हृदयाची धडधड सांगते तुमच्या आरोग्याची स्थिती; जाणून घ्या 'हार्ट रेट व्हेरिएबिलिटी'बद्दल

    • Author, जेमी दुशार्म
  • Published
  • वाचन वेळ: 9 मिनिटे

ह्रदयाच्या ठोक्यांमध्ये असणारे सूक्ष्म स्वरुपाचे चढउतार, तुमचं मानसिक आरोग्य, तणावाची पातळी आणि व्यायामाची क्षमता याविषयी संकेत देणारे उपयुक्त 'इंडिकेटर' ठरत आहेत. तुमचं वय वाढत असताना तुमचं आरोग्य किती चांगलं आहे म्हणजे तुम्ही किती चांगल्यारितीनं वयस्कर होत आहात, याचीही माहिती त्यातून मिळू शकते.

आर्टेम किरिलोव्ह हे स्वभावानं निवांत राहणाऱ्या, स्वस्थ बसणाऱ्या लोकांपैकी नाहीत. "मला थोडं अस्वस्थ वाटत असलं किंवा बरं वाटत नसलं, तरीदेखील मी स्वतःला पुश करतो," असं आर्टेम म्हणाले.

आर्टेम (40 वर्षे) लंडनमध्ये राहतात. ते हेल्थ टेक क्षेत्रात काम करतात. ते बऱ्याच काळापासून चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम करत आहेत.

जिममध्ये अधिक वेळ घालवला, अधिक वेळ व्यायाम केला म्हणजे त्यातून आपोआपच चांगले रिझल्ट मिळतील, असं त्यांना वाटत होतं. म्हणून त्यांनी विश्रांतीची आवश्यकता नाकारली. थकवा येत असूनही जिममध्ये व्यायाम करणं सुरू ठेवलं.

जोपर्यंत त्यांनी त्यांच्या ह्रदयाच्या ठोक्यांमधील बदलांकडे (हार्ट रेट व्हेरिएबिलिटी) लक्ष देण्यास सुरुवात केली नाही, तोपर्यंत हे त्यांनी सुरू ठेवलं. त्यांच्या स्मार्टवॉचद्वारे मागोवा घेतला जात असलेल्या आरोग्याविषयीच्या अनेक डेटा पॉईंट्सपैकी ह्रदयाचे ठोके हादेखील एक घटक आहे.

हार्ट रेट व्हेरिएबिलिटी हा ह्रदयाची गती किंवा ठोक्यांपेक्षा अधिक गुंतागुतीचा घटक आहे. ह्रदयाचे ठोके (हार्ट रेट) म्हणजे प्रति मिनिटाला ह्रदय किती वेळा धडधडतं. तर हार्ट रेट व्हेरिएबिलिटी म्हणजे ह्रदयाच्या ठोक्यांमध्ये किती प्रमाणात चढ-उतार होतात.

हार्ट रेट व्हेरिएबिलिटी आणि आरोग्याचा संबंध

अधिकाधिक संशोधनातून दिसून येतं आहे की हार्ट रेट व्हेरिएबिलिटी म्हणजे ह्रदयाच्या ठोक्यांमधील बदल हे ह्रदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्य, तणावाची पातळी, व्यायामाची क्षमता आणि इतर अनेक गोष्टींचे इंडिकेटर (सूचक) आहे.

याची माहिती नियमितपणे ट्रॅक करणाऱ्यांना फिटनेस किंवा व्यायामासंदर्भातील त्यांची दिनचर्या आणि जीवनशैली याबद्दल अधिक माहितीपूर्ण योग्य निर्णय घेता येतात.

व्यायामाला एक दिवस सुट्टी द्यावी की जिमममध्ये कठोर व्यायाम करावा, याबद्दल आर्टेम किरिलोव्ह जर द्विधा मन:स्थितीत असतील, ते त्यांच्या हार्ट रेट व्हेरिएबिलिटीबद्दलची माहिती लक्षात घेतात.

ही सवय लावल्यापासून, "मला अधिक संतुलित, स्थिर असल्यासारखं वाटतं आहे," असं ते म्हणाले.

ते या गोष्टीचे इतके समर्थक झाले आहेत की हार्ट रेट व्हेरिएबिलिटीचा डेटा वापरून तणाव ट्रॅक करण्यासाठी त्यांनी एक विशेष ॲपदेखील सुरू केलं आहे.

जसजसे वेअरेबल्स अधिकाधिक सर्वव्यापी होत आहेत आणि ह्रदयाच्या ठोक्यांमधील बदल, चढउतार यावरील संशोधनात वाढ होते, तसतसं हा डेटा ठेवण्यासाठी अधिकाधिक लोक आर्टेम किरिलोव्ह यांच्याशी जोडले जात आहेत, असं दीपक भट्ट म्हणाले. ते अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई फुस्टर हार्ट हॉस्पिटलचे संचालक आहेत.

मात्र, तुम्ही खरोखरंच हार्ट रेट व्हेरिएबिलिटीचा ट्रॅक ठेवण्याची आवश्यकता असते का आणि त्यामधून तुम्हाला काय समजतं? यासंदर्भात जाणून घेऊया.

हार्ट रेट व्हेरिएबिलिटी काय असते?

"ह्रदयाचे ठोके स्थिर आणि सामान्य पॅटर्नमध्ये असले पाहिजेत," असं भट्ट म्हणतात.

जेव्हा ह्रदयाचे ठोके खूपच अनियमित स्वरुपाचे असतात, तेव्हा त्याला 'अरिथमिया' असं म्हणतात. त्यात गंभीर स्थितीत ह्रदय निकामी होणं किंवा मेंदूच्या रक्तपुरवठ्यावर परिणाम होणं यासारखी गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

मात्र अगदी निरोगी ह्रदयाच्या बाबतीतदेखील ह्रदयाच्या ठोक्यांमधील वेळेत काही प्रमाणात फरक असतो, असंही भट्ट नमूद करतात.

हे फरक सूक्ष्म स्वरुपाचे असतात. ते मिलिसेकंदांमध्ये मोजले जातात. एक मिलिसेकंद म्हणजे सेकंदाचा हजारावा भाग. या पातळीवरील बदल लक्षात घेता, "सर्वसामान्यपणे कमी फरकापेक्षा जास्त फरक असणं अधिक चांगलं मानलं जातं", असं भट्ट म्हणाले.

हार्ट रेट व्हेरिबिएलिटी म्हणजे ह्रदयाच्या ठोक्यांमधील फरकाचा कोणताही एक आदर्श निकष नाही. तो वय, फिटनेसची पातळी, लिंग, ट्रॅकिंग डिव्हाईस आणि कॅल्क्युलेशन करण्याची पद्धत यानुसार बदलतो.

मात्र एका वेअरेबल ब्रँडच्या मते, ह्रदयाच्या ठोक्यांमधील सरासरी फरक, सक्रिय आणि आरोग्याविषयी जागरूक राहणाऱ्या पुरुषांमध्ये 65 मिलिसेकंद आणि महिलांसाठी 62 मिलिसेकंद असतो.

तर वयोगटानुसार विचार करता यातील तफावत मोठी आहे. म्हणजे 25 वर्षे वयाच्या व्यक्तीसाठी हा फरक सरासरी 78 असतो, तर 55 वर्षांच्या व्यक्तीसाठी हा फरक 44 असतो.

या आकड्यांमागील गणित गुंतागुंतीचं असतं. तरी तुम्ही त्यांना ह्रदयाच्या ठोक्यांमधील मिलिसेकंदांमधील वेळेच्या अंतरामधील सरासरी चढउतार किंवा फरकाचे अंदाजे आकडे समजू शकता.

हार्ट रेट व्हेरिएबिलिटी अधिक प्रमाणात मिळवण्यासाठी प्रयत्न करणं ही बाब कदाचित विरोधाभासी वाटू शकते. कारण विश्रांतीच्या वेळेस ह्रदयाचे ठोके किंवा त्यांची गती कमी असण्यातून दिसतं की त्या व्यक्तीचं ह्रदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्य चांगलं आहे.

मज्जासंस्थेच्या कार्यक्षमतेशी असलेला संबंध

मात्र तुमची मज्जासंस्था, तणावाला 'लढा किंवा पळा' असा प्रतिसाद देणं आणि विश्रांतीच्या स्थितीत 'विश्रांती आणि पचन' असा प्रतिसाद देणं, अशा दोन्ही स्थिती किती चांगल्या प्रकारे बदलते किंवा त्याच्याशी किती चांगल्या प्रकारे जुळवून घेते, हे हार्ट रेट व्हेरिएबिलिटी अधिक असण्यातून दिसून येतं. म्हणजे मज्जासंस्थेची कार्यक्षमता मोजण्याचा तो एक मार्ग आहे.

हे काम पुढीलप्रमाणे होतं. जर एखाद्या शिकारी प्राण्यापासून तुम्हाला वाचायचं असेल म्हणजे त्याच्यापेक्षा अधिक जोरात पळायचं असेल किंवा फक्त जॉगिंगला जायचं असेल, तर तुमची मज्जासंस्था अनेक प्रकारचे शारीरिक प्रतिसाद निर्माण करते. त्यातून तुम्हाला ऊर्जा आणि तीक्ष्णता मिळते. इतर परिणामांसोबतच, तुमच्या ह्रदयाचे ठोके वाढतात.

असं जेव्हा होतं, तेव्हा तुमची हार्ट रेट व्हेरिबिएलिटी कमी होते. कारण तुम्हाला कार्यरत ठेवण्यासाठी ह्रदयाला जलद आणि स्थिर गतीनं धडधडत राहावं लागतं.

जेव्हा तुमचं शरीर पुन्हा विश्रांतीच्या स्थितीत येतं, तेव्हा तुमच्या मज्जासंस्थेनं सर्वकाही पूर्ववत शांत केलं पाहिजे. या शिथिल किंवा विश्रांतीच्या स्थितीत तुमचं ह्रदय नैसर्गिकरित्या अधिक बदलत्या गतीनं धडधडतं म्हणजे ठोके अधिक बदलत्या गतीनं पडतात.

उदाहरणार्थ, तुम्ही श्वास घेता तेव्हा त्यांची गती थोडी वाढते. तर तुम्ही श्वास बाहेर सोडता, तेव्हा ती पुन्हा मंदावते.

सरासरी अधिक हार्ट रेट व्हेरिएबिलिटी दाखवते, "जेव्हा गरज असते तेव्हा तुमची प्रणाली (सिस्टीम) आसपासच्या वातावरणाशी किंवा परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी ह्रदयाची गती आणि रक्तदाब पटकन बदलू शकते," असं डेनिस लार्सन म्हणाले. ते जर्मनीतील कील विद्यापीठात पोस्टडॉक्टोरल रिसर्च फेलो आहेत.

त्यावरून असं दिसतं की, जेव्हा एखादी तणावाची स्थिती असते तेव्हा ती त्वरित सक्रिय होऊ शकते, तर जेव्हा तणावाची स्थिती नसते, तेव्हा ती पुन्हा शांत होऊ शकते.

तर दुसऱ्या बाजूला हार्ट रेट व्हेरिएबिलिटी कमी असण्यातून दिसून येतं की, तुम्ही एकाच स्थितीत अडकत आहात. सर्वसाधारणपणे किंवा बहुतांशवेळा, ती तणावाची 'लढा किंवा पळा' ही स्थिती असते.

आधुनिक जीवन हे वाहतूक कोंडीपासून ते कामाच्या 'डेडलाईन'पर्यंतच्या मज्जासंस्थेला उत्तेजित करणाऱ्या किंवा गतिमान करणाऱ्या तणावाच्या घटकांनी भरलेलं आहे.

एखाद्या इमारतीमधील स्वयंचलित तापमान नियंत्रण प्रणालीचा विचार करा. आदर्शरित्या इमारतीच्या आत तुम्हाला आरामदायी वाटावं यासाठी या प्रणालीनं बाहेरील वातावरणातील अगदी किरकोळ बदलांशीदेखील स्वत:ला जुळवून घेतलं पाहिजे.

मात्र जर ही व्यवस्था एकाच तापमानावर अडकून पडली, तर ती काही चांगली बाब नाही.

उदाहरणार्थ, वसंत ऋतूतील एखादा दिवस नेहमीपेक्षा अधिक उष्ण असतानाही ही तापमान नियंत्रण प्रणाली खूप जास्त उष्ण हवा बाहेर फेकत राहिली तर ते चांगलं असणार नाही.

तुम्हाला प्रचंड उकाडा जाणवेल, काहिली होईल (आणि तुम्हाला ती प्रणाली दुरुस्त करणाऱ्याला बोलवावं वाटेल).

तुमचं शरीरदेखील यापेक्षा वेगळं नसतं. जेव्हा तुमची प्रणाली योग्य ताळमेळात किंवा संतुलन स्थितीत असते, तेव्हा ती विविध अंतर्गत (शरीरातील) आणि बाह्य (वातावरणातील) सूचना किंवा संकेतांना पटकन आणि प्रभावी प्रतिसाद देणारी असायला हवी.

हार्ट रेट व्हेरिएबिलिटीमधून तुमच्या आरोग्याबद्दल काय समजतं?

ह्रदयरोगतज्ज्ञ तुमच्या ह्रदयाचं आरोग्य कसं आहे, ते कशाप्रकारे काम करतं आहे, याचं मूल्यांकन करण्यासाठी आणि आजाराबाबत धोक्याची चिन्हं शोधण्यासाठी हार्ट रेट व्हेरिएबिलिटी म्हणजे ह्रदयाच्या ठोक्यांमधील फरकाचा वापर करतात.

उदाहरणार्थ, भट्ट यांच्या संशोधनात म्हटलं आहे की, ॲट्रियल फायब्रिलेशन आहे की नाही हे पाहण्यासाठी हार्ट रेट व्हेरिएबिलिटीच्या माहितीची मदत होऊ शकते. ॲट्रियल फायब्रिलेशन हा अरिथमियाचा एक संभाव्य गंभीर प्रकार आहे.

काही खेळाडूदेखील हार्ट रेट व्हेरिएबिलिटीच्या माहितीचा वापर करतात. कठोर शारीरिक मेहनत घेतल्यानंतर त्यांचं शरीर किती चांगल्या प्रकारे सावरतं आहे, हे जाणून घेण्यासाठी ते याचा वापर करतात.

आदर्शपणे, खूप अधिक व्यायाम करताना हार्ट रेट व्हेरिएबिलिटी कमी झाली पाहिजे, मग नंतर पुन्हा वाढली पाहिजे.

जर जिममध्ये व्यायाम केल्यानंतर हार्ट रेट व्हेरिबिएलिटी काही दिवस कमीच राहिली, तर त्याचा अर्थ पूर्ण ताकद पुन्हा मिळवण्यासाठी शरीराला अतिरिक्त विश्रांतीची आवश्यकता आहे.

तणाव आणि मज्जासंस्थेचे आरोग्य दिसत असल्यामुळे हार्ट रेट व्हेरिएबिलिटी मानसिक आरोग्याचाही एक महत्त्वाचा इंडिकेटर आहे.

यासंदर्भातील 2023 च्या एका संशोधन आढाव्यातून असं आढळलं की, बहुतांश अभ्यासानुसार ज्या लोकांमध्ये चिंता आणि नैराश्य असतं, त्यांची हार्ट रेट व्हेरिएबिलिटी चिंता आणि नैराश्य नसलेल्या लोकांच्या तुलनेत कमी असते.

तीव्र स्वरुपाच्या चिंतेनं ग्रस्त असलेली व्यक्ती 'सतत तणाव किंवा दबावाच्या स्थितीत' असते, असं लार्सन म्हणतात.

"तिथे तुम्हाला हार्ट रेट व्हेरिएबिलिटीची पातळी सतत कमी झालेली दिसते," त्यातून संकेत मिळतो की त्याचं शरीर 'लढा किंवा पळा'च्या स्थितीत अडकलं आहे, असं ते म्हणतात.

मानसिक आजार, त्याच्याशी निगडीत उपचारांचा होणारा परिणाम

इतर संशोधनातून असं आढळून आलं आहे की, पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, डिमेन्शिया आणि स्किझोफ्रेनियासारखे आजार असलेल्या लोकांमधील हार्ट रेट व्हेरिएबिलिटी अनेकदा सामान्यपेक्षा कमी असते.

तसंच 2025 च्या एका संशोधन आढाव्यानुसार, काही प्रकरणांमध्ये मानसिक आजारांचं निदान झालेल्या लोकांना सायकोथेरेपी किंवा ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशनसारखे उपचार दिले जातात. त्यावेळेस त्यांच्या हार्ट रेट व्हेरिएबिलिटीमध्ये नंतर सुधारणा होते. त्यातून दिसतं की मज्जासंस्था अधिक चांगल्या प्रकारे काम करते आहे.

(मात्र, इतर अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, काही विशिष्ट अँटीडीप्रेसंट औषधांसारख्या मानसिक आजारांवरील उपचारांमुळे मज्जासंस्थेवरील त्यांच्या व्यापक परिणामांचा भाग म्हणून हार्ट रेट व्हेरिएबिलिटी कमी होऊ शकते.)

अर्थात, हे निष्कर्ष सावधगिरीनं स्वीकारले पाहिजेत. हार्ट रेट व्हेरिएबिलिटी आणि मानसिक आरोग्यावरील अनेक अभ्यास छोट्या स्वरुपाचे, पुनरावृत्ती न होणारे आणि या क्षेत्रातील एका सामान्य समस्येच्या अधीन आहेत. हार्ट रेट व्हेरिएबिलिटी मोजण्याचे अनेक मार्ग आहेत.

उदाहरणार्थ, हार्ट रेट व्हेरिबिलिटी वेगवेगळ्या कालमर्यादेमध्ये मोजली जाऊ शकते. म्हणजे फक्त 5 मिनिटांसाठीची हार्ट रेट व्हेरिबिलिटी मोजणं किंवा संपूर्ण दिवसभर त्यावर लक्ष ठेवणं.

तसंच काही उपकरणं इतर उपकरणांच्या तुलनेत अधिक अचूकदेखील असतात. त्यामुळे या मोजमाप किंवा निष्कर्षांबद्दल निश्चित मानकं ठरवणं देखील कठीण होतं.

मानसिक आरोग्याव्यतिरिक्त, तुम्ही किती चांगल्या प्रकारे वयस्कर होत आहात किंवा वय वाढत असताना तुमचं आरोग्य किती चांगलं आहे, हे देखील हार्ट रेट व्हेरिएबिलिटीमधून माहीत होऊ शकतं.

अभ्यासातून दिसून आलं आहे की, दीर्घकाळ तणावात राहिल्यामुळे शरीरात इन्फ्लेमेशन वाढतं. अनेक दीर्घकालीन आजारांमध्ये इन्फ्लेमेशनची भूमिका असते.

शरीर तणाव किती योग्य प्रकारे हाताळतं आहे, याचं मूल्यांकन करण्याचा हार्ट रेट व्हेरिएबिलिटी हा एक मार्ग आहे. त्यामुळे त्यातून इन्फ्लेमेशनची पातळी आणि परिणामी वाढत्या वयाशी संबंधित आजारांचा धोका वर्तवला जाऊ शकतो, अशा मुद्दा 2024 च्या एका संशोधन आढाव्यात मांडण्यात आहे.

हार्ट रेट व्हेरिएबिलिटी हे उपचाराचं लक्ष्य असू शकतं का?

काही संशोधकांना वाटतं की, हार्ट रेट व्हेरिएबिलिटीमध्ये हेतुपुरस्सर बदल केल्यास तो विविध मानसिक आणि शारीरिक आजारांवर उपचार करण्याचा एक प्रभावी मार्ग ठरू शकतो.

ब्रीथवर्क म्हणजे जाणीवपूर्वक लयीत आणि नियंत्रित स्वरुपात श्वास घेणं हा कदाचित हार्ट रेट व्हेरिएबिलिटीचं नियमन करण्याचा सर्वात सहज सोपा मार्ग आहे. कारण तुम्ही श्वास घेताना आणि सोडताना नैसर्गिकरित्या ह्रदयाची गती वाढते आणि कमी होत असते, असं टिम हर्झोग म्हणाले.

ते अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये परवानाधारक क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहेत. तसंच ते सर्टिफाईड बायोफीडबॅक तज्ज्ञ आहेत. ते उपकरणांच्या मदतीनं एखाद्याचा तणाव, वेदना कमी करण्याचं काम करतात, रुग्णांना मार्गदर्शन करतात.

हर्झोग सूचवतात की, लोकांनी दिवसातून दोनवेळा जवळपास 20 मिनिटांचा वेळ काढला पाहिजे. यावेळेत त्यांनी संथ आणि सजगपणे श्वासोच्छवास घेण्याचा सराव करावा. उदाहरणार्थ, 4 सेकंद श्वास आत घ्यावा आणि त्यानंतर 6 सेकंद श्वास बाहेर सोडावा.

अर्थात तरीसुद्धा, यासंदर्भात अधिक संशोधनाची आवश्यकता आहे. ब्रीथवर्कचा सराव करण्याचे याव्यतिरिक्त वेगवेगळे मार्ग आहेत. यातील सर्वोत्तम मार्ग कोणता हे तज्ज्ञांना ठरवावं लागेल. तरीदेखील, काही अभ्यासातून असं सूचवलं आहे की हा एक आश्वासक मार्ग आहे.

संशोधकांना आढळलं आहे की, जेव्हा पीटीएसडी आणि नैराश्य यासारखे मानसिक आजार असलेले लोक, त्यांची हार्ट रेट व्हेरिएबिलिटी वाढवण्यासाठी सजगपणे, नियंत्रितपणे श्वासोच्छवासाचा सराव करतात, तेव्हा त्यांच्या मानसिक आजाराची लक्षणंदेखील कमी होण्याची शक्यता असते.

बहुतांश अभ्यास छोट्या आणि प्राथमिक स्वरुपाचे असले तरी या मानसिक आरोग्याच्या क्षेत्राबाहेर करण्यात आलेल्या इतर अभ्यासांमध्ये असं दिसून आलं आहे की, अशाप्रकारे ब्रीथवर्क किंवा श्वासोच्छवास केल्यामुळे चांगली झोप येते, रक्तदाब कमी होतो आणि दीर्घकालीन वेदना कमी होतात.

मात्र, हार्ट रेट व्हेरिएबिलिटीमध्ये मुद्दामहून बदल करण्याची आवश्यकता आहे, असं सर्वच वैज्ञानिकांना वाटत नाही.

लार्सन यांना हार्ट रेट व्हेरिएबिलिटी "हे मूळ कारणं काय आहेत, हे पाहण्यासाठीचं एक मापक" वाटतं. मात्र त्यावर थेट उपचार करण्याची त्यांना आवश्यकता वाटत नाही.

भट्ट यावर सहमत आहेत. लोक जेव्हा व्यायाम करणं किंवा नियमित झोप घेणं यासारख्या आरोग्यदायी गोष्टी करू लागतात, तेव्हा हार्ट रेट व्हेरिएबिलिटीमध्ये अनेकदा सुधारणा होते. मात्र "ते अंड आधी की कोंबडी आधी या प्रश्नासारखी बाब आहे. हार्ट रेट व्हेरिएबिलिटीमध्ये बदल होणं ही स्वत:च महत्त्वाची गोष्ट आहे का? की ही सुधारणा कशामुळे झाली हे महत्त्वाचं आहे?" असं ते म्हणाले.

हार्ट रेट व्हेरिएबिलिटी कशी मोजली पाहिजे?

अनेक ग्राहकोपयोगी वेअरेबल्स हार्ट रेट व्हेरिएबिलिटी मोजतात. मात्र काही उपकरणं इतरांपेक्षा लक्षणीयरित्या अचूक असतात, असा इशारा केरिन स्टीअर देतात. त्या अमेरिकेतील वॉशिंग्टनमधील पजेट साऊंड विद्यापीठात सहयोगी प्राध्यापिका आहेत. त्यांच्या संशोधनात म्हटलं आहे की, मनगटावर उपकरण घालण्याची पद्धत प्रचलित आहे. मात्र त्यापेक्षा छातीभोवती बांधली जाणारी उपकरणं अधिक चांगलं काम करतात.

तुम्ही कोणत्याही प्रकारचं वेअरेबल किंवा उपकरण वापरत असा, लक्षात ठेवा की हार्ट रेट व्हेरिएबिलिटी कोणत्यातरी एका क्षणी तपासण्यापेक्षा कालांतरानं तपासणं सर्वाधिक उपयुक्त ठरतं, असं त्या म्हणाल्या.

हार्ट रेट व्हेरिएबिलिटी दिवसभरात बदलत असते. तुम्ही जेव्हा आराम करत असता त्यातुलनेत तुम्ही धावायला बाहेर पडता, तेव्हाची हार्ट रेट व्हेरिएबिलिटी नैसर्गिकरित्या वेगळी असेल. त्यामुळे तुम्ही एकदाच त्याची माहिती घेण्याऐवजी कालांतरानं त्यात होणारे बदल पाहणं अधिक महत्त्वाचं आहे. म्हणजे जर तुम्ही हार्ट रेट व्हेरिएबिलिटी कधीतरी एकदाच पाहिली तर त्यातून तुम्हाला कमी माहिती मिळेल. तर कालांतरानं त्यात कसा बदल होतो हे पाहिल्यास अधिक माहिती मिळेल.

"दररोज सकाळी, तुम्ही हार्ट रेट व्हेरिएबिलिटी पाहा. ती कशी आहे ते पाहा आणि मग त्याच्याआधी काय घडलं याचा विचार करा. रात्री माझी छान झोप झाली होती? आदल्या रात्री मी वाईन प्यायलो होतो का?" असं स्टीअर म्हणाल्या.

कालांतरानं, तुमची बेसलाईन म्हणजे तुमच्या हार्ट रेट व्हेरिएबिलिटीची मूळ स्थिती आणि त्यात तुमचं आरोग्य आणि वर्तन यानुसार कसे बदल होतात, याची तुम्हाला कल्पना येते. त्यानंतर तुम्ही त्या माहितीचा वापर निर्णय घेण्यासाठी आणि प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी करू शकता, असं हर्झोग म्हणतात.

कदाचित तुम्हाला आळस किंवा सुस्ती आली असेल आणि तुमच्या हार्ट रेट व्हेरिएबिलिटीची माहिती दाखवत असेल की तुमच्या शरीरावर अधिक ताण आला आहे आणि त्याला विश्रांतीची आवश्यकता आहे. किंवा कदाचित तुम्ही एखादा नवीन व्यायाम सुरू केला असेल आणि त्यातून तुम्हाला अजून परिणाम दिसत नसतील.

हार्ट रेट व्हेरिएबिलिटीव्यतिरिक्त महत्त्वाचे सोपे घटक

व्यायामामुळे हार्ट रेट व्हेरिएबिलिटीमध्ये सुधारणा होते. त्यामुळे हार्ट रेट व्हेरिएबिलिटीमध्ये वाढ झाल्यामुळे तुम्ही केलेला व्यायाम खरोखरंच परिणामकारक ठरतो आहे, असं प्रोत्साहन तुम्हाला मिळू शकतं.

उलट त्याचा मागोवा ठेवल्यामुळे लोकांची "वैयक्तिक जागरुकता खरोखरंच वाढते", असं हर्झोग म्हणतात.

हे सर्व जर तुम्हाला खूप जास्त, दडपण आणणारं वाटत असेल? तर त्याबद्दल चिंता करू नका किंवा त्याचा ताण घेऊ नका, असं भट्ट म्हणाले.

जे लोक त्यांच्या आरोग्याशी संबंधित माहितीचा मागोवा घेण्यास खूप प्रेरित असतात, त्यांच्यासाठी हार्ट रेट व्हेरिएबिलिटी उपयुक्त किंवा कुतुहलाची बाब ठरू शकते.

मात्र भट्ट यांना वाटतं की, हार्ट रेट व्हेरिएबिलिटीपेक्षा समजण्यास अधिक सोपे असे अनेक घटक किंवा मापक आहेत. कदाचित ते अधिक महत्त्वाचे आहेत.

उदाहरणार्थ, ह्रदयाची गती किंवा ठोके, रक्तदाब, वजन, कमरेचा घेर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी.

"प्रत्येक प्रौढ व्यक्तीला याबद्दलची आकडेवारी माहीत असली पाहिजे. बहुतांश लोक अगदी तेवढंदेखील करत नाहीत," असं भट्ट म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)