिनिधी आणि आदिवासी सल्लागार ज्युलियाना डोमिको या मात्र ही प्रथा त्यांच्या संस्कृतीचा भाग असल्याचं मान्य करत नाहीत.
"आपली संस्कृती म्हणजे आपले पारंपरिक कपडे, हस्तकला, नृत्य आणि भाषा. जीव घेणारी ही प्रथा आपल्या संस्कृतीचा भाग नाही. संस्कृती कधीही जीव घेत नाही."
त्या सांगतात की, हा कायदा अनेक वर्षांच्या जनजागृती आणि सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे अस्तित्वात आला आहे. "आता या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, त्यासाठी सरकारने ठोस धोरण तयार करावं आणि पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आमची अपेक्षा आहे."
धमक्या आणि विरोध
क्विनोनेझ ही प्रथा बदलण्यासाठी सातत्याने आवाज उठवत आहे. पण, त्यासाठी तिला अनेक धमक्या मिळाल्या असून, त्यापैकी बहुतांश धमक्या पुरुषांकडून आल्याचं ती सांगते.
परंपरेनुसार पुरुषांना या प्रथेबद्दल माहिती नसावी, अशी समजूत आहे. पण, ही प्रथा बंद करण्याबाबत चर्चा अनेकदा पुरुष नेत्यांशीच करावी लागते. कारण एम्बेरा समुदायातील अनेक महिलांना केवळ त्यांची एम्बेरा ही आदिवासी भाषा येते आणि त्यांना स्पॅनिश भाषा येतच असेल असं नाही.

यामुळे अनेक महिलांना आपल्या बाळासाठी डॉक्टरांची मदत घेण्यापासूनही रोखलं जाऊ शकतं. क्विनोनेझच्या मते, काही आरोग्य कर्मचाऱ्यांना या प्रथेबद्दल पुरेशी माहिती नसते किंवा ते महिलांकडे पूर्वग्रहाने पाहत असल्याने ही समस्या जास्त गंभीर बनते.
ती सांगते की, माझ्या मुलीला मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे (युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन) ताप आला होता. तेव्हा मी तिला रुग्णालयात घेऊन गेली. पण तेथील एका नर्सने मला 'तुम्ही रानटी आहात' अशा शब्दांत सुनावलं आणि 'तुमच्या कर्माचीच शिक्षा तुम्हाला मिळाली आहे,' असंही म्हटलं.
"माझ्या मुलीचा ताबा माझ्याकडून काढून घेऊन तिला बालकल्याण विभागाच्या ताब्यात दिलं जाईल, अशी धमकीही मला देण्यात आली."
"तेव्हापासून, मी शक्यतो माझ्या मुलीला रुग्णालयात नेत नाही. मी औषधी वनस्पती आणि औषधांच्या मदतीने तिच्यावर उपचार करते. मी तिला कधीही एकटं सोडत नाही."
'संवादाशिवाय पर्याय नाही'
क्विनोनेझ सांगते की, एम्बेरा समुदायात आता बदल घडत आहेत. महिलांमध्ये एफजीएम ही प्रथा सुरू ठेवावी की नाही, यावर आपापसात चर्चा होताना दिसत आहे.
ती म्हणते की, एका आजीने आपल्या नातींवर एफजीएम करण्याच्या अनुभवावर मत मांडलं, तेव्हा तिचं मन हेलावलं.
त्या आजीने सांगितलं की, "तिने हे कधीही वाईट हेतूने केलं नव्हतं. पुरुषांनी आपल्या नातींवर टीका करू नये, एवढ्याच उद्देशाने हे केलं होतं."

फोटो स्रोत, AFP via Getty Images
ती म्हणते की, वेगळ्या पद्धतीने जीवनाबद्दल चर्चा करणं वेदनादायक असू शकतं. "ज्या महिलांनी क्लिटोरिस शिवाय आयुष्य जगलं आहे, त्यांना वेगळं शरीर कसं असू शकतं, याची कल्पनाही करता येत नाही."
भविष्यात एक दिवस आपल्या मुलीशी याबद्दल बोलणंही तिच्यासाठी कठीण असेल. "पण ही चर्चा टाळता येणार नाही," असंही ती म्हणते.
"आपल्या सर्वांना आपल्या शरीराविषयी माहिती असण्याचा आणि त्याबद्दल कोणतीही लाज किंवा संकोच न बाळगता बोलण्याचा अधिकार आहे."
(या लेखातील चित्रे बीबीसी मुंडोच्या व्हिज्युअल जर्नालिझम टीममधील डॅनियल आर्से यांनी तयार केली आहेत.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
























