You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शेतीसाठी बैलजोडी नेताना कथित गोरक्षकांनी अडवलं, लातूर पोलिसांनी शेतकऱ्यावरच दाखल केला गुन्हा
- Author, मुस्तान मिर्झा
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
सध्या देशात इंधनाचा तुटवडा असल्याचे वृत्त सातत्याने प्रसारमाध्यमांमधून येत आहे. मराठवाड्यात डिझेल मिळत नसल्याने पेट्रोल पंपावर मोठी झुंबड उडाल्याचेही दिसून आले.
काही ठिकाणी शेती कामासाठी पुन्हा बैलांचा वापर सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
याच दरम्यान शेती कामासाठी बैल खरेदी करून गावाकडे निघालेल्या एका शेतकऱ्याला कथित गोरक्षकांनी त्रास दिला आणि त्यात पोलिसांनी घेतलेल्या विचित्र भूमिकेमुळे या शेतकऱ्याला मोठ्या मनस्तापालाही सामोरं जावं लागलं आहे.
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील अरजखेडा येथील भीमराव सूर्यवंशी असं या शेतकऱ्याचं नाव असून त्यांनी पाटोदा येथील बाजारातून बैलांची खरेदी केली होती.
आपल्या मुलाच्या सोबतीने बैलांना आपल्या गावाकडे घेऊन जात असताना त्यांना या प्रसंगाचा सामना करावा लागला.
ही बैलजोडी कत्तलखान्यात घेऊन जात असल्याचा आरोप या कथित गोरक्षकांनी केला. कागदपत्रे दाखवूनही ते ऐकायला तयार नव्हते. मदतीसाठी पोलिसांना बोलावलं.
पण नंतर पोलिसांनीच भीमराव सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल केला. काही सामाजिक आणि राजकीय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सूर्यवंशी यांच्याबाबत घडलेल्या प्रकारावरून आवाज उठवला.
अखेरीस, पोलिसांनी या शेतकऱ्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घेतला आहे. पोलिसांच्या भूमिकेबद्दल ही आता चर्चा होताना दिसत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
शेतातील कामासाठी बैलांची गरज असल्याने अरजखेडा येथील शेतकरी भीमराव सूर्यवंशी हे पाटोदा येथील बाजारात बैल खरेदीसाठी गेले. त्यांनी तेथून बैलजोडी खरेदी केली. यासाठी आवश्यक कागदपत्रंही घेतली.
सूर्यवंशी यांच्याबरोबर त्यांचा मुलगा महेश हा देखील होता. चांगली बैलजोडी मिळाल्याने आनंदात असलेल्या सूर्यवंशी पिता-पुत्रांना मात्र पुढे आलेला अनुभव अत्यंत भयानक होता.
याबाबत महेश सूर्यवंशी यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, "आम्ही शेती कामासाठी पाटोद्याच्या बाजारातून बैलजोडी घेतली होती. वाहन न मिळाल्याने आम्ही ती बैलं घेऊन चालतच निघालो."
चालत येत असल्यामुळे रात्री उशीर झाला होता. रात्री 11 ते 11.30 च्या सुमारास आम्हाला खोपेगाव चौकात बजरंग दलाच्या काही पदाधिकाऱ्यांनी अडवलं आणि चौकशी सुरू केली. "बैल कुठे नेताय?" "कशासाठी नेताय?" असे प्रश्न विचारत आम्हाला खूप वेळ थांबवून घेतलं.
त्यानंतर पुढे आल्यानंतर लातूरमधील राजीव गांधी चौकात आम्हाला पुन्हा अडवलं. यावेळी तिथं तरुणांची संख्या वाढली होती. त्यांनाही कागदपत्रं दाखवली. पण तणाव वाढत चालला होता, त्यांची जास्त संख्या असल्याने पोलीस हेल्पलाइनला फोन करून माहिती दिली.
"पोलिसांनाही आवश्यक ती सर्व कागदपत्रे दाखवली, आमचे आधारकार्ड दाखवले. त्यांनी आम्हाला विवेकानंद पोलीस ठाण्यात आणलं. आम्हाला अडवणारे सर्वजण दारूच्या नशेत होते," असं महेश सूर्यवंशी म्हणाले.
परंतु, शेतकऱ्याला अडवणाऱ्यांवर कारवाई न करता बैलजोडी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांवरच गुन्हा दाखल करून जनावरे गोरक्षणात पाठवण्यात आले.
'मी माळकरी, खाटीक व्यवसाय का करू?'
दरम्यान, शेतकरी भीमराव सूर्यवंशी यांनी मात्र या संपूर्ण प्रकारावर नाराजी व्यक्त केली.
ते म्हणाले की, "औसाच्या पुढे आल्यावर आम्हाला अडवलं. ते आमचं ऐकायलाच तयार नव्हते. मी माळकरी आहे, खाटीक व्यवसाय का करू?"
"नंतर पोलिसांना फोन केला. पोलिसांनी आम्हाला पोलीस ठाण्यात आणलं. बैलं बांधली आणि कागदपत्रांवर सह्या करण्यास सांगितलं. आमच्याकडे कागदपत्रं असतानाही तुम्ही असं का करताय म्हणून विचारलं. पण त्यांनी आमचं ऐकलं नाही. आमच्यावर गुन्हा दाखल केला आणि बैलं गोरक्षकांकडे दिली."
"एफआयआर कॉपी पण दिली नाही. पुरावे असतानाही आमची बैलं गोरक्षकांना दिली. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे," असं उद्विग्न होत त्यांनी म्हटलं.
पोलिसांनी अखेर गुन्हा मागे घेतला
दरम्यान, काही सामाजिक आणि राजकीय संघटनेचे कार्यकर्ते सूर्यवंशी यांच्यासाठी समोर आले. शिवसेनेचे कुलदीप सूर्यवंशी यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली. सर्वसामान्य शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला तर गोरक्षकांविरोधात आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.
ते म्हणाले की, स्वतःला गोरक्षक म्हणवणाऱ्या या लोकांनी दारू पिऊन सूर्यवंशी पिता-पूत्रांना अडवलं होतं. पोलिसांकडे तक्रार करूनही बैलांना सोडण्यात आलं नाही. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. यांना गाड्या अडवण्याचा अधिकार कोण दिला? गोरक्षकाच्या नावावर काळे धंदे करणाऱ्यांविरोधात आम्ही आवाज उठवू, असं ते म्हणाले.
अखेरीस पोलिसांनी सूर्यवंशी यांच्या विरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द केला आहे. विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी बीबीसी मराठीला ही माहिती दिली.
ते म्हणाले की, "सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, पोलिसांनी सर्व पडताळणी केली असता बैलजोडी ही शेतकरी आपल्या शेतकामासाठी घेऊन जात होते, तशी सर्व कागदपत्रं त्यांनी सादर केले. त्यामुळे शेतकऱ्यावरील गुन्हा रद्द करण्यात आला आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)