दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या 4 सैनिकांचा मृत्यू, आयडीएफने आणखी काय सांगितलं?

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, HAZEM BADER / AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या 4 सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर 2 जण जखमी झाले (प्रातिनिधिक छायाचित्र)
वाचन वेळ: 3 मिनिटे

दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या 4 सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर 2 जण जखमी झाले. इस्रायल संरक्षण दलाने (आयडीएफ) टेलिग्रामवर प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात ही माहिती दिली.

आयडीएफच्या म्हणण्यानुसार, 2 सैनिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 1 'गंभीर जखमी' आहे, तर दुसरा एक राखीव सैनिक 'जखमी' झाला आहे.

संयुक्त राष्ट्रानं (यूएन) म्हटलं की, दक्षिण भागात लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम दलाच्या (UNIFL) 3 शांतता सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना, आयडीएफने म्हटलं, "या घटनेमागे हिजबुल्लाह आहे की आयडीएफ हे निश्चित करण्यासाठी त्यांची सखोल चौकशी केली जात आहे."

आयडीएफनं पुढं म्हटलं, "हे लक्षात घेण्यासारखं आहे की, या घटना सक्रिय संघर्ष सुरू असलेल्या भागात घडल्या आहेत. त्यामुळे शांतता सैनिकांना इजा झालेल्या या घटना आयडीएफमुळे घडल्या असं गृहीत धरणं योग्य ठरणार नाही."

डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट चर्चेत; इराणवरील ताज्या हल्ल्याचा व्हीडिओ केला शेअर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर एक व्हीडिओ शेअर केला असून, त्यामध्ये इराणवर झालेल्या ताज्या हल्ल्याचे दृश्य दिसत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये फक्त व्हीडिओ शेअर केला आहे. त्यांनी त्यावर काहीही लिहिलेलं नाही. हा व्हीडिओ इराणमधील नेमक्या कोणत्या ठिकाणाचा आहे, हेही त्यांनी सांगितलेलं नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर एक व्हीडिओ शेअर केला

फोटो स्रोत, Getty Images/Donald Trump

फोटो कॅप्शन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर एक व्हीडिओ शेअर केला

हा व्हीडिओ इराणमधील इस्फहान शहरावर हल्ल्याचा आहे, असा सोशल मीडियावर दावा केला जात आहे.

याआधी सोमवारी ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याचं कौतुक करत लिहिलं होतं की, "इराणमध्ये मोठा दिवस. आमच्या महान सैन्य दलाने अनेक महत्त्वाची ठिकाणं उद्ध्वस्त केली. आमचे सैन्य जगात सर्वात उत्तम आणि शक्तिशाली आहे."

दरम्यान, वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार डोनाल्ड ट्रम्प हे होर्मुजची सामुद्रधुनी मोठ्या प्रमाणात बंद राहिली तरीही लष्करी कारवाई थांबवण्यासाठी तयार होऊ शकतात.

दुबई बंदरावर इराणच्या हवाई हल्ल्यानंतर कुवैतच्या तेलवाहू जहाजाला आग

जहाजावरील सर्व 24 कर्मचारी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे (प्रातिनिधिक छायाचित्र)

फोटो स्रोत, Mostafa Alkharouf/Anadolu via Getty Images

फोटो कॅप्शन, जहाजावरील सर्व 24 कर्मचारी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे (प्रातिनिधिक छायाचित्र)

दुबई बंदरावर इराणच्या हवाई हल्ल्यामुळे कुवैतच्या तेलवाहू जहाजाला आग लागली, अशी माहिती संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) अधिकाऱ्यांनी दिली.

बीबीसी पर्शियनच्या वृत्तानुसार, सागरी अग्निशमन पथके आग नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. जहाजावरील सर्व 24 कर्मचारी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.

रिव्होल्युशनरी गार्डशी संबंधित माध्यमांनीही कुवैतच्या तेलवाहू जहाजाला लक्ष्य करण्यात आल्याचे वृत्त दिले आणि जहाजाचे फोटो प्रसिद्ध केले.

"जर तेहरानने कराराचे पालन केले नाही आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली, तर इराणच्या वीज, तेल आणि ऊर्जा सुविधांना लक्ष्य केले जाईल," असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्यानंतर काही तासांतच जहाजावरील हा हल्ला झाला आहे.

यापूर्वी, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले होते, "इराणचे हल्ले पर्शियन आखाती देशांवर नाहीत, तर अरब आणि इराणी लोकांचा आदर न करणाऱ्या 'शत्रू आक्रमकांवर' आहेत."

त्यांनी सौदी अरेबियाला आपल्या भूभागातून अमेरिकी सैन्याला हाकलून देण्याचे आवाहनही केले.

(इराण युद्धाशी संबंधित ही स्टोरी सतत अपडेट होत आहे.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)