अर्जेंटिना वि. इंग्लंड : 'हँड ऑफ गॉड', कान ओढण्याचा प्रकार आणि फॉकलंड युद्ध; दोन कट्टर स्पर्धकातला गेल्या 60 वर्षांचा संघर्ष

मायकल ओव्हन डिएगो मॅराडोना, डेव्हिड बॅकहम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मायकल ओव्हन डिएगो मॅराडोना, डेव्हिड बॅकहम
    • Author, अँडी क्रायर
    • Role, बीबीसी स्पोर्ट्स जर्नलिस्ट
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

विश्वचषकाची उपांत्य फेरी. इंग्लंड विरुद्ध अर्जेंटिना सामना. पिढ्यानपिढ्या लक्षात राहील अशी एक पारंपारिक लढत.

या सामन्याचं महत्त्व शब्दांत सांगणं खूप कठीण आहे.

बुधवारी (15 जुलै) अटलांटा येथे लिओनेल मेस्सी आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. इंग्लंडची 60 वर्षांची प्रतीक्षा संपवण्यापासून रोखण्याचे उद्दिष्ट सध्याचा विश्वविजेता अर्जेंटिनाचे असेल.

विश्वचषकात इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यातील या रंगतदार लढतींची सुरूवात 1962 पासून झाली. तेव्हापासून या सामन्यांमध्ये शानदार गोल, वाद आणि रेड कार्ड्ससारखे अनेक नाट्यमय क्षण पाहायला मिळाले आहेत.

पण ही चुरस किंवा वैर केवळ फुटबॉलच्या मैदानापुरतं मर्यादित नाही. विशेषतः 1980 च्या दशकातील फॉकलंड युद्धामुळे दोन्ही देशांमध्ये राजकीय तणाव निर्माण झाला होता. आजही अर्जेंटिनाचे खेळाडू आणि चाहते आपल्या फुटबॉलच्या गाण्यांमध्ये या संघर्षाचा उल्लेख करतात.

इंग्लंडच्या इतिहासातील एका सर्वात मोठ्या सामन्यापूर्वी बीबीसी स्पोर्ट्सने विश्वचषकातील इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यातील जुन्या पारंपारिक फुटबॉल लढतींचा आढावा घेतला आहे.

अनेकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की, विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये झालेल्या 5 सामन्यांमध्ये इंग्लंडचं पारडं जड राहिलेलं आहे.

या दोन्ही संघांचा विश्वचषकातील शेवटचा सामना 2002 मध्ये झाला होता. त्यामुळे दोन्ही देशांतील तरुण पिढीच्या एका मोठ्या वर्गाला कदाचित या जुन्या फुटबॉल संघर्षाची माहितीही नसेल. म्हणूनच बीबीसी स्पोर्ट्सने गेल्या 6 दशकांतील या संघर्षाचा आढावा घेतला आहे.

1962: इंग्लंड 3-1 अर्जेंटिना (रँकागुआ, चिली - ग्रुप स्टेज)

भविष्यात जे काही घडणार होतं, त्याच्या तुलनेत हा सामना खूपच शांतेत झाला.

सामन्याच्या सुरुवातीलाच इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेतली होती. ही आघाडी अर्जेंटिनाला भरून काढता आली नाही. अखेरच्या क्षणी अर्जेंटिनाला एक गोल करता आला.

7 जून 1962 - रानकागुआत वर्ल्ड कप फुटबॉल मॅचमध्ये इंग्लंडने अर्जेंटिना 3-1 ने हरवले होते

फोटो स्रोत, Keystone/Getty Images

फोटो कॅप्शन, 7 जून 1962 -रँकागुआत वर्ल्ड कप फुटबॉल मॅचमध्ये इंग्लंडने अर्जेंटिना 3-1 ने हरवले होते

दोन्ही संघांनी ग्रुप स्टेजचा शेवट प्रत्येकी एक विजय, एक बरोबरी आणि एक पराभव अशा कामगिरीने केला. परंतु, गोल फरकामुळे इंग्लंडने अर्जेंटिनाला मागे टाकत पुढच्या फेरीत जागा बनवली.

उपांत्यपूर्व फेरीत म्हणजेच क्वार्टर फायनलमध्ये ब्राझीलने इंग्लंडला स्पर्धेबाहेर केलं.

1966: इंग्लंड 1-0 अर्जेंटिना (वेम्बली, इंग्लंड - उपांत्यपूर्व फेरी)

हा तोच क्षण होता का, जेव्हा इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यातील फुटबॉल वैर खऱ्या अर्थाने अधिक तीव्र झालं?

कदाचित, हो.

उपांत्यपूर्व फेरीत दोन्ही संघ आमनेसामने आले होते. अर्जेंटिना आजपर्यंत दावा करत आली आहे की, त्या सामन्यात त्यांच्यावर अन्याय झाला होता आणि जिओफ हर्स्टने केलेला विजयी गोल ऑफसाइड होता.

पण वाद तिथेच थांबला नाही. अवघ्या 3 मिनिटांच्या कालावधीत घडलेल्या दोन घटनांनंतर, सामन्याच्या 33 व्या मिनिटाला अर्जेंटिनाचा कर्णधार अँटोनियो रॅटिन याला रेड कार्ड दाखवण्यात आलं होतं.

पहिली घटना इंग्लंडचा खेळाडू बॉबी चार्ल्टनला खाली पाडण्याची होती. तर दुसरी घटना जर्मन रेफ्री रुडॉल्फ क्राइटलाइन यांच्याशी वारंवार वाद घालण्याची होती.

रॅटिनने मैदान सोडण्यास नकार दिला, त्यामुळे सामना साधारण 8 मिनिटं थांबला होता.

अत्यंत तणावपूर्ण वातावरणात झालेल्या या सामन्यात इंग्लंडने आपली आघाडी कायम ठेवली. इंग्लंडचे प्रशिक्षक अल्फ रॅम्से यांनी अर्जेंटिनाच्या संघाचं वर्णन 'जनावर' असं केलं.

सामना संपल्यानंतर जर्मन रेफ्री क्रेटलिन यांना पोलिसांच्या संरक्षणात मैदानाबाहेर नेण्यात आलं.

फोटो स्रोत, Keystone-France/Gamma-Keystone via Getty Images

फोटो कॅप्शन, सामना संपल्यानंतर जर्मन रेफ्री क्रेटलिन यांना पोलिसांच्या संरक्षणात मैदानाबाहेर नेण्यात आलं. इंग्लंड आणि अर्जेंटिनाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्यांनी अर्जेंटिनाचा खेळाडू अँटोनियो रॅटिनला मैदानाबाहेर पाठवलं होतं. त्यामुळे स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

1966 च्या विश्वचषक विजेत्या इंग्लंडच्या संघातील डिफेंडर जॉर्ज कोहेन यांनी 2009 मध्ये 'द गार्डियन'ला दिलेल्या मुलाखतीत या सामन्याच्या काही आठवणी सांगितल्या.

ते म्हणाले, "टॅकल करणं ठीक आहे. पण काही खेळाडू अत्यंत खालच्या पातळीवरच्या गोष्टी करत होते. ते थुंकत होते, मानेच्या मागचे केस ओढत होते, कान खेचत होते."

"आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांच्या युक्त्यांचा आमच्यावर काहीच परिणाम होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अशा गोष्टी सुरू केल्या, ज्या मी यापूर्वी कधीच पाहिल्या नव्हत्या."

"मला सर्वात जास्त वाईट याच गोष्टीचं वाटतं की, ते ज्या दर्जाचा खेळ खेळू शकत होते, तसा खेळ त्यांनी खेळलाच नाही. कदाचित आम्ही हरलोही असतो, पण त्यांनी आपला नैसर्गिक किंवा खरा खेळ दाखवायला हवा होता."

असं मानलं जातं की, या सामन्यानंतरच रेड आणि यलो कार्डांची संकल्पना सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. 1970 च्या मेक्सिको विश्वचषकात या कार्ड्सचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला. त्याआधी रेफ्री खेळाडूंना केवळ तोंडी ताकीद देत असत.

1959 ते 1969 या काळात अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व करणारे आणि 1962 व 1966 चे विश्वचषक खेळलेले अँटोनियो रॅटिन यांचं शनिवारी (11 जुलै) वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं.

1986: अर्जेंटिना 2-1 इंग्लंड (मेक्सिको सिटी, मेक्सिको - उपांत्यपूर्व फेरी)

'हँड ऑफ गॉड'. आहा!

हा उपांत्यपूर्व सामना फॉकलंड युद्धाच्या अवघ्या 4 वर्षांनी झाला होता. त्या युद्धात इंग्लंड आणि अर्जेंटिना आमनेसामने आले होते. त्यामुळे हा सामना केवळ फुटबॉलपुरता मर्यादित नव्हता, तर दोन्ही देशांतील तीव्र राजकीय तणावही त्यामागे होता.

अर्जेंटिनातील प्रसारमाध्यमं आणि लोकांनी या सामन्याकडे फॉकलंड युद्धावर आपला राग व्यक्त करण्याची संधी म्हणून पाहिलं. तर ब्रिटनमधील प्रसारमाध्यमांनीही राष्ट्रवादाची भाषा वापरून दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढवला.

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या पत्रकार लॉर्डेस हेरेडिया त्या वेळी अझ्टेका स्टेडियममध्ये उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, "माझ्या वडिलांना त्यांची 'लाडकी मुलगी' तिथे जावी असं वाटत नव्हतं."

"अर्जेंटिना आणि इंग्लंडच्या चाहत्यांमध्ये तणाव वाढू शकतो, अशी त्यांना भीती होती. पण माझ्या आईने मात्र अजिबात संकोच केला नाही. कारण ही आयुष्यात एकदाच मिळणारी संधी होती."

या सामन्याने इंग्लंडच्या फुटबॉल चाहत्यांना आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण दिला. दिएगो मॅराडोनाच्या अफलातून प्रतिभेमुळे अर्जेंटिनाला आघाडी मिळाली.

पण हा गोल त्याने पायाने नाही, तर आपल्या हाताने केला.

उपांत्यपूर्व फेरीतील या सामन्यात दिएगो मॅराडोनाने इंग्लंडचा गोलरक्षक पीटर शिल्टनपेक्षा उंच उडी मारत हाताने चेंडू जाळ्यात ढकलला. हा गोल पुढे 'हँड ऑफ गॉड' म्हणून प्रसिद्ध झाला.

फोटो स्रोत, Allsport/Getty Images

फोटो कॅप्शन, उपांत्यपूर्व फेरीतील या सामन्यात दिएगो मॅराडोनाने इंग्लंडचा गोलरक्षक पीटर शिल्टनपेक्षा उंच उडी मारत हाताने चेंडू जाळ्यात ढकलला. हा गोल पुढे 'हँड ऑफ गॉड' म्हणून प्रसिद्ध झाला.

अर्जेंटिनाचा 10 व्या क्रमांकाचा स्टार खेळाडू मॅराडोनाने इंग्लंडचा गोलरक्षक पीटर शिल्टनबरोबर चेंडूपर्यंत पोहोचण्यासाठी उंच उडी मारली. त्या वेळी मॅराडोनाने कुणाच्याही लक्षात न येऊ देता हाताने चेंडू रिकाम्या गोलमध्ये ढकलला.

त्या काळात व्हीएआर असता, तर!

त्यानंतर मॅराडोनाने विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलपैकी एक केला. त्याने इंग्लंडच्या अर्ध्या संघाला चकवत गोलरक्षक पीटर शिल्टनलाही मागे टाकलं आणि चेंडू गोलमध्ये पाठवत अर्जेंटिनाची आघाडी दुप्पट केली.

हेरेडिया म्हणाल्या, "जेव्हा मी अर्जेंटिनात काम करत होते, तेव्हा लोक नेहमी 'हँड ऑफ गॉड' गोलबद्दल बोलायचे. पण त्यामुळे मॅराडोनाने केलेला दुसरा अप्रतिम गोल अनेकदा दुर्लक्षित राहतो. तो गोल इतका सुंदर होता की त्यावर विश्वास ठेवणं जवळपास कठीणच होतं."

सामन्याच्या अखेरीस इंग्लंडचा स्टार खेळाडू गॅरी लिनेकरने एक गोल केला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर वादग्रस्त परिस्थितीत इंग्लंडचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं.

मॅराडोनाने 2005 मध्ये याबद्दल माफी मागितली. परंतु, शिल्टनने त्याची माफी स्वीकारली नाही.

अर्जेंटिनाने अंतिम सामन्यात पश्चिम जर्मनीचा पराभव करत विश्वचषकही जिंकला. यामुळे इंग्लंडच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखंच झालं.

1998: अर्जेंटिना 2-2 इंग्लंड (पेनल्टीमध्ये अर्जेंटिना 4-3 ने विजयी, फ्रान्स - अंतिम 16)

हा तोच सामना होता, जो डेव्हिड बेकहॅम कधीच विसरू शकणार नाही.

हा सामना इंग्लंडचा डेव्हिड बेकहॅमने अर्जेंटिनाच्या दिएगो सिमियोनेला मारलेली लाथ आणि त्यानंतर त्याला मिळालेल्या रेड कार्डमुळे आजही कायम लक्षात ठेवला जातो.

सुरुवातीला गॅब्रिएल बॅटिस्टुटा आणि ॲलन शिअरर यांनी पेनल्टीवर गोल केले. त्यानंतर मायकेल ओव्हनने इंग्लंडसाठी विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलांपैकी एक गोल करत इंग्लंडला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.

मायकेल ओव्हनने अर्जेंटिनाच्या बचावफळीला (डिफेन्स) चकवत एक उत्कृष्ट वैयक्तिक गोल केला. पण, पहिल्या हाफच्या अखेरच्या क्षणी चतुराईने घेतलेल्या फ्री-किकवर झेवियर झॅनेटीने गोल करत अर्जेंटिनाला बरोबरी मिळवून दिली.

अर्जेंटिनाचा फॉरवर्ड गॅब्रिएल बॅटिस्टुटाने, पहिल्या हाफच्या अखेरच्या क्षणी झेवियर झॅनेटीने केलेल्या गोलाचा आनंद साजरा करताना.

फोटो स्रोत, GERARD MALIE / AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, अर्जेंटिनाचा फॉरवर्ड गॅब्रिएल बॅटिस्टुटाने, पहिल्या हाफच्या अखेरच्या क्षणी झेवियर झॅनेटीने केलेल्या गोलाचा आनंद साजरा करताना.

बेकहॅमला रेड कार्ड मिळाल्यानंतरही इंग्लंडने हार मानली नाही आणि शेवटपर्यंत जोरदार लढत दिली. 81 व्या मिनिटाला सोल कॅम्पबेलने हेडरवर गोल केला. त्यामुळे त्याला इंग्लंड जिंकली असल्याचं वाटलं, परंतु धक्का दिल्याचे कारण देत रेफ्रीने तो गोल अमान्य केला.

सामन्याचा निकाल अखेर पेनल्टी शूटआउटपर्यंत गेला. इंग्लंडच्या डेव्हिड बॅटी आणि पॉल इन्स यांची पेनल्टी हुकल्याने अर्जेंटिनाने सामना जिंकला. पण, पुढच्या फेरीत नेदरलँड्सने अर्जेंटिनाचं आव्हान संपुष्टात आणलं.

'मी फक्त इतकंच म्हणेन की, रेफ्री आमच्या सापळ्यात अडकला,' असं वक्तव्य एक वर्षानंतर करून सिमियोनेने या वादाला पुन्हा तोंड फोडले.

"त्यांच्यासाठी ते टाळणं खूप कठीण होतं. कारण मीही तसाच पडलो आणि अशा वेळी सामन्यात खूप तणाव असतो."

"माझ्यामुळे यलो कार्डाचं रेड कार्डमध्ये रूपांतर झालं, असं तुम्ही म्हणू शकता. पण खरं तर त्यासाठी यलो कार्ड हीच योग्य शिक्षा होती."

2002: इंग्लंड 1-0 अर्जेंटीना (सप्पोरो, जपान - ग्रुप स्टेज)

हा सामना डेव्हिड बेकहॅमच्या दमदार पुनरागमनासाठी लक्षात ठेवला जाईल.

इंग्लंडचा कर्णधार असलेल्या डेव्हिड बेकहॅमने पेनल्टीवर सामन्यातील एकमेव गोल केला. मायकेल ओव्हनला मॉरिसिओ पोचेटिनोने पाडल्यानंतर इंग्लंडला ही पेनल्टी मिळाली होती.

ग्रुप स्टेजमध्ये पहिल्या सामन्यात स्वीडन विरुद्धचा सामना ड्रॉ झाल्यानंतर इंग्लंडसाठी हा विजय खूपच महत्त्वाचा होता.

ग्रुपमधील शेवटच्या सामन्यात इंग्लंडने नायजेरियाविरुद्ध गोलशून्य बरोबरी साधली आणि पुढील फेरीत प्रवेश केला. परंतु, स्वीडनविरुद्ध 1-1 अशी बरोबरी करणाऱ्या अर्जेंटिनाला 1962 नंतर प्रथमच बाद फेरीपूर्वीच स्पर्धेबाहेर जावं लागलं.

अंतिम 16 मध्ये इंग्लंडने डेन्मार्कचा पराभव करून पुढची फेरी गाठली. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत ब्राझील आणि रोनाल्डिन्होच्या अप्रतिम फ्री-किक गोलसमोर त्यांचा निभाव लागला नाही. त्यामुळे इंग्लंडचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला.

7 जून 2002 रोजी जपानमधील सप्पोरो येथे झालेल्या फिफा विश्वचषकातील ग्रुप एफ सामन्यात इंग्लंडचा डॅनी मिल्स आणि अर्जेंटिनाचा क्लॉडिओ लोपेझ धावताना.

फोटो स्रोत, Richard Sellers/Sportsphoto/Allstar via Getty Images

फोटो कॅप्शन, 7 जून 2002 रोजी जपानमधील सप्पोरो येथे झालेल्या फिफा विश्वचषकातील ग्रुप एफ सामन्यात इंग्लंडचा डॅनी मिल्स आणि अर्जेंटिनाचा क्लॉडिओ लोपेझ धावताना.

बीबीसी स्पोर्ट्सचे प्रमुख फुटबॉल प्रतिनिधी फिल मॅकनल्टी याबद्दल आठवण सांगतात की, "2002 च्या जपान विश्वचषकात सप्पोरो डोम (स्टेडियम) हे डेव्हिड बेकहॅम आणि इंग्लंडच्या दमदार पुनरागमनाचा ऐतिहासिक साक्षीदार ठरला."

"फ्रान्समध्ये 4 वर्षांपूर्वी अर्जेंटिनाविरुद्ध झालेल्या सामन्यात बेकहॅमला रेड कार्ड मिळालं होतं आणि अंतिम 16 मध्ये इंग्लंडला पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे दोन्ही संघांतील तणाव अजूनही कायम होता. यामुळे हा सामना प्रचंड तणावपूर्ण झाला होता."

"अखेरीस इंग्लंडने हा सामना 1-0 असा जिंकला. पहिल्या हाफच्या अखेरच्या मिनिटात डेव्हिड बेकहॅमने पेनल्टीद्वारे एकमेव गोल केला. मायकेल ओव्हनला मॉरिसिओ पोचेटिनोने (पोचेटिनो नंतर टॉटनहॅमचा व्यवस्थापक बनला) पाडल्यामुळे इंग्लंडला ही पेनल्टी मिळाली. परंतु, रेफ्रीच्या या निर्णयावरही मोठा वाद झाला होता."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)